पाऊस यायला लागला की छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल यांची आठवण होते. खरं तर, आधीपासून बघून ठेवू, असं कितीही मनाशी ठरवलेलं असलं तरी माकडाच्या घरासारखं ‘उद्या बघू, उद्या बघू’ करत थेट पाऊसच येऊन कोसळतो. मग शोधाशोध सुरू होते आणि ‘नंतर सापडायला हवेत’ म्हणून ‘नीट’ ठेवलेले रेनकोट आणि छत्री काही वेळेवर सापडत नाही. मग पाऊस नसताना चोरासारखं बाहेर जाऊन यायची कसरत सुरू होते. नवीन छत्री आणि रेनकोटचा लगेच ऑनलाइन सर्च सुरू होतो. दरवर्षी नवीन वस्तूंचा मोह पाडायला तर ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट तयारच असतात. दरवर्षी काहीतरी युनिक आणि हटके मार्केटमध्ये आलेलंच असतं. एकच छत्री मोडेपर्यंत किंवा रेनकोट फाटेपर्यंत आणि चप्पल तुटेपर्यंत वापरायचा जमाना गेला आणि दरवर्षी वेगवेगळ्या ट्रेण्डी दिसणाऱ्या वस्तू मिळायला लागल्या. मात्र नवीन लुकमध्ये अडकल्याने त्यांच्या कम्फर्टकडे फारसं लक्ष दिलं जात नसे. आता मात्र हा ट्रेण्ड बदलला आहे.

या वर्षी मार्केटमध्ये ट्रेण्ड होणारं रेनवेअर हे कम्फर्टच्या दृष्टीने जास्त भर देऊन बनवलं गेलं आहे. रेनवेअरमध्ये छत्री, रेनकोट, चप्पल हे सगळं साहजिकच येतं. पूर्वीच्या काळी पुरुषांच्या छत्र्या काळ्या आणि बायकांच्या छत्र्या फुलाफुलांच्या, एवढंच समीकरण होतं. मोठ्या काठीच्या आजोबा छत्र्या कालबाह्य झाल्या आणि गेल्या काही वर्षांत रंगीबेरंगी साज लेऊन अचानक परत ट्रेण्डमध्ये आल्या. पुन्हा आल्या त्या मात्र खास करून विमेन कंझ्युमरला टार्गेट करून आल्या. मुलीही अगदी गच्च भरलेल्या ट्रेनमध्येसुद्धा एवढी मोठी छत्री घेऊन जायला लागल्या. मात्र आता तो ट्रेण्ड जाऊन पुन्हा हलक्या, छोट्या आणि पटकन वाळणाऱ्या अशा छत्र्यांची मागणी वाढली आहे. डिझाइन, प्रिंट एकवेळ ट्रेण्डी मिळाली नाही तरी चालेल, पण छत्रीचा प्रत्यक्ष उपयोग झाला पाहिजे या विचाराने पुन्हा जोर धरला आहे. वॉटरप्रूफ कापडावर चांगले प्रिंट येत नाहीत आणि चांगलं प्रिंट होऊ शकणारं कापड वॉटरप्रूफ नाही, अशी पूर्वीची तऱ्हा होती. मात्र आता वॉटरप्रूफ कापड आणि आकर्षक रंग, आकर्षक प्रिंट, फ्रिल, छत्रीच्या वर कार्टूनचे कान वगैरे सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यात सन, ए अँड बी असे ब्रॅण्ड्स यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आता छान दिसणाऱ्या आणि उपयोगीही असणाऱ्या छत्र्या मिळतात आणि आवडतात.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta viva the rain umbrella raincoat raincoat look trend amy
First published on: 21-06-2024 at 07:06 IST