|| स्वप्निल घंगाळे, गायत्री हसबनीस

यंदा समाजमाध्यमांवर ताकदीचे बदल झाले आहेत आणि त्यामुळेच तरूणांपर्यंत समाजमाध्यमांतून पोहोचण्याच्या कृतीवर सगळ्याच पक्षांकडून जोर देण्यात येतो आहे.

येत्या ११ एप्रिलपासून निवडणूकांना एक वेगळाच जोर मिळणार आहे त्यामुळे सध्या प्रचाराचा वेग कायम आहे. प्रचाराची वेळही संपत आली असताना याबद्दल आता तेवढय़ाच ताकदीने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी समाज माध्यमांचा आधार घेतला जातो आहे. यंदा निवडणूकीच्या काळात तरुणाईसाठी शिक्षण, रोजगार आणि स्किल डेव्हलपमेंट यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाज माध्यमांवरून सत्ताधारी पक्ष मेहनत घेताना दिसतो आहे. या निमित्ताने आपल्या भविष्यातील प्रगती आणि सोयीसुविधांसाठी तरुणांनी समाज माध्यमांचाच आधार ‘वोट’ करताना ते कोणाला द्यावे याच्या चाचपणीसाठी घेतला आहे. त्यामुळे तरुणांच्या समस्या जाणून त्यांचे प्रश्न समजून घेत आणि ते सोडवण्याची हमी देत तरुणांनाच कसे या व्यवस्थेत सहभागी करून घेतलं जातं हे यंदाच्या समाज माध्यमांवर दिसत असलेल्या विविध बदलांवरून समजून येतं आहे. तरुणाई ही मोठय़ा प्रमाणात ऑनलाइन आणि ऑफलाईन सक्रिय होते आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यंदा समाजमाध्यमांवर ताकदीचे बदल झाले आहेत आणि त्यामुळेच तरुणांपर्यंत समाजमाध्यमांतून पोहोचण्याच्या कृतीवर सगळ्याच पक्षांकडून जोर देण्यात येतो आहे. प्रचाराच्या दिवसात समाज माध्यमांवर बऱ्याच तरुण नेत्यांची भाषणं, चर्चासत्रं, प्रचार हे लाईव्ह दाखवले जात आहेत. त्यामुळे फेसबुक वापरणाऱ्या सत्तर टक्के तरुण मुलांमुलांना ती भाषणं, चर्चासत्रं घरबसल्या लाईव्ह पाहता येत आहेत. ही निवडणूक सोशल नेटवर्किंगवरही लढवली जाईल, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यातही तरुणांच्या आवडत्या समाजमाध्यमांवर या निवडणुकींचे संपूर्ण प्रतिबिंब दिसेल हेही स्पष्टच होते. मात्र ज्याप्रमाणे निवडणुकींचे गारुड जोर धरु लागले आहे त्यानुसार दिवसोंदिवस या ऑनलाइन कट्टय़ांवर होणाऱ्या चर्चांना जोर आला आहे. आज वर्तमानपत्रे किंवा टीव्हीवरील चर्चासत्रांपेक्षा समाज माध्यमांवरील माहितीच्या आधारे तरुण मुले आपले मत बनवताना दिसत असून याच आधारावर ते मतदान करणार असल्याचे चित्र सध्या दिसते आहे.

फेसबुकने काही दिवसांपूर्वीच दोन बडय़ा पक्षांच्या समर्थनार्थ चालवली जाणारी काही पेजेस बंद केली. अमेरिकन निवडणूकांच्या निकालांवर फेसबुकसारख्या समाज माध्यमांचा प्रभाव पडल्याचे आरोप झाल्यानंतर फेसबुकनेही निवडणुकांच्या काळामध्ये अधिक सतर्क रहात लोकशाही पद्धतीने निवडणूका लढवण्यासाठी कंपनी संपूर्ण सहकार्य करेल, असे आधीच स्पष्ट केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून फेसबुकने ही पेजेस बंद केल्याची चर्चा आहे. असे असले तरी बडे पक्ष आणि नेत्यांच्या सशुल्क जाहिराती फेसबुकवर पहायला मिळतात. फेसबुकवरील कठोर झालेले नियम आणि या माध्यमाचे गांभीर्य इतर माध्यमांपेक्षा काही प्रमाणात कमी झाल्यासारखे चित्र दिसत असल्याने सर्वच पक्षांनी आपला मोर्चा फेसबुकबरोबरच मुख्यत्वे ट्विटर, इन्टाग्राम, टिकटॉक आणि युटय़ूबकडे वळवला आहे. तरुणांपर्यंत त्यांच्या आवडत्या माध्यमातून पोहचण्यासाठी राजकारणीही अपडेट होताना दिसत आहेत. असे असेल तरी जगातील सर्वात लोकप्रिय समाज माध्यम असणाऱ्या फेसबुकवरच निवडणूकां संदर्भात सर्वाधिक चर्चा रंगल्याचे सहज दिसून येते.

फेसबुकवर अनेक स्थानिक पक्षांची पेजेस तर आहेतच, मात्र येथे मुख्य सामना आहे भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असा. मोदी समर्थक असो किंवा काँग्रेस समर्थक; अनेकजण आपल्या आवडीच्या पक्षाला समाज माध्यमांवर पाठिंबा देताना दिसत आहेत. अनेक फेसबुक पेजेसवर विविध वयोगटातील तरुण आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांना समर्थन देताना दिसत आहेत. अशाच एका पेजवर मोदींच्या समर्थनार्थ अगदी रॅप सॉन्गही तयार केलं गेलं आहे. हा व्हिडिओ भाजपनेच युटय़ूबवर ८ एप्रिलला पोस्ट केला. ‘माय फर्स्ट वोट टू द वन, वन अ‍ॅन्ड ओन्ली वन हू हॅझ गॉट एव्हरीथिंग’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या माध्यमातून सरकारने केलेल्या कामांचा पाढाच या तरुणांनी वाचून दाखवला आहे. यात अगदी डिजिटल इंडिया, एल.पी.जी. सबसिडी, होम लोन, तूरडाळीचे भाव, सोलार पावर वगैरे विषयांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात म्हणजे १३ फेब्रुवारीला ‘बंदा अपना सही हैं’ हे रॅप सॉन्गही भाजपने पोस्ट केले होते. या व्हिडीओत मोदींच्या कारकिर्दीची झलक दाखवण्यात आली होती. याच दरम्यान ‘अपना मोदी आएगा’ नामक रॅप व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून # NaMoagain2019 हा हॅशटॅगही समाज माध्यमांवर चांगलाच चर्चेत असल्याचे दिसते आहे.

या सगळ्याला उत्तर देण्यासाठी काँग्रसनेही आपल्या नेत्यांचा प्रचार समाज माध्यमांवरुन जोरात सुरु ठेवला आहे. विरोधी पक्षांच्या चुका शोधण्यापासून ते आपल्या नेत्यांनी तरुणांशी साधलेला संवाद असं सर्वकाही या अकाऊ ण्टवरुन शेअर होताना दिसतं आहे. अनेक पक्षांनी तरुणांना स्वयंसेवक म्हणून पक्षाच्या कार्यात सामावून घेतान त्यांच्याकडून डिजिटल किंवा प्रत्यक्ष फॉर्म भरून घेतले आहेत. या फॉर्ममध्येही तरुणांशी समाज माध्यमांवरुन संवाद साधण्याचा प्रयत्न पक्षांकडून केला जातो आहे. हे सर्व रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना तरुणांना फेसबुक आणि ट्विटर आयडी देणे अनिवार्य असते. तरुणांना समाज माध्यमांवर बोलतं करण्यासाठी दोन्ही पक्ष कुरघोडी करताना दिसत आहेत. ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ या नावाच्या फेसबुक पेजवर रोज अनेक विषयांवर चर्चा होतात. # NamoYuva या हॅशटॅगच्या माध्यमातून तरुणांमध्ये पंतप्रधान आणि त्यांच्या कामासंदर्भात सकारात्मक मत तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी मोदींविरुद्ध ‘प्रधानमंत्री हिसाब दो’ ही वेबसिरिज युटय़ूबवर पोस्ट केली आहे. या वेबसिरिजच्या माध्यमातून पर्यटन, मुलींचे शिक्षण, रोजगार अशा अनेक प्रश्नांवरुन सरकारने काय काम केले याचा जाब विचारण्यात आला आहे. ऑनलाइन प्रचारावर जोर असला तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वेगवेगळ्या शहरांमध्ये महाविद्यालयीन तरुणांना भेटून त्यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. ‘हम निभांऐंगें’,  ‘अब होगा न्याय’ अशी काही प्रचारसूत्रं तरुणांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने काँग्रेसकडून हाती घेण्यात आली आहेत.

