जगभरात २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. १९८२ साली युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेने (International Theatre Institute) हा दिवस पॅरिस येथे जाहीर केला. याचे उद्दिष्ट होते- नृत्यकलेचे जागतिक पातळीवर महत्त्व पटवणे, कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे, आणि या कलेबद्दल अधिकाधिक जनजागृती करणे. भारताची नृत्यपरंपरा कालानुरूप अतिशय समृद्ध झाली आहे. भरतनाट्यम, कथक, ओडिसी, मणिपुरी, कुचिपुडी यांसारख्या शास्त्रीय नृत्यशैलींपासून ते लावणी, गोंधळ, दांडिया यांसारखे प्रत्येक प्रकार आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत.

कधी काळी छंद म्हणून पाहिलं जाणारं नृत्य आजच्या पिढीसाठी एक सशक्त करिअर पर्याय बनलं आहे. ‘नाचून जीवन जगता येतं का?’, या प्रश्नाचं उत्तर आता ‘हो’ असं आत्मविश्वासाने देता येतं. कारण, आजच्या डिजिटल युगात नृत्यकला केवळ रंगमंचापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती एक व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी कारकीर्द ठरते आहे. पूर्वी नृत्य हे मुख्यत: धार्मिक, सांस्कृतिक किंवा छंदात्मक स्वरूपातच पाहिलं जात असे, पण गेल्या काही दशकांमध्ये चित्रपट, टीव्ही रिअॅलिटी शोज, सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता आणि ग्लोबल नृत्यशैलींचा प्रभाव यामुळे नृत्याला एक नवं व्यावसायिक वलय मिळालं आहे.

आज नृत्यकलेला एक व्यावसायिक शिक्षण म्हणून स्वीकारलं जातंय. भारतात भरतनाट्यम, कथकसारख्या शास्त्रीय नृत्यशैलींसाठी डिग्री कोर्सेस, डिप्लोमा, ऑनलाइन ट्रेनिंग उपलब्ध आहेत, तर पश्चिमेकडील हिप-हॉप, कंटेम्पररी, सालसा यांसारख्या नृत्यशैली देखील युवा पिढीला आकर्षित करत आहेत.

डान्समध्ये करिअरचे विविध पर्याय

प्रोफेशनल डान्सर : स्टेज शोज, थिएटर, चित्रपट, टीव्ही, वेबसीरिजसाठी काम.

इव्हेन्ट कोरिओग्राफर : गाणी, नाटके, जाहिराती, विवाह आणि इतर समारंभांसाठी नृत्यदिग्दर्शन.

डान्स टीचर / गुरू : स्वत:चे स्टुडिओ, अॅकॅडमी, शाळा-कॉलेजमध्ये अध्यापन.

फिटनेस ट्रेनर : झुंबा, डान्स-थेरपी, बूटकॅम्प्ससारखे कार्यक्रम.

डान्स थेरपिस्ट : शारीरिक व मानसिक तणाव घालवण्यासाठी नृत्याचा उपयोग. कॉर्पोरेट क्षेत्रात या पद्धतीचे पर्याय उपलब्ध असतात.

डिजिटल क्रिएटर : सर्वात आधुनिक आणि सोशल मीडियामुळे निर्माण झालेले क्षेत्र. युट्यूब, इंस्टाग्रामवरील नृत्य कंटेंट क्रिएशन. तुम्ही वरचे कुठलेही पर्याय निवडूनसुद्धा कन्टेन्ट क्रिएटर होऊ शकता.

आज जरी तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे नृत्य शिकणं सोपं झालं असलं, तरी नृत्य गुरूंचं मार्गदर्शन अद्यापही अमूल्य आहे. नृत्य ही केवळ शारीरिक कला नसून त्यामध्ये शिस्त, भावनाशीलता आणि आध्यात्मिक एकरूपता असते, हे शिकवण्यासाठी गुरूचं स्थान अनन्यसाधारण आहे. नृत्यक्षेत्रातले अदबीने घेतले जाणारे नाव म्हणजे पंडिता रोहिणीताई भाटे. त्यांनी साधारण १९४७ मध्ये स्वत:ची नृत्य संस्था- नृत्यभारती; थोडासा समाजाचा रोष पत्करून उभी केली. कालांतराने नृत्य हे कला म्हणून कसे बदलत गेले याबद्दल रोहिणी यांच्या स्नुषा आणि शिष्य, ज्येष्ठ कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे सांगतात, ‘सुरुवात केली तेव्हा आणि त्या आधीही साधारण ४०-५० वर्षांपूर्वी नृत्य करणं; मुख्यत: मुलींनी नृत्य करणं याला परवानगीच नसायची. त्या काळात तितकीशी समाजमान्यता डान्ससाठी नव्हती. नृत्य केला तरी करिअरचा पर्याय म्हणून याकडे कधीच बघितलं गेलं नाही. माझ्या घरी थोडी वेगळी कारणं होती की याच्यातून स्वावलंबी कसं होता येईल… नृत्य खूप महागडी कला आहे, अशा प्रत्येक घरातल्या विविध गोष्टींमुळे नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा व्यापक नव्हता. हे सगळं असताना सुद्धा नृत्य शिकण्यासाठी ज्या स्त्रिया किंवा मुली जायच्या, त्यासुद्धा उच्च वर्गातल्या, उच्च शिक्षित, ज्यांची घरं समृद्ध होती अशा असायच्या. आताच्या काळात खूप माध्यमं उपलब्ध आहेत, तरुण पिढीला सगळी माहिती आहे, करिअर काउंसिलिंग आहे, मुली स्वत: खूप लहान वयात स्वावलंबी होत आहेत, नृत्य क्षेत्रातही खूप नावीन्यपूर्ण बदल झाले आहेत, संधी अमाप उपलब्ध आहेत, या सगळ्यामुळे नृत्य हे कला म्हणून फार पुढे गेले आहे.’

