मृण्मयी पाथरे
गेल्या आठवडय़ात सारंग सध्या पुण्यात राहणाऱ्या त्याच्या पालकांना निवांत वेळ काढून भेटायला गेला. एका वर्षांपूर्वी त्याने त्याचं गौरववर प्रेम आहे, हे पालकांना सांगितलं होतं. त्या वेळेसही त्याच्या आईबाबांना आपलं मूल समलैंगिक व्यक्तींकडे आकर्षित होतं, हे समजून घेणं आणि पचवणं थोडं अवघड होतं; पण कालांतराने त्यांनी सारंग आणि गौरवच्या नात्याला स्वीकारलं. मात्र आताची भेट त्याहून अधिक खास होती. थोडय़ा इकडच्या- तिकडच्या गप्पा झाल्यावर सारंग दबक्या आवाजात म्हणाला, ‘‘आई-बाबा, मला आणि गौरवला तुम्हाला एका खास व्यक्तीबद्दल सांगायचं आहे. ही व्यक्ती आम्हा दोघांसाठीही खूप महत्त्वाची आहे. जसं मी आणि गौरव एकमेकांवर जिवापाड प्रेम करतो, तसंच आम्हा दोघांनाही अद्वैत फार आवडतो. एका नात्यात तीन व्यक्ती असणं ही कल्पनाच कदाचित तुमच्यासाठी नवी असेल. तुमच्या मनात अनेक प्रश्नंही असतील आणि आम्ही त्या प्रश्नांची आम्हाला जमतील तशी उत्तरं देण्याचा प्रयत्न करू.’’ सारंगच्या आईबाबांना नक्की काय बोलावं हे सुचेना!
सारंगच्या पालकांच्या मनात विचारांचं वादळ थैमान घालत होतं, ‘‘आपल्याला एखादं कपल किंवा जोडपं कसं असतं हे माहिती आहे, पण एकापेक्षा जास्त जोडीदार असलेल्या नात्याला नक्की म्हणायचं तरी काय? दर दशकात आपल्याला नवनवीन काही तरी ऐकायला मिळतं. जग खूप वेगाने बदलतंय. एखाद्या नात्यात दोनपेक्षा जास्त व्यक्ती असतील, तर घरात आणि घराबाहेर कामाचं विभाजन कसं करतात? एकाहून अनेक जोडीदार असतील आणि एखाद्या जोडीदाराकडे जास्त लक्ष दिलं गेलं, तर तिसऱ्या व्यक्तीला कधी जेलस वाटत नसेल? आजकाल शारीरिक आकर्षणाच्या मोहापायी नवीन नात्यांचे निकष बदलत असतात. आपल्याला नक्की कोणती व्यक्ती आवडते हे ठरवणं खरंच एवढं कठीण आहे? एकाच व्यक्तीशी जन्मभर कमिटेड राहण्यात यांना नक्की काय प्रॉब्लेम आहे? आज अद्वैत आवडला, उद्या कोणी अजून एखादा आवडला मग? आधीच्या जोडीदाराला सोडून देणार की आहे त्याच नात्यात आणखी जोडीदाराची भर घालणार? आणि हे असं कधीपर्यंत करत राहणार? या अशा नात्याला काही खोल अर्थ राहील का?’’ पण हे सगळं थेट सारंगला कसं विचारायचं, या प्रश्नाने त्याचे पालक बुचकळय़ात पडले.
सारंगच्या पालकांना त्यांना पडलेले प्रश्न विचारताना संकोचल्यासारखं वाटणं साहजिकच होतं. आपल्यापैकी अनेक जण लहानपणापासून केवळ विषमिलगी ( heterosexual) जोडप्यांना बघत, ऐकत किंवा वाचत आल्याने आपल्या नात्याची व्याख्या तेवढीच मर्यादित आहे. विषमिलगी नात्यांच्या पलीकडेही पॉलिअॅमरी (polyamory) सारखे कित्येक नात्यांचे प्रकार असू शकतात हे आपल्याला दैनंदिन जीवनात सहसा माहितीही नसतं आणि कसं माहिती असेल? अशा नात्यांविषयी सहसा ना वर्तमानपत्रात किंवा पुस्तकात काही छापलं जात, ना टी.व्ही. किंवा सिनेमामध्ये दाखवलं जात आणि दाखवलं गेलंच तरी अशा नात्यातील सूक्ष्म बारकाव्यांपेक्षा नफ्याचं गणित मांडून भडक (आणि बऱ्याचदा विवादात्मक) गोष्टीच प्रेक्षकांसमोर आणल्या जातात. नात्याचं हे असं कळत – नकळतपणे दाखवलेलं बीभत्स रूप पाहून अशा नात्यांपासून दूर पळालेलं बरं, हा समज अनेकांच्या मनात दृढ होतो. त्यामुळे कित्येकदा ‘आधीच दुष्काळ, त्यात तेरावा महिना’ अशी गत होते.
