तरुण पिढीची सणवार साजरे करण्याची पद्धतच वेगळी. सणवार असो वा फॅशन प्रत्येक गोष्टीत ट्रेण्ड शोधणाऱ्या किंवा आणणाऱ्या तरुणाईने राखी पौर्णिमेच्या सणातही जुन्या परंपरांशी नव्या विचारांचा मेळ साधला आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेला ओवाळणीत देण्यात येणाऱ्या गिफ्ट्सपासून हातावर बांधल्या जाणाऱ्या राखीतही वेगवेगळे प्रकार आणि ट्रेण्ड्स पाहायला मिळतात.

श्रावण महिन्यातला सगळ्यात आवडता आणि हवाहवासा वाटणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे भावंडांच्या हक्काचा दिवस. बहिणीच्या हट्टाचा, भावाच्या प्रेमाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा आनंदाचा दिवस. घर मुला-बाळांनी गजबजलेलं असतं. भेट-वस्तू, ओवाळणी, नवीन कपडे, समारंभ अशा सगळ्याची मांदियाळी असते. यानिमित्ताने आजची पिढी जी आपापल्या आयुष्यात अत्यंत व्यस्त, व्यग्र आणि धावती आहे ती एकत्र जमते, मजा-मस्ती करते, जुने बालपणीचे दिवस नव्याने जगते. कोणत्याही वयातली भावंडं असली तरी या सणाचा आनंद साजरा करायला कोणतीही परिसीमा नसते. विशेषत: तरुण पिढीचा उत्साह कुठल्याही समारंभाला नावीन्याची झालर लावत असतो. राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनाचा सणही त्याला अपवाद नाही. समारंभ साजरे करण्याची पद्धत असेल, कपड्यांची फॅशन असेल किंवा अगदी राखी पौर्णिमेची स्पेशल राखी असेल… सगळ्यातच त्यांचा एक ट्रेण्डिंग टच पाहायला मिळतो. राख्यांमध्ये तर गेल्या काही वर्षांत फारच इंटरेस्टिंग ट्रेण्ड्स आले आहेत.

Hack to remove coconut from its shell
नारळाच्या करवंटीमधून खोबरे बाहेर काढण्यासाठी ‘ही’ सोपी पद्धत नक्की ट्राय करा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा

पूर्वीच्या काळात राख्यांना धार्मिक आणि भावनिक महत्त्व अधिक होते. एरव्ही राख्या साध्या धाग्यांपासूनच बनवल्या जायच्या. रेशीम, कापूस, सुटली अशा अगदीच नैसर्गिक आणि साध्या गोष्टींपासून बनलेल्या राख्या असायच्या. बदलत्या काळानुसार राख्यांमध्ये अनोखे ट्रेण्ड आले असले, तरी या पारंपरिक राख्यांची जादू तरुणाईच्या मनावर गारुड करून आहेच.

● प्रीमियम राखी

रोजच्या राख्यांसोबतच आता मोती, पन्ना, हिरे, इतर मौल्यवान खडे, कुंदन, चांदी आणि सोने अशा पद्धतीची सामग्री वापरूनसुद्धा शाही राख्या बनवल्या जातात. सोनारांकडे अशा राख्या खास बनवूनसुद्धा घेतल्या जातात. राखीच्या साध्या धाग्याच्या जागी सोन्या-चांदीच्या साखळ्या असतात आणि सजावटीसाठी मोती किंवा खडे वापरले जातात. शिवाय, या राख्या इतर वेळी ब्रेसलेट म्हणूनसुद्धा शोभून दिसतात. अशा प्रकारे, तुमचा भाऊ वर्षभर घालू शकेल अशी राखी तुम्ही शोधत असाल तर सोन्या-चांदीची ब्रेसलेट स्वरूपातील राखी हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. मौल्यवान आणि प्रीमियम राखीची ही निवड तुमच्या सोहळ्याला शाही टच देईल.

