हल्ली एक नवीन पद्धत रूढ झाली आहे, ती म्हणजे ‘फास्ट फॅशन’. हा शब्द तसा काही नवीन नाही, फास्ट फॅशनची संकल्पना नवीन नसली तरी दिवसागणिक याचे ट्रेंड्स बदलत आहेत आणि त्याचा परिणाम पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यावर होणार आहे, हे अजूनही आपण लक्षात घेत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘फास्ट फॅशन’ची संकल्पना रुळण्याआधी सामान्य कुटुंबातील लोक वर्षातून एकदा किंवा फारतर दोनदा सणासुदीला किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने कपडे खरेदी करत असत, पण हल्ली सोशल मीडियाचा प्रभाव आपल्यावर असल्याने आपण आवडलेले कपडे लगेच खरेदी करतो. बाजारात गेलात तरी किंवा अगदी ऑनलाइनही तुम्हाला कमी किमतीमध्ये कमी दर्जाचे कपडे सहज मिळतात. ‘अरे, दोनशे रुपयाला तर टॉप आहे, चार वेळा घातलास तरी पुरे…’ असं म्हणत आपण नको तेवढ्या कपड्यांचा ढीग घरात आणतो. बऱ्याचदा असंही होतं की तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला असणारे अनेकजण एकदा घातलेले कपडे परत घालत नाहीत किंवा घातले तरी ते सोशल मीडियावर रिपीट होतील म्हणून त्याचे फोटो पोस्टदेखील करत नाहीत. मग किमान इन्स्टा स्टोरीसाठी नवीन ड्रेस, नवीन लुक असा जामानिमा केला जातो.
इंस्टाग्राम स्क्रोल केलं की, फॅशनचे व्हिडीओ दिसतात आणि कॅप्शनमध्ये, खरेदी करण्यासाठी दिलेल्या लिंकवर कमेंट करा असं लिहिलेलं असतं आणि कमेंट करताच लगेच आपल्याला मेसेज येतो त्या अमुक तमुक वस्तू तुम्ही फलाणा संकेतस्थळावरून मागवू शकता आणि लोक त्या विकतही घेतात, कारण त्या बऱ्याच वेळेला स्वस्त असतात. पण खरोखरच या वस्तूंची आपल्याला गरज आहे का? याचा विचारच केला जात नाही. ऑनलाइनवर जशी ही खरेदीची चंगळ चालते, तसंच ‘डी मार्ट’सारख्या सुपरमार्केटमध्ये गेलात तर काय होतं याची सगळ्यांनाच कल्पना आहे. आपल्याकडे हे नाही, ते नाही याची जाणीव होते आणि लोक ठरवल्यापेक्षा अधिक खरेदी करतात. या ‘फास्ट फॅशन’मुळे खरेदी करा, वापरा आणि फेकून द्या… अशीच लोकांची मानसिकता दृढ झाली आहे.
एकदा मैत्रिणीबरोबर खरेदीला गेले असताना आलेला अनुभव पुरेसा बोलका आहे. तिने सॉक्स खरेदी केले. ‘माझे सगळे सॉक्स वापरलेले आहेत, आता नवीन घेते’ असं तिने सांगितलं. तिच्या त्या ‘वापरलेले’ यामागचं कारण होतं मला सॉक्स धुवायला आवडत नाहीत. म्हणून मग मी सॉक्स खरेदी केल्यावर ते एक-दोन वेळा वापरते आणि फेकून देते. त्या वेळी तिचं ते म्हणणं ऐकून मला भारी आणि ‘कूल’ वाटलं होतं. पण आता मला प्रश्न पडतो, तिने फेकून दिलेल्या सॉक्सचं काय होत असेल? फक्त सॉक्स नव्हे तर आपण जे कपडे फेकून देतो किंवा दान करतो त्या कपड्यांचं नेमक काय होतं? मी माझ्या जवळपासच्या लोकांना विचारलं की, तुम्ही तुमच्या जुन्या कपड्यांचं काय करता? तर १० पैकी ४ लोकांचं असं म्हणणं आहे की ते कपडे दान करतात, बाकीच्या ६ लोकांपैकी काही लोक ते कचऱ्यात टाकतात, तर काही कपडे वाईट स्थितीत असल्यामुळे त्याचा वापर फरशी पुसण्यासाठी करतात, काहीजण त्याचा पुनर्वापर करण्याऐवजी थेट फेकून देतात. त्यामुळे हे कपडे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाऊन प्लास्टिकसारखे विघटन न होणाऱ्या कचऱ्याच्या स्वरूपात साचून राहतात.