समाज माध्यम हे उत्स्फुर्तपणे प्रकट होण्याचे माध्यम असल्याने इमोजीचा उपयोगही मोठय़ा प्रमाणात होताना दिसतो आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामने बोटावरील शाईच्या इमोजीची संकल्पना आणली आहे. ट्विटरने पार्लमेंट इमोजीदेखील आणले आहे. #देशकामहात्यौहार #लोकसभाइलेक्शन्स२०१९ या हॅशटॅगद्वारे सर्व भाषांमध्ये ट्विटर इंडियाने ट्विट करण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. ट्विटरवर सर्वात जास्त तरुण मंडळी असल्याने आणि जास्त प्रमाणात तरुण हे राजकीय नेत्यांना फॉलो करत असल्याने यंदा ट्विटरवरून तरुणांनी निवडणूक आणि त्यासंदर्भातील चर्चामध्ये सहभागी व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरही विविध मेसेजेसद्वारे प्रचाराच्या मार्गांना गती मिळाली आहे. फेसबुकने ‘२०१९ इलेक्शन्स’ असे फीचर लॉन्च केलं आहे. ज्यात विविध राज्यांतील गावागावांतून निवडणूकीला उभे राहिलेले उमेदवार आपला प्रचार आणि माहिती व्हिडिओद्वारे इथे पोस्ट करू शकतात. काही उमेदवारांनी आपले व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यातून एक वेगळं संख्याबळ निर्माण होईल. याशिवाय ‘भाडिपा’सारखे लोकप्रिय ग्रुप्सही ‘विषय खोल’ सारक्या कार्यक्रमातून #लोकमंचच्या माध्यमातून तरुणांच्या मनातील प्रश्न थेट नेत्यांना तरुणांसमोरच विचारताना दिसत आहेत. आत्तापर्यंत ‘लोकमंच’च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तरुणांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला आहे.

समाज माध्यमांशी असलेलं तरुणाईचं घट्ट नातं लक्षात घेत निवडणूक-मतदान यासंदर्भातील विचार मंथन याच माध्यमातून करण्याचा सर्वाचा सर्वतोपरी प्रयत्न एक वेगळेच समीकरण घडवणारा ठरतोय यात शंका नाही. या माध्यमातून एकीकडे तरुणाई नेत्यांबाबत आणि त्यांच्याशी थेट व्यक्त होते आहे. त्याचप्रमाणे नेत्यांनीही कुठलाही आडपडदा न ठेवता थेट तरुणांना आवाहन केले आहे. पहिल्यांदाच ट्रोलिंग पलिकडे जात समाज माध्यमांचा योग्य वापर तरुणाईकडून आणि तरुणाईसाठीही के ला जातो आहे हे महत्वाचे!

अनेक फेसबुक पेजेसवर विविध वयोगटातील तरूण आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांना समर्थन देताना दिसत आहेत. अशाच एका पेजवर मोदींच्या समर्थनार्थ अगदी रॅप सॉन्गही तयार केलं गेलं आहे. हा व्हिडिओ भाजपनेच युटय़ूबवर ८ एप्रिलला पोस्ट केला. ‘माय फर्स्ट वोट टू द वन, वन अ‍ॅन्ड ओन्ली वन हू हॅझ गॉट एव्हरीथिंग’ असे या गाण्याचे बोल आहेत.

viva@expressindia.com