मे महिन्यात आंबा येतो तसा, सूर्य तांबूस पिवळा लख्ख होत आग ओतू लागतो. या दोन्हींचं टेरिफिक कॉम्बिनेशन असलेला पिवळा- केशरी रंग पॉझिटिव्ह एनर्जी देणारा रंग मानतात. भारतीय त्वचेवर कधीही खुलून दिसणाऱ्या या मँगो कलरविषयी आणि मँगो फॅशविषयी..
पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर,
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर!
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी,
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी!
कवी भा. रा. तांबे यांनी निसर्गात होणाऱ्या पिवळ्या रंगाची उधळण अगदी चपखल शब्दांत मांडली आहे. कोणताही ऋतू आणि त्या ऋतूत निसर्गात दिसणारे रंग यांचं नातं अगदी घट्ट असतं. मे महिना उजाडत आला की आपल्याला आंब्याचे वेध लागतात आणि त्याच बरोबर सूर्यही तांबूस पिवळा होऊन आग ओकू लागतो. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून की काय पण ‘मँगो कलर’ बराच चलतीत दिसतो. जुन्या पिढीतले लोक ‘तांबूस पिवळा’ म्हणून या रंगाला ओळखतात, तर ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरीच्या यंगस्टर्सना याला ‘गोल्डन येलो’ किंवा ‘मँगो कलर’ म्हणायला आवडतं. पण सर्वसाधारणपणे ‘मँगो कलर’ आबालवृद्धांना आवडणारा रंग आहे. कारण हा रंग पॉझिटिव्ह एनर्जी देतो.
अमेरिकन प्रकाशन असलेल्या ‘Psychology for better advertising’ या पुस्तकात मँगो कलर संदर्भात एक प्रयोग दिला आहे. मँगो कलरचा लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी दोन वेगवेगळ्या वर्गात एका ठरावीक वयोगटातल्या काही लहान मुलांना बसवलं. एका वर्गाच्या िभती मँगो कलरने रंगवण्यात आल्या होत्या, तर दुसऱ्या वर्गाच्या िभती निळ्या रंगाच्या होत्या. त्यावेळी असं आढळलं की मँगो कलरच्या िभती असलेल्या वर्गातली मुलं जास्त अ‍ॅक्टिव्ह, उत्साही होती. त्यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की मँगो कलर मेंदूच्या कार्याला वेग देतो. या रंगाचं वैशिष्टय़ असं की हा रंग फार उग्र नाही आणि अतिशय सौम्यही नाही. त्यामुळे मँगो कलर एक क्लासी इफेक्ट निर्माण करतो. अत्यंत आकर्षक, आत्मविश्वास निर्माण करणारा रंग म्हणून या रंगाकडे पाहिलं जातं.
पण या रंगाची दुसरीही बाजू आहे. या रंगाचा अतिवापर स्ट्रेस निर्माण करणारा ठरू शकतो, असं म्हणतात. प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉ यांच्याबाबत समीक्षकांनी असं म्हटलं आहे की ज्या वेळी वॅन गॉ यांनी आत्महत्या केली त्यादरम्यान त्यांनी काढलेल्या चित्रांमध्ये मँगो कलरच्या जवळच्या छटेचा बराच वापर केलेला होता. पण ‘जेजे स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट’चे प्राध्यापक आशीष विळेकर यांनी याच बाबतीत एक वेगळा विचार समोर आणला. ते म्हणतात, ‘वॅन गॉ हा एक जातिवंत चित्रकार होता. त्याच्या आयुष्यात बरंच नराश्य होतं. मग याच्या उलट परिस्थितीचं आकर्षण म्हणून त्याने पिवळ्या रंगाचा अधिक वापर केलेला असू शकतो. कारण वॅन गॉ यांना तेजाचं आकर्षण होतं. त्यांच्या चित्रातला पिवळ्या रंगाचा वापर आणि स्ट्रोक्स हे असंही सूचित करतात की, त्यांना निसर्गाला प्रत्युत्तर देण्याची इच्छा होती. त्यामुळे उन्हात बसून चित्र काढत असताना सूर्याच्या तेजाला प्रत्युत्तर म्हणूनही त्याच छटेचा अधिक वापर वॅन गॉ यांनी त्यांच्या चित्रात केला असू शकतो.’
थोडक्यात काय तर प्रत्येक रंगाला दोन्ही बाजू असतात. दृष्टी तशी सृष्टी! त्यामुळे कोणत्याही रंगछटेप्रमाणे त्या रंगाच्या अर्थछटासुद्धा बदलत जातात.
सध्या पिवळसर नारंगी छटा असलेला मँगो कलर सध्या इन फॅशनआहे. कपडय़ांपासून सुरुवात करायची तर ब्राईट यल्लो ते ऑरेंज या शेड्समध्ये जाणारे टय़ुनिक्स, फ्लोर लेन्थ ड्रेसेस, स्कर्ट्स, साड्या सध्या इन ट्रेंड दिसतील. समर ड्रेसमध्ये तर एक तरी मँगो शेड मस्ट आहे. कॉटन फॅब्रिकमध्ये मँगो कलरची ही छटा छान खुलून दिसते. त्यामुळे कॉटनचे समर ड्रेसेस, शर्ट्स तुम्ही नक्कीच निवडू शकता. हल्ली तर डेनिममध्येसुद्धा मँगो कलर उपलब्ध आहे. छानशा मँगो कलरमध्ये समर जॅकेटचा ऑप्शन पण आहे तुमच्यासमोर.
अ‍ॅक्सेसरीजना विसरू नका. मँगो शेड्समधील बॅग्स, शूजसुद्धा मार्केटमध्ये पाहायला मिळतील. मँगो शेड्सच्या बॅलरीनाज काय दिसतात! तुमच्या रोजच्या जॉिगग सेशनमध्ये चेंज आणायचा असेल तर मँगो कलरचे स्पोर्ट शूज किंवा रिस्ट बॅण्ड ट्राय करा. यशिवाय नेकलेसेस, इअरिरग्सची निवडही तुम्ही करू शकता. ज्वेलरीत मँगो आणि गोल्ड कलरचा मॅच मस्त जुळतो. त्याचबरोबर स्कार्फ असतोच जोडीला. उन्हाळ्यात स्कार्फ मस्ट आणि त्यात मँगो कलरचा स्कार्फ असेल तर अगदी ट्रेंडी वाटेल.
मँगो कलरमध्ये नेलपेण्ट, लीपकलर, मोबाईल कव्हर्ससुद्धा आहेच की. पण ती वापरताना जरा सावधान. हा बोल्ड रंग आहे. त्यामुळे तो वापरताना पुरेसा आत्मविश्वास हवा. मँगो कलर युथफूल समजला जातो. तो फ्रेश आहे. त्यामुळे मँगो फॅशन अवश्य हवी. फक्त ती हुशारीने आणि कॉन्फिडन्सनं ल्यायला हवी.