चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सतत सोशल मीडिया, टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या व अशा अनेक झोपेच्या तक्रारी दूर करण्यासाठी, पर्यटन विश्वामध्ये खास तुमची झोप पूर्ण करण्यासाठी स्लीप टुरिझम हा नवीन ट्रेण्ड आला आहे.

या प्रकारच्या ट्रॅव्हलला स्लीप स्टेकेशन, नॅप टुरिझम किंवा नॅप्सेशन असेही म्हणतात. जिथे तुमचे प्राथमिक लक्ष प्रवासावर, खाण्यावर किंवा मजा करण्यावर नसून योग्य झोप घेण्यावर असते. अशा सुट्टीचा बेत आखणे म्हणजे स्लीप टुरिझम होय. एरव्ही फिरायला आल्यानंतर कोणी हॉटेल रूममध्ये झोपा काढत असेल तर त्याच्या वाट्याला शिव्याच येण्याची शक्यता अधिक असते, मात्र स्लीप टुरिझमसाठी आलेल्यांना यापेक्षा वेगळा अनुभव येतो. स्लीप टुरिझममध्ये तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून ते सर्व उपक्रम, रात्रीच्या विश्रांतीनुसार सर्व गोष्टींचे नियोजन केले जाते. यामध्ये पर्यटकाच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्याचे काम केले जाते. या ट्रिपमध्ये लोक स्वत:ची झोप पूर्ण करण्याचा, तसेच स्वत:ला रिचार्ज करण्याचा प्रयत्न करतात. रोजच्या तणावातून बाहेर पडून लोक स्वत:च्या झोपेवर फोकस करतात. आणि या सुट्टीत फक्त आणि फक्त आराम करतात. शांत झोप घेण्यावर लक्ष केंद्रित करणे ही झोपेच्या पर्यटनामागील कल्पना आहे. या पर्यटनामध्ये लोक झोपण्याबरोबरच आयुर्वेदिक मसाज, योग, ध्यान, बॉडी स्पा अशा मार्गांचादेखील अवलंब करतात. जेणेकरून माइंड आणि बॉडी दोन्ही रिलॅक्स होऊन टूरची मज्जा द्विगुणित होते.

वाढती स्पर्धा, त्यातून होणारी दगदग तसेच नोकरी – व्यवसायामुळे वाढत असलेला दैनंदिन कामाचा ताण यामुळे अनेकांना झोपण्याची समस्या जाणवते आहे. नियमित झोपेचे वेळापत्रकदेखील बिघडले आहे. सात तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांची संख्या यामुळे वाढते आहे. परिणामी, कामाचा ताणतणाव कमी करण्यासाठी आणि आपल्या नियमित झोपेचे वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी स्लीपिंग टुरिझमचा पर्याय तरुणाईकडून निवडला जातो आहे. वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना झोपेशी निगडित समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे आरोग्य पर्यटनाची एक शाखा असलेल्या या पर्यटन ट्रेण्डला कॉर्पोरेट जगतातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

अपुऱ्या झोपेचा परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमध्ये होऊ शकतो. झोपेच्या अभावामुळे लठ्ठपणा वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे इत्यादी समस्या वाढू शकतात. या सगळ्या तक्रारींपासून दूर राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. त्यासाठी स्लीप टुरिझम हा ट्रेण्ड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

स्लीप टुरिझमसाठी भारतातील अनेक पर्यटनस्थळे आहेत, तेथील रिसॉर्ट्स लक्झरी सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहेत. जसे की कर्नाटकमधील कुर्ग हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. इथल्या शुद्ध वातावरणात राहणे पर्यटक फार आधीपासूनच पसंत करतात. इथे अनेक रिसॉर्ट्स स्लीप टुरिझमसाठी खास पॅकेज देतात. त्याचबरोबर भारतातील ऋषिकेश, धरमशाला व दार्जिलिंग इथेही लोक स्लीप टुरिझम एन्जॉय करण्यासाठी जातात. तर भारताच्या बाहेर न्यूयॉर्कपासून ते लंडनपर्यंतच्या हॉटेल्समध्ये यासाठी खास खोल्या बनवल्या गेल्या आहेत. या खोल्यांमध्ये बाहेरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू दिला जात नाही. येथे एखाद्या नैसर्गिक औषध केंद्र किंवा निसर्गोपचार केंद्रांमध्ये घेतली जाते तशी तुमची काळजी घेतली जाते.

झोपेची गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी उद्याोजकांनी गुंतवणूक करणे हे काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांमध्ये स्लीप टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक वाढत गेल्याने स्लीप टुरिझममध्येही वाढ होऊ लागली आहे. आता तर आपल्याला विमानतळांवरदेखील स्लीप पॉड्स पाहायला मिळत आहेत. तसेच हॉटेल्समध्येदेखील लक्झरी सूट्स असतात. आपल्याला चांगली झोप मिळावी यासाठी लोक झोपेच्या शोधात जगभर फिरत आहेत. दरम्यान, ७५ टक्के लोकांना अनिद्रेची समस्या असल्याचे क्लिनिकल स्लीप मेडिसिनच्या एका जर्नलमध्ये अभ्यासानंतर प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले आहे. हे पाहता एकीकडे चांगल्या झोपेची मागणी वाढत असल्या कारणाने हा उद्याोगही आता वाढू लागला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संचलित केले गेलेले हायटेक बेड आणि स्लीप काऊन्सिलर्स यांच्या सल्ल्याची या उद्याोगात मोठी भूमिका आहे. हे दोन्ही घटक लोकांना चांगली झोप मिळावी यासाठी मदत करत असतात.

झोप हा मूलभूत मानवी अधिकार आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. चांगली झोप तुमच्या मेंदूची कार्यक्षमता, मूड आणि आरोग्य सुधारते. पुरेशी दर्जेदार झोप नियमितपणे न मिळाल्याने अनेक आजार आणि विकारांचा धोका वाढतो. यामध्ये हृदयविकार आणि स्ट्रोकपासून ते लठ्ठपणा आणि स्मृतिभ्रंश यासारख्या आजारांचाही समावेश आहे. बेडवर पडून सोशल मीडिया, ओटीटी वा टीव्ही पाहात कित्येक तास घालवण्यापेक्षा काही तासांची झोप तुमचे आयुष्यमान सुधारू शकते आणि वाढवूही शकते आणि म्हणूनच नॅप्सेशनचा हा नवा प्रकारही अनुभवायला काहीच हरकत नाही.

viva@expressindia.com