डॉ. अपूर्वा जोशी – viva@expressindia.com
डार्विनचा सिद्धान्त व्यवसाय क्षेत्राला लागू केल्यास आपल्याला असे लक्षात येते की, करोना ही आपत्ती आहेच आणि या आपत्तीमधून बलाढय़ किंवा चतुर व्यवसाय स्वत:चे अस्तित्व वाचवायचा प्रयत्न करतीलच, पण वाचतील तेच जे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतील.
करोना व्हायरस अवघ्या जगासाठी प्रलय बनून आला आहे आणि या प्रलयकारी परिस्थितीमधून जगातल्या कोणत्याच देशाची सुटका झालेली दिसत नाही. ज्यांची आयुष्ये या व्हायरसमुळे भरडली जाताहेत त्यांची या त्रासातून लवकर सुटका होवो अशीच माझी प्रार्थना आहे. पण या प्रलयामुळे अर्थव्यवस्था ठेचकाळली आहे. जगभरातले भांडवल बाजार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताहेत आणि अर्थातच याचा परिणाम स्टार्टअप इकोसिस्टीमवरदेखील झालेला दिसतो आहे. करोनाची उत्पत्ती ही चीनमधील आहे. भारतातल्या अनेक स्टार्टअप्सना चीनमधून वित्तपुरवठा होतो, अनेक स्टार्टअप्स बऱ्याच मोठय़ा प्रमाणात प्रवास करतात गुंतवणूक मिळवण्यासाठी. हा प्रवास आता पूर्णत: ठप्प झालेला दिसतो आहे. त्यामुळे सध्या कोणतेही गुंतवणूक करार होताना दिसत नाहीत.
स्टार्टअप्स इकोसिस्टीममधील विमान सेवा देणाऱ्या किंवा प्रवासाशी संबंधित ‘ओला’, ‘उबर’ यांच्या व्यवसायाची अपरिमित हानी करोनामुळे झालेली दिसते. रिटेलिंग व्यवसाय असेल किंवा अन्नधान्याची सुविधा देणारा व्यवसाय असेल सगळ्यांचीच सध्या तारांबळ उडताना दिसते आहे. थोडक्यात काय, तर सप्लाय चेनवर आधारित सर्वच स्टार्टअप व्यवसायांची क्षमता आटली आहे. या सगळ्या गदारोळात काही व्यवसायांना अचानक लॉटरी लागली आहे. जनता कर्फ्यू असेल किंवा सार्वजनिक जमावबंदी असेल, सामान्य जनता घरात आहे, मग घरात बसल्या बसल्या काय करायचे तर मग काही मंडळी चित्रपट पाहतात, त्यामुळे व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपन्यांचा फायदा होतो आहे. काही मंडळी आपला वेळ सत्कारणी लागावा म्हणून विविध शैक्षणिक कार्यक्रम पूर्ण करताना दिसतात. त्यामुळे व्हिडीओ कोर्सेस पुरवणाऱ्या कंपन्यांना मागणी आहे. घरात बसून ऑफिसचे काम करणेही क्रमप्राप्त आहे, त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला सुगीचे दिवस आले आहेत.
स्टार्टअप गुंतवणूकदारांच्या विश्वात दादा समजल्या जाणाऱ्या ‘सिकोविया कॅपिटल’ या संस्थेने करोनाला आपत्ती ठरवत ‘ब्लॅक स्वान २०२०’ ही उपमा दिली आहे. जगाला हादरवणारा कोणताही प्रसंग जेव्हा घडतो तेव्हा ही ‘ब्लॅक स्वान’ संधी उपलब्ध होते. याआधी जेव्हा संगणकाचा जन्म झाला किंवा ९/११ चा हल्ला झाला तेव्हा या प्रकारच्या संधी उपलब्ध झालेल्या. जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर यायला आता कदाचित अनेक महिने जातील. करोनामुळे पुढील कालावधीत आव्हाने वाढणार, उत्पादनांच्या किमती घसरणार, कंपन्या विकत घेण्याचं प्रमाण कमी होणार, आयपीओची संख्या आटत जाणार, त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येईपर्यंत अनेक स्टार्टअप्ससाठी ही अस्तित्वाची लढाई ठरू शकते. डार्विनचा सिद्धान्त व्यवसाय क्षेत्राला लागू केल्यास आपल्याला असे लक्षात येते की, करोना ही आपत्ती आहेच आणि या आपत्तीमधून बलाढय़ किंवा चतुर व्यवसाय स्वत:चे अस्तित्व वाचवायचा प्रयत्न करतीलच, पण वाचतील तेच जे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतील.
बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्टार्टअप्सना अनेक धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असते. अशा प्रलयात सरकारवर हवाला ठेवता येत नाही. कारण ही परिस्थिती आटोक्यात आणणे हे मनुष्याच्या हातात नसते, तेव्हा इथे आखून दिलेल्या पंचसूत्रीचे पालन करणे फायद्याचे ठरते.
या सगळ्या धोरणात्मक निर्णयांवर काम केल्यास केवळ स्टार्टअप जगवूच शकत नाही तर ते मोठेही करू शकता. कारण एक गोष्ट इथे विसरता कामा नये की, आज जी सिकोविया करोनाला ‘ब्लॅक स्वान २०२०’ ची उपमा देते आहे त्याच सिकोवियाने अशा आपत्तीनंतरच आजच्या जगप्रसिद्ध कंपन्यांत गुंतवणूक केल्या आहेत. १९८७ सालातल्या ‘ब्लॅक मंडे’नंतर सिस्कोसोबत तर डॉट कॉमचा फुगा फुटल्यावर ‘पेपाल’ आणि ‘गूगल’सोबत तर २००८ सालच्या ‘लेहमन ब्रदर्स’ प्रकरणानंतर एअर बीएनबीसोबत गुंतवणूक करार केले आहेत. आपत्तीतून संपत्ती निर्माण करणे हाच तर त्यांचा व्यवसाय आहे.
रोकड वाचवा हा मोठा अवघड काळ आहे. या काळात पुढे ढकलता येणारे अथवा टाळता येणारे खर्च कमी करून जास्तीत जास्त रोकड हातात ठेवायला हवी. जाहिरात खर्च मोठय़ा हुशारीने करायला लागतो या काळात.
ऑनलाइन जा रोज बदलणाऱ्या सरकारी धोरणांमुळे, जर अधिकाधिक नागरिक घरातच बसणार असतील तर त्यांना लागणाऱ्या जास्तीत जास्त गोष्टी ऑनलाइन पुरवल्या गेल्या पाहिजेत. शिक्षण, सेवा, किराणा, अन्नधान्य वगैरे. पण या सेवा किमान मनुष्यबळात पुरवता आल्या तरच त्याचे फायदे दिसू लागतात.
गुंतवणुकीचा ओघ आटणार जे व्यवसाय गुंतवणुकीच्या पैशावर अवलंबून असतात, गुंतवणूकदारांचे पैसे डिस्काऊंट देण्यात खर्चत असतात त्यांच्यासाठी ही सत्त्वपरीक्षा असते. कारण प्रवास बंद, भेटी बंद त्यामुळे गुंतवणुकीचा ओघ आटणार किंवा लांबणार असल्याची तयारी करून व्यवसाय नफ्यात आणण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करावे लागते.
भांडवली खर्चात कपात करा गरज नसताना कार्यालय, मालमत्ता इत्यादी खर्च करू नका.
वसुलीच्या मागे लागा राष्ट्रीय आपत्ती असून आयकर, संपत्ती कर आदी सर्व सरकारी कार्यालये वसुली करताहेत तशीच व्यवसायांना पण तरलता राखण्यासाठी वसुली महत्त्वाची आहे.