|| वेदवती चिपळूणकर

‘कुशल मंगल’ असं स्टेज-नेम घेतलेल्या कुशलने वयाच्या पाचव्या वर्षांपासून कीबोर्ड वादनाचं शिक्षण घेतलं आहे. प्रोफेशनली पहिल्यांदा त्याने फिनिक्स मॉलमध्ये पियानो वाजवला. त्याबद्दल बोलताना कुशल म्हणाला, ‘‘आमच्या पर्युषणच्या वेळी रोज काही ना काही कार्यक्रम असतात. त्यावेळी तिथे परस्पर कोणीतरी माझं नाव सुचवलं आणि तिथे मी पहिल्यांदा परफॉर्म केलं. त्यानंतर फिनिक्स मॉलमधून बाहेर पडताना एकदा मी तिथल्या पियानिस्टना विचारलं की मी वाजवू का? पहिल्यांदा त्यांनी नकार दिला. तेव्हा मीही आग्रह केला नाही. काही दिवसांनी मी पुन्हा फिनिक्सला गेलेलो तेव्हा त्यांना पुन्हा विचारलं. त्यावेळी त्यांनी एकदा वाजवून बघायला परवानगी दिली. त्यावेळी मी वाजवलेला पियानो त्यांना एवढा आवडला की त्यांनी मला सांगितलं की जेव्हा ते येऊ  शकणार नाहीत तेव्हा मी मॉलमध्ये त्यांच्याऐवजी परफॉर्म करू शकतो. माझ्यासाठी ती परिस्थिती म्हणजे विन-विन सिच्युएशन होती. मला पियानो वाजवण्याची संधीही मिळणार होती आणि त्याबद्दल पेमेंटसुद्धा! त्यामुळे मी अगदी सहज हो म्हटलं. पहिल्यांदा ते नसताना मी सलग ४ तास पियानो वाजवला. तिथून माझी कला पहिल्यांदा लोकांसमोर आली.’’

संगीताच्या क्षेत्रात करिअर करायचा निर्णय त्याने घेतला तेव्हा त्याच्या आई-बाबांनी त्याला प्रोत्साहनच दिलं. मात्र जे करशील ते उत्तम असू दे याबद्दल मात्र ते आग्रही होते. आई-बाबांच्या सपोर्टबद्दल उत्साहाने बोलताना कुशल म्हणतो, ‘‘त्यांच्या सपोर्टशिवाय माझ्या मनासारखं करिअर निवडणं मला शक्य झालं नसतं. इतक्या लहान वयापासून मला कीबोर्ड शिकायला त्यांनीच पाठवलं. पुढे जेव्हा कॉलेजमध्ये असताना मी अनेक गोष्टी करत होतो तेव्हा मात्र आईने मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आणि त्याबाबतीत निर्णय घ्यायला प्रवृत्त केलं. आयुष्यभर नक्की काय करायचं आहे, पुढचे प्लॅन्स नक्की काय आहेत या सगळ्याबद्दल तिने मला विचार करायला भाग पाडलं. भविष्याबद्दल काहीतरी ठोस निर्णय घेणं आणि त्यानुसार पावलं उचलणं महत्त्वाचं होतं. कॉलेजमध्ये म्हणजे तेवढा मोठा मी नक्कीच होतो जेव्हा हा निर्णय मी घेऊ  शकत होतो. आईच्या आणि माझ्या या संवादाने माझा निर्णय पक्का झाला. तेव्हा विचार एवढाच केला की आयुष्यभर काय करायला आवडेल तेच निवडायचं आणि माझ्या निवडीला आई-बाबांनी सपोर्ट केला.’’

आपल्या कुटुंबपद्धतीत केवळ आपले आई-बाबा नव्हे तर इतरही सगळे नातेवाईक आणि त्यांची मतं ही बरोबरीने महत्त्वाची ठरतात. अशा वेळी निर्णय घेताना तो एकटय़ाचा असत नाही तर त्यात संपूर्ण कुटुंबाची मतं विचारात घेतली जातात. संपूर्ण कुटुंब कोणत्या ना कोणत्या व्यवसायात असताना, कुटुंबात व्यवसायाची परंपरा असताना आणि कोणालाही म्युझिकची पाश्र्वभूमी नसताना कुटुंबातल्या एका मुलाने थेट परफॉìमग आर्ट्सकडे वळावं आणि त्यालाच आपलं प्रोफेशन म्हणून निवडावं ही गोष्ट सगळ्याच कुटुंबीयांना सहज पचण्यासारखी नक्कीच नव्हती. मात्र कुशलला आत्मविश्वास होता आणि त्याच्या आई-बाबांचा त्याला संपूर्ण पाठिंबा! त्याचं वाढतं यश बघून सर्वानाच त्याच्यातल्या कलाप्रेमाची आणि संगीतप्रेमाची खात्री पटली आणि सगळ्यांनीच त्याची वाहवा केली. ‘‘आपण प्रयत्नच केला नाही तर आपल्याला जमतंय की नाही हे कधी कळणारच नाही,’’ असं तो म्हणतो. ‘‘कॉलेजमध्ये विषय निवडतानासुद्धा मी काहीही विचार न करता केवळ विषयाचं नाव आवडलं म्हणून बघू या तर काय आहेत अशा विचाराने विषय घेतले होते. शिकून बघितले, आवडले आणि त्यातूनच मी माझा मास्टर्सचा विषयही निवडला. पण आधी अभ्यासक्रम बघून वगैरे ठरवलं असतं तर कदाचित सगळेच विषय कठीण वाटले असते आणि कोणताच विषय मी बिनधास्तपणे घेऊ  शकलो नसतो. त्यामुळे ट्राय करून बघणं हे मी ठिकठिकाणी वापरत आलो आहे,’ असंही तो म्हणतो.