● रेझीन राखी

सामान्यत: रेझीन या प्रकाराला राळ म्हणतात. या रेझीनची राखी बनवण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असते. रेझीनचे एक मिश्रण तयार केले जाते, सिलिकॉन मोल्ड्समध्ये ठेवून त्याला आकार दिला जातो, ज्याने ते घट्ट एकजीव होते. ते मिश्रण ओले असताना तुम्ही त्याच्यात हवी ती सजावट करू शकता. या राख्यांमध्ये फुलांच्या पाकळ्या, चमकी, मोती, छोटे छोटे खडे किंवा मणी वापरून कस्टमाइज्ड डिझाइन तुम्ही बनवू शकता. रेझीनचा टिकाऊपणा आणि चकचकीत फिनिशमुळे या राख्या भरपूर काळ टिकतात, तसेच आजकालच्या सस्टेनेबल आणि पर्यावरणपूरक फॅशनमध्ये हा प्रकार अगदी परफेक्ट बसतो. सध्या या राख्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत.

● भय्या – भाभी राखी

रक्षाबंधन हा परंपरेने बहीण-भावांचा सण आहे, परंतु राजस्थानमध्ये आणि आजूबाजूच्या भागांमध्ये भाभी म्हणजेच भावाच्या बायको सोबतही राखीपौर्णिमा साजरी करण्याची एक नवीन परंपरा आहे. हे आता बहुतेक भागांमध्ये किंवा शहरांमध्येही प्रचलित झाले आहे. आता भैय्या आणि भाभी दोघंही राखी बांधून घेतात आणि त्या दोघांबरोबर भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. भाभीलासुद्धा राखी बांधली जाते, जेणेकरून आपसूकच तिचं कुटुंबातदेखील स्वागत केलं जातं. या नवीन परंपरेने अनेक नवीन आठवणी आणि ऋणानुबंध जोडले जातात. याच पद्धतीच्या भैय्या-भाभी राखी लोकप्रिय झाल्या आहेत. या राख्या कस्टमाइज्ड पद्धतीने बनवून घेण्याचा ट्रेण्ड आहे. तुम्हाला हवी तशी प्रीमियम रत्नजडित राखी किंवा अगदी नाव गोंदवूनसुद्धा या राख्या मिळू शकतात. भैय्या-भाभी राखीसाठी भावाला ब्रेसलेट राखी आणि भाभीला जी राखी बांधली जाते त्याला लुम्बा राखी असं म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर आपण ड्रेस किंवा ब्लाऊजला जसं लटकन लावतो तशा पद्धतीची ही राखी असते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये या राख्यांचे सुंदर सुंदर गिफ्ट हॅम्पर्ससुद्धा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये चॉकलेट्स, ड्रायफ्रुटस असे गिफ्ट पॅकही असतात.

● क्रोशे (लोकर) राखी

पूर्वीच्या बायका विशेषत: आपल्या आजी-पणजीला सतत हातात लोकर घेऊन विणताना आपण पाहिलेलं आहे. गेल्या काही वर्षांत लुप्त झालेला हा ट्रेण्ड पुन्हा एकदा तरुणाईच्या फॅशनमध्ये डोकावताना दिसतो आहे. लोकरीचे टॉप्स, कानातले आणि इतर सजावटीच्या गोष्टींसह खास लोकरीच्या राख्यासुद्धा आता ट्रेण्डमध्ये आल्या आहेत. लोकरी हाताळायला, सांभाळायला आणि वापरायला सगळ्यात सोपी आहे. राखी म्हणूनसुद्धा हा वेगळा काहीतरी प्रकार दिसायला छान दिसतो. मुळात लोकरीमध्ये वेगवेगळे रंग असतात, जे विणल्यावर अगदी सुरेख आणि सुबक दिसतात. क्रोशेचे दागिने जसे आता ट्रेण्डिंग आहेत तसेच क्रोशेची राखी ब्रेसलेटसारखी हातात छान दिसते. शिवाय, कुठल्याही वयातल्या भावाला त्याच्या आवडीप्रमाणे ही राखी देता येते. यातसुद्धा वेगवेगळे मणी ओवून घातले की राखीला अगदी शोभा येते. हॅन्डमेड राख्यांमध्ये तुम्हाला चांगला प्रकार हवा असेल तर लोकरीची राखी हा प्रकार खरंच वेगळा आहे.

