मलाइका अरोरा खान
प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका अरोरा खान देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
हाय, मी आरती, मी रंगानं बऱ्यापैकी सावळी आहे. म्हणून मंद रंगसंगतीचे कपडे माझ्या रंगाला शोभून दिसणार नाहीत अशी मला सतत भीती वाटते. मंद रंगसंगतीचे कोणते कपडे मी वापरावेत? याबद्दल काही टिप्स मला, आपल्याकडून मिळू शकतील का?
आरती.
हाय आरती, गुड! खूपच चांगला प्रश्न विचारलायस तू. हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणींना पडत असणार. कारण वाढणारं वय, भोवतालचं प्रदूषण, धूळ, कडक ऊन, चिंता, ताण, खाण्यापिण्यातील अनियमितता या सगळ्या कारणांमुळे मूळचा रंग गोरा असला तरी तो काळवंडायला कितीसा वेळ लागणार?
खरं तर तू म्हणत्येस तशा रंगाला म्हणजे डस्की स्किनला गडद केशरी (किंवा कोरल रेड), चमकदार पिवळा रंग चांगले सूट करतात. अशा रंगांच्या सान्निध्यात तुझं सौंदर्य आणखी खुलून दिसेल. आता आपण कपडय़ांच्या मंद रंगसंगतीबद्दल विचार करू या. कपडय़ांमध्ये अबोली रंग किंवा पीच कलर म्हणू शकतो आणि फिरोजी, हिरवा किंवा मिंट कलर. अशा रंगांचे कपडे, तुला शोभून दिसतील. यांच्या जोडीला पांढरा किंवा ग्रे, करडय़ा रंगाचे कपडेही छान दिसतील. पांढऱ्या टी-शर्टवर पीच कलरची जीन्स झकास दिसेल. नाहीतर करडय़ा किंवा ग्रे रंगाच्या टॉपवर मिंट कलरची पँट सही वाटेल. हे सर्व पर्याय दिवसा छान वाटतील. ऑफिससाठी किंवा ब्रंच पार्टीसाठी कुल दिसतील. यातही तुला स्मार्ट दिसायचं असेल तर वर ब्लेझर घालू शकतेस. हवं तर ब्लेझरही पांढऱ्या रंगाचा घातलास तर अगदी ‘यो’ स्टायलिश दिसशील.
आता हे सगळं झालं कपडे आणि त्यांच्या रंगांबद्दल. आता आपण यावर घालायच्या अॅक्सेसरीजबद्दल बोलू या. आता तुला या कपडय़ांबरोबर एखादं ठसठशीत रिस्टवॉच किंवा कानात एकाच मोठय़ा खडय़ाचे स्टड्स घालता येतील. या गोष्टी नक्की बघणाऱ्याचे लक्ष वेधून घेतील. तू तुझ्या केसांबद्दल काहीच लिहिलं नाहीस, पण जर लांब, दाट केस असतील तर ते खुशाल मोकळे सोड. मस्त दिसतील. याशिवाय आणखी पर्याय म्हणजे, आता रोज ऑफिसला जाताना किंवा बाहेर जाताना प्रवासात तुला मंद रंगातला स्कार्फ घालता येईल. त्यामुळे उन्हापासून, धुळीपासूनही रक्षण होईल आणि स्मार्ट लुकही मिळेल. एखाद्या गडद रंगाच्या कुर्त्यांवर मंद रंगाचा सिल्कचा स्कार्फ – नाईस कॉम्बो. आता पादत्राणांविषयी बोलू या. यातही मंद रंगातले हील्स असलेले बॅलेरीना शूज किंवा सँडल्स एक नावीन्यपूर्ण लुक देऊन जातील. सो आरती, इतके सगळे मंद रंगातले ऑप्शन्स समोर असताना, स्टायलिंगची चिंता कशाला? आणि आरती, जाता जाता शेवटचं, कायम लक्षात ठेव – त्वचेचा किंवा कपडय़ांचा रंग यापेक्षा तुझ्या मनातला आत्मविश्वास, तुला नवी ओळख मिळवून देईल.
(अनुवाद : गीता सोनी)
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com, http://www.theclosetlabel.com
आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.