हिवाळ्यातली एक सोनसळी सकाळ. तालुक्याच्या शाळेत आसपासच्या सगळ्या गावांतल्या मुलांची गर्दी जमली आहे. शाळेचं मैदान चिमुरड्यांच्या उत्साहाने भरून गेलं आहे. त्यांच्या डोळ्यात उत्सुकता ओसंडून वाहते आहे. अचानक शिट्टी होते, शाळेचं बँड पथक ताल धरतं, लेझीम पथक खळखळतं, स्काऊट पथकाची परेड सलामी देते आणि या जल्लोषात इस्रोच्या ‘स्पेस ऑन व्हील्स’ बसचं दमदार आगमन होतं. मुलं रांगेने शिस्तीत बस बघतात, सगळी माहिती समजावून घेतात, त्यांच्या मनात इस्रोविषयी असणारा आदर आता शतपटीने वाढलेला असतो.
यातून प्रेरणा घेत एखाद्या छोट्या ‘कलाम’च्या डोळ्यात मोठेपणी इस्रोत शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न चमकत असतं… तर कोणी एखादी चिमुकली ‘कल्पना’ अंतराळवीर बनून केव्हाच स्वप्नाच्या अंतराळात तरंगत असते. संध्याकाळ होते, तरीही तुरळक गर्दी कायम असते. शेवटचा विद्यार्थी मैदानात असेपर्यंत हा सोहळा सुरू असतो. दिवसभर हजारो मुलांना अशी प्रेरणा देऊन इस्रोची बस पुढच्या तालुक्यात जायला निघते. सध्या तालुक्या-तालुक्यात हे असं वातावरण आहे. निमित्त आहे ‘इस्रो’ची महाराष्ट्र वारी!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ ही आपल्या भारतीयांचा अभिमान आहे. १५ ऑगस्ट १९६९ ला स्थापन झालेल्या या संस्थेने आरंभीची प्रतिकूल परिस्थिती आणि इतर आव्हानांना तोंड देत अल्पावधीत मोठी झेप घेतली आहे. चांद्रयान, मंगलयान, आदित्य एल १ अशा यशस्वी मोहिमांनी इस्रो नवे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे, पण भारताची ही यशस्वी घोडदौड, वैज्ञानिक प्रगती इस्रोच्या चार भिंतीत मर्यादित न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी इस्रो प्रयत्नरत आहे. याचाच एक भाग म्हणजे – ‘स्पेस ऑन व्हील्स’!! ही विशेष बस भारतभर प्रवास करत सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.
या विशेष बसमध्ये इस्रोद्वारा निर्मित विविध प्रक्षेपक, उपग्रह यांच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच भारताच्या मंगलयान, चांद्रयान, उपग्रहांचे दळणवळण, दूरस्थ संवेदन यासाठी उपयोग यांच्याविषयी माहिती आहे. याविषयी अधिक माहिती देताना इस्रोच्या एनआरएससीचे जनसंपर्क विभागाचे प्रमुख डॉ. आर. श्रीनिवास यांनी सांगितले की, ‘स्पेस ऑन व्हील्स’च्या माध्यमातून इस्रो थेट जनसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचते आहे. अंतराळ संशोधनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
इस्रो आणि विज्ञान भारती यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार या बसच्या भारतभर प्रवासाच्या नियोजनाचे दायित्व विज्ञान भारती या संघटनेला देण्यात आले आहे. विज्ञान भारतीच्या माध्यमातून देशभरात प्रत्येक राज्यात आणि राज्यातील विविध तालुक्यात ही बस जाते आहे. विविध शैक्षणिक संस्थांशी संपर्क करून त्यांच्या प्रांगणात या बसच्या प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. ‘विज्ञान भारती’ ही स्वदेशी विज्ञानाचा प्रचार-प्रसार करणारी राष्ट्रीय संघटना आहे. आणि स्वदेशी विज्ञानातून देशाच्या प्रगतीचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्रो होय. विज्ञान भारतीच्या मानसी माळगावकर यांनी याविषयी बोलताना सांगितले, ‘स्पेस ऑन व्हील्स’ला विदर्भात सुमारे पाच लाख लोकांनी भेट दिली. पुणे जिल्ह्यात ८० हजारांहून अधिक लोकांपर्यंत ही बस पोहोचली. सध्या या बसचा नाशिक जिल्ह्यात प्रवास सुरू असून पुढे अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा असा पश्चिम महाराष्ट्र दौरा चालत राहील. यानंतर पुढील काही महिन्यांत मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा पूर्ण महाराष्ट्र फिरत विज्ञानाचा जागर करेल. महाराष्ट्रातील सगळ्या तालुक्यांत ही बस नेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.
‘स्पेस ऑन व्हील्स’ या बसमध्ये बाहेरच्या बाजूला आर्यभट, रोहिणी, भास्कर अशा सुरुवातीच्या भारतीय उपग्रहांच्या प्रतिकृती आहेत. आर्यभट हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह, पण तेव्हा उपग्रह प्रक्षेपणाचे तंत्रज्ञान भारताकडे नसल्याने रशियाच्या मदतीने याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. हे प्रदर्शन इस्रोच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देते. पुढे बसच्या आत शिरताच भारताने बनवलेल्या विविध प्रक्षेपणयानांच्या (लॉन्च व्हेईकल) प्रतिकृती आपले स्वागत करतात. सुरुवातीच्या उपग्रह प्रक्षेपणयाना (SLV) पासून तर सध्या चांद्रयान- ३ मध्ये उपयोगात आलेले जीएसएलव्ही मार्क ३ पर्यंतचा हा प्रवास इस्रोच्या गरुडभरारीची आठवण करून देतो. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणयान (PSLV) द्वारे एका मोहिमेत १०४ उपग्रह प्रक्षेपित करून इस्रोने इतिहास रचला होता. स्वत:च्या उपग्रहाला प्रक्षेपित करण्यासाठी इतरांवर अवलंबून असणारा देश आता इतर देशांचे उपग्रह अवकाशात पाठवण्यास सज्ज आहे ही जाणीव होताच अभिमानाने ऊर दाटतो.
