मितेश रतिश जोशी
स्वयंसेवक व्हा आणि पर्यटनाच्या अशा एका मोहक स्वप्नात प्रवेश करा, ज्याची जादू दीर्घकाळ तुमच्या मनाला मोहवत राहील..

पर्यटन विश्वामध्ये प्रत्येक पर्यटकाची आपली स्वतंत्र अशी फिरण्याची स्टाइल असते. व्हॉलेंटिअर टुरिझम म्हणजेच स्वेच्छा पर्यटन किंवा स्वयंसेवक पर्यटन, हा पर्यटन विश्वातला सध्याचा आकर्षक ट्रेण्ड आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून परदेशात हा ट्रेण्ड फॉलो केला जात असला तरी भारतात आता कुठे या पर्यटनाला अच्छे दिन आले आहेत.

adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

व्हॉलेंटिअर टुरिझम म्हणजे नेमकं काय? तर पर्यटनासाठी देश-विदेशातील एखादं स्थळ निवडायचं. तिथं जाऊन स्वेच्छेने काम करायचं. मोबदल्यात समोरची संस्था आपल्या राहण्याचा, खाण्याचा सगळा खर्च करते. अशा प्रकारचं काम पर्यटन क्षेत्रातील एखाद्या हॉस्टेलमध्ये हमखास मिळू शकतं. हॉस्टेलमध्ये दिवसभर काम करायचं. तुमच्यातील अंगभूत कलागुण, कौशल्य इतर पर्यटकांना शिकवायचे. उरलेल्या वेळेत मनसोक्त हिंडायला बाहेर पडायचं. उभय देशांची संस्कृती आदानप्रदान करायची, तिथल्या शाळांमध्ये जाऊन एखादी भाषा, नृत्य, गायन, चित्रकला शिकवायची वा मुलांना एखादं वाद्य वाजवायला शिकवायचं. याबदल्यात कोणताही आर्थिक मोबदला न घेता संबंधित संस्थेकडून राहण्याची, जेवणाची व फिरण्याची व्यवस्था मोफत होतेच. हेच असतं व्हॉलेंटिअर टुरिझम! अलीकडच्या काळात बराच लोकप्रिय झालेला ट्रेण्ड.

व्हॉलेंटिअर टुरिझमचं नियोजन अगदी सोपं आहे. सर्वप्रथम आपण एखादा देश आणि तेथे उपलब्ध असलेल्या संधीसाठी किती वेळ देऊ शकतो? आपले छंद कोणते? आपल्यात कोणती कौशल्ये आहेत? या सगळय़ाचा अभ्यास करावा. हे कळलं की प्रवासाची आखणी करणं सोपं जाईल. आपला व्यवसाय वा नोकरी सांभाळून, प्रकृतीला मानवेल यानुसार एखादं काम निवडायचं. लहान मुलांना शिकवणं आवडत असेल तर अनेक संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत. एखाद्या सामाजिक कार्यात रस असेल, प्रशासकीय कार्याची आवड असेल वा वैद्यकीय सेवा देण्याची आवड असेल तर तशी सेवा देऊन तुम्ही पर्यटनाचीही मजा लुटू शकाल. भारतासह परदेशातही काही बिगर-सरकारी संस्था आहेत ज्या अशा पर्यटनाला प्रोत्साहन देतात. नेटसर्फिगमधून तुम्हाला त्याची इत्थंभूत माहिती मिळू शकते.

डोंबिवलीचा इंद्रजीत मोरे हा तरुण २०१८ पासून फक्त आणि फक्त व्हॉलेंटिअर टुरिझम करत आपला सफरनामा एन्जॉय करत असतो. जगभर हे पर्यटन कसं चालतं याची माहिती देताना तो म्हणाला, ‘संपूर्ण जगभर सध्या या भ्रमंतीची क्रेझ आहे. लेह-लडाखमध्ये काही शाळा आहेत, ज्या फक्त स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालवल्या जातात. त्यासाठी भारतभरातून मुलं आपला अर्ज दाखल करतात. त्यांचं शिक्षण व इतर कौशल्यं तपासून त्यांची निवड केली जाते. त्यांना शाळेत शिकवण्यासाठी विषय आणि तास दिले जातात. तितके तास पूर्ण झाले की उरलेल्या वेळेत स्वयंसेवक एक तर त्यांची कामं करू शकतात किंवा भटकंती. आफ्रिका या देशात शेतांमध्ये व्हॉलेंटिअर टुरिझम चालतं. यातून तुम्हाला तेथील शेतीच्या पद्धतीची माहिती मिळते आणि सोबत तुम्ही तो देशही फिरू शकता. कोस्टारिका या देशात जंगलाचं प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे, त्यामुळे तिथे जंगल संवर्धन प्रकल्प चालतात. त्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता भासते.’ असे अनेक प्रकल्प जगभर सुरू असतात. त्यानिमित्ताने सलग काही महिने एका ठिकाणी राहून एक नवीन संस्कृती जवळून अभ्यासायला मिळते. वेगळं काही तरी शिकायला मिळतं, असं तो सांगतो. व्हॉलेंटिअर टुरिझम तुम्हाला तुमची चौकट मोडायला लावतं. आपल्याकडे जी माहिती नाही ती माहिती करून देतं. वेगळे अनुभव जगायला शिकवतं’, असंही तो नमुद करतो.

मुळातच ही संकल्पना केवळ स्वयंसेवकांसाठी डिझाइन केलेली आहे हे सगळय़ांनी समजून घ्यायला हवं, असं सांगत इंद्रजीतने या पर्यटनाच्या काही इतर नकारात्मक बाजूंवरही प्रकाश टाकला. एखादी संस्था जेव्हा तुम्हाला त्यांचा स्वयंसेवक म्हणून निवडते, तेव्हा अर्थातच त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये मदत मिळेल या हेतूने तुमची निवड झालेली असते. फिरणं हा मुद्दा तिथे प्रथमस्थानी नसतोच. आता नेमकं यात उलट घडू लागलं आहे. मुलं कामाला कमी आणि फिरायलाच अधिक प्राधान्य देतात, त्यामुळे संबंधित संस्थेची गळचेपी होते. त्या पर्यटनातला आनंद भरकटून जातो. तसंच या पर्यटनात आपण आपल्या घरापासून, रोजच्या मित्रमंडळींपासून शेकडो मैल लांब असतो, त्यामुळे एकटेपणा वाटणं साहजिक आहे. अशा वेळी जर एखादा पर्यटक मानसिक संतुलन सांभाळू शकला नाही तर त्याला नैराश्यसुद्धा येतं, असं सांगणाऱ्या इंद्रजीतने गोव्यात बारमध्ये काम करताना आपल्याला नैराश्य आल्याचं सांगितलं. ‘त्यावर उपाय म्हणून मी माझं काम संपल्यावर एका कॅफेत जाऊन बसायचो, समुद्रावर फिरायला जायचो. असे उपाय आपलेच आपल्याला शोधावे लागतात’ असंही त्याने सांगितलं.

पुण्यातील मधुरा हुबळीकर ही तरुणीसुद्धा व्हॉलेंटिअर टुरिझममध्ये सहभागी होत असते. धरमकोटमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहून तिथल्या पर्यटकांकडून मधुराने भरतनाटय़मचे धडे गिरवून घेतले. व्हॉलेंटिअर टुरिझमला निघण्याआधी नियोजन कसं असावं हेही ती सविस्तर सांगते. ‘मुळातच व्हॉलेंटिअर टुरिझमसाठी वयाचं बंधन नसतं. कोणतंही पर्यटन स्थळ निवडण्याची जरी मुभा असली तरी त्यासाठी किती खर्च येणार आहे, तो कसा करायचा, तेथे मोफत सेवा द्यायची की खर्चापुरते पैसे घ्यायचे वा त्याबदल्यात राहण्याची- खाण्याची सोय करून घ्यायची हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. एकूण खर्च आणि निधीची उपलब्धता यासाठी तुमचं बजेट निश्चित असायला हवं. तुम्ही किती वेळ देऊ शकता, हे पाहून त्यानुसार पर्यटनाला निघण्यापूर्वीच कोणतं काम करायचं हे ठरवा. तेथे गेल्यावर अर्धवेळ काम करणार की पूर्णवेळ, उर्वरित वेळेत की वीकएंडला पर्यटनाला जाणार हे ठरवून त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करावी लागते. याशिवाय, विदेशी भाषा, तेथील खाद्यपदार्थ, तेथील संस्कृतीशी जुळवून घेण्याची तयारी ठेवावी लागते. तडजोड करण्याच्या तयारीबरोबरच भावनेपेक्षा व्यवहार जपण्याची मानसिकता अंगी बाणवून घ्यावी लागेल’ असंही ती सांगते. ‘उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी गेल्यावर कोणत्याही विदेशी मुलगा वा मुलगीबरोबर रूम शेअर करण्याची, स्वत:चं जेवण स्वत: बनविण्याची, अस्वच्छ टॉयलेट्स वापरण्याची तयारी ठेवावी लागते. त्याचबरोबर हे पर्यटन आपण एकटे करत आहोत याचं सतत भान ठेवावं लागतं. कोणत्याही क्षणी बेसावध राहता येणार नाही, हे जरूर ध्यानात घ्या. प्रत्येक व्यक्तीला याचे भिन्न अनुभव येतात. म्हटलं तर सगळंच ‘अभूतपूर्व’, म्हटलं तर पुन्हा कधीही जाणार नाही इतपत मानसिकताही तयार होऊ शकते. प्रत्येकानं ठरवायचं साहसी, धाडसी पर्यटन करायचंय तरच मग चला पुढे..’ असा सल्लाही तिने दिला. 

व्हॉलेंटिअर टुरिझमसाठी आवश्यक आहे धीटपणा, आत्मविश्वास, एखादं लक्ष्य ठरवून ते नेटाने पूर्ण करण्याची चिकाटी, समोर आलेल्या परिस्थितीत तडजोड करण्याची तयारी आणि विचारांमधील स्पष्टता. हे गुण अंगी असतील तर अशा प्रकारच्या पर्यटनाचा तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता. आणि अर्थातच ‘सेवा’ केलीत तरच पुढचा तुमचा ‘सफरनामा’ सुकर होईल.

viva@expressindia.com