लहानपण म्हणजे खेळण्याचा आणि विविध गोष्टी अनुभवण्याचा काळ. अनेकांसाठी खेळणी, टीव्ही बघणं ही लहानपणीची आवड असते, पण काहींच्या मनात निसर्ग, जंगल आणि प्राणी यांचं वेगळंच स्थान असतं. अशीच तिचीही एक आगळीवेगळी आवड होती. लहानपणापासून असलेली ही आवड तिला प्राणिशास्त्र या विषयाच्या अभ्यासापर्यंत घेऊन गेली. जाणून घेऊया याच निसर्गप्रेमातून कीटकशास्त्रज्ञ होण्याची वाट सापडलेल्या डॉ. स्नेहल लोंढे हिचा प्रवास…

मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी दोडामार्ग येथील डॉ. स्नेहल लोंढे हिला लहानपणापासून जंगलं, वन्यप्राणी यांची आवड. जेव्हा जेव्हा गावाला जाणं होतं तेव्हा या गोष्टी तिला अधिक आकर्षित करतात, असं ती सांगते. हीच आवड तिने पुढे जपायची ठरवली. स्नेहलने मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून प्राणिशास्त्रात पदवी घेतली आणि प्राणी शरीरशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. प्राणिशास्त्राचं शिक्षण घेत असताना स्नेहलने कीटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास केला आणि त्यात तिला रस निर्माण झाला. या विषयावरच्या अभ्यासासाठी तिने असंख्य राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांना भेटी दिल्या. ज्यामुळे तिला पक्षी विज्ञान आणि वन्यजीव छायाचित्रण या दोन अन्य वेगळ्या विषयांमध्ये गोडी निर्माण झाली. या आवडीमुळेच ‘नेचर अँड लँडस्केप’ या छायाचित्रण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी प्रवृत्त झाले, असं स्नेहल सांगते. विल्सन महाविद्यालयात असताना या स्पर्धेत तिने पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणादरम्यान द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिकं पटकावली.

‘मी जेव्हा पीएचडीसाठी काम करायला सुरुवात केली, तेव्हा या विषयांच्या आकर्षणाचा परिणाम माझ्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक प्रगतीमध्ये झाला. प्रा. डॉ. अलका के. चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाच्या ‘द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई’ येथे प्राणिशास्त्र विषयात मी सुरुवातीला जैवविविधता किंवा प्राण्यांच्या वर्तनावर संशोधन करण्याचं ठरवलं होतं, परंतु प्राण्यांऐवजी कीटकांच्या संशोधनावर मी लक्ष केंद्रित करावं असं चौगले यांनी सुचवलं. मानवी समाजाला फायदेशीर ठरू शकतील, अशा पद्धतीच्या विषयांवर संशोधन वा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. किंबहूना, कोणत्याही संशोधनाचं उद्दिष्ट हे समाजासाठी उपयुक्त गोष्टींचा शोध घेणं हेच असतं, असं त्यांनी समजावून सांगितलं. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर मीही विचारपूर्वक रेशीम कीटक, बॉम्बिक्स मोरी एल आणि रेशीम उत्पादनाच्या अल्ट्रास्ट्रक्चर आणि बायोमोलेक्यूल्सवरील चुंबकीय प्रभाव यावर संशोधन करण्यास सुरुवात केली’ असं स्नेहलने सांगितलं. या संशोधनादरम्यान रेशीम ग्रंथीवरील चुंबकीय क्षेत्र (म्हणजे रेशीम कीटक बॉम्बिक्स मोरी एलचे रेशीम उत्पादन करणारे अवयव) हे जैव रेणू, अल्ट्रास्ट्रक्चर, एन्झाइम्स, रेशीम उत्पादन आणि कोकूनच्या आर्थिक वैशिष्ट्यांवर प्रभाव पाडते, असे निरीक्षणाअंती दिसून आले, असं सांगणाऱ्या स्नेहलने प्रा.डॉ. अलका के. चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली याच विषयावरचे चार शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत.

कीटकशास्त्रात कीटकांची शरीररचना, जीवनचक्र, त्यांच्या सवयी आणि त्यांच्या वागणुकीचा अभ्यास केला जातो. निसर्गातील जैवविविधता आणि अन्नसाखळी यातही कीटकांचं महत्त्वाचं योगदान असतं. आणि म्हणून ते खोलात समजून घेणं गरजेचं आहे. कधी कधी कीटकशास्त्रज्ञ जंगलात किंवा शेतात कीटक गोळा करून प्रयोगशाळेत त्यांचं निरीक्षण करतात. त्यामुळे ही एक खूपच गुंतागुंतीची, पण रंजक शाखा असल्याचं ती सांगते.

रेशीम कीटक बॉम्बिक्स मोरी एलच्या रेशीम ग्रंथीमधील जैव-रेणू आणि हिस्टोलॉजीवरील चुंबकीय क्षेत्र या डॉ . स्नेहलने केलेल्या अभ्यासातून असे दिसून आलं आहे की, चुंबकीय क्षेत्र प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि एन्झाइम पातळीच्या वाढीवर प्रभाव टाकतात, परिणामी रेशीम उत्पादकता वाढते. रेशीम शेती हे एक कृषी-आधारित क्षेत्र आहे, ज्यात रोजगाराची लक्षणीय क्षमता आहे. उच्च दर्जाच्या रेशीम उत्पादनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. शिवाय, शाश्वत जीवनाचा पर्याय वास्तवात आणणंही शक्य होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना चालना देणारं रेशीम संशोधन हे एका अर्थी मानवी समाजाच्या विकासासाठी प्रोत्साहन देणारं आहे, असं मत डॉ. स्नेहल लोंढे यांनी मांडलं.

हे संशोधन ग्रामीण भागातील लोकांचं, विशेषत: महिलांचं सक्षमीकरण करतानाच पर्यावरण संरक्षण आणि अन्न सुरक्षेलाही चालना देते. त्यामुळे एकीकडे लहानपणापासून असलेली निसर्गाची आवड, संशोधन करण्याचं आणि याच विषयात पीएचडी मिळवण्याचं पाहिलेलं स्वप्न या सगळ्याची सांगड घालणारं काम मला करायचं होतं. माझ्या संशोधनातून समाजासाठी काहीतरी उपयुक्त ठरेल असं काम करण्याची माझी इच्छाही पूर्ण झाली. त्यामुळे एक संशोधक म्हणून आवड आणि ध्येय यांची सांगड घालणारं काम मला करायला मिळतं आहे, याचा अधिक आनंद वाटतो असं सांगणाऱ्या स्नेहलचा हा ध्येयवादी प्रवास युवा मनांना मार्गदर्शक ठरेल असा आहे.

viva@expressindia.com