सतीश धवन अंतराळ केंद्र येथील प्रक्षेपण तळाच्या प्रतिकृती प्रक्षेपणयानाची बांधणी आणि प्रक्षेपण याविषयी माहिती पुरवतात. दूरस्थ संप्रेषण उपग्रह (remote sensing satellites) आणि संदेशवाहक उपग्रह (communication satellites) या विषयीच्या प्रदर्शनातून इस्रोद्वारे सोडल्या गेलेल्या विविध उपग्रहांचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित होते. फोनकॉल, इंटरनेट, टीव्ही यांच्यापासून ते शेती, सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांतील उपग्रहांचा उपयोग यातून कळण्यास मदत होते.
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (GPS) प्रमाणे भारताने आपली स्वत:ची नाविक (NaVIC) ही स्थितीदर्शक यंत्रणा विकसित करून अशी यंत्रणा असणाऱ्या मोजक्या देशांच्या रांगेत स्थान मिळविले आहे. नाविकविषयीच्या प्रदर्शनातून याची माहिती मिळते. चांद्रयान १, चांद्रयान ३, मंगलयान यांचे प्रदर्शन सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतात. तसेच क्रू एस्केप मोड्युल आणि पुनर्वापरायोग्य प्रक्षेपण यान – आरएलव्ही-टीडी हे इस्रोच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांची झलक दाखवतात. ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही बस बघताना इस्रोचा हा सारा प्रवास आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातो. आणि हेच या प्रदर्शनाचे यश आहे!
आजच्या इंटरनेटच्या युगात खरे तर या बसमध्ये असणारी सगळी माहिती घरबसल्या एका क्लिकवर सहज मिळू शकते, तर मग ही बस खास भारतभर फिरवण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न पडू शकतो. याचे उत्तर ‘स्पेस ऑन व्हील्स’ला भेट दिली की आपसूकच मिळते. जिथे ही बस असते तिथे जणू विज्ञान मेळावा भरलेला असतो. आयोजक शाळा-कॉलेजने आठवडाभर आधीपासून जय्यत तयारी सुरू केलेली असते. परिसरातील इतर शाळा आणि संस्थांना निमंत्रण पाठवलेले असते. कुठे पताक्यांनी मैदान सजतं, तर कुठे शास्त्रीय माहिती देणारे पोस्टर्स तयार होतात. दूरवरच्या खेड्यापाड्यांतून शिक्षक, पालक आपल्या विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनातून या ठिकाणी आणतात. बसला भेट द्यायला हजारो विद्यार्थी एकत्र जमतात. पण ही नुसती गर्दी न ठरता विज्ञानप्रेमींचे जणू संमेलन ठरते. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा, पोस्टर प्रेझेन्टेशन, मॉडेल मेकिंग असे विविध उपक्रम इथे सुरू असतात. आयोजक शाळेचे विद्यार्थी, कार्यकर्ते स्वत: अभ्यास करून सविस्तर माहिती सांगत असतात. आश्रमशाळा, बालसुधारगृह, अनाथाश्रम, विशेष मुलांच्या शाळा असे समाजाच्या मूळ प्रवाहापासून काहीसे वेगळे पडलेले घटकदेखील या ज्ञानयात्रेत आवर्जून सहभागी होताना दिसतात. यातून प्रेरणा घेत विद्यार्थी घरी परततात.
विद्यार्थ्यांच्या मनात अशी प्रेरणा जागवण्याची नितांत गरज असल्याचे नासा आणि इस्रोच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी आवर्जून नमूद करतात. अवकाश संशोधन या क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक नव्या संधी उपलब्ध आहेत. शालेय वयात अशी प्रेरणा रुजवली तर भविष्यात करिअरच्या दृष्टीने त्याचा नक्की विचार करतील. इस्रोची यशोगाथा दाखवणाऱ्या ‘स्पेस ऑन व्हील्स’ या बसभेटीतून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा त्यांना विश्वास वाटतो.
अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमिक शाळेत ही बस येते, तेव्हा संस्थेच्या महाविद्यालयांचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून हिरिरीने काम करतात. काही ठिकाणी अभियांत्रिकी किंवा विज्ञान महाविद्यालयातदेखील या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. अशा वेळी या आयोजनात तरुणाईचा सहभाग उल्लेखनीय असतो. नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सपट इंजिनीअरिंग कॉलेजला विद्यार्थी कार्यकर्त्यांनी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ असे बारा तास काम करत हे प्रदर्शन दाखवले. या कॉलेजची विद्यार्थिनी स्वयंसेवक प्राजक्ता भांडारकरच्या मते आपल्या देशाची ही यशोगाथा सांगताना वाटणारा अभिमान शब्दात मांडता येणे कठीण आहे.
येत्या काही महिन्यांत ‘स्पेस ऑन व्हील’ राज्याच्या इतर जिल्ह्यात प्रवास करेल. आतापर्यंत दिसलेला हा उत्साह उर्वरित ठिकाणीही दिसेल यात शंका नाही. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई म्हणाले होते, ‘एखाद्या संशोधनात जेव्हा फक्त शासनच नाही तर देशातील जनता सहभागी असते तेव्हाच त्याची खरी सफलता असते.’ स्पेस ऑन व्हील्सच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दिसणारा हा उत्साह इस्रोच्या यशाची पावती आहे असं नक्कीच म्हणता येईल.
viva@expressindia.com