अभिषेक तेली

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात सत्तेसाठी अनपेक्षित अशी समीकरणे जुळल्यामुळे सत्तासंघर्ष दिवसेंदिवस चिघळत गेला. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन दररोज निरनिराळय़ा घडामोडी घडत आहेत. राजकीय मंडळींच्या स्वार्थापोटी सत्तेसाठी सुरू असलेल्या रस्सीखेचाच्या खेळात महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची चिरफाड झाली अशी भावना आज जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही संभ्रमात आहेत. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाबाबत राज्याचं भविष्य असलेल्या तरुणाईच्या मनात नेमक्या काय भावना आहेत..

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
khamgaon buldhana assembly constituency
खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक
home voting in nala sopara
वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन

शिवसेना-भाजप युती तुटणं, पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडी सरकारची स्थापना, एकनाथ शिंदे यांचं बंड आणि शिवसेनेतील फुटीनंतर अभूतपूर्व सत्तांतर, आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सुरू झालेला वाद. सत्तासंघर्षांमधील हा नवा अंक आता राज्यातील जनतेसमोर सुरू आहे आणि आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आज इकडे तर उद्या तिकडे कसं काय जातात? हा प्रश्न त्यांना सातत्याने सतावतो आहे. एखादा पक्ष कोणाशी कधी युती करेल, कोण कधी पक्ष फोडेल आणि एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारेल याबाबत काहीही भरवसा राहिला नाही आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशास्त्राचा विद्यार्थी असलेला अनिकेत चव्हाण म्हणतो, ‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष हा महत्त्वाकांक्षी वृत्ती, नाराजी, शासकीय यंत्रणांचा दबाव आदी विविध कारणांमुळे दिवसेंदिवस पेटतो आहे. राज्यात आता नवीन राजकीय पद्धतीचा उदय होतोय का? साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींच्या बळावर सत्ता मिळवणं हा पायंडा पडेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे आता एक नागरिक म्हणून राजकारण हे निव्वळ सत्ताकारणच असतं याची खात्री पटली आहे. यामध्ये ना विचारधारा, ना विश्वास, ना जनमत, कशाचाच विचार केला जात नाही.’

अनिकेतची प्रतिक्रिया ही सध्या राज्यातील तरुणाईची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे असंच म्हणता येईल. ओमकार नवाथे हा तरुणही अनिकेतच्या मताला दुजोरा देत सद्य:स्थितीत सत्ता हाच राज्यातील नेत्यांचा एकमेव हेतू असल्याचे मत व्यक्त करतो. ‘सध्या देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. या दबावाखाली विरोधी पक्षांतील आमदार-खासदार फुटून सत्ताधारी पक्षाची वाट धरत आहेत. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फुटले आहेत. या घाणेरडय़ा राजकारणात मराठी माणसांच्या अडीअडचणी आणि समस्या काही सुटत नाही आहेत. जनतेचा विश्वास राजकारण्यांवरून पूर्णपणे उडाला आहे. आगामी निवडणुकीत ‘नोटा – नन ऑफ दि अबाव्ह’ हाच उत्तम पर्याय निवडण्याची वेळ जनतेवर आली आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव,’ अशी खंत ओमकारने व्यक्त केली. नैतिकता व विचारधारेविना राजकारण म्हणजे हृदयाविना शरीर आहे. देशातील लोकशाही जगवण्यासाठी राजकारण्यांनी फोडाफोडीचं राजकारण बंद केलंच पाहिजे, असा आग्रही ओमकारसारखे तरुण धरताना दिसतात.

भारतात निवडणूक म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा मोठा उत्सव असतो. वयाची १८ वर्षे पूर्ण असलेले नागरिक मतदानासाठी पात्र ठरतात. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मंडळींमध्ये कमालीची उत्सुकता असते आणि मोठय़ा संख्येमुळे राजकीय पक्षांसाठी तरुणाईची मते ही निर्णायक ठरतात. परंतु सध्या सत्तेसाठी सुरू असलेली राजकीय पक्षांची अनपेक्षित हातमिळवणी राज्यातील तरुणाईला अस्वस्थ करून सोडणारी आहे. ‘मनासारखा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मी प्रचंड उत्सुक होते; परंतु सध्या सुरू असलेले राजकारण पाहता आपला पक्ष कोणता? आपल्या पक्षाची मूल्ये-तत्त्वे काय? समोरच्या पक्षात तीच तत्त्वे आहेत का? कोणत्या मूल्यांखातर आपण समोरच्या पक्षाशी हातमिळवणी करत आहोत? याचा कुठलाही विचार न करता सरळ समोरच्या पक्षात विलीन होणं हे सध्या सर्रास सुरू आहे. त्यामुळे मुळात यांना पक्ष म्हणणंही आता गैर वाटू लागलं आहे. पक्षांतर्गत झालेले हे छोटे गट, त्यांचे आपापसांतील वाद पाहता केवळ सत्तापिपासू असणाऱ्या या नेत्यांना जनतेने न निवडताही सत्ता मिळवता येते आहे. त्यामुळे आता मतदानाला अर्थ उरला आहे का,’ असा प्रश्न तन्वी गुंडये या तरुणीने उपस्थित केला. लोकशाहीवरून जनतेचा विश्वास ढळू लागल्याने माझ्यासारख्या तरुण पिढीसमोर मतदान करावे की नाही हाच मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु जर जनतेने मनावर घेतलं तर मतदानाच्या बळावर सत्ताधारी लोकांना नामोहरम करून लोकशाहीची ताकद दाखवता येऊ शकेल अशी आशाही वाटते आहे, असे तन्वी म्हणते. तर गौरवी देशपांडेच्या मते, ‘सत्तेच्या खुर्चीसाठी मतदारांचा आणि त्यांच्या विकासाचा विचार न करता सगळेच राजकारणी स्वत:चे स्थान स्थिर करण्यात मग्न आहेत. या सगळय़ाकडे जेव्हा मी एक तरुण मतदार म्हणून पाहते तेव्हा विश्वास नक्की कोणावर ठेवायचा, हा प्रश्न निश्चितच मनात निर्माण होतो.’

