मधुरा नेरुरकर, योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर
२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर उत्साहात साजरा केला जातो. पण सध्या योग म्हणजे फक्त योगासने आणि प्राणायाम एवढाच मर्यादित अर्थ प्रचलित होतो आहे. याच्यापलीकडे विचार करता योग ही एक जीवनपद्धती आहे हे जाणून घेणं गरजेचं ठरतं.
२१ जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर उत्साहात साजरा केला जातो. काही वर्षांपासून सर्वसामान्यांपासून तर अगदी सेलिब्रेटींपर्यंत सगळ्यांमध्ये योग दिनाची क्रेझ वाढताना दिसते आहे. यानिमित्ताने सकाळी ठिकठिकाणी सामूहिक योग शिबिरं, व्याख्यानं आयोजित होतात. ध्यान करतानाचे फोटो क्लिक करून डीपीवर मिरवले जातात. योगासन करतानाच्या फोटोंचा सोशल मीडियावर पूर येतो. ‘योगा डे’चा हॅशटॅग दिवसभर टॉप ट्रेण्डिग असतो. बऱ्याचदा वर्षभर योग न करणारी मंडळीदेखील यात हौस भागवून घेतात. पण यानिमित्ताने योग फक्त एक दिवस करायची हौस आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. ट्रेण्डिग असूनही योगबद्दल असणारे गैरसमजदेखील यानिमित्ताने अधिक ठळक होतात.
बऱ्याच लोकांना योग म्हटलं की डोळ्यासमोर खिळ्यावर झोपणारे, जंगलात राहणारे साधू डोळ्यासमोर येतात. तर काहींना हातापायाचा गुंता करणारी आसनं आणि नाक-तोंड बंद करून श्वास कोंडणं म्हणजे योग वाटतो. काहींना हा फक्त शारीरिक व्यायाम वाटतो तर काहींना फक्त बौद्धिक बडबड. काहींना ही खूप क्लिष्ट प्रक्रिया वाटते. तर काहींच्या मते हे फारच सोपं प्रकरण आहे. रोज ५-१० मिनिटं हातपाय हलवले आणि डोळे मिटले की झाला ‘योगा’. अनेकदा तरुणाईसाठी सोशल मीडियावर ट्रेण्डिग राहण्यापुरताच योग मर्यादित राहतो. काहींना योग लाख दुखो कि एक दवा वाटतं तर काहींना हल्लीचं नवं खूळ. या सगळ्या पार्श्वभूमीवर योग दिनाच्या निमित्ताने योग म्हणजे नेमकं काय, योगाचा इतिहास आणि हल्लीचं स्वरूप हे जाणून घेणं गरजेचं ठरतं.
‘योग’ ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. जेव्हापासून भारतीय संस्कृती आहे तेव्हापासूनच योग आहे असे म्हणता येईल. याचा पुरावा म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या अवशेषात विविध योगासनातील मातीच्या अनेक मूर्त्या आणि इतर योगविषयक प्रतीकं आढळून आली आहेत. योग म्हटलं की फक्त पतंजली हे नाव डोळ्यासमोर येतं, पण त्याआधीपासून योगाची प्रदीर्घ परंपरा आहे. योग म्हणजे फक्त योगासने आणि प्राणायाम एवढाच मर्यादित अर्थ प्रचलित होतो आहे. वास्तवात ही योगाच्या अनेक परंपरांपैकी एका अष्टांगयोगातील घटक अंगं आहेत. याच्यापलीकडे विचार करता योग ही खरं तर जीवनपद्धती आहे. यात मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान, नीतिशास्त्र व अध्यात्म यांचा अनोखा समन्वय साधला गेला आहे.
इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात सूत्रबद्ध झालेला पतंजली यांचा ‘योगसूत्रे’ हा ग्रंथ योगदर्शनाचा सध्या उपलब्ध असणारा सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणत येईल. समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद आणि कैवल्यपाद अशा चार भागांत १९५ सूत्रांतून पतंजलींनी योगविषयक तत्त्वज्ञान सुसूत्रपणे मांडलं आहे. विशेष म्हणजे आज प्रचलित एकाही योगासनाचा उल्लेख योगसूत्रात नाही. सुखकारक आणि स्थिर शरीरस्थिती म्हणजे योगासन इतकीच सोपी व्याख्या यात आढळते. हठयोगप्रदीपिका, घेरंडसंहिता, योगतारावली अशा इतर ग्रंथांत विविध आसनं, प्राणायामाचे प्रकार, शुद्धीक्रिया यांची सखोल चर्चा आहे. स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, श्री अरबिंदो, जे. कृष्णमूर्ति, आचार्य रजनीश, महेश योगी, आचार्य गोयंका अशा अनेक योग्यांनी आधुनिक काळात विविध माध्यमांतून योगाला पुनरुज्जीवित केलं.
