रिशानने खिडकीतून पाहिलं. टेक्सासच्या आकाशात एव्हाना ढग दाटून येत पावसाला सुरुवात झाली. पहिल्या पावसाच्या सरीनं त्याला रोज येणारी शनायाची आठवण अगदीच तीव्र झाली. पटकन त्याने मोबाईल उचलला आणि भारतात व्हिडीओ कॉल केला. देश आणि काळ यांची बंधनं क्षणात दूर झाली. पावसाच्या साक्षीनं प्रेमाच्या गप्पा फुलल्या. तिसेक वर्षांपूर्वी दिल्लीला बदली झालेल्या अनिलचंही पहिला पाऊस पडल्यावर असंच झालं होतं. नुकत्याच रुजलेल्या लँडलाईन सेवेमुळे घरी फोन करून आरतीशी मनसोक्त बोलता आलं होतं. त्या आधीच्या पिढीतल्या सुधाकररावांची वेगळी कथा नव्हती. पहिल्या पावसातून उमटलेल्या भावना पत्रात लिहून त्यांनी मालतीबाईंना कळवल्या होत्या. पिढ्या बदलल्या, संदेशवहनाची साधनं बदलली, पहिला पाऊस मात्र अजूनही तसाच बरसतो. दूर राहणाऱ्या प्रियजनाची आठवण अजूनही तशीच तीव्र करतो. त्या आठवणी प्रिय व्यक्तीला सांगण्याची ओढ अजूनही तशीच आहे.
कोण्या एके काळी असाच एक यक्ष होता म्हणे. प्रेमात ठार बुडालेला. प्रेमात भान हरपून त्याने कर्तव्यात काही कसूर केला आणि प्रेयसीपासून वर्षभर दूर राहण्याची शिक्षा शाप बनून त्याच्या जीवनात आली. आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला दूर डोंगरावरून पावसाचे ढग येताना दिसले. एक ढग तर हत्ती सारखा डोंगरांना धडका देत होता. शांताबाई शेळकेंच्या शब्दात सांगायचं तर ,
आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला
टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला
आधीच तो विरहात होरपळलेला, त्यात पहिल्या पावसाच्या आठवणींचा दाह. त्या प्रेमवेड्याने चक्क त्या ढगालाच आपला संदेशवाहक बनवलं आणि आपल्या प्रेयसीकडे निरोप पाठवला. आणि मग कालिदासाच्या उत्तुंग प्रतिभेतून मेघदूताचा रम्य प्रवास सुरू झाला. पण हा प्रवास फक्त एका मेघाचा नाही. हा प्रवास आहे पहिल्या पावसाचा. पावसाच्या सरींनी बहरणाऱ्या निसर्गाचा, हिरव्यागार रानांचा, झुळझुळणाऱ्या झऱ्यांचा, उमलणाऱ्या रानफुलांचा. हा प्रवास आहे चिंब भिजलेल्या तरुणाईचा आणि पावसाच्या सरींसोबत फुलणाऱ्या प्रेमाचा.
‘मेघदूत’ हे महाकवी कालिदासाने लिहिलेलं एक संस्कृत खंडकाव्य. साधारणपणे इसवी सनाच्या चौथ्या शतकातलं हे काव्य आज शेकडो वर्षांनंतरही तितकंच रसरशीत आहे. चिरतरुण आहे. कालिदासाच्या काळाविषयी मतभेद असतीलही मेघदूत मात्र कालातीत ठरलं आहे. वरवर पाहता यात रामटेक ते हिमालय या प्रवासातील डोंगर दऱ्यांचे, नदीनाल्यांचे, पानाफुलांचे विहंगम वर्णन आहे असे वाटते. पण निसर्गाच्या याच भव्य हिरवट ‘बॅकड्रॉप’वर मानवी जीवनातल्या तरल भावनांचे अलवार रंग यात उमटले आहेत. मेघदूतात प्रेमाची उत्कटता आहे, प्रणयाची बेधुंदी आहे, लटके रुसवे-फुगवे आहेत, मनधरणी आहे, विरहाची हुरहुर आहे, पुन्हा मीलनाची आस आहे. आणि या सगळ्या प्रेमकथेत सतत पार्श्वसंगीतासारखी कानात रुंजी घालणारी पावसाची रिमझिम आहे.
