लहानपणापासूनच तिला समुद्राची ओढ होती. शाळेला सुट्टी पडली की तिची पहिली धाव समुद्रकिनारी असायची. शंख, शिंपले गोळा करता करता त्या लहानग्या मुलीचे समुद्राशी एक वेगळेच नाते निर्माण झाले. बालपणी समुद्रकिनारी बागडणारी मुंबईची प्राची हाटकर आता ‘सागरी संशोधक’ म्हणून कार्यरत आहे. जंगल सफारी करणं, प्राणिसंग्रहालयात जाऊन तेथील प्राण्यांना पाहणं, झाडंझुडपं, पक्षीदर्शन हे सगळं विलक्षण आनंद देणारं असतं. पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत जागरूक होत असलेली युवा पिढी यापलीकडे जाऊन अभ्यास-संशोधनाच्या माध्यमातून वन्यप्राण्यांचे जीवन, त्यांची वैशिष्ट्ये, वनस्पती-प्राणी यांच्या विविध प्रजाती आणि अशा विविध निसर्गसंपत्तीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते आहे. जंगल नावाचं खुलं पुस्तक उघडून पाहणाऱ्या आणि त्यातल्या अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या युवा संशोधकांविषयी ‘जंगल बुक’ या सदरातून जाणून घेता येणार आहे. प्राची हाटकर ही मूळची मुंबईची. समुद्रकिनारी रमण्याची आवड तिला होतीच, शिवाय पर्यावरणाचीही विशेष आवड होती म्हणून प्राचीने ‘झुओलॉजी’ या विषयातून शिक्षण घ्यायचे ठरवले. ठाकूर महाविद्यालयातून तिने झुओलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिच्यापुढे शिक्षिका व्हायचे की संशोधक, असे दोन पर्याय होते. मात्र तिने संशोधनाची शिक्षण क्षेत्राशीच एका वेगळ्या अर्थाने जोडली गेलेली वाट निवडली. संशोधक म्हणून करिअर करण्याचा निर्णय तिने घेतला. मात्र, कधीकाळापासून तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला समुद्र पुढे तिच्या करिअरसाठीही महत्त्वाचा ठरला.

त्या वेळी ‘एंडोक्रीनॉलॉजी’ या विषयातून मास्टर्स करणे तिला शक्य होते. तिने मात्र ‘ओशनोग्राफी’ हा पर्याय स्वीकारून त्यात पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या याच विषयातून ती पीएच.डी. देखील करते आहे. पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर प्राचीची ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ या संस्थेत इंटर्नशिपसाठी निवड झाली. इंटर्नशिपचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्याच संस्थेत नोकरी करायची संधी तिला मिळाली. इथून पुढे प्राचीच्या संशोधन पर्वास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

महाराष्ट्रात काही किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालतात. ही समुद्री कासवे अनेकदा मृतावस्थेत आढळतात. याची कारणे विविध असतात. नैसर्गिक कारणे किंवा मानवी हस्तक्षेप अशा कोणत्याही कारणामुळे कासवांचा मृत्यू होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन कासवांच्या मृत्यूचे ठिकाण, त्यामागची कारणे कोणती असू शकतील आणि त्यांची संख्या याबाबत अभ्यास-संशोधनातून एक विस्तृत अहवाल प्राचीने तयार केला. तिचा हा संशोधन अहवाल २०२४ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल एका मुक्त प्रवेश असलेल्या जैविक विज्ञानावर आधारित जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालामुळे समुद्री कासवांसाठी भविष्यात बचाव केंद्र किंवा उपचार केंद्राची निर्मिती करण्यास मदत होऊ शकते. ज्यामुळे कासवांना इतर कुठेही न नेता तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि कासवाचे प्राण वाचतील. इतकेच नाही तर सर्वात दुर्लक्षित केला गेलेला विषय म्हणजे ‘समुद्री गवत’ यावरही प्राचीचा अभ्यास सुरू आहे. कासव संशोधनाबद्दलची तिची भूमिकाही तिने स्पष्ट केली. ‘मी कासव संशोधन करताना अनेक अविस्मरणीय अनुभव घेतले. कासवांसारख्या प्रजाती त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, एका अभ्यासादरम्यान मला एका सागरी कासवाने समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी केलेली संघर्षमय यात्रा अनुभवण्याची संधी मिळाली. त्या क्षणी त्यांच्या जगण्याची लढाई आपल्या पर्यावरण संवर्धनाशी किती घट्ट जोडलेली आहे, याची जाणीव झाली’ अशा शब्दांत प्राचीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉल्फिनप्रमाणेच समुद्री गाय (डुगाँग) हादेखील सस्तन प्राणी असल्याचे सुरुवातीला प्राचीला माहीत नव्हते. याबाबत माहिती झाल्यानंतर तिने या विषयावर काम करण्यास सुरुवात केली. आता समुद्री गायीच्या संवर्धन आणि अधिवासासाठी ती काम करते. याच समुद्री गायींच्या संवर्धनासाठी प्राची ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेबरोबर संशोधनाचे काम करते आहे. समुद्री कासवांप्रमाणेच सागरी सस्तन प्राण्यांविषयीचे संशोधनदेखील करायचे असल्याचे प्राचीने सांगितले. ‘सागरी जैवविविधता टिकवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच संवेदनशीलताही महत्त्वाची आहे. सागर आणि त्यातील जीवसृष्टी ही आपल्या अस्तित्वाचा महत्त्वाचा आधार आहे, त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवायला हवा’ असे आवाहन तिने तरुण संशोधकांना केले.

प्राचीला ‘ओशन कन्झर्व्हेशनिस्ट’ म्हणून नामांकन मिळाले आहे. वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याण संघटना या स्वयंसेवी संस्थेकडून धवल स्मृती वन्यजीव तारणहार पुरस्कारही तिला प्राप्त झाला आहे. तसेच महिला डायव्हर्स हॉल ऑफ फेम २०२० कडून ओपन वॉटर स्कूबा प्रमाणपत्रासाठी शिष्यवृत्तीदेखील प्राचीला मिळाली आहे. केटीके फाउंडेशन, नवी दिल्ली कॅम्पसकडून भारत गौरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘प्रोग्रेस इन अॅक्वा फार’साठी सहयोगी संपादक म्हणूनदेखील ती काम करते आहे. मात्र, पुरस्कारांपेक्षा सतत संशोधन करत राहणे तिला अधिक भावते.

‘सागरी संवर्धनात नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि कृतीतून सकारात्मक बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे. माझ्यासारख्या तरुण संशोधकांसाठी, अशा क्षेत्रात काम करण्याचे समाधान आणि पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याचा अभिमान हेच खरे पुरस्कार आहेत’ असे ती आत्मविश्वासाने सांगते.

viva@expressindia.com

Story img Loader