पारंपरिक पद्धतीने योग चालत राहिला तसेच त्यात काही आधुनिक बदलदेखील झाले. अनेक आधुनिक योग्यांनी योगाचे मूलभूत सिद्धांत कायम ठेवत त्याला नवीन आयाम देत ‘मॉडर्न योग’ आकारास आणला. बिक्रम चौधरी यांनी विकसित केलेल्या ‘बिक्रम योगा’मध्ये एका बंद खोलीत ४० अंश सेल्सियस तापमानात आसनं केली जातात म्हणून याला ‘हॉट योगा’ म्हणूनदेखील ओळखलं जातं. बी. के. एस. अय्यंगार यांनी विकसित केलेल्या ‘अय्यंगार योग’मध्ये दोऱ्या, काठी, बेल्ट अशा साधनांची मदत घेत आसनं केली जातात.
योग म्हणजे नेमके काय हे जाणून घ्यायला योग शब्दाच्या व्याख्या उपयोगी पडतात. संस्कृतमधील युज धातूपासून योग शब्द बनला आहे. याचे जोडणं, एकत्र आणणं, ताब्यात ठेवणं असे अर्थ आहेत. इकडेतिकडे भरकटलेल्या मनाला शरीराशी जोडणे आणि जोडून ठेवण्याची सवय लावणं ही योगाची सोपी व्याख्या. थोडक्यात, योग म्हणजे ‘टू कनेक्ट’. आजच्या मल्टिटास्किंग जीवनशैलीत मन सतत भिरभिरत असताना ही व्याख्या अधिकच गरजेची ठरते. जेवताना समोर टीव्ही, व्यायाम करताना कानाला हेडसेट, अगदी मित्राशी गप्पा मारतानादेखील हातातल्या मोबाइलवर रिल्स पाहणं असं सगळं चालू असताना आपलं लक्ष त्या कामात नसतंच मुळी. अटेंशन स्पॅन तर इतका कमी झाला आहे की, १० सेकंदांच्या आतच रील स्वाइप अप केले जातात. एका बैठकीत पुस्तक वाचून संपवणं, तहानभूक विसरून एखाद्या कलेत मग्न होणं, देहभान न राहता खेळण्यात मग्न होणं अशा गोष्टी जणू आता इतिहासजमा होत आहेत. सतत काही नवं हवं, सतत काही ट्रेण्डिग हवं, कारण मनाला शरीराशी ‘कनेक्ट’ राहण्याची सवय कमी होते आहे. अशा वेळी योग मदतीला येतो. दिवसातल्या थोड्या वेळासाठी का होईना एका ठिकाणी शांत बसलं की मन हळूहळू कनेक्ट होऊ लागतं, शांत होऊ लागतं.
पतंजली म्हणतात तसं मनात उठणाऱ्या विचारांच्या, भावनांच्या तरंगांना शांत करणं म्हणजे योग- ‘योगश्चित्तवृत्त निरोध:’ यासाठी शरीराच्या काही क्रिया करत स्थिर राहणं आणि श्वासावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवणं उपयोगी ठरतं. हेच योगासन आणि प्राणायाम. पण सकाळी एकदा काही वेळ योगासनं करून भागत नाही. शरीर-मनाचं हे कनेक्शन दिवसभर प्रत्येक कामात जपता येणं अपेक्षित आहे. अगदी जेवणं, झोपणं, व्यायाम करणं अशा दैनंदिन क्रिया असोत किंवा कॉलेजचा अभ्यास, ऑफिसमधलं काम असो. प्रत्येक गोष्ट मन लावून आणि अगदी १०० टक्के देऊन करायची मनाला हळूहळू सवय लागते. ‘कुशल चितैकग्गता योग:’ मनाची अशी एकाग्रता म्हणजे योग असं बौद्ध तत्त्वज्ञानात म्हटलं आहे. मन शांत असल्याने कुठलेही ताणतणाव येत नाहीत. असा माइंडफुलनेस जपला की रोजची कामं परफेक्ट व्हायला लागतात. वर्क-लाइफ हा बॅलन्स साधायची युक्ती योग शिकवते. ‘योग: कर्मसु कौशलम’ म्हणत गीतेने योगाला हा व्यावहारिक आयाम दिला आहे.
फक्त माइंड-बॉडी कनेक्शन एवढ्यापुरताच योग मर्यादित राहत नाही. आपण ज्या समाजात राहतो, त्याच्याशी जोडलं जायला योग शिकवतो. यासाठी स्वत: पाळायची नैतिकतेची पथ्यं (नियम) आणि समाजात इतरांशी कसं वागावं याची आचारसंहिता (यम) योग शिकवतं. अष्टांगयोगात यम आणि नियम हे घटक आसन आणि प्राणायाम यांच्या आधी येतात. ‘अहिंसा’ (non- violence) म्हणजे फक्त शरीरानेच नाही तर शब्दाने आणि अगदी विचारांनी देखील कोणालाही विनाकारण न दुखावणं. कॉलेजमधलं रॅगिंग, बुलिंग असो किंवा ऑफिसमधले निरर्थक हेवेदावे ‘अहिंसा’ या यमाच्या पालनाने नक्कीच थांबू शकतात. ‘सत्य’ ( Truthfulness) पालनातून अभ्यास किंवा कामात प्रामाणिकपणा आणि सचोटी यायला लागते. सोशल मीडियावरील वायरल पोस्ट असो की कोणाविषयीचं गॉसिप. आधी सत्यता पडताळून पाहण्याची दृष्टी यातून मिळते.
