नीलेश अडसूळ viva@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रेमाकडे बघण्याचा प्रत्येकाचा चष्मा वेगळा असला तरी प्रेमासारखी निर्मळ गोष्ट दुसरी कोणतीही नाही. ‘त्या दोन’ व्यक्तींच्या नात्यांपलीकडे जाऊन विचार केला तर अगदी चराचरांत प्रेम व्यापल्याचं संतही सांगून गेलेत. आणि त्या दोन व्यक्तींमध्ये प्रेम असलं तरी त्यात वावगं काय? त्याहून पुढे त्यांनी ते साजरं केलं तर तथाकथित संस्कृतिरक्षकांना पोटशूळ उठण्याचं काही कारण नाही. त्यामुळे असा फुटकळ विरोध नजरेआड करून दरवर्षी प्रेमाचा दिवस म्हणजेच तुमचा-आमचा ‘व्हॅलेंटाइन डे’ उत्साहात साजरा केला जातो. किशोरवयीन मुलांपासून ते सत्तरीच्या आजी-आजोबांपर्यंत विविध वयोगटांतील जोडपी या दिवसाचा आनंद लुटताना दिसतात. अर्थात तरुण वर्ग यात कायमच पुढे राहिला आहे. करोनाकाळात मात्र जगासोबतच हे प्रेमही टाळेबंद झालं. या टाळेबंदीत काहींची नाती जुळली तर काहींच्या नात्यात अंतर पडलं. जे नात्यात होते त्यांनी ती नव्याने अनुभवली. प्रत्यक्ष सहवासाविना एकमेकांना अंतर्मनातून जोडणारी ही टाळेबंदी अनेकांच्या प्रेमाची स्मरणीय आठवण बनली आहे. म्हणूनच या व्हॅलेंटाइन दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊन काहींची लॉकडाऊनवाली लव्हस्टोरी..
प्रेम काही कुणाला नवीन नाही, प्रेमात कुणी पडलंच नाही असंही नाही. फक्त ते व्यक्त करून, जगासमोर आणणारे, त्याचा उत्सव करणारे मोजके. आता तीही संख्या वाढतेय म्हणा. त्यामुळे कॉलेजचे कट्टे, नाके, चौपाटय़ा ‘रोज डे’ ते ‘व्हॅलेंटाइन डे’ या सात दिवसांच्या हंगामात कर्दळीच्या फुलासारख्या गर्द लाल झालेल्या असतात. हे सगळं करण्यातही गंमत असते. त्या त्या दिवशी आपापल्या प्रियकर-प्रेयसीला ठरलेल्या भेटवस्तू देण्यासाठी मुलं पैसे साठवतात, नियोजन करतात, एकमेकांना सरप्राईज देतात, फिरायला जातात. अनेक जण तर मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या दिवसाची वाट पाहात असतात. फेब्रुवारी २०२० मध्ये मोठय़ा उत्साहात हा दिवस साजरा झाला. त्याआधी सुरू असलेल्या प्रेमाच्या गाडया सुसाट होत्याच, पण नव्याने जुळलेले प्रेमही मार्गस्थ होत होते. अशातच करोना नावाची एक मोठी दरी आडवी आली आणि जवळपास एक वर्ष भेटीचे मार्गच बंद झाले. कुठे एकमेकांप्रति असलेली ओढ वाढली तर कुठे पर्याय उभे झाले. पण एक वर्षांच्या अंतराने एकमेकांना भेटणारे मात्र आजही तो क्षण श्रावणी असल्याचे सांगतात.
‘आम्ही अकरावीत एकमेकांना भेटलो. मैत्री झाली. बारावीत असताना मी तिला याच दिवशी प्रपोज केलं. माझ्याबरोबर सत्यनारायणाच्या पूजेला बसशील का, अशा शब्दात तिला विचारल्याने ती आधी एवढी हसली की होकाराच्या सगळय़ा शक्यताच गेल्या. पण तिच्याही मनात तेच भाव असल्याने ती हो म्हणाली. तेरावीतही आम्ही ठरवून कॉलेज आणि अभ्यासक्रम निवडला. त्यामुळे पुन्हा एकाच वर्गात आलो. कॉलेजमुळे रोज भेटायची, बोलायची सवय झालेली असते. मार्चमध्ये टाळेबंदी जाहीर झाली तेव्हा मी पहिला फोन तिला केला. जवळपास वर्षभर आम्ही फोनवरच बोलत होतो. दरम्यान, व्हिडीओ कॉल वाढले, पण प्रत्यक्ष भेटीची सर त्याला आली नाही. मध्यंतरी आम्ही ठरवून भेटलो. तेव्हा ट्रेनला परवानगी नसल्याने ती गाडी करून ठाण्याहून नरिमन पॉंइंटला आली. गाडीतून उतरल्यावर माझ्याकडे पळत येऊन तिने मिठी मारली. आपण एखाद्या चित्रपटाचे नायक-नायिका तर नाही ना, असाच काहीसा भास त्या वेळी मला झाला होता,’ असे अक्षय सांगतो.
पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या नमिताची मात्र वेगळीच लव्हस्टोरी आहे. ती सांगते, ‘आम्ही प्रेमात असलो तरी कधीही एकमेकांशी गरजेपेक्षा जास्त बोललो नाही. तो विज्ञान आणि मी कला शाखेची विद्यार्थी असल्याने दोघेही आपल्याला कामात व्यग्र. शेवटच्या वर्षांला रिसर्च वगैरे असल्याने त्यातच पुष्कळ वेळ जायचा. कधी तरी चित्रपट, हॉटेलमध्ये जेवण यानिमित्ताने एखादा दिवस सोबत फिरायचो आणि एरवी फक्त ख्यालीखुशाली. पण टाळेबंदी झाल्यावर भेटणं बंद झालं, अभ्यासाच्या वेळा बदलल्या आणि दिवसरात्र फोन हातात असल्याने एकमेकांशी संवाद वाढला. प्रत्यक्ष सोबत नसलो तरी एकमेकांची काळजी करू लागलो आणि तितकेच रोमँटिकही झालो. म्हणजे अनेकदा आम्ही एकसारखे कपडे घालणे, घरी एकसारखे पदार्थ तयार करणे, गाणी म्हणणे, असे प्रकार केले आहेत.’
लालबागमध्ये राहणारा अद्वैत आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बाईकवर नाशिकला गेला होता. त्या उपद्वय़ापाचे थोडक्यात वर्णन. ‘टाळेबंदी झाल्यानंतर करोनाने चांगलाच जोर धरला. सानिकाचे बाबा रिक्षा चालवत असल्याने त्यांचा व्यवसायही ठप्प झाला. गावी शेतीवाडी आणि नातेवाईक असल्याने त्यांनी पंधराएक दिवसातच गाव गाठले. गावी नेटवर्कची बोंब. त्यात घरात आजूबाजूला सतत माणसांचा राबता असल्याने फोनवर बोलणे व्हायचे नाही. कधी एकदा तिला भेटेन असे वाटायचे, पण त्या वेळी गावी जायचे तर पास हवा. मग मित्राच्या मदतीने कसाबसा तो पास मिळवला. घरच्यांना मित्राच्या गावी जातो असं सांगून पहाटेच बाईकने नाशिक गाठले. तिनेही घरी मित्र येत असल्याचं सांगितलं असल्याने थेट तिच्या घरातच आम्ही भेटलो. पण तू इथे कसा आलास याची कथा रचताना तिच्या घरच्यांसमोर भंबेरी उडाली होती,’ असे अद्वैत म्हणाला.
ऋतुजा आणि साहिल हे सध्या विवाहित आहेत, पण आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत याची जाणीव त्यांना टाळेबंदीत झाली. ‘आम्ही शाळेपासूनचे मित्र. अगदी एकमेकांच्या घरी सहज वावर असायचा, पण लग्न वगैरे करू असे कधीच वाटले नाही. टाळेबंदीच्या काळात नाती नव्याने कळली. स्वत:सोबत कुटुंबाच्या सुख-दु:खात, आजारपणातही आम्ही सहभागी झालो. एक वेळ अशी आली जेव्हा आम्हीच एकमेकांसाठी आहोत की काय असे जाणवू लागले, पण व्यक्त झालो नाही. दरम्यान, घरच्यांनी लग्नाचा रेटा लावला. त्या वेळी आम्ही काही तरी बोलू अशी अपेक्षा त्यांना होती. पण आमच्यात केवळ मैत्री आहे हे कळल्यावर त्यांनीच पुढाकार घेऊन आमचे लग्न जुळवले,’ असा किस्सा त्या दोघांनी सांगितला.
‘सुखद क्षणात फारशा कविता लिहिता येत नाहीत. जरासा विरह सहन करावा लागला, भांडणं झाली की भावना अशा शब्दातून वाहत जातात. करोनाकाळात जितकी पुस्तके वाचली तितकंच लिखाणही केलं. खूप प्रेमकविता लिहिल्या. टाळेबंदीत फोनवर बोलणं वाढलं, तसे खटकेही वाढले. त्यामुळे कविता सुचत गेल्या. याच कविता एकत्र करून व्हॅलेंटाइन डेला त्याला भेट देणार आहे,’ असे यामिनीने सांगितले.
या काही रम्य, वाचनीय आठवणी असल्या तरी अनेकांचे अनुभव काही बरे नाहीत. या काळात सहवास नसल्यामुळे अनेकांची नाती तुटली. सध्या तरुणाई इतकी धावती झाली आहे की, मनापेक्षा सहवासाला अधिक महत्त्व आल्याने नाती टिकवणे कठीण गेले. याचविषयी ऋतुजा हिने तिच्या आसपासची काही निरीक्षणे मांडली. ‘टाळेबंदीत नातं टिकवणं फार अवघड गेलं. निम्म्याहून अधिक वेळ मित्र-मैत्रिणींचे सांत्वन करण्यात गेले. भेट होत नसल्याने आम्ही चोवीस तास ऑनलाइन असायचो. मग संवाद इतका वाढला की एकमेकांच्या आयुष्यात नाहक हस्तक्षेप वाढला. मग गैरसमज आणि ब्रेकअप. हा काळ एका अर्थी प्रेमाला समृद्ध करणारा होता. म्हणजे बेगडी नाती संपली पण खरं ते टिकलं,’ असा अनुभव तिने सांगितला.
थोडक्यात काय, तर प्रेम हे सुंदर असलं तरी ते शांत डोहासारखं असेल तर त्याचा सहवास आल्हाददायक वाटतो. ते प्रवाही व्हावंही, पण उथळ झालं की मग सहवासही अडगळीसारखा बोचरा वाटू लागतो. त्यामुळे या निर्मळ भावनेचा आनंद चवीचवीने घेत यंदाचा व्हॅलेन्टाइन सर्वानी आनंदात साजरा करायला हवा. कारण दोन वर्षांत वाढलेला दुरावा, बदललेली नात्यांची समीकरणे सांधण्याची हीच ती वेळ असावी कदाचित..