‘तो येतोय’ म्हणता म्हणता… तो आता दारावर येऊन थांबला आहे. वर्षभरात ज्या क्षणाची लहानथोर सगळे जण अगदी चातकासारखी वाट पाहात असतात तो क्षण आला आहे. कोणासाठी तो इच्छापूर्ती आहे, कोणासाठी तो नवसाचा आहे, कोणासाठी तो गल्लीचा राजा आहे, कोणासाठी तो दरवर्षी हक्काने घरी येणारा गणराया आहे.

तो येतो आणि स्वत:बरोबर आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा आणि भक्तीचा एक महासागर घेऊन येतो. गणरायाच्या आगमनाच्या तयारीत पूजा, कपडे, सजावट याबरोबरीने त्याच्यासाठीच्या खास दागिन्यांचीही लगबग असते.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Muramba
फिल्मी स्टाइलने अक्षयने रमाला केले प्रपोज; गोड नात्याची नव्याने होणार सुरुवात, ‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…

सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि त्या बरोबरच घरगुती गणेशोत्सवाची प्रथाही समाजात अधिकाधिक रुजत गेली. आपल्या हौसेच्या, मौजेच्या आणि लाडाच्या गणरायाला घरी आणणं सगळ्यांनाच आवडू लागलं. मग त्यासोबत आली सजावट, मोदक आणि दागिन्यांची हौस. कालांतराने या सगळ्याला भव्य रूप मिळत गेलं. गौरी गणपतीच्या निमित्ताने विविध पारंपरिक आणि नावीन्यपूर्ण दागिने बाजारात येऊ लागले. मग यामध्ये आभूषणं, शस्त्रं-अस्त्रं या सगळ्याचाच सहभाग असतो. घरगुती गणपती असो किंवा मोठ-मोठ्या मंडळांचा गणपती असो, आजकाल प्रत्येक मूर्ती दागिन्यांनी सजलेली दिसते. मूर्ती बनविताना मूर्तिकाराने दागिने कोरलेलेच असतात, पण त्याची प्राणप्रतिष्ठा करताना आपल्याकडचे दागिने बाप्पाला चढवणं किंवा घालणं यात आता एक वेगळंच समाधान भक्तांना मिळतं.

खास गणरायासाठी बनवल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये कोणते दागिने ट्रेण्डमध्ये आहेत ते पाहूया…

चांदीच्या दागिन्यांचा सेट

गेल्या काही वर्षांत मुकुट, दुर्वा, दुर्वांचा हार, जास्वदींचा हार, सोंडपट्टी, मोदक, केळीचं पान, जानवं, मूषक असा एक अखंड चांदीचा सेटच मिळायला लागला आहे. यात तुम्हाला हव्या त्या साइझ आणि डिझाइनचे दागिने मिळू शकतात. सोनारांकडे संपूर्ण सेट उपलब्ध असतो. यात ड्रायफूट सेट, बेल पत्री, पान सुपारी, नारळ, पळी-पंचपात्र, गणपतीचे कर्ण, चौरंग, ११ आणि २१ मोदकांचा सेट अशा वस्तूसुद्धा उपलब्ध असतात. हा सेट आजकाल सगळ्यांकडेच असतो, कारण प्राणप्रतिष्ठा करताना यातल्या बहुतांशी गोष्टी लागतात. आपल्या घरातल्या गणपतीसाठी किंवा कोणाला भेट म्हणून देण्यासाठी हा सेट आतिशय सुरेख आणि रिच वाटतो.

या सेटचं वैशिष्ट्य म्हणजे हा एकदाच करून घेतला की छोट्या छोट्या गोष्टी वेगळ्या करायची गरज पडत नाही. तसंच यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही इतरही छोट्या-मोठ्या पूजेला वापरू शकता. गणपतीच्या आभूषणांमध्ये त्रिशूल आणि परशुसुद्धा चांदीमध्ये करून घेता येतात. मोठ्या सोनारांकडे तुम्हाला हवी ती फळंसुद्धा चांदीमध्ये उपलब्ध आहेत; नारळ, खारीक, सुपारी, आंबा, अननस, केळी, सीताफळ, पेरू असा ५-६ फळांचा सेट घेतला की पूजेसाठी कायमचा होतो. फुलांमध्ये अर्थातच बाप्पाचं आवडतं जास्वंद आणि त्याबरोबर सोनचाफा, कमळ ही फुलं किंवा या फुलांच्या हारामध्ये अनेक नाजूक आणि सुरेख डिझाइन्स उपलब्ध आहेत. सोन्याचं पाणी लावलेले चांदीचे दागिने, मीनाकारी काम केलेल्या फुलांचा हार अशी नावीन्यपूर्ण डिझाइनसुद्धा सोनारांकडे आलेली आहे.