‘अपरिग्रह’( Non- Possessiveness) अनावश्यक बाबींचा साठा कमी करायला शिकवतो. मोबाइलमधला जंक डेटा असो की बुकशेल्फमधली उगाच जमवलेली पुस्तकं. जेवढं लागतं तेवढंच ठेवायची यातून सवय लागते. आणि मग जे अधिक आहे ते ‘शेअर’ होऊ लागतं. स्क्रीन टाइम किंवा डायटिंग, ‘ब्रह्मचर्य’ (Moderation) हा यम संयम आणि नियमन शिकवतो. जे आपलं नाही ते न घेणं म्हणजे ‘अस्तेय’ (Non- Stealing). यातून इतरांच्या कामाचं, कल्पनांचं श्रेय त्यांना द्यायची सवय लागते. जे आपलं नाही ते मिळवण्यासाठी चाललेली ‘रॅट रेस’ थांबते.
‘नियम’ हे वैयक्तिक आचरणाविषयी मार्गदर्शन करतात. ‘शौच’ (cleanliness) हा नियम फक्त स्वत:चे शरीरच नाही तर आपली रूम, आपलं घर, ऑफिस/ कॉलेज, आपला परिसर यांची सतत स्वच्छता राखण्याविषयी आग्रही ठरतो. ‘संतोष’ (Contentment) या नियमातून जे मिळालं आहे त्याविषयी कृतज्ञतेची भावना (Gratitude) येऊ लागते. ‘शर्माजी के बेटे’शी होणारी अनावश्यक तुलना थांबते. झाडाला आलेलं पहिलं फुल, रिक्षात ऐकलेलं छानसं गाणं अशा छोट्या छोट्या गोष्टींत आनंद मिळू लागतो. रोजच्या जीवनात शिस्तदेखील गरजेची ठरते. ‘तप’ (Discipline) हा नियम दिनचर्या, व्यायाम, डाएट, अभ्यास यांचं शेड्युल काटेकोरपणे पाळायला प्रोत्साहित करतो. आपलं ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी रोज काही वेळ तरी एखादे स्किल शिकणं, पुस्तक वाचणं असे प्रयत्न म्हणजे ‘स्वाध्याय’ (Self- Study). योगातून आपली दृष्टी व्यापक होऊन विश्वाच्या अफाट पसाऱ्याची जाणीव झाली की आपले प्रॉब्लेम अगदी क्षुल्लक वाटू लागतात. ईश्वर प्रणिधान (self- surrender to Universe) या नियमातून जे मिळालं आहे आणि जे सोडून गेलं आहे दोघांचा सारखाच स्वीकार करण्याची वृत्ती मिळते. ‘मेरा वचन ही शासन’ हा अहंभाव नाहीसा होत सगळ्यांच्या मतांचा आदर होऊ लागतो.
व्यक्तीचं कुटुंबाशी, कुटुंबाचं समाजाशी, समाजाचं संपूर्ण सृष्टीशी जोडलं जाणं इतका व्यापक अर्थ ‘योग’ या शब्दात आहे. अर्थातच, हे सगळं एका दिवसात व्हायला योग म्हणजे जादूची कांडी नाही. दिवसातून काही वेळ योगासनं, प्राणायाम, ध्यान यांचा अभ्यास आणि दिवसभर यम-नियमांचं पालन यांच्यात सातत्य अपेक्षित आहे. यातून गीतेत ‘युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु’ असं जे म्हटल्याप्रमाणे व्यक्तीच्या आहार-विहार, रोजच्या कामात अगदी करमणुकीत देखील बॅलन्स येऊ लागतो. म्हणूनच योग फक्त व्यायामाचा प्रकार नसून रोज जगायची जीवनशैली ठरते. योग दिन फक्त त्याची आठवण करून देण्याचं एक निमित्त आहे.
योगाचे शारीरिक, मानसिक फायदे लक्षात घेत जागतिक पातळीवर योग स्वीकारला गेला आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. याला मान्यता मिळून आता जगभर हा दिवस साजरा केला जातो. सध्याच्या काळात तणावग्रस्त जीवन, दुभंगलेली नाती, मानसिक अस्वस्थता, निसर्गाची हानी अशा वि‘योग’ परिस्थितीत योगाचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं. या पार्श्वभूमीवर योग दिन एका दिवसाचा सोहळा न ठरता ही जीवनशैली अंगीकारायचा आरंभ दिन ठरवा याच योग दिनाच्या शुभेच्छा!
viva@expressindia.com