|| नीलेश अडसूळ
प्रेम काळानुरूप बदलत जातं. मागे डोकावून पाहिलं तर तेव्हाचं प्रेम हे अधिक शृंगारिक वाटतं. प्रेयसीला पत्र, चारोळ्या असे प्रकार व्हायचे. कधी तरी रीतसर ओळख काढून मागणी घातली जायची. अगदी काहीसं मागे म्हणजे समाजमाध्यम हातात नव्हतं तेव्हाही व्यक्त होण्यासाठी भेटीगाठी, ओळखपाळख काढली जायची. मित्र-मैत्रिणींकडून निरोप पोहोचवले जायचे आणि मग प्रेम जुळायचं. तेही सहजपणे नाहीच. त्या मानाने आजची पिढी भलतीच प्रगत आणि गतिमान आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन, नाना तºहेची समाजमाध्यमं आल्याने संवाद सहज शक्य झाला आहे. परिणामी प्रेमाची भाषा- परिभाषाही बदलू लागली आहे. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ हे वाक्य आता पुरतं आऊटडेटेड झालंय. ‘आय लव्ह यू’चा पर्याय समोर असल्याने मराठीतील ‘ते’ तीन शब्द आता इतिहासजमा झालेत असंही म्हणणं वावगं ठरणार नाही. मग मनातलं तेही मातृभाषेत सोप्या शब्दात मांडायचं तरी कसं? त्याचंच आजच्या तरुणाईने दिलेलं उत्तर म्हणजे… ‘जेवलीस का?’
‘जेवलीस का?’ या साध्या सरळ प्रश्नार्थी वाक्याला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. कारण या वाक्याच्या नव्याने झालेल्या अर्थबोधाने अनेकांचे ‘दिल मिल गए’. तरुणाईमध्ये तर हा चर्चेचा विषय झालाय. कारण हे केवळ जेवणाशी संबंधित वाक्य नसून आता जीवनाशी संबंधित वाक्य झालेलं आहे. थोडं आश्चर्य वाटेल खरं… पण प्रियकराकडून प्रेयसीपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचा श्रीगणेशा या वाक्याने केला जातो आहे. अर्थात हे प्रत्यक्षात विचारलं जात नाही, तिचा नंबर असेल तर व्हॉट्सअॅपवर किंवा नसेल तर फेसबुक, इन्स्टा किंवा अन्य शब्दसंवाद माध्यमावर.
हे वाक्य इतकं प्रचलित होईल कुणालाच ठाऊक नव्हतं. कारण कुणी कितीही जवळचं असलं तरी आपण आपल्या ‘त्या’ जवळच्या व्यक्तीसोबत काय बोलतोय हे काही कुणाला सांगत नाही. पण फेसबुकसारख्या माध्यमावर जेव्हा हे समोर आलं तेव्हा एकूणच तरुण वर्गाने याला दुजोरा दिला आणि बहुसंख्य तरुण प्रेमात पडल्यानंतर ‘ति’च्याशी संवाद साधताना ‘जेवलीस का?’ हेच पहिलं वाक्य उच्चारतात हे एकमुखाने सिद्ध झालं. बरं केवळ तरुणांनीच नाही तर तरुणींनीही याचं समर्थन केलं आहे. ‘हे वाक्य आलं की आम्ही समजून जातो, समोरच्याच्या मनात काय आहे’, अशी भावना तरुणी व्यक्त करतात.
‘प्रेमात पडणं सोप्पं, पण व्यक्त होणं महाकठीण. अशा वेळी समोरची व्यक्ती काय म्हणेल, नकार देईल का, त्यात जवळची मैत्रीण असेल तर ठार मेलोच… मैत्रीच राहिली नाही तर… अशा नाना शंका प्रेम व्यक्त करण्यापूर्वी मनात येतात. अनेकदा व्यक्त व्हायची हिंमत असते, पण शब्द सापडत नसतात. सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. अशा वेळी ‘जेवलीस का?’ या वाक्याने सुरुवात केली तर जरा भीड चेपते’, अशी भावना एका महाविद्यालयीन तरुणाने व्यक्त केली आहे. पुढे तो असंही म्हणतो की, ‘या वाक्याने अंदाज येतो, समोरची व्यक्ती पटण्यासारखी आहे की नाही. कारण मराठी घरांमध्ये जेवणाला फार महत्त्व असतं. आपल्या घरात कोणत्याही वेळी कुणीही आलं तर आपण पहिल्यांदा विचारतो, जेवलास का किंवा जेवलीस का? तेच समीकरण प्रेमातही लागू झालं आहे.’
‘जेवलीस का? हे आत्ताचं झालं. आम्ही कॉलेजमध्ये असताना मुलींपुढे व्यक्त होताना थंडीताप यायचा. तिचा भाऊ मध्ये आला तर, तिनं सरांना सांगितलं तर, कॉलेजमध्ये काही झालं तर याच विचारात प्रेमाचा विचार विरून जायचा’, असं एका तिशीतल्या तरुणाने सांगितलं. कॉलेजमधल्या आठवणींना उजाळा देताना ‘भावना एकाच्या आणि शब्द दुसऱ्याचे’ याचा गमतीशीर किस्साही त्याने सांगितला, ‘ज्यांना छान लिहिता यायचं, कविता करता यायच्या अशा मंडळींना तेव्हा फारच डिमांड होती. अगदी अशा मित्राच्या पाया पडून आम्ही कविता लिहून घेतल्या आहेत. आपल्यासाठी कुणी तरी काही तरी लिहिलंय याचं तेव्हा मुलींना फार अप्रूप वाटायचं. किंबहुना तिथंच अर्धी मोहीम फत्ते व्हायची. मग त्यासाठी मित्राच्या पाया पडाव लागलं तरी चालेल, पण तिच्यासमोर ‘इज्जत का सवाल’ महत्त्वाचा असायचा.’
हा झाला वैयक्तिक अनुभव. समाजमाध्यमांवर, विशेषकरून फेसबुकवर याविषयी बराच शब्दप्रपंच दिसतो. ‘जेवलीस का’ नावाने स्वतंत्र पेजही पाहायला मिळतात. ज्यामध्ये प्रेमाविषयी विनोद, चारोळ्या, शब्दकोट्या, मिम्स असं बरंच काही आहे. शिवाय अनेकांनी याविषयी लिहिण्यातही पुढाकार घेतला आहे. ‘प्रपोज केलं म्हणून नाही म्हणालीस. ‘जेवलीस का’ विचारलं असतं तर हो म्हणाली असती’ अशी भावना एकाने व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातही या वाक्याचा जोरदार प्रसार- प्रचार झालेला दिसतो. एकाने विचारलं, ‘जेवलीस का?’ त्यावर मुलगी म्हणते, ‘एका थपडीत तुला पाणी पाजेन’ तर ‘हल्ली जेवलीस का हे विचारण्याचीही भीती वाटते. म्हणजे आपल्या मनात काही नसेल तर या ट्रेण्डमुळे उगाच संशयाची सुई आपल्या दिशेने येते. शिवाय लोकांमध्ये हा थट्टेचा आणि चर्चेचा विषय झाला आहे,’ अशीही भीती काही जण व्यक्त करतात. ‘जेवलीस का? असं विचारून ब्लॉक होण्यापेक्षा मैत्रीत राहिलेलं बरं…’ असं एकाचं म्हणणं आहे. तर प्रेमप्रवासात तरून गेलेली एक विवाहित मुलगी लिहिते, ‘जेवलीस का?… इथपासून ते आज जेवणात काय करते आहेस इथपर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम.’
यात काही गमतीजमती, उपरोध किंवा बेधडकपणाही पाहायला मिळतो. एका मुलीला ‘जेवलीस का?’ अशी एकाकडून विचारणा झाली. त्यावर ‘होय, तू भांडी घासायला येतोयस का?’ असं थेट उत्तर तिने धाडलं. तर एका मिममध्ये ‘जेवलीस का?’ या प्रश्नाला वैतागलेली मुलगी म्हणते, ‘हे बघ, मला चांगल्या पगाराची नोकरी आहे, त्यामुळे मी एकही दिवस उपाशी नसते. रोज रोज असले प्रश्न विचारू नकोस’. एक मिम तर अगदी टोकाचा पाहायला मिळतो. ज्यामध्ये ‘आता थेट तुझ्या तेराव्याचंच जेवेन म्हणते’, असं उत्तर ती त्याला देते.
एका तरुणीने समस्त तरुणीचं प्रतिनिधित्व करत पुरुष वर्गाला ‘जेवलीस का’ हे विचारणं बंद करा, असे आवाहन करणारा व्हिडीओही पोस्ट केला आहे. ‘आम्ही फक्त जेवलोच नाही तर अगदी गळ्याशी येईपर्यंत जेवलोय’, असा उपरोध ही तरुणी दर्शवते. बाजारातही हे वाक्य अंगाखांद्यावर खेळू लागलं. कस्टमाइज्ड टीशर्ट विक्रेत्यांकडे ‘जेवलीस का?’ या ट्रेण्डचे टीशर्ट्स उपलब्ध आहेत. ज्याला तरुण-तरुणींकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
मुलगा : हाय
(त्याने जेवलीस का, हे विचारायच्या आतच…)
ती : हो… मी जेवले.
दुपारीही आणि रात्रीही
आणि आता झोप येत नाही म्हणून जागी आहे.
हां आता जागी आहे, म्हणजे प्रियकरासोबतच बोलतेय असं नाही…
तोही झोपलाय, तेही जेवून
सगळी माहिती तुला मिळाली असेलच
आता तूही झोप…
असा व्हॉट्सअॅपवरचा स्क्रीनशॉट सध्या भलताच व्हायरल होतो आहे.
थोडक्यात काय, तर काही शब्द मूळ अर्थापलीकडे जाऊन ‘संकेत’ म्हणून रूढ होतात. त्याचे अर्थ पुढे तसेच घेतले जातात. काळानुरूप बदलत जाणाऱ्या ‘सांकेतिक भाषेत’ (कोड लँग्वेज) याही शब्दाची ‘आय लव्ह यू’ म्हणून पर्यायी ओळख झाली आहे हे आता मान्य करावं लागेल. त्यामुळे आता सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, निदान मुलींनी तरी. कारण सध्या सुरू असलेल्या प्रेमाच्या आठवड्यात म्हणजे व्हॅलेंटाइन वीकमध्ये जर कुणी ‘जेवलीस का?’ असं विचारत असेल तर थेट समजून जायचं, त्याचा ‘इरादा’ काय आहे. आता त्या इराद्यावर नकार असेल तर उत्तर देण्यासाठी लेखात दिलेला कोणताही पर्याय उपलब्ध आहेच. पण जर इरादा याही बाजूने पक्का असेल तर ‘सोबतीने जेवू या’ असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ‘यंदा कर्तव्य आहेच!’
viva@expressindia.com