‘कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त’ अशा शब्दांनी मेघदूताची सुरुवात होते. हिमालयातील यक्षांच्या अलका या स्वर्गीय नगरीतील ‘कोणी’तरी एक यक्ष, त्याच्या कडून ‘काहीतरी’ अपराध होतो आणि विरहाची शिक्षा पदरी पडते. या यक्षाचं, त्याच्या प्रेमिकेचं काही नाव नाही. नक्की काय चूक घडली याचा पण उल्लेख नाही. या निनावीतेतुन ही सगळ्या प्रेमवीरांची कहाणी ठरते. विरहात हा यक्ष इतका खंगला की हातातले सोनकडे गळून गेले. रामगिरी पर्वतावर कसेबसे त्याने आठ महिने काढले खरे, पण उरलेले चार महिने काढणं आता कठीण झालं होतं. अशातच पावसाळा येऊन ठेपला. ढग दाटून आले की अगदी आनंदी मनावरसुद्धा जुन्या आठवणींचे मळभ दाटते. त्यात हा तर प्रेमवीर. कुसुमाग्रज म्हणतात तसं
सुखमय चित्तहि मेघ पाहतां हुरहुरतें, कालवे,
दूर जयाची सखि संगातुर, काय तया यातना।।
दिल-ए-नादाँला झालेल्या या प्रेमरोगाची दवा ना यक्षाला माहीत ना गालिबला. अशाच अगतिकतेतून हा प्रेमदिवाणा एका ढगालाच आपला निरोप्या म्हणून नेमतो. ‘ढग निरोप कसा पोहोचवणार?’ असले प्रश्न प्रेमात आकंठ बुडालेल्यांना पडतच नाहीत. सजीव निर्जीव असे तार्किक भेद सर्वसामान्यांसाठी असतात. मेघाला पत्ता सांगण्याच्या बहाण्याने यक्ष आपले घर, तिथे जाण्याचा मार्ग, घरी वाट पाहणारी प्रेमिका यांचे तपशीलवार चित्रण मनात रंगवतो.
यक्षाच्या डोळ्यासमोर हिमालयाच्या कुशीतील आपली स्वर्गीय अलका नगरी येते. इथे तारुण्य सोडून दुसरं वय नाही. इथल्या यक्षांचे फक्त शरीर नाही तर मन देखील चिरतरुण आहे. प्रेमाची लुटुपुटु भांडणं सोडली तर दुसरा कलह नाही. ‘वैभवशाली घरांत ज्यांच्या अचल राहतें धन, कूजन करिती सुरांगनांसह जेथ विलासी जन’ अशा या अलकेत प्रेमाचा वसंत ऋतू कायमच बहरलेला असतो. आपल्या प्रिये सोबत इथे घालवलेले सुखद क्षण आठवत यक्ष हळवा होतो, पण आता मात्र विरहात कृश झालेल्या प्रियेची प्रतिमा त्याला व्याकूळ करते. रडून तिचे डोळे सुजले असतील, उसासे टाकून ओठ सुकले असतील. एक एक दिवस मोजत ती कशीबशी जगत असेल. मेघाच्या बहाण्याने यक्ष स्वत:लाच दिलासा देतो. आता फक्त चार महिन्यांचा हा विरह, त्यानंतर पुन्हा प्रेमाच्या चांदणराती येतील हे स्वत:लाच समजावतो.
मेघदूतात फक्त यक्षाची एकमेव प्रेमकथा नाही. यक्ष मेघाला पहिल्या पावसाच्या साक्षीनं फुलणाऱ्या अनेक प्रेमकहाण्या बघत जायला सांगतो. यक्षाच्या तोंडून कालिदास अशा अनेक नायक -नायिकांच्या प्रेमकथा मांडत जातो. संस्कृत साहित्यात प्रेयसींचे अनेक प्रकार आढळतात. प्रियकर दूरदेशी गेल्याने व्याकूळ नायिका म्हणजे ‘ प्रोषितभर्तृका’ नायिका. पहिल्या पावसाच्या मेघाला आकाशातून जाताना पाहून अशा प्रेमिका आनंदित होतात. कारण व्यापार, युद्धमोहिमा अशा कारणांनी दूर गेलेले त्यांचे प्रियकर पावसाळा सुरू व्हायच्या आत घरी परत येतात. म्हणून अशा पथिक-वनिता मोठ्या आतुरतेने पहिल्या मेघाची वाट पाहत असतात.