यापेक्षा अनेक अजून वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारात पाहायला मिळतील, त्या सगळ्याच इथे नमूद करायचं म्हटलं तर जागा अपुरी पडेल, कारण तरुणाईच्या नावीन्यतेला, कलाकुसरीला कसलीच मर्यादा नाही. प्रत्येक वर्षी आधीच्या वर्षापेक्षा अनेक वेगळे प्रकार पाहायला मिळतात. सध्या हे प्रकार तरुणाईच्या भाषेत ट्रेण्डिंग आहेत. हल्ली सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तरुणाईला प्रत्येक गोष्टीत वेगळेपण हवं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे ते वेगळेपण त्यांना शोधताही येतं. या माध्यमांमुळेच जग छोटं झालंय; याचा फायदा असा की सामाजिक बांधिलकी, पर्यावरणपूरकता, समयसूचकता या सगळ्याच गोष्टींचं भान तरुणाईला फार चांगल्या प्रकारे उमगलं आहे. तसंच राहणीमान बदलल्यामुळे किंबहुना ते अधिक चांगलं आणि ऐषोआरामी झाल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचे सोहळे करता येतात. राखी पौर्णिमा हा तर असा सोहळा साजरा करण्यासाठी सगळ्यात खास आणि मोठा दिवस आहे.

राखी बांधून घेणारा हात नेहमी रक्ताच्या नात्यातला असतोच असं नाही. कधी कधी जवळचा मित्र, बहिणीचा नवरा किंवा एखाद्या बहिणीमध्येही भावाचं प्रेम गवसतं, असं तरुणाईचं मत आहे. राखी ही संरक्षण करण्याच्या विश्वासावर बांधली जाते, या भावनेला एकाच नात्यात अडकवून का ठेवायचं? असाही विचार करणारी तरुणाई आजूबाजूला आहे. आजच्या तरुणाईला सण समारंभ, कल्पकता, तंत्रज्ञान या सगळ्याची जितकी आवड आहे, तितकंच ते समाजभान, पर्यावरणाबद्दलची सजगताही बाळगून असतात. अनाथाश्रम, दिव्यांग किंवा विशेष मुलांसाठी कार्यरत संस्था, महिला बचत गट व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांशी बरेच तरुण जोडले गेले आहेत. अगदी भावाला राखीच्या रूपात झाडाचं एक बी भेट देत सणाला सामाजिक अर्थ जोडून घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तरुणाई समाजातला महत्त्वाचा व समृद्ध करणारा घटक म्हणतात ते याचसाठी. समाजात जे काही जीवनावश्यक कमी जास्त बदल होत असतात ते तरुणाई भोवतीच फिरत असतात. त्यांच्या पद्धतीनेच हे बदल रुजत असतात. त्यामुळे तरुणाईची सण समारंभ साजरे करण्याची परिभाषा नक्कीच बदलली असेल, पण त्यांची इच्छा, विचार आणि हौस भागवून घेणं या सगळ्यात आधीच्या पिढीपेक्षा ते एक पाऊल पुढे आहेत. त्यामुळे हेही वारंवार सिद्ध झालं आहे की रूढी, परंपरा सांभाळून व नव्या विचारांचा मेळ घालत अर्थपूर्ण पद्धतीने सण साजरं करणं त्यांना उत्कृष्टपणे जमतं. या राखी पौर्णिमेलाही त्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.

viva@expressindia.com

परंपरेतून नावीन्य साधणारा

Story img Loader