गणपतीचे हार

गणपतीच्या हारांमध्ये आजकाल जेवढे डिझाइन्स आणि नावीन्य पाहायला मिळतं, तेवढं इतर कुठल्याही देवाच्या दागिन्यांमध्ये कदाचित नसेल. पूर्वीपासूनच गणपतीची कंठी म्हणजे पोटापर्यंतचा छोटा नाजूक हार एवढाच दागिना होता, परंतु आता कंठीमध्ये तर वैविध्यता आलीच आहे त्याचबरोबर, जास्वदींच्या फुलांचा हार, बकुळी हार, दूर्वांचा हार, श्रीमंत हार असे प्रकारही यात पाहायला मिळतात. श्रीमंत हार म्हणजे सोन्याचे पाणी लावलेला चांदीचा हार ज्यावर मीनाकारी काम तसंच रंगीबेरंगी खड्यांचं काम असतं. शक्यतो हा मोठाल्या गणपतीच्या मूर्तींना जास्त शोभून दिसतो, परंतु आता घरगुती गणपतींच्या मापाचे सुद्धा अगदी अप्रतिम हार मिळू लागले आहेत. मोठमोठ्या संस्थानचे गणपती म्हणजेच दगडूशेठ गणपती, लालबागचा राजा, सारस्वत मंडळाचा गणपती आणि अशा अनेक मुंबई-पुणे किंवा इतर शहरातल्या गणपतींना हिरेजडित हारसुद्धा भाविकांकडून अर्पण केले जातात.

किरीट

सामान्यत: मुकुट म्हणून सगळ्यांना माहीत असलेला हा दागिना आहे. इतर देवांसारखा संपूर्ण डोक्याला गोलाकार मुकुट नसून फक्त डोक्याच्या पुढच्या भागावर म्हणजेच कपाळावरचा हा मुकुट असतो ज्याला ‘किरीट’ या नावाने संबोधलं जातं. हा दागिना मुख्यत: घरगुती गणपतींना अर्पण केला जातो. चांदी, सोने किंवा सोन्याचं पाणी लावलेले अतिशय सुबक किरीट सोनारांकडे मिळतात. आता देवतांचेही रेखीव दागिने इमिटेशन किंवा एक ग्रॅम सोन्यामध्ये बनवून मिळतात. किरीटचेही अनेक-विविध डिझाइन्स उपलब्ध आहेत, शिवाय तुमच्या आवडीनुसार तुम्ही किरीट बनवून घेऊ शकता. घरच्या गणपतीला किंवा नातेवाईकांकडे भेट देण्यासाठी हा दागिना बेस्ट ऑप्शन आहे.

तोडे

हल्ली आपण जे जे दागिने घालतो ते सगळे दागिने देवतांना घालायची पद्धत आहे. तोडे हा पारंपरिक दागिना आता गणपतीच्या दागिन्यांमध्येही दिसून येतो. गणपतीच्या मूर्तींचा हात अगदी छोटा आणि नाजूक असल्याने हे तोडे दिसायला फार सुबक आणि देखणे दिसतात. शक्यतो हे आपल्या पारंपरिक डिझाइनमध्येच घ्यावेत म्हणजे दिसायला भरीव दिसतात. गणरायाच्या छोट्याशा हातांमध्ये हे तोडे अगदी श्रीमंत दिसतात. घरच्या गणपतीला काय दागिने करायचे आणि किती वर्षे तेच तेच करायचे? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तोडे हा प्रकार वेगळा आणि सुंदर वाटेल. तोडे हातात बसत नसतील तर बाजूबंद म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो. बाजूबंद स्वतंत्रपणेही विविध डिझाइन्समध्ये खरेदी करता येतात.

शुंड भूषण

पुण्याच्या दगडूशेठ गणपतीमुळे हा दागिना प्रचलित झाला. शुंड भूषण म्हणजेच गणपतीच्या सोंडेवरचा रेखीव आणि नाजूक दागिना. गणपतीच्या मूर्तीमध्ये शुंड भूषण असतोच. त्याचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी हा दागिना बनवला जातो. यावर नाजूक जाळीदार असं डिझाईन असतं. चांदी किंवा सोन्यामध्ये हे फारच सुरेख दिसतं. सोनारांकडे अगदी छोट्या आकारापासून हे उपलब्ध आहेत. हा दागिनासुद्धा वेगळा आणि आधुनिक आहे.

मूषक

खरंतर हा गणपतीच्या दागिन्यांमध्ये समाविष्ट नाही, पण गणपतीचा सगळ्यात जवळचा असल्याने कुठलीही गणपतीची मूर्ती त्याच्या आवडत्या मूषकाशिवाय अपूर्ण वाटते. त्यामुळे हा मूषकही आता चांदीमध्ये, सोन्यामध्ये, सोन्याचं पाणी लावलेल्या चांदीमध्ये अशा कुठल्याही प्रकारात मिळतो. लोक अगदी आवडीने आणि भक्तिभावाने इतर दागिन्यांसह मूषकही गणरायासाठी आवडीने घेतात.