प्रियकराच्या स्वागतासाठी श्रृंगार करत सज्ज होणाऱ्या ‘वासकसज्जा’ नायिकांना देखील हा मेघ मोहक वाटतो. गडगडाट ऐकून त्यांचे प्रेमी घरी येण्याची लगबग करतील याची त्यांना खात्री आहे. त्यांनी केस उदवून सुगंधित करण्यासाठी लावलेला धूप गवाक्षांमधून बाहेर पडून मेघाला जाऊन मिळतो आणि त्याला सुगंधित करतो. साजणाला भेटण्यासाठी लगबगीने जाणाऱ्या ‘अभिसारिका’ नायिकांना मात्र हा पाऊस संकट वाटतो. म्हणून यक्ष मेघाला सांगतो उज्जयनी नगरीतील कोणी अशी रमणी निघाली असेल तर तू मुसळधार वृष्टी करून किंवा गडगडाट करून अडथळा आणू नकोस. उलट हलकीशी वीज चमकवत तिला अंधारात रस्ता दाखव.
ठरलेल्या वेळी प्रियकराची वाट पाहणारी ‘विप्रलब्धा नायिका’ असो किंवा पावसामुळे प्रियकर न आल्याने त्याच्या प्रतारणेने रुसलेली ‘खंडिता नायिका’, यांच्यासाठी मेघ जणू खलनायक. म्हणून सकाळी अशा चिडलेल्या प्रेयसींची समजूत काढायला त्यांचे प्रियकर येतील तेव्हा मेघाने जलद निघून जाणं योग्य ठरेल. त्या वेळी मेघाने मध्ये येऊन त्यांचा रोष ओढवून घेऊ नये, असा सल्ला यक्ष मेघाला देतो. प्रियकर सोबत असणाऱ्या ‘स्वाधीनपतिका’ नायिकांना ढगांचा गडगडाट, कोसळत्या धारा, थैमान वारा हे सारंच हवंहवंस वाटतं. त्यांच्या अंगावर प्रियकरांनी उमटवलेल्या नखक्षतांवर मेघाने थंड तुषारांचे सिंचन केल्यावर त्या मेघाकडे कृतज्ञतेने कटाक्ष टाकतात. प्रत्येकाची प्रेमदशा वेगळी, प्रत्येकाचा पाऊस वेगळा. पहिल्या पावसाच्या साक्षीने उमटणारे हे प्रेमतरंग मेघदूतात अलगद टिपले आहेत.
मेघदूत हे निसर्गकाव्य आहे यात शंका नाही, पण यक्षाच्या उत्कट प्रेमामुळे त्याला उठाव मिळाला आहे. प्रेमात पडलं की रोजचं जगसुद्धा अधिक देखणं वाटू लागतं. मग रोजचंच साधं चांदणं ‘टिपूर’ वाटतं, पावसाची सर ‘रिमझिम’ भासते, फुललेली झाडं ‘बहार’ होतात. आणि विंध्य ते हिमालय हा रटाळ भौगोलिक प्रवास काव्यात्मक ‘मेघदूत’ होतो. यासाठी कालिदासासारखी रसिक दृष्टी हवी.
आजच्या धावपळीच्या काळात पाऊस अनुभवायला आणि प्रेम व्यक्त करायलाही वेळ मिळत नाही. त्यात प्रेमात ब्रेडक्रंबिंग, बेंचिंग, गोस्टिंग, सॉफ्ट लॉन्चिंग अशा नव्या संकल्पना रुजत आहेत. या पार्श्वभूमीवर मेघदूतातील यक्षाचं उत्कट, एकनिष्ठ प्रेम अधिकच विलक्षण वाटू लागतं. प्रेमाच्या आणि सौंदर्याच्या जाणिवा पुन्हा ताज्यातवान्या करण्यासाठी मेघदूत एकदा तरी वाचायलाच हवं. संस्कृत क्लिष्ट वाटत असेल तर मेघदूताचे जगभरातल्या अनेक भाषांत झालेले अनुवाद उपलब्ध आहेत. मराठीत देखील कुसुमाग्रज, शांता शेळके, सी. डी. देशमुख, बा. भ. बोरकर अशा अनेक दिग्गजांचे वीसहून अधिक सरस अनुवाद आहेत.
आषाढाच्या पहिल्या दिवशी असाच एखादा मेघदूताचा भावानुवाद हाती घ्यावा. पावसाची रिमझिम ऐकत त्याचा आस्वाद घ्यावा, यक्षाच्या शब्दातून प्रेम अनुभवावं, मेघाच्या डोळ्यातून निसर्ग पाहावा. हळूच खिडकीतून बाहेर डोकवावं. कदाचित समोरच्या उंच टॉवर शेजारी एखादा मेघ आपली वाट पाहात असेल. त्याच्या सोबत आपणही प्रेमाच्या प्रवासाला निघावं. शेवटी प्रेम म्हणजे प्रेम असतं, यक्षाचं असो की आपलं ‘सेम’ असतं.
viva@expressindia.com