समर लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग असणाऱ्या या आंब्याविषयीचं गप्पाष्टक
बाहेरच्या प्रखर उन्हात शोभून दिसणारा त्याचा रंग.. केशरीजर्द! बाळसेदार, गोमटं रूप.. नाक, डोळे, जीभ आणि अक्षरश: अंतरंग सुखावणारा एकच केसरिया बालम.. याच्याशिवाय हा ऋतू अपूर्णच! पेटी उघडताच नाकात भरणारा त्याचा गोड घमघमाटच आता जिव्हा तृप्त करणार अशी वर्दी देतो.. टळटळीत उन्हाचा चटका सुसहय़ करणारा एकच घटक असतो, उन्हाळा आवडायला लावणारं एकच कारण असतं अर्थातच..आंबा. फळांचा राजा वगैरे बिरुदं तो मिरवतोच पण असं कुठलंही उपनाव, बिरुद फिकं पडावं असा याचा रुबाब असतो. चातक पावसाळ्याची बघत नाही, अशी वाट तो येणार म्हणून उन्हाळ्याची पाहिली जाते. येतो तो उण्यापुऱ्या दोन-अडीच महिन्यांसाठी पण मन तृप्त करून जातो हे नक्की.
आंबापुराण असं कितीही गायलं तरी गोडंच वाटणार. अमीर-गरीब, बडे-छोटे, हेल्थ कॉन्शस, फिगर कॉन्शस अशा सगळ्या कॅटॅगरीच्या लोकांना आपली कॅटॅगरी जरा बाजूला ठेवून या फळाचा मनापासून आस्वाद घ्यायला आवडतोच. बरं.. याचे प्रकार तरी किती.. प्रांतानुसार बदलणारे! पण त्यात आपला हापूसची बात कुछ औरच!
आंबा हा आपल्या समर लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग आहे. कुठला आंबा कसा खाल्ला तर चांगला लागतो, हे खरा आंबाशौकीनच सांगू शकेल. म्हणजे रसाला अमुक आंबा चांगला, फोडी करून खायच्या तर हाच हवा. हा मिल्कशेकला चालेल पण आमरसाला नको वगैरे.. आंबा खाण्याची खरी मजा मात्र रस चोखून खाण्यातच आहे. आंबा असा गोल गोल पिळून हळूच वरचा काळा देठ उडवायचा आणि मग आतला ओतप्रोत भरलेला मधुर, केशरी रस मनमुराद चोखायचा.. स्वर्गसुख! या खाण्याने हात बरबटतील, तोंड केशरी होईल, कदाचित तुमचा ड्रेसही केसरिया रंगानं रंगेल थोडासा, पण तीच आंब्यावरच्या प्रेमाची पावती आहे.
छाया : आशिष सोमपुरा
मॉडेल : स्नेहा