पावसाळ्यात हवामान सतत आणि झपाट्याने बदलत असते. त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. याच काळात चातुर्मास असून उपवासाचेही दिवस असतात. तब्येतीच्याही अनेक तक्रारी उद्भवतात. या बदलत्या हवामानाशी आपल्या शरीराला जुळवून घेणे सोपे जावे यासाठी आहाराची आखणी करावी. पावसाळ्यात आहार कसा असावा? याविषयी मार्गदर्शन करताना मुंबईतील आहारतज्ज्ञ शैला जोशी म्हणाल्या, ‘पावसाळ्यात घरचे ताजे व नैसर्गिक अन्न खावे. आहारातील समतोल राखण्यासाठी न्याहरीला पोहे, उपमा, अप्पे, घावणे, अंडी यांसारखे पदार्थ खावेत. दोन वेळेच्या जेवणात पोळी, वरणभात, विविध भाज्या, डाळी किंवा उसळी, कोशिंबिरी असा चौरस आहार असावा. पोळीऐवजी नाचणी, ज्वारी, बाजरी या विविध पिठांच्या भाकऱ्या तसेच थालीपीठ, पराठे असेही पदार्थ खाता येतील. या पदार्थांतून कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व ‘ब’ व इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची शारीरिक गरज पुरविली जाते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते’. पावसाळ्यात कुठल्याही प्रकारच्या ब्रेडवर बुरशी लवकर येऊ शकते, त्यामुळे ब्रेड शक्यतो टाळावा. ब्रेड खाल्लाच तर तो ताजा व तव्यावर गरम करून खावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
पावसाळ्यात भाज्या कोणत्या खाव्यात याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, रोजच्या आहारात जीवनसत्त्वे व खनिजे याच्या पुरवठ्यासाठी सर्व प्रकारची फळे व भाज्या खायला हवीत हे खरे; परंतु या ऋतूत काही फळे व भाज्या यांचा समावेश करताना थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक असते. जीवनसत्त्व ‘क’युक्त काही भाज्या जसे पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली या स्वच्छ धुणे अवघड असते. त्यातून जंतुसंसर्गाची अधिक शक्यता असल्याने या पालेभाज्या टाळाव्यात किंवा किमान कोमट पाण्याने दोन-तीन वेळेला धुऊन मग खाव्यात. मशरूम मातीत उगवल्याने त्यात असू शकणाऱ्या विषाणूमुळे तेदेखील टाळलेलेच बरे. कंदमुळे आणि फळभाज्यांवर भर द्यावा. उदा. सुरण, भोपळा, दुधी, वांगी, तोंडली, पडवळ, भेंडी इत्यादी. अर्थात, या ऋतूत काही खास पावसाळी पालेभाज्या उपलब्ध असतात. जसे खोडशी, भारंगी, टाकळा, घोळ या भाज्या स्वच्छ कोमट पाण्याने दोन-तीन वेळेला धुऊन वापराव्यात. जीवनसत्त्व ‘क’युक्त भाज्या जसे टोमॅटो, लाल, पिवळी व हिरवी भोपळी मिरची, बटाटा व रताळीसुद्धा आहारात असाव्यात, असंही त्या नमूद करतात.
पुण्यातील ख्यातनाम वैद्या डॉ योगेश वैशंपायन सांगतात, ‘रोगा: सर्वेऽपि मन्देऽग्नौ ।’ ही पंक्ती आयुर्वेदामधली आहे. आयुर्वेद असे सांगतो की, वर्षा ऋतूमध्ये आपल्या शरीरातला अग्नी मंद असतो. सगळेच आजार मंद अग्नीमुळे होऊ शकतात. आपली रोग प्रतिकार शक्ती या ऋतूत खूप कमी झालेली असते. सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर संधीवात, सांधेदुखी, अपचन, पोटाचे तथा पचनाचे विकार, वेगवेगळी इन्फेक्शन्स, सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, चिकन गुनिया, झिका व्हायरस इत्यादी विकार डोके वर काढू लागले आहेत. वर्षा ऋतूमध्ये सतत वातावरणात बदल होत असतात. कधी गरम होते खूप ऊन असते, तर कधी संततधार पाऊस. सततच्या या बदलांमुळे, साचलेल्या किंवा खराब पाण्यातून अनेक जिवाणू – विषाणू वाढू लागतात’. हा मंदाग्नी आपल्या रोजच्या आहारामुळे व कृतीमुळे आणखी मंदावू शकतो. जसे की मांसाहार, ब्रेड, बेकरी किंवा मैद्याचे पदार्थ, कच्चे कडधान्य, नवीन धान्य, आंबवलेले पदार्थ, मिठाचा जास्त वापर, नमकीन पदार्थ वा पाण्याच्या अतिरेकी सेवनाने, जेवल्या जेवल्या झोपल्याने, रात्री खूप उशिरा जेवल्याने, भूक नसताना बळे-बळे जेवल्याने किंवा जेवण झाले असूनही हावरटपणाने पुन्हा खाल्ल्याने, आईसक्रीम, डेझर्टसच्या सेवनाने या सर्व प्रकारांमुळे तुमचा जठराग्नी अजूनच मंद होतो. त्यामुळे आधीच अग्नी मंद असल्याने वर्षा ऋतूत वरील कोणतीही कुपथ्ये करू नयेत, असेही डॉ योगेश म्हणाले.
