मृण्मयी पाथरे

अवघ्या आठ महिन्यांचा मितेश त्याच्यासोबत कोणी खेळायला नाही म्हणून रडत होता. त्याचे आई-बाबा आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे त्याच्याकडे फारसं लक्ष देऊ शकत नव्हते. मितेशला दूध पाजून झालं, खेळणी देऊन झाली, पण त्याचं रडणं मात्र थांबेना. अखेरीस, त्याला मोबाइलवर लहान मुलांची बडबड गीतं लावून दिली, तेव्हा कुठे तो शांत झाला. अगदी लहानपणापासूनच मितेशला टीव्हीवर कार्टून्स पाहणं आणि मोबाइलवर बडबड गीतं ऐकणं फार आवडायचं. कालांतराने तो रडायला लागल्यावर त्याला उचलून घेतलं, तरी मोबाइल हातात आल्याशिवाय त्याचं रडणं कमी व्हायचं नाही. तसं पाहायला गेलं, तर कामाच्या ढिगाऱ्यासमोर मितेशकडे सतत लक्ष देता येत नसल्याने त्याला चलतचित्रांमध्ये गुंतवून ठेवण्याचा हा पर्याय त्याच्या पालकांसाठी सोपा होता.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

अन्वय लहान असल्यापासूनच दिसायला फार गोंडस होता. तो हसताना त्याच्या गुबगुबीत गालावर पडलेली खळी आणि त्याचं दात नसलेलं बोळकं खूप क्युट दिसायचं. तो केवळ त्याच्या आई-बाबा आणि आजी-आजोबांचाच नव्हे, तर शेजाऱ्यांचाही लाडका होता. त्याच्या बाललीलांनी सगळय़ांचीच करमणूक व्हायची. अन्वयच्या बालपणीच्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी आणि आपला हा आनंद इतरांसोबत शेअर करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याचं सोशल मीडियावर अकाऊंट बनवलं. त्यांनी अन्वय कसा शिंकतो, झोपतो, खातो-पितो, बोबडं बोलतो (आणि रडतो) याचे असंख्य व्हिडीओज पोस्ट केले. त्याला बरेच लाइक्सही मिळाले. त्याच्या व्हिडीओजवर अगदी नामांकित सेलिब्रिटीजनीसुद्धा कमेंट्स केल्या. रातोरात अन्वय ‘सोशल मीडिया स्टार’ झाला. बघता बघता ही आठवणींची शिदोरी बनवताना आहेत ते क्षण एन्जॉय करण्यापेक्षा व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी अन्वयकडून कशा विशिष्ट रिअ‍ॅक्शन काढून घेता येतील याकडे जास्त लक्ष दिलं जाऊ लागलं.

‘सावनी पुढच्या वर्षी तीन वर्षांची होईल. तिच्यासाठी आतापासूनच प्लेस्कूल (playschool) शोधायला हवं. आजकाल नामांकित प्लेस्कूलचं अ‍ॅडमिशन एकेक वर्ष आधीच सुरू होतं. जरा जरी उशीर केला, तर आपण वेटिंग लिस्टमध्ये अडकू. आपल्या आवडीच्या प्लेस्कूलमध्ये प्रवेश नाही मिळाला, तर भविष्यात तिच्या शाळेची प्रवेशप्रक्रिया अडकायला नको. सध्या या प्लेस्कूलचं विशिष्ट शाळांसोबत टाय-अप पण असतं म्हणे! आताची दिरंगाई आपल्याला नंतर महाग नको पडायला.’ सावनीचे पालक एकमेकांशी बोलत होते. सावनी तशी नुकतीच जेमतेम दोन वर्षांची झाली होती. पण शेजारील मुलांच्या पालकांना सक्रियपणे त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील निर्णय घेताना पाहून सावनीच्या पालकांना एक वेगळंच प्रेशर जाणवत होतं. प्लेस्कूलव्यतिरिक्त सावनी चित्रकला, अबॅकस, पोहणं, कराटे अशा आणखी कोणत्या क्लासेसना जाऊ शकते यावरही चर्चा सुरू झाली.

काही दिवसांपूर्वीच भारतात बालदिन साजरा केला गेला. जसजशी वर्ष सरत जात आहेत, तसतसं लहान मुलांचं विश्वही बदलत जातंय. आपल्याकडे डिजिटल डिव्हाइसेस नव्हते, तेव्हा आपलं आयुष्यही थोडं कमी गुंतागुंतीचं होतं. या गॅजेट्सपेक्षा आपण सभोवतालच्या माणसांकडे जरा अधिक लक्ष द्यायचो. आजकाल मुलांनी जरा जरी कुरबुर केली तरी त्यांना मोबाइल, टॅबलेट किंवा टीव्हीवर हव्या त्या गोष्टी दाखवल्या जातात. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना स्वत:च्या भावना समजून घेऊन त्या कशा मॅनेज करता येतील, यापेक्षा ‘नकारात्मक भावना भयंकर असतात. म्हणून त्यांच्यापासून मन विचलित (distract) केलेलंच बरं’ असा पायंडा पडू शकतो. त्यामुळेच की काय, मोठं झाल्यावर ही मुलं अभ्यासाचा किंवा इतर गोष्टींचा ताण जाणवायला लागल्यावर आपल्या भावना इतरांसोबत शेअर करण्यापेक्षा पबजी, जी.टी.ए., मोर्टल कॉम्बॅट अशा िहसक किंवा कँडी क्रश, टेम्पल रन अशा मेंदूला फार काम करायला न लावणाऱ्या गेम्सच्या आहारी जाऊ शकतात.