फास्ट फॅशनचे पर्यावरणावर होणारे परिणाम
पाणी
‘बिझनेस इनसाइडर’च्या अहवालानुसार, कापड रंगवणे हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा जलप्रदूषक उद्याोग आहे, कारण रंगवलेल्या पाण्याचे उर्वरित अंश थेट गटारांमध्ये, नद्यांमध्ये किंवा ओढ्यांमध्ये टाकले जातात. वेगाने वाढणाऱ्या फास्ट फॅशनमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. नवीन कपडे तयार करताना मोठ्या प्रमाणावर पाणी, ऊर्जा आणि रसायने वापरली जातात.
मायक्रोप्लास्टिक
काही कपड्यांमध्ये सिंथेटिक फायबर्स असतात, जे विघटन होण्यासाठी शेकडो वर्षे घेतात. तर आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या (IUCN) २०१७ च्या अहवालानुसार, समुद्रातील एकूण मायक्रोप्लास्टिकपैकी ३५ टक्के कापड धुताना तयार होतात.
सध्या, वस्त्रोद्याोग उत्पादनातून होणारे एकूण हरितगृह वायू उत्सर्जन दरवर्षी १.२ अब्ज टन आहे. काही अंदाजांनुसार, २०३० पर्यंत या क्षेत्रातील उत्सर्जन ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
तर यावर उपाय काय आहेत?
● सगळ्यात पहिल्यांदा आपण जी वस्तू खरेदी करत आहोत ती खरंच गरजेची आहे का? हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे आणि उत्तर ‘हो’ असेल तर पर्यावरणपूरक असे ब्रँड्स निवडले पाहिजेत. आणि ते खरंच शाश्वत आहेत का? हेही पाहणं गरजेचं आहे. असेही काही ब्रँड्स आहेत, जे ‘इको फ्रेंडली’ असल्याचं नमूद करतात, पण जर आपण नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं की संपूर्ण कपड्यापैकी एखाद्याचा खिसाच किंवा एखाददुसरा पॅच फक्त जुन्या कापडाचा असतो. त्यामुळे विचारपूर्वक खरेदी करणं गरजेचं आहे.
● कपडे खरेदी करण्याच्या सवयी बदलण्याबरोबरच आपल्याकडे आहेत त्या कपड्यांचं काय करायचं? हा विचार तुमच्या मनात नक्की येत असेल. तर अनेक अशा संस्था असतात, एनजीओ असतात ज्या जुन्या कपड्यांचे पुनर्वापरासाठी संकलन करतात. आणि खूप सुंदर सुंदर कपडे तयार करतात, त्याने अनेकांना रोजगार मिळतो. पण त्याचबरोबर काही असे ब्रँड्स आहेत, जे जुने कपडे द्या. नवीन कपडे घेऊन जा असं म्हणत असतात तेव्हा खरंच तो ब्रँड किंवा संस्था त्याचा पुनर्वापर योग्य पद्धतीने करत आहेत का हेही पाहिले पाहिजे.
● घरात लहान असाल तर आपल्या मोठ्या भावाचे, बहिणीचे कपडे घातले असतीलच पण ‘थ्रिफ्टिंग’ किंवा सेकंडहँड कपडे विकत घेण्याची सवय लावली तर पर्यावरण वाचवण्यासाठी आपलाही थोडा हातभार लागेल.
फास्ट फॅशनमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपल्या खरेदीच्या सवयी बदलणं आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडणं हेच उपाय आहेत. आपण जर हा बदल केला तर केवळ पर्यावरणाचं संरक्षण होणार नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी पृथ्वी आपण जपू शकतो. चला, विचारपूर्वक खरेदी करूया आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेऊया!
viva@expressindia.com