निवडणुकांचा पहिला टप्पा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशातील वातावरण अगदी निवडणूकमय झाले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि कट्टय़ापासून सोशल नेटवर्किंगपर्यंत केवळ राजकारणाचीच चर्चा आहे. बरं ही चर्चा केवळ अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्यांमध्ये रंगलीय असं नाही. तर यंदा पहिल्यांदाच जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशात मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईनेही मतपेटीतून व्यक्त होण्याचा निर्धार केला आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांना कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात? त्यांना या राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटते? ते कोणत्या तत्त्वांच्या आधारे आपलं पहिलंवहिलं मत देणार आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांवर तरुणाई मोकळेपणाने व्यक्त होताना दिसते आहे. विशेष म्हणजे आपल्या एका मताने फरक पडणार यावर तरुणाईचा विश्वास आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांशी ‘व्हिवा’ने खास संवाद साधला. यात अगदी मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, ठाणे, गुहागर अशा वेगवेगळ्या शहरांमधील वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाईचा समावेश आहे. आपल्या पहिल्या मतदानासाठी ही मुले खूपच उत्साही असल्याचे त्यांच्या बोलण्यातूनच जाणवते.

मतदान ओळखपत्र आल्यापासून जबाबदारी वाढल्यासारखी वाटत असल्याचे मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणारी दीक्षा देसाई सांगते. तर दुसरीकडे बोटाला लावलेली शाई कधी एकदा बघतोय असं मला झालं असल्याचं गुहागरचा गौरव वैद्य सांगतो. अनेकांनी आपण पहिलं मत देण्यासाठी खूप जास्त ‘एक्सायटेड’ असल्याचं सांगितलं. मात्र मुंबईतील माहीममध्ये राहणारा सच्चित जोशी, ‘मी पहिल्या मतदानासाठी अजिबात एक्सायटेड नाही,’ असं सांगतो. यामागील नक्की कारण ठाऊक नाही, पण उत्साह वाटत नसल्याचे तो म्हणतो. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांपैकी बहुतेक सर्वच जण याबद्दल खूप जास्त उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशी उत्सुकता असली तरी पूर्ण भान ठेवूनच ही तरुण मंडळी मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं सांगतात. अवघ्या काही मतांनी उमेदवार पडताना दिसतात, त्यामुळे आमच्या एका मताने काय फरक पडतो? असा उलट प्रश्न न विचारता होय, माझ्या एका मताने फरक पडणार असल्याने मी आवर्जून मतदान करणार, असं अनेकोंनी सांगितलं. एक मत आपण म्हणतो पण थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे नक्कीच फरक पडेल, असा विश्वास २० वर्षीय मुंबईकर असणारी गौरी फणसे व्यक्त करते. गौरीच्याच म्हणण्याशी सहमती दर्शवणारे मत रत्नागिरीच्या ऋषीकेश वैद्यचे आहे. ऋषीकेश म्हणतो, ‘माझंच काय प्रत्येकाचं एकेक मत निश्चितच प्रभावी ठरेल यात शंका नाही.’ एका मताने काय फरक पडणार असं विचारल्यावर नाशिकचा वेदांग जोशी ‘अर्थात, एका मताने उमेदवार निवडून येऊ  शकतो किंवा पडू शकतो,’ असं विश्वासाने सांगतो. ‘एका मताने फरक पडेल असा विचार करणारे माझ्यासारखे खूप असतील, त्यामुळे एक एक करत या मतांनी बराच फरक पडेल,’ असा विश्वास रत्नागिरीच्या सार्थक घाणेकरने व्यक्त केला.

देशाची सुरक्षा, भारताचे हित या मुद्दय़ांवर सार्थकचे मत कोणाला हे ठरणार आहे, तर वेदांगसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्थिर सरकार निवडून देण्याला मतदान करताना प्राधान्य असणार आहे. सकारात्मक आणि नकारात्मक अशा सर्वच गोष्टी लक्षात घेऊन मत कोणाला द्यायचे हे ठरवले पाहिजे, असं ऋषीकेश म्हणतो. तर मुंबईकर सच्चितला शिक्षण, परदेश नीती आणि भ्रष्टाचार हे विषय मत देताना महत्त्वाचे ठरणार असल्याचे वाटते. गौरी मात्र आपले मत देताना उमेदवार कोण आहे, त्याने किती काम केलं आहे, निवडून आल्यावर त्या व्यक्तीकडे बदल घडवण्याची क्षमता आहे का? ती कोणत्या पक्षातून उभी राहणार आहे, हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन आपले पहिले मत देणार असल्याचे सांगते. दीक्षाच्या मते जाहीरनामा हा मत देताना महत्त्वाचा फॅ क्टर ठरेल, तर पुण्याची हर्षदा खालदकर आता उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराने भूतकाळात किती कामे केली आहेत आणि ती लोकांच्या किती उपयोगी आली आहेत याचा विचार करूनच मत देणार असल्याचं सांगते.

