|| मिताली दामले
आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांविषयी लहानपणापासून कुतूहल वाटायचं. त्यामुळे नववीत मी स्थानिक अॅस्ट्रोनॉमी क्लब आणि खगोलमंडळाची सदस्य झाले. पुढे सेंट झेवियर्स महाविद्यालयातून भौतिकशास्त्राची पदवी घेतली. आमच्या ऑनर्सच्या अभ्यासक्रमातील वैविध्यपूर्ण विषयांपकी अॅस्ट्रोफिजिक्समध्ये अर्थात खगोलशास्त्रात मला अधिक रस वाटला. त्यामुळे मी मुंबई विद्यापीठातून एम. एस.(फिजिक्स) केलं. कारण मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अॅस्ट्रोफिजिक्स हा विषय शिकवला जात नाही. केवळ उस्मानिया विद्यापीठात एम. एस.(अॅस्ट्रोफिजिक्स) आणि पीएचडी आहे. मात्र तिथल्या जागांची संख्या लक्षात घेता चटकन प्रवेश मिळणं सोपं नव्हतं. काही घरगुती अडचणीमुळे मी तीन वर्ष उल्हासनगरच्या सी.एच.एम. या महाविद्यालयात अकरावी, बारावी आणि पहिल्या वर्षांला भौतिकशास्त्र शिकवलं. मला शिकवण्याची आवड असली तरीही त्यातच करिअर करायचं नव्हतं. त्यापेक्षा अॅस्ट्रोफिजिक्स शिकून त्यातच पुढे करिअर करण्याचा पर्याय अधिक योग्य वाटला. या निर्णयाला घरच्यांचा खूपच पािठबा होता. अॅस्ट्रोफिजिक्समध्ये पीएचडीसाठी अर्ज केल्यावर बहुतांशी वेळा विद्यार्थ्यांला खगोलशास्त्राची काही पाश्र्वभूमी आहे का, हे तपासलं जातं. मला तशी पाश्र्वभूमी नव्हती. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठीच्या परीक्षा देण्याएवढा माझ्याकडे वेळ नव्हता आणि तेवढे पसेही मला खर्च करायचे नव्हते. त्यामुळे प्रवेशपरीक्षा आणि भाषेचा प्रश्न नसणाऱ्या युरोपमधील विद्यापीठांतील अभ्यासक्रमांची माहिती धुंडाळली आणि त्यातली काही विद्यापीठं निवडली. तिथले प्राध्यापक, विषयांचं संशोधन आणि माझी आवड आदी गोष्टी पडताळून पाहिल्या.
काही माजी विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संपर्क साधून अधिक माहिती मिळवली. तेव्हा ‘युनिव्हर्सटिी ऑफ पोट्सडाम’मधील अॅस्ट्रॉनॉमीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर्स) चांगला असून त्यात पुढे संधीही मिळू शकते, असं कळलं. या विद्यापीठाखेरीज बॉन आणि हायडेलबर्ग या विद्यापीठांमध्येही मी अर्ज केला होता. पोट्सडाममध्ये अर्जाला मंजुरी मिळाली खरी, पण व्हिसाच्या कामाला बऱ्यापकी उशीर झाला. त्यामुळे आमचं ओरिएंटेशन होऊन गेल्यावर दोन आठवडय़ांनी मी पोहचले. इतकंच नाही तर अभ्यासक्रमही शिकवायला सुरुवात झाली होती. सुदैवाने सहाध्यायांकडून मदतीचा हात मिळाला आणि ऑनलाइन सुविधेमुळे नोट्स वगरे मिळाल्या. भारतात मी जर्मन भाषेची ए १ लेव्हल शिकले होते. तरीही इथे पोहोचल्यानंतर भाषा कळायला थोडीशी अडचण आली. सुरुवातीच्या काळात व्यावहारिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी माझ्या आधी पोहोचलेल्या मित्रमंडळींनी मदत केल्याने स्थिरावायला वेळ मिळाला.
अगदी सुरुवातीला या नवीन वातावरणात आपण कसे काय रमणार?, असं वाटलं होतं. नंतर मात्र दिवस कसे भराभर गेले ते कळलंच नाही.. आता जर्मनीत येऊन दीड वर्ष झालं आहे. विद्यापीठाच्या बडी प्रोग्रॅमअंतर्गत एक सीनियर विद्यार्थी विमानतळावर न्यायला आला होता. त्याने मला घरापर्यंत सोडलं. भारतातून निघताना कायमस्वरूपी राहायची सोय झाली नसल्याने सुरुवातीचे काही दिवस गेस्टहाऊसवर राहिले. त्यानंतर डॉम्रेटरीमध्ये जागा मिळाली. चार जणांच्या शेअिरगमध्ये आवश्यक त्या सगळ्या सोयी पुरवलेल्या आहेत.
