शाळेच्या त्याच त्याच अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून शाळा सोडलेल्या आठ वर्षांच्या मुलाने शिक्षणाची आस मात्र सोडली नव्हती. आठव्या वर्षी एकटयाने रोबोटची निर्मिती करणाऱ्या अंगद दर्यानीचा उद्याोजक होण्यापर्यंतचा प्रवास भल्याभल्यांना अचंबित करणारा आहे.
लहानपणापासून हुशार असलेली मुलं पुढे जाऊन काहीतरी मोठं करतील असं सगळ्यांनाच वाटत असतं. तसंच काहीसं अंगद दर्यानीच्या बाबतीतही झालं. अंगद लहानपणापासूनच हुशार होता, मात्र त्याला नेहमीच्या अभ्यासाचा कंटाळा आला. आणि त्याने लवकर शाळा सोडून दिली. शिक्षण घ्यायच्या वयात शाळा सोडून बसलेल्या या अंगदने वयाच्या आठव्या वर्षी स्वत: पहिला रोबोट आणि सौर ऊर्जेवरची बोट बनवली. वयाच्या १३ व्या वर्षी त्याने स्वत:चा थ्रीडी प्रिंटर तयार केला. त्याने अंध मुलांसाठी वाचन सोपे करणारा ई-रीडर (व्हर्च्युअल ब्रेलर) वयाच्या पंधराव्या वर्षी तयार केला. इतक्या हुशार मुलाने शाळा सोडून दिली होती, कारण शाळेतल्या त्याच त्याच नेहमीच्या अभ्यासाचा त्याला हळूहळू कंटाळा आला होता.
‘मला शाळा गोंधळात टाकायची. मी अभ्यासात चांगला होतो, मार्क्स चांगले होते, मात्र माझ्या मूलभूत संकल्पना क्लिअर होत नव्हत्या. त्यामुळे मी ऑलिंपियाड सारख्या परीक्षांमध्ये काही करू शकत नव्हतो. त्यात मला उत्तरं शोधायला अडचण यायची, पण त्याच वेळी मी इतर पुस्तकं वाचून असे काही काही प्रोजेक्ट्स करत होतो की जे इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगच्या विषयाचे वगैरे होते. मला तो छंद होता. मी शाळा सोडली तेव्हा माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी एक ट्यूटर आणला जो मला शाळेतलेच विषय शिकवायचा, मात्र माझ्या सगळ्या संकल्पना क्लिअर करून! मला तेव्हा काही गृहपाठ नसायचा आणि जे काही सोडवायचं असायचं ते आम्ही शिकतानाच करायचो. त्यामुळे उरलेला वेळ मला या अशा छंदांसाठी देता यायचा’ असं अंगद सांगतो. अंगद चौदा वर्षांचा होता. त्यावेळी त्याने अमेरिकेतल्या एमआयटी मधल्या रमेश रासकर नावाच्या प्रोफेसरशी संपर्क साधला.
एमआयटीबरोबर काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्या प्रोफेसरनीसुद्धा त्याला तत्परतेने प्रतिसाद दिला. या कम्युनिकेशनच्या माध्यमातून एमआयटीने अंगदसोबत कोलॅबोरेशन केले आणि ‘इंडिया इनिशिएटीव्ह’च्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टींची निर्मिती करण्यात आली. यामुळे अंगदलाही प्रोत्साहन मिळालं.
अंगदला लहानपणापासून अस्थमा होता, त्यामुळे त्याला मुंबईच्या हवामानाचा त्रास व्हायचा. हवेतल्या प्रदूषणाचा त्रास व्हायचा. त्यामुळे दर थोड्या थोड्या काळाने त्याला मुंबई सोडून बाहेर जावं लागत असे. सततच्या त्रासाला कंटाळून त्याने स्वत:सोबतच जगाचा प्रॉब्लेमही सोडवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने एअर प्युरिफायर तयार करायचं ठरवलं आणि त्यादिशेने कामाला सुरुवात केली. शाळा सोडल्यानंतर पुन्हा काही काळाने त्याने आयबी स्कूलमध्ये अॅडमिशन घेतली. त्यानंतर त्याने जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतली आणि शिक्षणासाठी परदेशात गेला. त्याच्या एअर प्युरिफायर बनवण्याच्या प्रयत्नांना तिथे असतानाच सुरुवात झाली होती. तिथल्या नियमानुसार त्याच्या एफ-१ व्हिसावर त्याला तिथे प्लांट उभं करणं किंवा कोणत्याही व्यवसायासाठी प्रयोग किंवा प्रयत्न करणं याची परवानगी नव्हती. त्यामुळे तो त्याच्या कॉलेजमध्येच सगळे प्रयोग करत असे. प्युरिफायरचा प्रोटोटाइप, जवळपास पाच फूट उंचीचा होता. तो रोज घरातून युनिव्हर्सिटीमध्ये घेऊन जात असे. तिथे लॅबमध्ये प्रयोग करत असे आणि परत घरी घेऊन येत असे. अशा पद्धतीने मेहनत करून त्याने त्याचा पहिला प्रोटोटाइप विकसित केला.
अंगदने बनवलेला हा प्युरिफायर हवा आत ओढून घेतो. त्यातले धुळीचे कण म्हणजेच पार्टिकल्सना इलेक्ट्रिकल चार्ज करतो. त्या चार्जमुळे ते एका दिशेला ढकलले जातात आणि सगळे एकत्र जमा होतात. हवेपासून वेगळे करून ती शुद्ध हवा परत वातावरणात सोडली जाते अशा पद्धतीचा हा प्युरिफायर आहे. या प्युरिफायरने त्याला त्याच्या अस्थमावर तर उपाय दिलाच, पण त्याचबरोबर हेल्थ-टेकमध्ये त्याला जे संशोधन करून त्यासाठी काम करण्याची इच्छा होती त्यालासुद्धा प्रोत्साहन मिळालं. त्यासाठीची कार्य प्रेरणा तिथे मिळाली. त्या मोटिव्हेशनवर त्याने स्वत:ची ‘प्राण’ नावाची अख्खी कंपनी सुरू केली. ‘प्राण’ म्हणजे संस्कृत मध्ये जीवन किंवा श्वास. त्यामुळे कंपनीचं नाव त्याने ‘प्राण’ ठेवलं.
लहानपणापासून हुशार असणारा अंगद दर्यानी पुढे बाहेरच्या देशात जाऊन लॅब सेटअप करून लोकांच्या भल्यासाठी शोध लावतो आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी एवढी मोठी कंपनी निर्माण करतो. खरं शिक्षण हे चार भिंतींच्या आतच असतं असं नाही. शिक्षणाची, नवं काहीतरी शोधण्याची आस असेल, त्यासाठी प्रयत्न करण्याची जिद्द असेल तर अंगदसारखे संशोधक पुढे येतील. अंगदचं कार्य हे निश्चितच तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. लहान वयात उद्याोजक झालेल्या अंगदने स्वत:च्या समस्यांवर उत्तर शोधता शोधता समाजालाही त्याचा फायदा कसा होईल याचा विचार करून आपले अभ्यास-संशोधन सुरू ठेवले. आणि त्यातून समाजोपयोगी तंत्रज्ञान, उपकरणांची निर्मिती झाली. म्हणूनच अंगदचं काम, त्याची संशोधक वृत्ती, व्यापक दृष्टिकोन हे वेगवेगळे पैलू विचारात घ्यावेत असे आहेत.
viva@expressindia.com