आपलं पहिलंच मतदान असल्याने डोक्यातील विचारचक्रांना योग्य दिशा देण्यासाठी तरुणाई घरच्यांची मदत घेताना दिसते आहे. बहुतांश जणांनी आपण घरी आईबाबांशी तसेच भाऊ-बहिणीशी राजकारणावर घरात चर्चा करत असल्याचे सांगितले. अनेकांनी आईबाबांच्या विचारांचा प्रभाव अपल्यावर असल्याचे सांगितले. आईबाबांचे विचार नेमके काय आहेत, एखाद्या उमेदवाराबद्दल त्यांना काय वाटतं हे गौरवला जाणून घ्यायला आवडतं. ‘घरात चर्चा होते आणि साधारणपणे घरातल्या चर्चेतही परिसरातले मुद्दे असतात. पण लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान ठरवला जातो त्याचाही विचार आम्ही घरातील चर्चेदरम्यान करतो’, असं ऋषीकेश म्हणाला. वेदांग मात्र घरच्यांशी मतदानाचे महत्त्व काय आहे, याबद्दल चर्चा करत असल्याचं सांगतो. ज्यांना तिकीट मिळालंय त्यांनी आधी काय काम केलं आहे. त्यांची पाश्र्वभूमी काय आहे, याची माहिती मला घरात आईबाबांबरोबर होणाऱ्या चर्चेतूनच मिळते, अशी प्रांजळ कबुली हर्षदा देते. तर रत्नागिरीच्या सार्थक आणि मुंबईच्या सच्चितप्रमाणेच काही जण आईबाबांशी राजकीय चर्चा करणे टाळतानाही दिसतात.

एकीकडे हल्ली व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, फेसबुकवर निवडणुकांबद्दल चर्चांना उधाण आलेले असतानाच पहिल्यांदाच मत देणारी ही मुलं थोडय़ाफार प्रमाणात या माध्यमांचा उपयोग राजकीय चर्चेसाठी करताना दिसतात. प्रामुख्याने राजकीय परिस्थिती समजून घेण्याच्या वयात असल्याने ठामपणे आपली मतं अशी उघडपणे मांडण्याऐवजी राजकीय परिस्थिती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्याकडे या तरुणांचा कल असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. हर्षदा अशा चर्चा मुद्दाम टाळत असल्याचे सांगते. ‘अनेकदा लोकांची मतं वेगळी असल्याने वाद होतात. त्यामुळे मत बाजूला राहते आणि केवळ टाइमपास होतो’, असं मत हर्षदाने व्यक्त केलं. तर दुसरीकडे ऋषीकेश मात्र अशा चर्चा होतात असं सांगतो. ‘आज या व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकवर होणाऱ्या चर्चा बऱ्याच प्रमाणात निवडणुकांवर प्रभाव पाडतात, असं माझं किमान वर्षभराच्या निरीक्षणानंतरचं वैयक्तिक मत आहे’, असं ऋषीकेशने सांगितलं.

आपल्या मतदारसंघातील उमेदवारांबद्दल काही जणांना सर्व माहिती आहे, काहींना वरवर माहिती आहे, तर काहींनी ठरावीक उमेदवारांचीच माहिती जाणून घेतली असल्याचंही दिसतं. ‘माझे मत महत्त्वाचे असल्याचे मला वाटते, म्हणूनच मतदानाला जाण्यापूर्वी मी सगळ्या उमेदवारांची माहिती एकदा वाचून जाणार आहे’, असं मत मुंबईकर गौरीने व्यक्त केलं. तर मतदारसंघात उमेदवार कसा आहे. त्याची विचारधारा काय, पक्षांतर आहे की नाही, उमेदवारांची प्रतिमा याबद्दल पण पूर्ण माहिती आहे आणि पहिल्यांदा मतदान करताना किमान इतकी माहिती तर मला नक्कीच असल्याचे ऋषीकेश सांगतो. तर मालवणच्या योगेश परबच्या मते उमेदवारांची माहिती मिळवणे तेवढे आवश्यक नाही. सध्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे गरजेचे आहे, कारण पूर्ण बहुमत ही एक शक्ती असते, ज्यामुळे देशाच्या राजकारणाला बळ मिळते, असं तो म्हणतो.