पॉलिअॅमरस नात्यात एकाहून अधिक जोडीदार असल्याने त्यांना या नात्यात असणाऱ्या जोडीदारांच्या संख्येनुसार ‘कपल’ऐवजी ‘थ्रूपल’ (throuple), ट्रायड (traid), क्वाड (quad) असंही म्हटलं जातं. या जोडीदारांची जेंडर आयडेंटिटी सारखी असू शकते किंवा भिन्नही असू शकते. म्हणजेच एखाद्या नात्यात चार स्त्रिया एकत्र असू शकतात/ तीन पुरुष एकत्र राहू शकतात/ एक पुरुष, एक स्त्री, एक नॉन-बायनरी (non- binary) व्यक्ती राहू शकते/ दोन ट्रान्सजेंडर व्यक्ती, एक नॉन-बायनरी व्यक्ती आणि एक क्वीअर व्यक्तीही एकत्र असू शकतात. जितक्या विविध व्यक्ती, तितकी वैविध्यपूर्ण नाती! त्यामुळे कामाचं विभाजन न्याय्य (equitable) होण्याची शक्यता जास्त असते. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे पॉलिअॅमरस नातं हे केवळ शारीरिक आकर्षणापुरतं मर्यादित नसून भावनिक आणि रोमँटिक आकर्षणावरही अवलंबून असतं आणि आपल्यापैकी कित्येकांना याचाच विसर पडतो.
एकंदर, पॉलिअॅमरस नातं फुलवणं वाटतं तितकं सोपं नसतं. यात एकाहून अधिक जोडीदार जरी असले, तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या नात्याच्या परिसीमा (boundaries) कशा असाव्यात, हे व्यक्त करण्याचा हक्क असतो. नात्यात कोणत्या गोष्टींना परवानगी आहे किंवा नाही, कोणत्या गोष्टी एकमेकांना सांगितल्याच पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी सांगितल्या नाही तरी चालतील, या नात्यापलीकडे आपण इतर कोणासोबत संबंध ठेवू शकतो की नाही, आपल्या नात्यात एकाहून जास्त जोडीदार असल्याने नात्यामध्ये एखादी हायरार्की (hierarchy) असावी की नसावी याबद्दल वेळोवेळी सखोल चर्चा केली जाते; परंतु या चर्चेअंती एकमेकांशी सहमत झाल्यावरही इतर समस्या काही पाठ सोडत नाहीत.
बऱ्याचदा आपल्यापैकी काही जणांना पॉलिअॅमरस नाती आपल्या संस्कृतीला ‘धोका’ आहेत, असं वाटल्यामुळे या नात्यात असलेल्या व्यक्ती एकमेकांसोबत जरी जोडीदार म्हणून राहत असल्या, तरी त्यांना समाजात वावरताना आम्ही मित्रमैत्रिणी किंवा सहकारी म्हणून एकत्र राहत आहोत, असं सांगावं लागतं. आपल्या जोडीदाराला सगळय़ांसमोर जोडीदाराचा दर्जा न देता आल्याने अनेक जणांना ‘डबल लाइफ’ जगल्यासारखं वाटतं. आपल्या नात्याबद्दल इतरांना थांगपत्ता लागू नये यासाठी कित्येक जण आयुष्यभर भीत भीत जगतात. भारतात क्वीअर व्यक्तींना लग्न करावंसं वाटलं तरी सध्या कायद्यात अजूनही त्याची तरतूद नाही. जरी पुढे ही तरतूद केली गेली, तरी दोनहून अधिक जोडीदारांचा त्यात आताच्या घडीला उल्लेखही नाही. हे कायदे नक्की कोण बनवतंय आणि मंजूर करतंय याचा अभ्यास केला, तर ही परिस्थिती का उद्भवली आहे याचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल.
लग्नाच्या कायद्याबद्दल कोर्टात सध्या जरी ‘तारीख पे तारीख’ सुरू असलं, तरी काही जण आपापल्या पद्धतीने लग्नसोहळे पार पाडत आहेत. या सोहळय़ाचे फोटो किंवा व्हिडीओ कधी सोशल मीडियावर पोस्ट केले गेले, तर कॉमेंट्समध्ये एखाद-दुसरी व्यक्ती तरी ‘तुमचे फोटो तुमच्याकडेच ठेवा. उगाच जगासमोर बोभाटा कशाला?’ अशा आशयाचे शेरे मारताना हमखास आढळतील आणि अशा कॉमेंट्सना लाइक्सही बऱ्यापैकी मिळताना दिसतील; पण एखाद्या स्त्री-पुरुषाच्या लग्न समारंभावर चुकूनही अशा कॉमेंट्स केल्या, तर त्या माणसाची मात्र धडगत नसेल. क्वीअर व्यक्तींच्या केवळ सुखाच्याच क्षणांना नव्हे, तर ब्रेकअपसारख्या दु:खाच्या क्षणांनाही मेनस्ट्रीम संभाषणात जागा मिळत नाही. आपला आवाज असूनही तो जेव्हा समाजाकडून दाबला जातो, तेव्हा होणारी घुसमट ही फक्त त्या व्यक्तींनाच माहीत असते. तसं पाहायला गेलं, तर माणूस उत्क्रांत होताना त्याने ‘सव्र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’च्या नादात विषमिलगी नात्यांची चौकट प्रजननापुरती निर्माण केली. त्यामुळे कोणती नाती नैसर्गिक किंवा अनैसर्गिक आहेत, याही मानवनिर्मित कल्पना आहेत हे लक्षात घ्यायला हवं. हे जेव्हा आपल्याला उमजेल, तेव्हा कुठे आपण प्रेमाला प्रेमाने पाहू, हो ना?