‘हाय फ्रेण्ड! व्हॉटस् अप!’
(कोण आहे हा? डीपी तर ओळखीचा वाटतोय.. पण नीटसा आठवत नाहीये..)
‘हे, ओळखलं नाहीस मला?’
(..)
‘हे काही बरं नाही केलंस.. म्हणजे दरवर्षी आपण पुन्हा नव्यानं ओळख करून घ्यायची? कशी रे तुम्ही अशी माणसं ?’
(मनात – ‘आम्ही माणसं’.. मग हा कोण?)
‘नाही ना अजून डोक्याची टय़ूब पेटली? निदान यूटय़ूब तरी पेटतेय का बघ.. सर्च टाक ‘आंबा’.. लेका, मी आहे आंबा फळगावकर..
(ओऽऽऽहो.. येस्सऽऽऽ ओळखलं फ्रेण्ड! एकदम करेक्टली ओळखलं! आपलीतुपली दोस्ती विसरणार कशी..)
आंब्या, मित्रा, गेली चार महिने वाट पाहतोय रे.. तुझ्याबद्दलचे सगळे अपडेट घेत राहिलोय. इतर कोणत्याही फळांबद्दल येत नाहीत, एवढय़ा बातम्या तुझ्यावर येतात. जानेवारी ते मार्चमधल्या मोहोराच्या, मग पहिली आंब्याची पेटी बाजारात दाखल झाल्याच्या.. मग तुझ्या वाढत्या भावाच्या, चढत्या आवाजातल्या चर्चा.. यंदा तुझ्यावर युरोपात बंदी घातली गेल्येय नि आता कदाचित तुझा भाव खाली येईल, म्हणून आम्ही तुझ्या वाटेकडं डोळे लावून बसलोय..
आंब्या, तसं तर तुझं दर्शन मी रोज घेतोय. आमच्या समोरच्या सोसायटीतल्या एका काकूंनी लावलेल्या आंब्याच्या झाडामुळं.. त्या झाडाला आलेला धुंदावणारा मोहोर, त्याला धरणाऱ्या बाळकैऱ्या नि त्यांचं निवांतपणं मोठं होत जाणं.. कसली भारी एक्साइन्टमेंट असते राव.. माझ्याकडं प्रॉपर स्टेडी कॅमेरा असता ना तर त्या प्रो. केळफा अर्थात दादासाहेब फाळकेंसारखं मीही आंब्याचा सगळा सीझन शूट केला असता.. आमच्या मोबाइल कॅमेऱ्याला विचारतो कोण! तुला मज्जा माहित्येय का, परवा त्या अर्णवच्या गर्लफ्रेण्डनं लाडात येऊन त्याला झाडावर कैऱ्या काढायला चढवलं. कसाबसा फासफूस करत तो चढला. एखाद-दोन कैऱ्या काढल्या नि खाली बघतो तर कैऱ्या घेऊन मत्रीण गायब नि त्या काकू हातात काठी घेऊन उभ्या.. पुढं काय झालं, ते तू समजून घे रे बाबा.. मग मी कसा शहाणा बघ. मी फक्त त्या कैऱ्या क्लिक केल्या नि तोच पिक आता डीपी म्हणून ठेवला. अपना ‘टीआरपी’ तो एकदम निकल पडा. धपाधप लाइक्स आले. वर एका ताईनं लिहिलंन की, ‘असला डीपी बघून आमचे दात शिवशिवतात, कैरी खाल्ली जाते नि मग डेंटिस्टची चलती होते..’ आता कुणाचं काय तर कुणाचं काय!
सुट्टय़ा लागल्यावर कोकणात आज्जीकडं राहायला जाणं नि सॉलिड धम्माल करणं.. झाडावर चढून कैऱ्या काढणं नि त्या चिमण्या दातांनी उष्टावलेल्या कैऱ्या सगळ्यांना वाटणं.. समोर हा असा आंब्याचा ढीग.. हवा तो उचला नि हो जाओ शुरू.. तुझ्या देठावरून, सुरकुतलेल्या अंगावर अलगद हात फिरवला जातो. देठ काढून थोडासा चीक बाहेर काढल्यावर होतं तुझं रसाळ दर्शन.. केसरिया.. धीर धरवतच नाही.. तुला चोखताना रस तोंडाला लागणं, आजूबाजूला नि अंगावर सांडणं हे होतंच. पण मोठे लोक अजिबात ओरडत नाहीत. आंब्या, मित्रा, लेका, आम्ही तुझ्यावर एवढं खंडीभर प्रेम करत असलो, तरी तू अज्जिबात न आवडणारे महाभागही आहेत. माझे काही मित्र तर असे आहेत की, आधी तर ते तुला पाटय़ाच्या पाटय़ा घेऊन फस्त करायचे. पण आता सहा आंब्यांत गळपटून जातात. आता त्यांना तू म्हणे एवढा खास आवडतोस असं नाही. असं कसं काय होऊ शकतं? तू न आवडणाऱ्या लोकांना तू थोडा माहिती तरी असतोस का रे? म्हणजे बघ, हापूसखेरीज तुझे कित्ती तरी प्रकार आहेत. त्यांची नावंसुद्धा लई भारी नि गमतीशीर आहेत – दशेरी, पायरी, रायवळ, केसर, रुमाली, नीलम, तोतापुरी, लंगडा, बगनपल्ली, गावरान, भागमभाग, मल्लिका, आम्रपाली, सुवर्णरेखा, नागीण, भोपळी, बोरशा वगरे वगरे. आमच्या डाएटमध्ये बसण्याजोगा तर तू नक्कीच आहेस. कारण तुझ्यात ए, बी, सी व्हिटॅमिन्स नि फायबर आहे. लो फॅट, सॅच्युरेटेड फॅट-फ्री, अत्यंत कमी प्रमाणातला सोडियम आणि कोलेस्टेरॉल फ्री हा तुझा यूएसपी आहे. जूनमध्ये आपली ताटातूट झाली तरीही तू आमच्यासोबत असतोच. कारण नंतर तू लोणचं, मुरांबे, पन्हं, आमचूर पावडर, आंबापोळी, मिठाई, जॅम अशा ढेरसाऱ्या पदार्थाच्या स्वरूपात मिळतोसच.. अरे माझ्या एका मत्रिणीला तर तू एवढा आवडतोस की, ती तुझ्या मोसमात ‘..कोकणचा राजा झिम्मा खेळतो’, ‘नाच रे मोरा ..’, ‘वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे.. माझिया प्रियेचे झोपडे’ अशी ‘आंबागाणी’ आलटूनपालटून टय़ूून म्हणून ठेवते..
.. अरेरे.. नेट कनेक्शन गेलं बहुधा.. ओ..नो.. मँगो, माय फ्रेण्ड फॉरएव्हर.. लव्ह यू..
‘फ्रेण्ड, नेट कनेक्शन गेलेलं नाहीये.. मीच ऑफलाइन झालोय. अरे, तुमचं आंबाप्रेम पाहून मला अगदी भरून आलंय बघ.. आता हे सगळं सांगून त्या कोकिळेची कशी जिरवतो बघ. खूप मिजास करत होती. सॉरी यार, माझ्या ऑफलाइन होण्याबद्दल.. एक ब्रेकिं्रग न्यूज.. मी तर येतोय थेट तुझ्या घरीच.. सॉलिड पिवळाधम्मक होऊन.. बाहेरच्या टळटळीत उन्हाशी कडक मी मॅच नको का व्हायला?.. गावाहून निघालोय कधीचाच.. मित्रा, लेका, पिवळाधम्मक सीझन संपत आलाय.. टेक केअर..’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा