दरवर्षी वर्षातून दोन वेळा लॅक्मे फॅशन वीकची धामधूम अनुभवायला मिळते. मात्र या वर्षीचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ खास होता! देशातील महत्त्वाच्या फॅशन शोपैकी एक असलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ला यंदा पंचवीस वर्षं पूर्ण झाली. आणि पंचविशीचं सेलिब्रेशन या वेळी संपूर्ण फॅशन वीकच्या माहौलमध्ये दिसत होतं. गेल्या पंचवीस वर्षांतील आयकॉनिक डिझाइन्स लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी रॅम्पवर अवतरली. अनेक इन्फ्लुएन्सर्सनी या वेळी रॅम्पवर हजेरी लावली. लिसा हेडन, लिसा रे, इंद्राणी दासगुप्ता, सारा जैन डायस, शिमोना नाथ अशा अनेकांनी तर या वेळी वॉक केलाच, मात्र ‘लॅक्मे’चा चेहरा असलेली ओ.जी. करीना कपूरसुद्धा या वेळी लॅक्मे फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी रॅम्पवर खास उपस्थित झाली होती. या वर्षीच्या लॅक्मे फॅशन वीकचे काही खास ट्रेण्ड्स…

आजकाल आपण प्रत्येकजण ऋतूंनुसार आपला वॉर्डरोब बदलायची तयारी करत असतो. उन्हाळा म्हणजे कलरफुल आणि हलक्या पेस्टल शेड्सची रेलचेल दरवर्षीच अनुभवायला मिळते. अगदी मार्केटमध्ये ट्रेण्डिंगही पेस्टल आणि प्रिंटेड कपडेच असतात. ‘लॅक्मे फॅशन वीक समर सीझन’ हा उन्हाळ्यात होणाऱ्या मोठमोठ्या लग्नसोहळ्यांसाठीचा ट्रेण्ड सेटर आहे. मात्र या वेळी इथेही काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं. नेहमीच्या सवयीला, रंगांना, पॅटर्न्सना बाजूला ठेवून ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये या सीझनला काळ्या रंगाकडे जाणाऱ्या अशा डीप आणि डार्क शेड्सचे डिझाइनर वेअर्स अधिक करून पाहायला मिळाले. डार्क शेड्समधले गाऊन्स, ड्रेसेस आणि भरपूर डिझाइन्सनी या वेळचा लॅक्मे फॅशन वीक भारलेला होता. डीप ब्लॅक, एमराल्ड ग्रीन, सफायर ब्लू अशा कॉमन एरवी समरसाठी फारशी पसंती न मिळणाऱ्या कलर शेड्सवर फॅशन डिझाइनर्सनी अधिक जोर दिल्याचं जाणवलं. नेहमीच्या समरमधल्या पेस्टल शेड्सऐवजी या वेळी व्हाइट आणि लाइट ग्रेच्या शेड्सही जास्त करून पाहायला मिळाल्या. अनेक डिझाइनर्सनी आपले संपूर्ण कलेक्शन्स व्हाइटमध्ये केले होते. ‘ब्लॅक अँड व्हाइट’ कॉम्बिनेशन्सही अनेक डिझाइनर वेअर्समध्ये पाहायला मिळाली. या कॉम्बिनेशन्समध्ये ब्लॅकपासून व्हाइटपर्यंतच्या सगळ्या शेड्सचाही समावेश अनेक ठिकाणी करण्यात आला होता.

समर कलेक्शनमध्ये नेहमीच हलके-फुलके, फ्रेश दिसणारे, डोळ्यांना शांत भासले तरीही क्यूट वाटणारे असे फ्लोरल पॅटर्न्स बघायला मिळतात. मात्र, या वेळी बहुतांश डिझाइन्समध्ये फ्लोरल प्रिंटपेक्षा जॉमेट्रिक प्रिंट्स जास्त वापरली गेली. स्ट्रेट लाइन्स, कर्व लाइन्स, वेव्ह्ज अशा पॅटर्न्सनी पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या या शेड्स सजल्या होत्या. नुसते प्रिंट पॅटर्न्सच नव्हे तर वेडिंग कलेक्शनमध्येही एम्ब्रॉयडरीसुद्धा अत्यंत हेवी वापरली गेली. डार्क शेड्सना अधिक डार्क आणि डीप बनवणाऱ्या पॅटर्न्सची एम्ब्रॉयडरी या वेळी दिसून आली. नेहमीचे फ्रिल्स आणि रफल्स जाऊन या वेळी हाय नेक, मोठे स्लीव्ह्ज, लाँग गाऊन्स अशा डिझाइन्सनी वेडिंग कलेक्शन्स सजली होती. नेहमीच्या वेडिंग कलेक्शनमध्ये खरंतर प्रिन्सेस गाऊन सदासर्वकाळ ट्रेंडिंग असतात. या वेळी मात्र बॉडी-फिट गाऊन्सना या वेडिंग कलेक्शनमध्ये प्राधान्य दिलं गेलं होतं.

उन्हाळ्यात साधारणत: कमीत कमी लेयरिंग केलं जातं. मात्र या वेळी ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये खास समर सीझनसाठीच्या कपड्यांमध्येही लेयरिंग, कोट्स आणि सूट्स भरपूर प्रमाणात पाहायला मिळाले. डार्क शेड्सचे किंवा अगदी ब्लॅक कलरचेसुद्धा सूट्स डिझाइन केले गेले होते. स्टिच धोती पॅटर्नमध्येही काळी धोती आणि काळा कुर्ता अशी कॉम्बिनेशन्स अधिक ट्रेंडमध्ये होती. त्यालाच हेवी वर्क असलेल्या एम्ब्रॉयडरीच्या बॉर्डर वापरल्या गेल्या. सूट्सचं लेयरिंग केवळ मेन्स फॅशनमध्ये नव्हे तर वुमेन फॅशन डिझाइन्समध्येसुद्धा पाहायला मिळालं. डार्क आणि डीप शेड्स किंवा काळ्या रंगाचे सूट्स एका बाजूला, तर पूर्ण व्हाइट आणि त्याच्या विविध शेड्समधील सूट्स दुसऱ्या बाजूला… अशा पूर्णपणे दोन विरोधी रंगांच्या शेड्समधली डिझाइन्स फॅशन डिझाइनर्सनी या वेळच्या कलेक्शनमध्ये सादर केली होती.

पंचविसाव्या वर्षानिमित्त काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या आणि त्यासाठी वेगवेगळे इनिशिएटिव्ह्ज, प्रयोग आणि प्लॅटफॉर्म्स निर्माण करणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये डिझाइन्स, कलर्स, पॅटर्न्स आणि प्रेझेंटेशनमध्येही वेगळेपणा नक्कीच दिसून आला.

viva@expressindia.com