मी एम.सी.ए. फायनलला आहे. गेल्या दोन वर्षांपासून माझं निशावर प्रेम आहे. तिच्या घरची कंडिशन ठीक नाही. वडील मेन्टली वीक आहेत, आईला पॅरालिसीसचा अॅटॅक येऊन गेला आहे, त्या सतत आजारी असतात. तिच्या आईचा आमच्या लग्नाला सक्त विरोध आहे. हे असं असणार याची तिला कल्पना होती, पण आधी ती म्हणायची की, तू काही काळजी करू नकोस, मी तिला समजावीन. पण तिच्या आफला पटलं नाही. त्यामुळे निशा आता इथंच थांबूया म्हणते. तिला आईची खूप काळजी वाटते आणि म्हणूनच ती असं म्हणतेय, हे मला माहिती आहे. मी तिला सगळ्या प्रॉब्लेम्ससकट अॅक्सेप्ट करायला तयार आहे. तिच्या कुटुंबाची काळजी घ्यायला तयार आहे, असं तिला सांगितलं. माझ्या घरच्यांना ती पसंत आहे. तिच्या नकाराविषयी मी त्यांना अजून सांगितलेलं नाही, कारण त्यांना फार त्रास होईल. आमची कास्ट वेगळी आहे, पण मला त्याची पर्वा नाही. आता ती मला म्हणते की, तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न कर, पण हे शक्य आहे का हो? मला तिला इतक्या सहजपणे गमवायचं नाहीये.
मी काय करू?- निखिल
हाय निखिल,
तू निशाला दोन र्वष झाली ओळखतोस, असं लिहिलंयस. हे नातं आता पुढं न्यायला नको, असं तिनं तुमचं ठरल्यानंतर लगेच काही काळानं सांगितलं की आत्ता-आत्ता? सध्या तू तिच्या संपर्कात कशा प्रकारे राहतो आहेस? प्रत्यक्ष भेट होते का? त्या वेळी किंवा फोनवर तिचा अॅटिटय़ूड कसा असतो? कोरडा, तुटक की आपुलकीचा?
तुमची कास्ट वेगळी आहे, असा तू जाता-जाता उल्लेख केलायस. तुझ्या दृष्टीनं हे फार महत्त्वाचं नसलं तरी तिच्या घरचे याला जास्त महत्त्व देतायेत का?
तुमच्या रिलेशनशिपच्या सुरुवातीला आईची परवानगी मिळविण्याबाबत ती बऱ्यापैकी कॉन्फिडन्ट होती, असं दिसतं. नंतर तिच्या अॅटिटय़ूडमध्ये बदल होण्यासारखं काही घडलं होतं का, याचा थोडा नीट विचार करून बघ. कधी-कधी एखादी गोष्ट त्या वेळी आपल्या दृष्टीनं ट्रिव्हियल वाटते, पण तिचे परिणाम मात्र पर्मनन्ट होतात. शिवाय कोणतीही रिलेशनशिप ही वाहत्या पाण्यासारखी, सतत बदलणारी असते. दिवस जातील तसा एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावनांमध्ये बदल होऊ शकतो. निशा स्वत:च्या फिलिंग्जविषयी कन्फ्यूज्ड असेल कदाचित. आईचं आजारपण, तिचा नकार याचं ती अननेसेसरी भांडवल तर करीत नाहीये ना, ही शक्यतासुद्धा तुला रूल-आऊट करायला हवी.
तुझ्यासारखाच मलाही प्रश्न पडलाय की, एक्झ्ॉक्टली तिच्या मनात काय चाललं असेल. तुमच्यात अजूनही मोकळेपणानं संवाद होत असेल तर तुला स्वत:लाच तिच्याकडून हे समजून काढून घेता येईल, पण अनेकदा काय होतं की, समोरच्याला संवाद साधणं कठीण जातं. काय बोलावं, कसं बोलावं, बोलू की नको, मी याच्याशी काही बोलले आणि त्यानं त्याचा भलताच अर्थ घेतला तर? असं काही-काही वाटत राहतं. खूपदा या चर्चाचं भांडणात परिवर्तन होतं. त्यामुळे मग नकोच ती चर्चा, असं वाटतं. तुमच्या दोघांनाही जवळ असणारा एखादा मित्र किंवा मैत्रीण आहे का? त्यांना रिक्वेस्ट करून बघ. निशाला कदाचित अशा एखाद्या जवळच्या, पण तिऱ्हाईत व्यक्तीशी बोलणं जास्त सोपं, मोकळं वाटेल आणि ती खरं कारण सांगण्याची शक्यता आहे.
तू तिच्यात खूप गुंतला आहेस. त्यामुळे अर्थातच तिच्याशिवाय आयुष्य काढण्याची कल्पनाही तुला अनबेअरेअल वाटते आहे. तू शक्य ते सगळे प्रयत्न करच, थोडा वेळही दे तिला आणि स्वत:ला. आता तुझी परीक्षा झाली की जॉब वगैरे शोधून इंडिपेन्डन्ट हो. म्हणजे तू त्यांची काळजी घेण्याचे जे अॅश्युअरन्सेस देतोयस त्याविषयी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना खात्री वाटेल. तू आणि निशा, दोघंही स्वतंत्र व्यक्ती आहात. तुम्हा दोघांनाही स्वत:ची अशी वेगळी स्पेस आहे, निर्णयस्वातंत्र्य आहे आणि ते जपलं पाहिजे, हे मात्र विसरू नकोस.
तू एमसीए फायनलला आहेस म्हणजे तुझी परीक्षा जवळ आली असेल. अभ्यास कसा चाललाय? तुला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट!
Winning is not everything, but making the effort to win us!
विचारा तर खरं..
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.