बॉलीवूडमध्ये कुशलची एन्ट्री झाली ती शर्ली सेठियासोबत! जेव्हा यूटय़ूब फॅनफेस्ट हा प्रकार भारतात सुरू झाला नव्हता आणि यूटय़ूब भारतात नुकतंच आपलं बस्तान बसवत होतं तेव्हा यूटय़ूबची एक लहानशी पार्टी होती ज्यात शर्ली गाणार होती. तिच्याकडून कुशलला पहिल्यांदा कॉन्सर्टसाठी विचारणा झाली. तिथून कुशलचा बॉलीवूडमधल्या गायक-संगीतकार यांच्यासोबतचा प्रवास सुरू झाला. इतका काळ केवळ बॅण्डमध्ये साथ करणाऱ्या कुशलने आता स्वत:च्या ‘कुशल मंगल’ या यूटय़ूब चॅनेलवरून संपूर्णत: त्याची स्वत:ची असलेली दोन गाणी रिलीज केली आहेत. संगीताच्या क्षेत्रात येण्याच्या निर्णयाबद्दल कुशल खूप थोडकं पण मार्मिक बोलतो, ‘‘या संगीतामुळेच मला अशी नवनवीन माणसं भेटली जी कलाकार म्हणून सगळ्यांना आवडतातच, पण ती माणूस म्हणूनही खूप छान आहेत. पैसे मिळतात, अटेन्शन मिळतं आणि रिस्पेक्टही मिळतो. मात्र सगळ्यात मोठी कोणती गोष्ट मला मिळत असेल ती म्हणजे समाधान! आयुष्यभर श्वास घेतो तसं माझ्यासाठी म्युझिक आहे आणि त्यामुळे त्यातच करिअर करायला मिळणं यामागे जितकं माझं शिक्षण आणि मेहनत आहे तितकाच वाटा माझ्या नशिबाचाही आहे. सपोर्टिव्ह आई-बाबा मिळणं, चांगले गुरू लाभणं आणि वेळोवेळी उत्तम संधी समोर येणं हा नशिबाचाच भाग आहे. मात्र येतील त्या संधींमधून चांगलं शोधत त्या स्वीकारल्या तरच आपण पुढे जाऊ  शकतो.’’

स्वत:चं चॅनेल असणं आणि त्याला मनासारखे व्ह्य़ूज मिळणं हे कोणत्याही यूटय़ूबरचं स्वप्न असतं. कोणत्याही कोलॅबोरेशनशिवाय आणि प्रमोशनशिवाय कुशलचं पहिलं गाणं ‘हिट’ ठरलं. ‘कुशल मंगल’ या नावाने प्रसिद्ध होत असलेल्या या उदयोन्मुख कलाकाराला ऑल द बेस्ट !    – वेदवती चिपळूणकर

आपण सतत काही ना काही गोष्ट घेऊन रडतच राहिलो तर सहानुभूती मिळते, पण पुढे जायचा मार्ग मिळत नाही. तो मार्ग आपल्याला स्वत:लाच शोधावा लागतो. त्यामुळे जे जमणार नाही असं वाटतंय ते कमीत कमी करून तरी बघावं. मात्र आपल्याला जे आवडतंय असं वाटतंय ते खरंच आवडतंय आणि जमतंय का हे तपासून पाहून स्वत:ची खात्री झाल्यावरच पुढे जावं.     – कुशल छेडा

बॉलीवूडचे आताच्या पिढीचे प्रसिद्ध सिंगर-परफॉर्मर असणाऱ्या कित्येक कलाकारांना त्याने साथ केलेली आहे. लाइव्ह शोज, म्युझिक व्हिडीओज, अल्बम्स, यूटय़ूब कव्हर्स अशा सगळ्या प्लॅटफॉम्र्सवर तरुणाईच्या लाडक्या कलाकारांसोबत तो झळकला आहे. शर्ली सेठियाच्या बॅण्डसोबत तो काम करतो. यूटय़ूबवर सबस्क्रायबर्सची तुडुंब गर्दी असलेल्या भुवन बामच्या बॅण्डमध्येही तो कीबोर्ड सांभाळतो. नुकत्याच झालेल्या यूटय़ूब फॅनफेस्टमध्येही त्याने परफॉर्म केलं. वेस्टर्न क्लासिकल पियानो आणि इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड यांच्या ‘ट्रीनिटी कॉलेज ऑफ लंडन’च्या आठव्या, म्हणजे सर्वोच्च ग्रेडच्या परीक्षांमध्ये त्याला डिस्टिन्क्शन आहे. ‘थिअरी ऑफ म्युझिक’ या हटके विषयातही त्याने आठव्या ग्रेडला डिस्टिन्क्शन मिळवलेलं आहे. नुकतीच स्वत:ची दोन स्वतंत्र गाणी यूटय़ूबवर रिलीज करणारा हा तरुण म्युझिशियन आहे कुणाल छेडा.

आपण काहीच करू  शकत नाही हे जेव्हा वाटतं तेव्हाच आपण काही करू  शकण्याच्या सर्व शक्यता आपणच संपवलेल्या असतात. जेव्हा आपण आपल्यातल्या सगळ्या कमतरतांवर मात करून सज्ज असतो तेव्हाच नशीबही आपल्याला साथ देतं.