विस्तीर्ण नभाच्या पल्याड काळेकुट्ट ढग जमा झालेत.. अन् काही चुकार-मुकार जलिबदू उधळताहेत.. काजळ भरलेले तिचे डोळे वाट पाहतायत.. त्याच्या बरसण्याची. अन् सोबतीलाच त्याच्या येण्याची.. त्याचं अस्तित्वही कारण त्या मेघांसारखच झालंय.. कधी अचानक भरून येणारं.. आनंदाची चाहूल देणारं.. तर कधी शोधताही येणार नाही अशा ठिकाणी लपून बसणारं..
आज तशी ती घरातही एकटीच.. तिच्या गॅलरीत निवांत बसलेली.. पण तिच्या त्या निवांतपणाच्या पल्याडही तिला अस्वस्थ करणारी तिची ती बेचनी.. त्याची सांगड ती घालू पाहतेय.. पण कुठं जमतंय तिला ते.. कारण सांगड घालण्यासाठी सोबत कुणी तरी हवं.. ते ‘कुणीतरी’ कुठंय तिच्यासोबत.. मग मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या अनेक व्यक्तींचा अन् क्षणांचा शोध सुरू केलं तिनं.. मरिन ड्राइव्हच्या रस्त्यावरून भर्रकन जाणाऱ्या गाडीप्रमाणे तिच्या डोळ्यांसमोरून अनेक क्षण तरळून जातायत.. पण हातात मात्र एकही सापडत नाहीये!
भानावर येऊन तिनं आताच आभाळाकडं पाहिलं.. कारण एव्हाना तिच्यावर पडणारं सांयकाळचं कोवळं ऊन कुणीतरी लपवून टाकावं तसं वातावरण तयार झालंय.. तिला अजिबात न आवडणारं मळभ.. पुन्हा एकदा आकाशात दाटलंय.. पण आज का कुणास ठाऊक, पण त्या आभाळाशीच एक अनोखं अद्वैत साधावं असं वाटतंय तिला.. कारण तिच्याही मनात तसं पाहायला गेलं तर मळभच दाटलंय.. त्याच्या आठवणींचं!!
लहानपणी पाऊस अजिबात आवडायचा नाही तिला.. तसं तो आजही नाही आवडत.. पावसाची ती चिपचिप, तो चिखल, ऐन कामाच्या वेळीच त्याचं ते बरसणं.. ट्रेनचं बिघडलेलं वेळापत्रक.. या साऱ्यामुळेच पावसाबद्दल तिच्या मनात एक अढी दाटून राहिलेली.. पण या वेळी मात्र तो काहीसा वेगळ्याच पद्धतीनं खुणावतोय तिला.. त्याच्या त्या गहिऱ्या रूपाचं एक खोलवर रुजलेलं आश्वासन देतोय.. तिच्या सख्याच्या भेटीचं.. कारण त्याची भेट ती या पावसापाठोपाठच कुठूनतरी होणार याची पक्की खूणगाठ तिनं गेल्या कित्येक दिवसांत, कित्येक महिन्यांत मनाशी बांधून ठेवलीये.. म्हणूनच वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीसरशी अंगावर येणारा शहारा तिला सांगतोय, “टल्ल२ल्ल ्र२ ूं’’्रल्लॠ ८४.!!!” आणि म्हणूनच या पावसात त्याच्याशी गट्टी करण्याचं तिनं मनाशी पक्कं ठरवलंय!
कारण तिच्याच्यानं सारं अनावर झालंय आता.. त्याची आठवण, त्याचा सहवास, तिच्या भोवतालचा त्याचा वावर, त्याचं अस्तित्व.. सारं- सारंच! चिमुरडय़ा बालकानं पहिलाच पाऊस पाहताना त्याच्या मनात उमटणारे निरागस भाव जसे असतात नं, तसेच काहीसे भाव तिच्याही मन:पटलांवर अनामिक तारण उमटवतायत.. पहिला-वहिलाच पाऊस पाहिल्याप्रमाणे पावसाला साद घालू पाहतायत.. अन् त्या पाठोपाठच अगदी ‘त्याला’सुद्धा..!
पावसाची एवढी रूपं तिने पाहिलेली.. पण तरीही.. या वेळेचा पाऊस.. अन् तिचे त्याच्याशी जुळलेले ते बंध.. पार वेड लावून टाकतायत तिला.. मोहरवून टाकतायत. बेभान करून सोडतायत. त्याच्या त्या मादक सरींची खुणावणारी उत्कंठा, तिला त्याच्या आठवणींत चेहऱ्यावर एक गोड हसू उमटवून जातेय..
आता पुरे झालं.. बस्स झाला हा लपाछपीचा खेळ असं म्हणत तिनं सरळ-सरळ साद घातलीये त्याला.. अन् त्यानंही ‘ओ’ दिलीय.. हलकेच.. थंडगार वाऱ्यासरशी होणारी त्याच्या आगमनाची ती चाहूल.. त्याचं बरसण्यापूर्वीचा तो गडगडाट तर तिला ‘त्याच्या’ जवळ असण्याची खूण अगदी अलगद पटवून देतोय.. ती उठून उभी राहिलीये.. सलज्ज.. त्याच्या सरींचा स्पर्श थेट मनाला करून देण्यासाठी.. मुक्तपणे.. तिचा लांबलेला तळहात अन् त्यावर अनाहूतपणे पडलेले पावसाचे ते ‘दोन थेंब’! शांत करू पाहतायत तिला.. मागाहून येणाऱ्या असंख्य सरी तिला त्यांच्यात मिसळवून टाकतायत.. हलकेच!
शांत झालीये ती.. अगदी ग्लांत.. निवांत.. इतके दिवस होणारी मनाची तगमग आता अखेर शमलीये.. संपलीये.. क्षणात सुटलेला तो मादक मृदगंध तिला अधिकच चेतावतोय.. आश्वस्त वाटतंय तिला अगदी त्याच्या त्या टपोऱ्या थेंबांत! त्याच्या त्या स्निग्धाळ रूपानं खुललीये ती.. एखाद्या कळीप्रमाणे.. ‘काहीही झालं तरी तू माझ्यासोबत राहशील ना?’ हा इतके दिवस सतावणारा प्रश्न तिनं पावसाच्याच त्या गहिऱ्या रूपाला विचारून टाकलाय.. अन् उत्तरही मिळालंय तिला.. त्याच्याच आश्वस्त रूपातून.. अन् रिक्त झालीये ती आता.. पूर्णपणे रिक्त.. तिच्या ‘त्याला’ नव्यानं स्वीकारण्यासाठी सज्ज झालीये.. अन् नेमका याच वेळी तिच्या मोबाइलवर दीर्घ काळानंतर आलेला ‘त्याचा’ मेसेज-  “Hey dear. Monsoon is calling us!! Are you coming with me at Marine Drive?”

Story img Loader