तरुण पिढी नृत्याकडे फक्त एक कला म्हणून नाही तर अभिव्यक्तीचे साधन म्हणून पहाते. काही तरुण मुलींशी बोलल्यावर डान्स हा करिअरचा पर्याय म्हणून त्या का निवडतात याचे विशेष मुद्दे जाणवले ते असे:

कला करिअर = परिपूर्ण समतोल

पूर्वी कला आणि करिअर यामध्ये समतोल असणे अशक्य मानले जात असे, पण आज नृत्यकला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि व्यावसायिक संधी असलेले क्षेत्र बनली आहे. ज्यांना कला आणि करिअर या दोन्हीचा मिलाप हवा आहे, त्यांच्यासाठी नृत्य एक आदर्श पर्याय आहे.

स्टेज, स्क्रीन आणि सोशल मीडियाचं व्यासपीठ

आज नृत्य रिअॅलिटी शोज, चित्रपट, वेब सीरिज, इंस्टाग्राम-रील्स, यूट्यूब यामुळे नृत्यकारांना केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी मिळते. प्रसिद्धी, फॉलोअर्स आणि ब्रँड कोलॅब्स हीसुद्धा आजच्या पिढीसाठी आकर्षणाची कारणं आहेत.

फिटनेस, थेरपी आणि वेलनेसचा भाग

नृत्य हा एक सर्जनशील व्यायाम प्रकार आहे. मानसिक आरोग्यासाठीही नृत्य उपयोगी आहे झ्र अनेकजण नृत्य थेरपीतून तणावमुक्त होत आहेत. म्हणून तरुणपिढी स्वत:ची आणि इतरांची ‘जीवनगुणवत्ता सुधारण्यासाठी’ नृत्य करतात.

स्वावलंबन आणि उद्याोजकता

स्वत:चा नृत्य स्टुडिओ सुरू करणं, ऑनलाइन कोर्सेस, फिटनेस ट्रेनिंग, कोरिओग्राफी- हे सर्व व्यवसायात रूपांतरित होणारे पर्याय आहेत. नृत्यकला आता उद्याोजकतेचं माध्यम देखील झाली आहे.

नृत्यकला आज सातासमुद्रापार पोहोचली असली तरी त्याची साधना, ध्यास आणि त्यातूनच सातत्याने घ्यावं लागणारं प्रशिक्षण याचं महत्त्व तरुण पिढीने समजून घ्यायला हवं, असं आग्रही मत शमा भाटे व्यक्त करतात. त्या सांगतात, ‘नृत्य शिकताना सातत्य, शिस्त आणि आपल्या गुरूंच्या संस्कारांवर विश्वास हवा. आम्ही अशा काळात नृत्य शिकलो जेव्हा रोहिणीताईंच्या संस्कारांचा मुख्य प्रभाव आमच्यावर झाला आणि तो आजही आहे. करिअर करायचं का एवढी समज आणि जागरूकता तेव्हा आम्हाला नव्हती, पण नृत्यातच आपण खूप शिकायचं, ते प्रेम निभवायचं, जपायचं आणि पुढेही द्यायचं हे मात्र नक्की ठरलेलं होतं’. पुढच्या पिढीने हा ध्यास आत्मसात करणे गरजेचे आहे, असं त्या सांगतात.

आजच्या पिढीतल्या आघाडीच्या नृत्यांगना हेच सांगतात की नृत्य शिकण्यासाठी तुम्हाला ते स्वत:मध्ये बिंबवणं गरजेचं आहे. ती एक कला आहे, त्यामुळे त्या कलेच्या सादरीकरणाला मर्यादा नाहीत. तुम्हाला आवडेल तो प्रकार तुम्ही शिकू शकता, पण काहीही झालं तरी नृत्याशी प्रतारणा आणि तडजोड करायची नाही हे ध्येय मनाशी ठरवलेच पाहिजे. नृत्य तुम्ही करिअर, व्यवसाय, ध्यास किंवा छंद म्हणून कुठल्याही उद्देशाने जोपासा, पण रियाजाला पर्याय नाही हा आग्रहीपणा तरुण पिढीने आत्मसात केला पाहिजे. तरुण पिढीने नृत्य करिअर म्हणून किंवा व्यवसाय म्हणून आज पाहिले तरी या कलेची अभिव्यक्ती कशी टिकून राहील याला महत्त्व दिले पाहिजे. हा ठेहराव, मानसिक स्थैर्य आणि शिस्त कदाचित तरुण पिढीमध्ये यायला वेळ लागतो, पण हळूहळू ते येतंच, कारण नृत्यासारखी संवेदनशील कला साकार करता येते. नृत्य ही केवळ एक कला नसून स्वत:ला साकार करण्याचा मार्ग आहे. ताल, ठेका आणि मेहनतीचा संगम असलेलं हे करिअर आजच्या पिढीला आत्मिक समाधानासोबत आर्थिक स्थैर्यही देऊ करतं आहे.

viva@expressindia.com