प्रत्येक राजकीय पक्षाची स्वत:ची विचारधारा असते. या विचारधारेच्या तसेच तत्त्वांच्या जोरावर राजकीय पक्षांचा प्रवास सुरू असतो. सर्वसामान्य नागरिकही या विचारधारेकडे आकर्षित होऊन एखाद्या पक्षाशी जोडले जातात आणि त्यांना मतदान करतात. परंतु सध्याचे राजकारण पाहता पक्षाच्या तत्त्वांचा विचार केला जातो का? याबद्दल प्रतीक पवार हा तरुण म्हणतो, ‘राजकारण्यांनी तरुणांच्या मनामध्ये ‘राजकारण हे चिखल आहे, त्यात उतरू नये’ अशी एक प्रतिमा तयार करून ठेवली आहे. त्यामुळेच राजकारणाच्या बाबतीत तरुणाईत उदासीनताच पाहायला मिळते. सध्या महाराष्ट्रात चाललेलं दलबदलू राजकारण म्हणजे निव्वळ निष्ठा, तत्त्व, विश्वास आणि विचारधारा यांना पायाखाली कसं तुडवलं जातं आणि या साऱ्या गोष्टींचा आपल्या स्वार्थासाठी कसा वापर करता येतो याचं एक उदाहरण म्हणावं लागेल. ‘मत’ अधिकाराला ‘दान’ समजणाऱ्या या देशात आधीच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्यांची टक्केवारी कमी आहे आणि सध्या सुरू असलेलं राजकारण पाहून हा आकडा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.’ देशाचं भवितव्य हे तरुणाईवर अवलंबून असतं; परंतु सध्याच्या गलिच्छ राजकारणामुळे तरुणाईचा लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडत चालला आहे. देशातील लोकशाही जर टिकवायची असेल तर सत्तापिपासूंना रोखायला हवं आणि त्यासाठी मतदानाचा अधिकार अधिक प्रभावीपणे बजावला तरच देशाला प्रगतीच्या दिशेने नेता येऊ शकेल, तरीही असा अंधुक विश्वास कुठे तरी आजही तरुणाईला वाटतो आहे.

बंड आणि सत्तांतर..

सत्तेचं सिंहासन काबीज करण्यासाठी २०१९ ची विधानसभा निवडणूक शिवसेना व भाजपने युतीत आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून लढवली होती. जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल शिवसेना-भाजप युतीला दिला. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावरून दोन्ही पक्षांचं एकमत झालं नाही आणि इथूनच महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्यास सुरुवात झाली. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटेच्या वेळेस थेट राजभवनात जाऊन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. त्या वेळी अजित पवारांचे बंड मोडून काढण्यात शरद पवार यशस्वी ठरले. यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. मात्र २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. या अभूतपूर्व सत्तांतरानंतर न्यायालयीन लढाई होऊन राज्यातील सत्तासंघर्षांने नवे वळण घेतले. उद्धव ठाकरें यांच्याकडून शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्हही गेलं. सतत एकमेकांच्या उखाळय़ापाखाळय़ा आणि कुरघोडीच्या राजकीय वातावरणात पुन्हा अजित पवारांच्या बंडाची भर पडली आहे. २ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि आता अजित पवार व शरद पवारांमधील वादाने टोकाचे वळण घेतले आहे.

राजकारण्यांना सर्वसामान्यांची भीती वाटायला हवी

सत्तेसाठी जनतेपुढे सातत्याने शाब्दिक बाचाबाची करणारे राजकारणी पडद्यामागे मात्र गुण्यागोविंदाने राहतात. यामुळे कार्यकर्त्यांनी आपापसांत न भांडणे हेच चांगले आणि या सगळय़ा अराजकाकडे सजग दृष्टीने पाहात जनतेने मतदानाचा अधिकार बजावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राजकारण्यांना ईडी-सीबीआयपेक्षा सर्वसामान्य जनतेची भीती जास्त वाटेल तेव्हाच राजकारणाचा स्तर उंचावेल, अशी आशा साईश तोडणकर या तरुणाने व्यक्त केली.

viva@expressindia.com