फुलं आणि फुलांचे हार

चांदीच्या दागिन्यांच्या सेटमध्ये सगळीच हार-फुलं मिळतात, परंतु हे वेगळे घेतले तरी जास्वदींचं फूल, गुलाबाचं फूल, दूर्वा, कमळाचं फूल अशी वेगवेगळी फुलं खूपच गोंडस आणि रेखीव दिसतात. दूर्वांचा हार आणि मधोमध जास्वदींचं फूल असा हारही खूप प्रचलित आहे. पूर्ण जास्वदींच्या फुलांचा हारही अगदी अप्रतिम दिसतो आणि हा प्रत्येकाकडे असतोच. घरातल्या गणपतीच्या मूर्तीवर हा हार अगदी सुबक दिसतो. जास्वदींची फुलं मीनाकारी केलेल्या लाल रंगातही मिळतात. आधी म्हटलं तसं आपण जे जे दागिने घालतो ते सगळेच आता देवतांच्या दागिन्यांच्या डिझाइनमध्ये मिळतात, त्यातलाच एक प्रकार म्हणजे बकुळी हार आणि कमळाच्या फुलांचा हार. ही फुलं अगदी नाजूक एकत्रितपणे गुंफलेली छान दिसतात.

फुलांच्या हारांमध्ये अजून एक प्रकार आहे तो म्हणजे मोठमोठ्या गणपतींना जे हार घातले जातात, त्याची प्रतिकृती हल्ली बाजारात मिळते. दगडूशेठ गणपतीचा हिरे-रत्नजडित फुलांचा हार, लालबागच्या राजाचा श्रीमंत हार, कंठी असे सेम डिझाइनचे हार बनवून मिळतात. सध्या लोकांच्या अत्यंत आवडीचा हार म्हणजे सोनचाफ्याच्या फुलांचा हार. सोन्याचं पाणी लावलेला चांदीचा सोनचाफ्याचा हार बाजारात आला आहे, ज्यावरून तुमची नजरच हटणार नाही.

शेला

मोठ्या मंडळाच्या गणपतीला सोन्या-चांदीचा शेला असतो. लोकांच्या आवडीप्रमाणे घरगुती गणपतींनाही शेला किंवा उपरणं लोक करून घेतात. या शेल्यावरही जाळीदार डिझाइन, त्यावर कोरलेली फुलं, श्री नाम, मोरया असे काय काय नक्षीकाम केलेलं आढळतं. सोन्याचा शेला हाही दगडूशेठ गणपतीचा शेला पाहिल्यावर लोकांना आवडू लागला. दगडूशेठ गणपतीचा हा शेला जवळपास ३ किलो सोन्यापासून बनलेला आहे.

भिकबाळी

काही विशिष्ट दागिन्यांचा विचार करता दगडूशेठ गणपतीचा उल्लेख करावाच लागतो. भिकबाळी पेशवेकालीन असल्याने पुण्यातल्या गणपतींना हा दागिना घातला जातो, परंतु आता तो सगळीकडेच प्रचलित झाला आहे. ही भिकबाळीही इमिटेशन किंवा सोन्याचं पाणी लावलेली मिळते. भिकबाळी घालायची असेल तर गणरायाची मूर्ती तुम्हाला तशी बनवून घ्यावी लागते किंवा आता पिन-अप केलेल्यासुद्धा मिळत असतील.

गणपतीचे दागिने हे चांदी आणि एक ग्रॅम सोन्यामध्ये जास्त प्रसिद्ध आहेत. याची किंमत हजारापासून सुरू होते ती तुम्ही घ्याल त्याप्रमाणे कमी जास्त होते. मुंबई-पुण्याच्या काही होलसेल बाजारांमध्ये अगदी १००-२०० रुपयांपासून हे दागिने मिळतात. ठाण्यातही खास गणपतीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी अनेक दुकानं आहेत. वर उल्लेख केलेल्या दागिन्यांपेक्षा वेगळे म्हणजे गणपतीचा दंत, हस्त, पाय, कान हेही दागिन्यात घडवून मिळतात. नुसता मोदक गणपतीच्या हातात ठेवण्यापेक्षा आता मोदकांचा हारही उपलब्ध आहे.

कंठी किंवा तोडे तुम्हाला मोत्यामध्ये मिळू शकतात आणि ते छानही दिसतात. त्याशिवाय तुम्हाला सोप्पे, स्वस्त आणि वॉशेबल दागिने हवे असतील तर लोकर आणि खण हा ऑप्शनही उत्कृष्ट आहे. या दोन प्रकारांमध्ये अत्यंत वैविध्यपूर्ण दागिने आणि सजावटीचे प्रकार बाजारात आले आहेत. या दागिन्यांमध्ये रंगसंगती अतिशय सुरेख आहे. तसंच घरच्या गणेशोत्सवाला वेगळेपणा देण्यासाठी हे दागिने तुम्ही वापरू शकता.

गणपती हा सर्व देवांचा अधिपती आहे. कुठलंही शुभ कार्य असो गणपतीचा मान हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. लोकांच्या मनात असलेली त्याची भक्ती, श्रद्धा आणि भावना जितकी श्रीमंत, समृद्ध आहे तीच नितळ भावना खास त्याच्यासाठी घडवलेल्या दागिन्यांमध्येही उतरते आणि ते कालानुरूप अधिक मौल्यवान होत जातात.

viva@expressindia.com