सोशल मीडियामुळे तर आपण आता केवळ आपलीच नव्हे, तर आपल्या मुलांचीही तुलना इतरांच्या मुलांसोबत करायला लागलो आहोत. सोशल मीडियावरच्या फोटोज आणि व्हिडीओजमध्ये आपल्या मुलांनी एका विशिष्ट प्रकारेच दिसावं, वागावं, पोज द्यावी आणि हावभाव करावेत, याकडे सध्या काही पालक डोळय़ात तेल घालून लक्ष देतात. या गोष्टी जर मोठय़ांसाठी महत्त्वाच्या असतील, तर त्या आपल्यासाठीसुद्धा महत्त्वाच्या आहेत, असा त्यातून लहान मुलांचा समज होऊ शकतो. यामुळे मोठय़ांच्या या सवयीचं अनुकरण करून वेगवेगळय़ा पोजेसमध्ये, निरनिराळे फिल्टर्स वापरून शेकडो सेल्फी आणि व्हिडीओज काढणं आणि आपण ‘सुंदर’ दिसेपर्यंत त्यांना एडिट करत बसणं, त्यांच्या आयुष्याचा एक भाग होऊन जातं. यातून पुढे बॉडी इमेज इश्यू, चेहऱ्याच्या आणि शरीराच्या केवळ मोजक्या भागांबद्दल ऑब्सेशन (obsession) निर्माण होणं, स्वओळख आणि आत्मविश्वास दृढ करण्यात येणारे अडथळे, लहानसहान गोष्टींसाठी आणि आनंद अनुभवण्यासाठी सोशल मीडियावरील लाइक्स आणि कमेंट्सवर अवलंबून राहणं, अशा कित्येक प्रॉब्लेम्सना आयतं आमंत्रण मिळतं.

हल्ली मूल बाल्यावस्थेत असल्यापासूनच त्यांच्यासाठी कडेकोट रुटीन आखणं, अभ्यास आणि एक्स्ट्रा-करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीजच्या गराडय़ात खेळण्याचा वेळ कमी करणं, आपलं मूल ‘परफेक्ट’ कसं होईल यासाठी कंबर कसून प्रयत्न करणं अशी बरीच धडपड पालक करत असतात. पुढे हे मूल मोठं झाल्यावर भविष्यात करिअरचे ऑप्शन्स खुले राहावेत यासाठी मुलांकडून कमीत कमी पंचाऐंशी टक्क्यांच्या वर मार्क असावेत असा आग्रह धरणारे, मुलांच्या एकेका मार्काचा हिशोब ठेवणारे आणि एखाद-दुसरा मार्क कमी मिळाल्यास कोचिंग क्लासेसमध्ये किंवा शाळेत शिक्षकांना जाऊन भेटणारे पालकही आपल्याला नक्की सापडतील. जी स्पर्धात्मक वृत्ती सध्याच्या तरुण पिढीमध्ये दिसते आहे, तीच वृत्ती गेल्या सात-आठ वर्षांत चिमुकल्यांच्या आयुष्यातही डोकावते आहे. मोठय़ांची स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा लहान मुलांवर लादल्याने कमी वयातच त्यांची घुसमट होणं, आपण मोठय़ांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तर ‘आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. आपण फेल्यूअर (failure) आहोत’, असं वाटणं, अमुक मार्क मिळाले नाहीत तर आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा विचार करणं अशा कित्येक समस्या उद्भवू शकतात. आणि मुलांनी घर सोडून जाणं, ड्रग्ज किंवा दारूचं सेवन करणं, स्वत:ला इजा पोहोचवणं अशा काही गोष्टी केल्या की आपण ‘आजकालच्या पिढीला एवढासाही ताण सहन करता येत नाही’ असं म्हणून सहजपणे त्यांनाच दोष देऊन मोकळे होतो.

खरं तर, एखादं मूल जन्माला येतं तेव्हा ते या समस्या किंवा अपेक्षा घेऊन येत नाही. आपण मोठी माणसंच एकेका अपेक्षेचे मनोरे रचतो आणि त्या मनोऱ्याच्या कळसापर्यंत मूल पोहोचलं नाही, तर त्यांना बोल लावणारेही बऱ्याचदा आपणच असतो. पण आपण मुलांना स्वत:चे मनोरे स्वत: निर्माण करू दिले तर? या मनोऱ्यांवर चढताना त्यांचा पाय सटकला तर त्यांना ओरडण्याऐवजी आधार दिला तर? एखादा मनोरा सर करताना तो मनोरा आपल्यासाठी नाही आहे हे लक्षात आल्यावर दुसऱ्या मनोऱ्याला प्राधान्य दिलं तर? तो मनोरा सर केला किंवा नाही यावर आपलं आपल्या मुलांप्रति असलेलं प्रेम अवलंबून नाही, हे त्यांना वेळोवेळी जाणवू दिलं तर? येणारी पिढी आधीच्या पिढय़ांपेक्षा नक्कीच थोडी वेगळी आणि आनंदी असेल, नाही का?