अग्नी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगत डॉ योगेश पुढे सांगतात, ‘पावसाळ्यात हलका आहार घ्यावा. भूक असेल तरच पूर्ण जेवण करावे अथवा दोन घास कमीच बरे. अन्न ताजे आणि गरम असावे. स्निग्ध पदार्थांचा पुरेपूर वापर असावा जसे साजूक तूप, तेल, दूध, ताक इत्यादी. वेलवर्गीय फळभाज्या जसे दुधी, दोडका, पडवळ, भेंडी, तोंडली, घेवडा, गवार इत्यादी भाज्या जास्त खाव्यात. पालेभाज्यांमध्ये द्रवांश असल्याने शक्यतो कमी खाव्यात. शक्य असल्यास नीट निवडून भाज्या शिजवाव्यात. सूर्यास्तापूर्वी सर्व प्रकारची फळे खाण्यास हरकत नाही. आपल्या पारंपरिक पाकशास्त्रात वापरले जाणारे सगळे मसाल्याचे पदार्थ जसे हिंग, जिरे, ओवा, मिरी, पिंपळी, मोहरी, मेथी, लवंग, सुंठ, दालचिनी तसेच बऱ्याचशा वाटणात लागणारे आले, लसूण हे पदार्थसुद्धा आपला जठराग्नी चांगला ठेवायला आणि वाढवायला मदत करतात. त्यामुळे यांचा योग्य पद्धतीत समावेश आपल्या आहारात नियमित करावा’.
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. यातील बहुतांश काळ हा पावसाळ्यात येतो. पावसाळ्यामुळे भूक व पचनशक्ती मंदावलेली असते. म्हणून या काळात जास्तीत जास्त उपवास करण्याची प्रथा आहे. पचनसंस्थेला विश्रांती मिळावी, तसेच या काळात शरीरात शिरणारे रोगजंतू आतड्य़ातील एन्झाईम्समुळे मारले जावेत हा त्यामागचा हेतू आहे. वांगे पचायला जड असते आणि पोटात गॅसेस उत्पन्न करू शकते. या काळात ते हितकारक नसते, म्हणून चातुर्मासात वांगे खात नाहीत. छोलेदेखील या काळात शक्यतो टाळावेत, कारण तेही गॅसेस उत्पन्न करतात. मांसाहार पचायला जड असल्याने तोही आध्यात्मिक निमित्त साधून या काळात बंद केला जातो. उपवास हे विविध धर्मांमध्ये सांगितले गेले आहेत. प्रत्येक धर्माने उपवास हा उपासनेशी जोडला आहे. याला काही शास्त्रीय करणे आहेत. उप आसन आपल्या इच्छित शक्तीसमवेत बसणे असा अर्थ उपनिषदांमध्ये सांगितल्याचे आढळते. म्हणजे केवळ एका ठिकाणी बसणे नाही, तर शरीर आणि मन एकात्म करून, निर्विकार तसेच अंतर्मुख होण्याची प्रक्रिया साधणे म्हणजे उपवास करणे होय.
उपवासाने काय साध्य होते याचा विचार केला तर स्थूलता तसेच वजन आटोक्यात राहण्यासाठी निसर्गत: मदत होते. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहून इन्शुलिन योग्य प्रमाणात स्रावते. पर्यायाने इन्शुलिन प्रतिरोध होत नाही. शरीरात ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन फ्री रॅडिकल्स कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने विषारी घटकांचा निचरा होण्याचे काम उपवासाने साध्य होते. शरीरातील ‘ट्रॉयग्लिसेराइड्स’ या अनावश्यक कोलेस्टेरॉलला अटकाव होतो. कॅन्सर, मेटॅबोलिक सिंड्रोमपासून बचाव होतो. नियंत्रण आणण्याचे तंत्र साध्य होते. त्यामुळे आनंदी राहण्याचे सहजसोपे निसर्गाने दिलेले साधन म्हणजे उपवास होय. त्यामुळे पावसाळ्यात अवश्य उपवास करावा. आणि अतिशय विचारपूर्वक आहाराचे नियोजन करावे. तरच पावसाळ्यातील मजा अनुभवत शारीरिक स्वास्थ्य आणि पर्यायाने मानसिक स्वास्थ्य टिकवणे सहज शक्य होते.
viva@expressindia.com