जगात अनेक सामान्य आणि असामान्य लोक वावरतात. काही दिव्यांग तर काही विशेष क्षमता असलेल्या व्यक्ती असतात. या सामान्य व्यक्तींचं जेव्हा दिव्यांग व्यक्तींकडे लक्ष जातं आणि त्यांना त्यांच्यासाठी मनापासून काही करावंसं वाटतं तेव्हा त्या दिव्यांग व्यक्तींचं आयुष्य छान होण्यासाठी प्रयत्न होतात. अशाच एका सामान्य मुलाचं आजूबाजूच्या दिव्यांग व्यक्तींकडे लक्ष गेलं आणि त्याच्या मनात विचार तर डोक्यात कल्पनांचं चक्र सुरू झालं. त्यातूनच आकाराला आलं एक नवं संशोधन! या संशोधनाने त्या तरुण मुलाच्या आयुष्यावर तर परिणाम केलाच मात्र त्याला हवा असलेला सामाजिक परिणामही साध्य झाला. त्या मुलाचं नाव आहे शुभम बॅनर्जी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवघ्या बावीस वर्षांच्या असलेल्या शुभम बॅनर्जीला सगळं जग सध्या सिलिकॉन व्हॅलीमधला सर्वात यंग बिझनेसमन म्हणून ओळखतं. वयाच्या तेराव्या वर्षी स्वत:च्या संशोधनाचा प्रोटोटाइप बनवणाऱ्या शुभमने स्वत:ची कंपनी सुरू करून तिला अनेक ठिकाणहून गुंतवणूक मिळवून दिलेली आहे. शुभमने वयाच्या केवळ तेराव्या वर्षी केलेलं हे संशोधन म्हणजे ब्रेल प्रिंटर ज्याचं नाव आहे ‘ब्रेगो’. त्याच नावावरून त्याने ‘ब्रेगो लॅब्स’ हे स्वत:च्या कंपनीचं नाव ठेवलं. शाळकरी मुलं लेगोचा मेकॅनिक्सचा खेळत असलेला खेळ घेऊन त्याने या प्रिंटरचा प्रोटोटाइप बनवला होता. त्याचे आई वडील पहिल्यापासून त्याच्याबाबतीत सपोर्टिव्ह होते. त्याने आई बाबांना लेगोचा ‘माइंड स्टॉर्म्स इव्ही ३’ हा विशिष्ट सेट घेऊन देण्यासाठी तयार केलं. त्यातून आणि काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वापरून, इलेक्ट्रिकल भाग जोडून त्याने पहिला प्रिंटर तयार केला. पूर्ण सात वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याला तो रफ डिझाइन अर्थात प्रोटोटाइप बनवायला जमला. प्रत्येक प्रयत्नात अगणित चुका करत शुभम एकदाचा त्या प्रोटोटाइपपर्यंत पोहोचला.

याच गोष्टीवर काम करायचं किंवा संशोधन करायचं शुभमने का ठरवलं? याबद्दलची त्याची विचारप्रक्रियाही त्याने सांगितली. ‘अंध व्यक्ती कशा वाचत असतील हा प्रश्न मला पडला होता. आताच्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये टेक्स्ट- टू- स्पीच यामुळे लिहिलेल्या गोष्टी मोबाइल किंवा लॅपटॉप मोठ्याने वाचून दाखवतो, पण या टेक्नॉलॉजीला मर्यादा आहेत. प्रत्येक वेळी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हरएक भाषा वाचू शकता येईल असं नाही, प्रत्येक भाषेसाठी तिला वेगळं ट्रेन करावं लागेल. त्यात या टेक्नॉलॉजी वापरण्यासाठीसुद्धा कॉम्पॅटिबल डिव्हाइस असणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनाच ते शक्य असेल अशी खात्री नाही. ब्रेल प्रिंटिंगचा प्रिंटर आधीपासून आहे, मात्र त्यात खूप कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. साहजिकच ती टेक्नॉलॉजी महाग होते आणि त्यामुळे अशा प्रिंटिंगने आलेली ब्रेल पुस्तकं किंवा इतर साहित्यही महाग असतं. म्हणून अफोर्डेबल असलेली काही तरी टेक्नॉलॉजी शोधून काढावी असा विचार केला’, असं शुभमने सांगितलं.

वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षी एवढा विचार करून, त्यात तंत्रज्ञान वापरून आणि प्रत्यक्ष ते उपयोगात आणून शुभम बॅनर्जीने अत्यंत गरजेचा असलेला ब्रेल प्रिंटर बनवला. मात्र त्याला मोठ्या प्रमाणावर प्रॉडक्शन करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार होता आणि अनेक कसरती कराव्या लागणार होत्या. वेगवेगळ्या सायन्स फेअरमध्ये त्याने ते प्रोजेक्ट सादर केलं. आतापर्यंत ब्रेगो लॅब्सने चार पेटंट आपल्या नावे केली आहेत. त्याने व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा आधार घेऊन आपली कंपनी पुढे चालवण्याचा प्रयत्न सुरू केला.

शुभम बॅनर्जींने ब्रेगो लॅब्सला आणि त्याच्या ब्रेल प्रिंटरला सिलिकॉन व्हॅलीच नव्हे तर संपूर्ण जगात नाव मिळवून दिलं आहे. भारत सरकारनेदेखील त्याची दखल घेत भारत आयकॉन म्हणून त्याला प्रसिद्धी दिली आहे. लहान वयात ही अचाट कामगिरी करणाऱ्या शुभमने सामाजिक बांधिलकीही जपली आणि आपल्या संशोधनातून व्यापक स्तरावर कार्यही उभारले. आकांक्षापुढती गगन ठेंगणे याची प्रचीती त्याने त्याच्या कार्यातून आणून दिली आहे. केवळ लहानपणी केलेले संशोधन आणि त्यातून उभी राहिलेली कंपनी इतपतच मर्यादित न राहता त्याने यशस्वी उद्याोजक म्हणून आपला नावलौकिक आजही कायम राखला आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta viva phenom story researcher shubham banerjee businessman company amy