वेदवती चिपळूणकर परांजपे
लहान वयापासून असलेली निसर्गाची ओढ आणि प्रेमाला डारा मॅकॅनल्टी या तरुणाने लेखन आणि प्रत्यक्ष त्यादृष्टीने केलेल्या कार्यातून एक दिशा मिळवून दिली. ऑटिस्टिक असूनही आपल्या समस्यांवर परिश्रमपूर्वक मार्ग शोधणाऱ्या डाराने निसर्गाच्या संवर्धनाचं आपलं काम कधीही मागे पडू दिलं नाही. म्हणूनच आज जगभरात यंग नॅचरलिस्ट ही ओळख त्याला मिळाली आहे.
तो ऑटिस्टिक आहे, कदाचित म्हणूनच अतिशय संवेदनशील आहे. सर्व गोष्टींप्रति त्याच्या भावना खूप तीव्र आहेत. २००४ मध्ये जन्माला आलेल्या त्याने वयाच्या चौदाव्या वर्षीच पुस्तक लिहिलं. ते जगभर गाजलं. ‘डायरी ऑफ अ यंग नॅचरलिस्ट’ हे त्या पुस्तकाचं नाव आणि डारा मॅकॅनल्टी हे त्याचं नाव. आर्यलडमध्ये राहणारा डारा निसर्गाच्या अत्यंत जवळ राहतो. निसर्गाबद्दलचं प्रेम हे लहानपणापासूनच त्याच्या मनात रुजलेलं आहे. त्याच्या ऑटिस्टिक असण्याच्या पार्श्वभूमीवर त्याला जाणवलेला निसर्ग, त्यातले खाचखळगे आणि आनंद अशा दोन्ही दृष्टिकोनातून त्याने हे पुस्तक लिहिलं आणि त्याला जगभरातून समीक्षकांची पसंती मिळाली.
वयाच्या पाचव्या वर्षी डाराला तो ऑटिस्टिक असल्याचं निदान करण्यात आलं. त्या वेळी तो राहत असणाऱ्या शहरात सतत गाडय़ांचे आवाज, ट्रॅफिक, विमानांचे आवाज, माणसांचे आवाज, कारखान्यांचे आवाज असा एकच कोलाहल होता. या सगळय़ामुळे त्याला शांतता मिळत नव्हती. त्याची दोन्ही भावंडंही ऑटिस्टिक आहेत आणि त्याची आईदेखील. त्यांच्यापैकी कोणीच स्वत:च्या या कंडिशनमध्ये काही सुधारणा करू शकत नव्हतं किंवा शांतपणे जगू शकत नव्हतं. डाराचे वडील कन्झव्र्हेशन सायंटिस्ट आहेत. त्यांची शहरापासून लांब आणि निसर्गाच्या जवळ ट्रान्सफर झाल्यानंतर मात्र डारा, त्याची भावंडं आणि आई, या सगळय़ांसाठीच गोष्टी बदलल्या आणि जास्त पॉझिटिव्ह झाल्या.
निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यापासून डाराने ब्लॉग आणि जर्नल स्वरूपात लिखाण करायला सुरुवात केली. तो आणि निसर्ग हाच त्याच्या लिखाणाचा विषय असायचा. त्याच्या ब्लॉगला ‘वाइल्डलाइफ ट्रस्ट ३० डेज वाइल्ड २०१७’ या कॅम्पेनच्या यूथ कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळालं. ‘अ फोकस ऑन नेचर’ या संस्थेच्या स्पर्धेत २०१६ साली त्याच्या ब्लॉगला प्राइज मिळालं. या निमित्ताने डाराच्या दृष्टीने अवघड असणाऱ्या गोष्टी त्याने त्या वर्षभरात केल्या. चार ठिकाणी जाणं, प्रवास करणं, वेगवेगळय़ा लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, लक्षपूर्वक वागणं अशा गोष्टी ज्यांची त्याला नेहमी भीती वाटायची, त्याचा ताण यायचा, कल्पनेनेसुद्धा त्याला प्रेशर यायचं, अशा सर्व गोष्टी त्याने हिमतीने केल्या. लिहिणं हे त्याचं व्यक्त होण्याचं माध्यम होतं, मात्र भेटणं, बोलणं, लोकांमध्ये मिसळणं हे त्याच्यासाठी अवघड आणि भीतीदायक होतं. तरीही तो जाणीवपूर्वक सततच्या प्रयत्नांतून त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडला.
डारा त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडला, अधिक मोकळा झाला. त्यानंतर मात्र त्याने निसर्गाशी संबंधित विषय घेऊन लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी असलेल्या एका सोसायटीशी तो जोडला गेला आहे. दुर्मीळ होत चाललेल्या काही पक्ष्यांच्या जपणुकीसाठी काम करणाऱ्या काही संस्थांशीही तो जोडलेला आहे. याशिवाय, शाळा-शाळांमध्ये जाऊन निसर्गाबद्दल आणि जीवसृष्टीच्या संवर्धनाबद्दल जागृती करण्याचं काम तो करतो. त्यासाठी त्याने अनेक प्रेझेंटेशन्स बनवली आहेत. निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन स्वत: फोटोग्राफी करायला तो शिकला आहे. शाळेतल्या मुलांना घेऊन पर्यावरणासंदर्भातील वेगवेगळय़ा अॅक्टिव्हिटीज तो करतो. ती लहान मुलंदेखील या कामात कशी मदत करू शकतात, निसर्गासाठी काय काय करू शकतात हे तो त्यांना प्रत्यक्ष छोटय़ा छोटय़ा कृतीतून दाखवतो. डारा वटवाघूळांच्या जतनासाठीसुद्धा काम करतो.
२०१७ मध्ये डाराला बीबीसीचं अवॉर्ड मिळालं आणि त्याच वर्षी बीबीसी नॉर्दन आर्यलडच्या ‘होमग्राऊंड’ या शोमध्ये त्याला सहभागी व्हायची संधी मिळाली. समोरच्याशी नीट संवादही साधताना अडखळणाऱ्या एका ऑटिस्टिक मुलासाठी ही मोठी संधी होती. इतरांना रोजच्या आयुष्यात साध्या-साध्या वाटणाऱ्या या गोष्टीही ऑटिस्टिक मुलांसाठी किती अवघड असतात हे तो अशा उदाहरणांमधून सांगतो. एकाच विषयावर लक्ष केंद्रित करून बोलणं, आपल्या बोलण्यात सुसंगती असणं, समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला किंवा प्रश्नाला अनुसरून बोलणं, जे बोलायचं आहे ते सर्व लक्षात ठेवणं आणि आयत्या वेळी ब्लँक न होणं, अशा अनेक साध्या गोष्टीसुद्धा डाराला अवघड गेल्या. या सगळय़ासाठी त्याला खूप जास्त मानसिक तयारी करावी लागली, मात्र त्याच्या म्हणण्यानुसार निसर्ग हा त्याचा सर्वात आवडता आणि प्रिय विषय असल्याने त्याला त्या विषयाच्या अनुषंगाने बोलणं थोडंसं सोपं गेलं. त्याच्या आवडत्या विषयातील लेखन, त्याबद्दल साधलेला संवाद आणि प्रत्यक्ष निसर्गासाठी करत असलेलं काम या सगळय़ाचा एक सकारात्मक आणि ठोस परिणाम त्याच्या आयुष्यावर झाला.
नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर एवढय़ा लहान वयात निसर्गाबद्दल प्रेम असणाऱ्या आणि त्याबद्दल सतत लेखन आणि जनजागृती करणाऱ्या डारा मॅकॅनल्टी या तरुणाची गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे.