अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात हिरीरीनं भाग घेण्यात आजची तरुण पिढी आघाडीवर आहे. पण दुसरीकडे परीक्षेच्या काळात लकी ड्रेसवर भरवसा ठेवणारी, केटीचा पेपर सोडवण्यासाठी गणपती बाप्पाला मोबाइल स्क्रीनवर आणणारी आणि संतोषीमातेचे चित्र १५ सेकंदात १५ जणांना फॉरवर्ड करणारीही तरुण पिढीच आहे. लक बाय चान्सवर विश्वास ठेवणारी तरुणाई खरी की, स्वत:च्या जिद्दीवर आणि विचारांवर विश्वास ठेवणारी?
आज सुयोगच्या कॉप्युटरचा स्क्रीन सेव्हर बदललेला दिसला. त्यावरची त्याची आवडती हीरोईन हटली आणि साक्षात मंगलमूर्ती तिथे विराजमान झालेले दिसले. एरवी आरशात चार वेळा निरखून बघणारा, गुळगुळीत घोटून दाढी करणारा सुयोग आज तसाच बाहेर निघाला होता. कारण.. ऑक्टोबरचा केटीचा पेपर जवळ आला होता. ‘मागच्या परीक्षेच्या वेळी मी दाढी न करता गेलो होतो आणि त्या पेपरला पास झालो.’ त्याचं उत्तर. सुपर्णा तिचा ड्रेस न विचारता का इस्त्रीला बाहेर दिला म्हणून आईवर चिडचिड करत होती. आता परीक्षेला तिचा तो लकी ड्रेस घालायला मिळणार नव्हता, कारण धोब्यानं तो आणूनच दिला नव्हता. राजू अचानक गळ्यात चावरे बापूंचं लॉकेट, मोबाइलवर गणपतीचा फोटो आणि रिंगटोनसुद्धा ओम जय जगदीश अशा ‘जय्यत तयारीनं’परीक्षेला निघाला होता.
खरंच काहींची सिच्युएशन परीक्षा जवळ आल्यावर अगदी अशीच होते. अभ्यास करायलाही जागत नाहीत एवढे ‘तुला गणपतीची शप्पथ’ हा मेसेज १० जणांना फॉरवर्ड करायला अख्खी रात्र काही जण घालवतात. कुणीकुणी फेसबुकवर फॉरवर्ड केलेला संतोषीमातेचा किंवा शंकराचा फोटो दहा सेकंदात २५ जणांना फॉरवर्ड करण्यासाठी धडपतात. कारण तसं केलं नाही तर काहीतरी विपरीत होईल, अशी भीती त्यात व्यक्त केली असते ना!
एकीकडे आजची तरुण पिढी रॅशनली जगते, असं म्हणायचं आणि दुसरीकडे हे असं इल्लॉजिकल वागायचं.. हे असं वागणं म्हणजे एक प्रकारे अंधश्रद्धेच्या आहारी जाणंच नाही का? यातला थट्टेचा आणि वरवरचा भाग सोडला तर आज २१ व्या शतकात देखील काही तरुण स्वत: प्रयत्न न करता या साऱ्या अविचाराला भुलतात हेच त्यातून दिसतं. श्रद्धेच्या नावाखाली विचाराने अंध होऊन स्वत:चंच नुकसान करतात आणि त्यातूनच अंधश्रद्धा जन्म घेते.
परंतु दुसरीकडे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ‘विचारांची लढाई विचारांनी’ या ध्येयाने प्रेरित झालेलेसुद्धा अनेक तरुण आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी होऊन अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन कसं होईल यासाठी प्रचार आणि प्रसार करण्याचं त्यांचं काम जोमाने सुरू आहे. त्यांच्याशी संवाद साधताना त्यातला प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आणि क्षेत्रातून आल्याचं जाणवलं, परंतु या अशा प्रकारच्या सामाजिक परिवर्तन चळवळीचा भाग झाल्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीकडे पाहायची सवय लागली आणि महाराष्ट्राला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या ध्येयाने वेड लावलं, अशी प्रतिक्रिया या तरुणांनी दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती(गोरेगाव शाखा)मधील राहुल ऐवळे हा विद्यार्थी म्हणाला, ‘मी गेली सहा-सात र्वष या समितीमध्ये आहे. अधिकाधिक तरुणांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सहभागी करून घेणे हाच आमचा धागा आहे. दर गुरुवारी आम्ही सगळेच भेटतो आणि विविध ठिकाणी घडणाऱ्या सामाजिक अनिष्ट घटनांविरोधी जनजागृती करण्याविषयी चर्चा करतो. गोरेगावमधल्या शाळांमध्ये स्वयंअध्ययन म्हणून प्रश्न मंजुषेचे आयोजन करून त्यायोगे विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित प्रश्न विचारतो आणि त्यासाठीची सर्व तयारी समितीतले तरुणच करतात.’
  अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी दादरमधून काम करणारे काही विद्यार्थी म्हणाले, ‘चमत्कारामागचं विज्ञान आम्ही इथे शिकतो आणि इतरांनाही सांगतो, जेणे करून भोंदूबाबांच्या चमत्कारांना कोणी बळी पडू नये. नरबळी किंवा इतर जादूटोणा याविषयी आम्ही ऐकत होतो आणि समाजात हे खूप भयंकर घडतंय असंही जाणवत होतं, पण काय करावं हे कळत नव्हतं. तेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांची मुलाखत ऐकली आणि योग्य दिशा मिळून आम्ही समितीमध्ये सहभागी झालो. कॉलेज, नोकरी सांभाळून जसा वेळ मिळेल तसा आम्ही विविध कॉलेज, शाळांमध्ये जाऊन अधिकाधिक युवकांना याबाबत जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.’
एन. डी. पाटील यांना याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ‘आज खेडय़ापाडय़ातच नाही तर शहरातसुद्धा अंधश्रद्धा मूळ धरू लागली आहे. अडाणी लोकांना मुळातच सारासार विचार करायची शक्ती नसते, त्यामुळे अनाहूतपणे या सगळ्यात ते अडकले जातात. पण शिक्षित तरुणांना सारासार विचार करण्याची शक्ती असूनही ते त्याचा वापर करीत नाहीत. अनेकांनी भोदूबाबांच्या नादी लागून स्वत:ची आयुष्यं बरबाद केली आहेत. मुळात तरुणांच्या मनातील अंधश्रद्धा ही एक प्रकारची मनोरुग्णाची लक्षणं आहेत. स्वत:च्या ताकदीवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवण्याऐवजी ते अंधश्रद्धा हा सोप्पा मार्ग आहे असा समज करून घेतात. खडे, माणिक-मोती, धनलाभ या सगळ्याच्या लोभात ते सहज खेचले जातात.’
धर्माला विरोध नाही; पण धर्माच्या नावाखाली लोकांना फसवण्यात येतं आणि त्यातूनच यामध्ये भरडल्या जाणाऱ्या लोकांना बाहेर काढायचं काम आजचे तरुण नि:स्वार्थी आणि विज्ञाननिष्ठ भावनेने करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा