वैष्णवी वैद्य मराठे

बघता बघता नवीन वर्षांतला पहिला सण येऊन ठेपलाय. ‘मकर संक्रांत’ या सणाची खासियतच ही आहे की, इतर वेळी सणासुदीला, शुभकार्याला जे काळे कपडे आपण घालू शकत नाही ते या दिवशी अगदी बिनधास्त मिरवता येतात. तिळगुळाची गोडी वाटणाऱ्या या सणाला परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाफ साधत करता येणारी ‘काळी’ फॅशन म्हणजे आनंदाची पर्वणीच.. 

Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
Video : ठरलं! मृणाल दुसानिसची नवीन मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये झळकणार ‘हे’ दमदार कलाकार
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

नववधूंसाठी मकर संक्रांत हा अजूनच खास असतो, याचं कारण पहिली मकर संक्रांत हलव्याचे दागिने परिधान करून आणि पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम करून साजरी करतात. आणि या दिवशी महत्त्व असतं ते काळय़ा साडीचं. कपडय़ांमधला काळा रंग खरं तर इतका समृद्ध आणि चैतन्यमय आहे की इतर कुठल्याही रंगासोबत याचं कॉम्बिनेशन केलं तर अतिशय उठावदार दिसतं. पूजा-अर्चा किंवा देवधर्माचे कार्यक्रम सोडले तर वर्षभर कुठल्याही निमित्ताने आपण काळे कपडे घालू शकतो. तरीही मकर संक्रांतीच्या निमित्ताने काळय़ा कपडय़ांमध्ये दिसणारी इतकी वैविध्यपूर्ण फॅशन म्हणजे जणू कृष्णप्रेमींसाठी खजिनाच.. अगदी साडय़ांमध्येही जरी-काठाच्या साडय़ांपासून ते ट्रेण्डी साडय़ांपर्यंत सगळे सुंदर प्रकार मिळतात आणि ते विविध पद्धतीने स्टाइलसुद्धा करता येतात. त्यातलेच काही नावीन्यपूर्ण प्रकार आणि ट्रेण्ड पाहू या.. 

कांथा साडी

कांथा या शब्दाचा अर्थ बंगाली भाषेत ‘जुनं कापड’ असा होतो. पश्चिम बंगाल आणि ओडिसा भागातल्या बायकांनी अशा वेगवेगळय़ा कापडांपासून साडी तयार केलेली आहे ती म्हणजे कांथा साडी. या सध्या फार ट्रेण्डमध्ये आहेत. कांथा साडी नेसल्यानंतरचा लुक हा फार आकर्षक दिसतो आणि त्यातून काळय़ा रंगाची साडी तर अतिशय स्मार्ट दिसते. यावर कुठल्याही प्रकारे मिसमॅच कॉम्बिनेशन करून ब्लाऊज पेअर करता येतो. तसंच जरा मॉडर्न लुक देण्यासाठी तुम्ही यावर ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान करू शकता. पारंपरिक आणि इतिहास असलेली ही साडी सध्या ट्रेण्डी आणि मॉडर्न फॅशन म्हणून मिरवली जाते आहे.

डोला सिल्क साडी

डोला सिल्क साडी ही शुद्ध रेशमापासून बनवली जाते. हे रेशीम नाजूक, टिकाऊ आणि अतिशय हलकं असतं, ज्यामुळे ही साडीसुद्धा नेसायला आणि पेलायला अतिशय हलकी असते. या साडय़ा हव्या त्या पद्धतीच्या काठपदरात मिळतात. शक्यतो छोटे काठ आणि साडीभर बुट्टी असलेली डोला सिल्क साडी घरगुती आणि बाहेरच्या समारंभांनासुद्धा फार मोहक दिसते. यातली काळी आणि सोनेरी साडी मुळातच चमकदार असते, त्यामुळे शक्यतो मॅट फिनिश आणि प्लेन ब्लाऊज घाला, जेणेकरून लुक बॅलन्स होईल. साडीच्या काठाच्या रंगानुसार कुठल्या फिनिशची ज्वेलरी घालायची हे ठरवा. अशा साडय़ांवर शक्यतो टेम्पल ज्वेलरी चांगली दिसते. या साडय़ा साधारण ३००० ते ५००० रुपयांच्या रेंजमध्ये असतात.

मुगा कतान सिल्क साडी

लग्नानंतर पहिलाच संक्रांतीचा सण असणाऱ्यांसाठी या साडय़ा बेस्ट. एक तर ही साडी चापूनचोपून बसते आणि यावर नाजूकसे हलव्याचे दागिने अतिशय गोड दिसतात. या साडय़ांची जरी ही सिल्व्हर-गोल्डन अशा मिक्स कॉम्बिनेशनची सुद्धा असते, त्यामुळे तुम्ही पारंपरिक दागिने घातले तरी यावर छान दिसतात. यामध्येही तुम्हाला नावीन्य आणायचं असेल तर प्लेन स्लीवलेस ब्लाऊज घालू शकता. कुठल्याही अंगकाठीच्या बायकांना ही साडी अगदी सुटसुटीत बसते. जर पहिलीच संक्रांत असेल तर शक्यतो मिक्समॅच कॉम्बिनेशन करू नका, कारण मग ते हलव्याच्या दागिन्यांना सूट होणार नाही.

ब्लॅक जॉर्जेट साडी

ब्लॅक साडीसारखं एलिगंट पार्टीवेअर दुसरं काही असूच शकत नाही. मकर संक्रांतीचं घरगुती हळदी-कुंकू किंवा छोटासा गेट-टुगेदर टाइप कार्यक्रम असेल तर सुंदर अशी जॉर्जेटची साडी परफेक्ट चॉइस आहे. त्यावर वेगळं स्टायिलग म्हणजे मोठमोठय़ा सेलिब्रिटीजनाही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा ते काळी पार्टीवेअर साडी नेसतात तेव्हा ज्वेलरी अतिशय मिनिमलिस्टिक असते. काळी पार्टीवेअर साडी आणि नाजूक डायमंड यापेक्षा क्लासी काहीच असू शकत नाही. जॉर्जेटमध्येही शिमर आणि सिक्विन काम केलेल्या साडय़ा फारच उठावदार दिसतात. तुम्हाला सुंदरही दिसायचं आणि ओव्हर द टॉपसुद्धा नाही व्हायचंय तेव्हा अशा पद्धतीचं साडी स्टायिलग तुम्ही करू शकता. या साडय़ाही ३००० ते ५००० रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.

कोटा डोरिया साडी

वजनाला सगळय़ात हलकी साडी जर कुठली असेल तर ती कोटा डोरिया साडी. या साडीचे धागे खूप लांब असतात, त्यामुळे ही जरा हलकी आणि ट्रान्स्परंट असते. यामध्ये शक्यतो काळं आणि राखाडी कॉम्बिनेशन असेल तर सध्याच्या फॅशनला ही बेस्ट साडी आहे. घरगुती समारंभ आणि ऑफिसवेअर म्हणून ही साडी सगळय़ात परफेक्ट आहे. ही साडी दिसायला फॉर्मल लुक देते, त्यामुळे फॉर्मल मीटिंग्जनाही साडी नेसून जाऊ शकता. या साडीवर पारंपरिक लुक करायचा असेल तर मोत्याची ज्वेलरी सुंदर दिसते. ही साडी २००० ते ५००० रुपयांच्या रेंजमध्ये येते.

लिनन सिल्क साडी

लिनन हे सगळय़ात बहुमुखी कापड आहे. तुम्ही जितकं वापराल तितकं टिकाऊ आणि सॉफ्ट होत जातं. त्यामुळेच लिननच्या साडय़ाही सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. काठपदर आणि पारंपरिक साडय़ा सोडून जर एखादी साडी तुम्हाला ट्राय करायची असेल तर लिनन साडी उत्तम चॉइस आहे. त्यावर कॉन्ट्रास्ट म्हणून तुम्ही शिमरचा ब्लाऊज परिधान करू शकता, जेणेकरून छान ट्रेण्डी लुक मिळेल. ही साडी थोडी वेस्टर्न लुक देते, पण तुम्ही संक्रांतीनिमित्ताने नवीन काही तरी म्हणून स्टाइल करू शकता. लिननसुद्धा वजनाला जवळपास शून्य असतं, त्यामुळे अगदी दिवसभर किंवा रात्रभरसुद्धा साडी अंगावर ठेवलीत तरी तुम्हाला फार त्रास होत नाही.

चंद्रकळा साडी

चंद्रकळा हा जुन्या बनारसी साडय़ांमधला प्रकार आहे जो आता फारसा पाहायला मिळत नाही. पण नव्याने पुन्हा बनायला सुरुवात झालेली दिसते. या साडीचं वैशिष्टय़ म्हणजे यावरची बुट्टी आणि याचे रंग. तुम्हाला शाही आणि पारंपरिक लुक हवा असेल तर काळी चंद्रकळा साडी आणि त्यावर चंद्राची बुट्टी हे कॉम्बिनेशन अतिशय राजेशाही दिसतं. शेवटी हा प्रकार म्हणजे एक शालूचाच प्रकार आहे, त्यामुळे तो तसा हेवी आणि शाही लूक देतो. आता नव्याने या साडय़ा सगळय़ाच प्रकारात बनत आहेत जसं की खण आणि खादी. यावर मात्र फक्त आणि फक्त पारंपरिक ज्वेलरीच उठून दिसते. अस्सल मराठमोळे दागिने यावर परिधान केले की तुम्हाला पारंपरिक राजेशाही लुक साधता येतो.

काळय़ा साडीचे आणखीही काही प्रकार प्रचलित आहेत ते म्हणजे पिंट्रेड साडय़ा. या पिंट्र फॅशनमध्ये सगळय़ात लोकप्रिय झालेली पिंट्र म्हणजे प्राजक्ताच्या फुलांची पिंट्र आणि विणकाम. काळय़ा साडीवर पांढऱ्या केशरी प्राजक्त फुलांचं विणकाम म्हणजे अक्षरश: अंगणातच सडा पडल्यासारखा दिसतो. अजरख प्रकारची साडीसुद्धा यंदा फार लोकप्रिय झाली आहे. यामध्ये काळा, इंडिगो, लाल असे रंग ट्रेण्डिंग आहेत, त्यावर एलिगंट अशी पिंट्र फॅशन असल्याने कसंही स्टायिलग आणि मिक्समॅच कॉम्बिनेशन करता येतं. या साडय़ा तुम्ही चक्क सहज मैत्रिणीबरोबर फिरायला जाताना, बाहेर जेवायला जातानाही नेसून जाऊ शकता इतक्या कॅज्युअल आणि आटोपशीर असतात.

पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींमागचा विचार लक्षात घेतला तर त्या आवडू लागतात. मकर संक्रांत हा सण थंडीत येतो आणि काळा रंग अतिशय उबदार, उष्ण असल्याने संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे योग्य कारण देऊ करणाऱ्या या सणाला काळय़ा रंगाची साडी नेसण्याची हौस भागवायची संधी मिळाली तर ती दवडून चालणार नाही. तुम्हीही तुमची ‘काळी’ साडी लवकर निवडा.. येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा, तिळगूळ घ्या, गोड गोड बोला.

viva@expressindia.com