एकीकडे बेरोजगारीवरून राजकारण पेटलेलं असतानाच तरुणाईला बेरोजगारी हा सध्या देशासमोरच्या सर्वात मोठय़ा प्रश्नांपैकी एक असल्याचे वाटतेय. मत नोंदवणाऱ्या सर्वानीच बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे, यावर सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी नाशिकच्या वेदांगला मात्र बेरोजगारीपेक्षा कुशल शिक्षणाची कमी ही सर्वात मोठी समस्या वाटते. तर उद्योजकतेला प्रोत्साहन द्यायला हवं, असं मत ऋषीकेशने नोंदवलं आहे.

पहिल्यांदाच मतदान करताना निवडणुकांबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी तरुणाईचा मुख्य स्रोत हा इंटरनेट असल्याचेच दिसून येते आहे. यामध्ये अगदी फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल साइट्सपासून ते यू-टय़ुब चॅनेल, ब्लॉग्स, ई-पेपर, बातम्यांच्या वेबसाइट यांचा समावेश होतो. सहज उपलब्ध असणाऱ्या इंटरनेटच्या काळातही विश्वासार्हता टिकवून असणारी वृत्तपत्रेच आजही राजकीय बातम्यांचे स्रोत असल्याचे मतही तरुणांनी व्यक्त केले आहे. याशिवाय वृत्तवाहिन्यांवरील चर्चामुळेही बातम्या समजत असल्याचे काही जणांनी सांगितले.

पहिल्यांदा मत देणाऱ्या तरुणाईसाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण ठरतोय. सर्वच पक्षांनी शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष के ल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. कोणताही पक्ष शिक्षणाविषयी धोरणात्मक पद्धतीने विचार करताना दिसत नाही, असं वेदांग सांगतो. तर शिक्षणाबद्दल कोणत्याच पक्षाचे काही ठाम मतच नाहीय असं हर्षदाला वाटतं. शिक्षणाबद्दल घेतलेले निर्णय किती योग्य पद्धतीने अमलात आणले जातात, याकडे कोणाचेच लक्ष नसते, अशी खंतही तिने बोलून दाखवली आहे.

कोणताच उमेदवार योग्य वाटत नसल्यास नोटाचा पर्याय वापरण्याची कोणाचीही इच्छा नसल्याचे दिसून आले. आपले पहिले मत नोटा म्हणून देण्यास तरुणांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे उमेदवारांची जितकी माहिती आहे तितक्या माहितीच्या आधारे मत दिले तरी ते नोटाला देणार नाही असंच तरुणांचं म्हणणं आहे. एकंदरीतच सांगायचे झाल्यास तरुणाईने आपल्या एका मताने फरक पडतो या मताशी सहमती दर्शवत आपल्या मताच्या माध्यमातून देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसतेय असंच म्हणावं लागेल.

पहिल्या मताची किंमत

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार यंदाच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांच्या मतांमुळे २९ राज्यांमध्ये २०१४ साली अगदी थोडय़ाफार फरकाने जिंकलेल्या २८२ जागांच्या निकालांवर मोठा परिणाम होणार आहे. यापैकी १२ जागा या महाराष्ट्रातील आहेत हेही विशेषच. १९९७ ते २००१ दरम्यान जन्मलेल्यांना २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करता आले नव्हते. मात्र या काळात जन्मलेले आणि आयोगाकडे नोंद असणारे आठ कोटी १० लाख तरुण यावर्षी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी एक कोटी १० लाख तरुण हे महाराष्ट्रातील आहेत. देशाचा विचार केल्यास यंदा प्रत्येक मतदारसंघातून अंदाजे एक लाख ४९ हजार मतदार हे पहिल्यांदा मतदान करणारे तरुण असतील.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi article in loksatta viva