वर्गात कितीही विद्यार्थी असले तरी प्राध्यापक मन लावून शिकवतात किंवा परीक्षा घेतात. त्यांना विद्यार्थ्यांच्या संख्येने काही फरक पडत नाही.परीक्षेत पाठांतराला जागाच नाही. प्राध्यापक केवळ पुस्तकांच्या चौकटीतलं शिकवत नाहीत. तर चालू घडामोडी, त्या त्या विषयांशी संबंधित असलेल्या समकालीन प्रसिद्ध होणाऱ्या पेपर्सची चर्चा, कार्यक्रमांचं आयोजन आदी गोष्टी चालू असतात. त्यामुळे आमचा त्या विषयांचा अभ्यास अधिकाधिक पक्का होत जातो. याआधी मीही वर्गात शिकवलेलं असल्यामुळे इथे प्राध्यापक कसं शिकवत आहेत, याकडे कळत-नकळत लक्ष जातं. त्यासंबंधी विचार होतोच. थिअरीवर भर न देता व्यावहारिकतेवर भर दिला जातो. उदाहरणार्थ: ग्रह-ताऱ्यांचं निरीक्षण करताना ते कसं कराल, त्याचं विश्लेषण कसं कराल याचा अधिकाधिक सखोल पद्धतीने विचार आणि अभ्यास करायला शिकवलं जातं.
सुरुवातीला दोन सेमिस्टर्समध्ये असाइन्मेंट आणि प्रेझेंटेशन करायचं होतं. प्रेझेंटेशन करताना मी महाविद्यालयात शिकवत होते, त्या अनुभवाचा खूप फायदा झाला. माहिती सांगता सांगता बोलण्याची एक पद्धत आपसूकच विकसित झाली. आता प्रबंधाचं काम सुरू आहे. आमचे सुपरवाईजर प्राध्यापक डॉ. मार्टनि स्पर्ो शिकवत असलेल्या विषयात मला खूप रस वाटला. या विषयावर प्रबंध लिहायला मला आवडेल, असं मी त्यांना कळवलं. तो विषय होता- गॅलेक्सी स्टिम्युलेशन! आकाशगंगेतील ग्रहतारे खूप वर्षांपूर्वी कसे दिसायचे आणि भविष्यात ते कसे दिसतील, याचे आडाखे या प्रबंधात मांडायचे आहेत.
आमच्या डॉम्रेटरीत भारतीय, मॉरिशियस, अमेरिका, युक्रेन इत्यादी देशांतील आणि वर्गात आशियाई, जर्मनी, भारतीय, युरोपियन देशांचे विद्यार्थी आहेत. आम्ही मित्रमंडळी आपापल्या देशांचा इतिहास, भूगोल, संस्कृतीबद्दल बोलतो. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांना फारच कुतूहल वाटतं. आपला गुढीपाडवा साजरा करणं, ही गोष्ट मी खूपच मिस करते आहे. आम्ही विद्यार्थी सणवार साजरे करत असलो तरी इथे बरीच र्वष राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये तेवढं पटकन मिसळत नाहीत. कारण त्यातले बहुतांशी लोक कुटुंबीयांसोबत राहातात आणि त्यांचं एक वेगळंच विश्व तयार झालं आहे.
विद्यापीठाचे तीन कॅम्पस असून आमचा कॅम्पस पोट्सडाममध्ये ग्लोममध्ये आहे. तिथे बहुतांशी विज्ञानक्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांच्या इमारती आहेत. हा कॅम्पस खूप मोठा असून आता विविध फेस्टिव्हल्स सुरू होतील. आमच्या वॉशहाऊस क्लबमध्ये विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले अनेक कार्यक्रम होतात. शिवाय कॅम्पसमधल्या पबमध्ये दर गुरुवारी संध्याकाळी पार्टी असते. त्यात विद्यार्थ्यांना आपापल्या देशांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळते. गेल्या वर्षी या कार्यक्रमात मीही सहभागी झाले होते; तेव्हा जाम धमाल केली होती.
काही संकल्पना कळण्यासाठी आम्ही ग्रंथालयातली काही पुस्तकं वाचतो. प्रसिद्ध झालेले पेपर्स ऑनलाइन उपलब्ध असतात. ग्रंथालयात िपट्रिंग, स्कॅिनग वगरे गोष्टींची चांगली सोय आहे. इथे कॅन्टीनला मेनसा म्हणतात. तेथील मेन्यूत थोडीशी सवलत मिळते आणि हा मेनु अनेकांना आवडतो.पहिल्या सेमिस्टरला काही गोष्टी नीट समजत नव्हत्या. व्हिसाच्या घोळामुळे मी उशिरा पोहोचले आणि जर्मन भाषा शिकण्याच्या वर्गात नाव नोंदवता आलं नाही. त्यामुळे भारतात शिकलेल्या जर्मन भाषेच्या ज्ञानाचा आणि गुगलचा आधार घ्यावा लागला. सुरुवातीचा हा काळ फारच गोंधळाचा आणि धावपळीचा गेला. मात्र पुढल्या सेमिस्टरमध्ये जर्मनसाठी नाव नोंदवलं आणि त्याच सुमारास स्टुडण्ट जॉबही लागला. परीक्षाही त्याच वेळी होती. तेव्हा ते सगळं निभावणं थोडंसं कठीण गेलं. सध्या फक्त प्रबंध आणि नोकरी करायची असल्यामुळे गोष्टी थोडय़ा सुकर झाल्या आहेत. शिवाय विद्यापीठाजवळच्या एस्ट्रोफिजिक्स इन्स्टिटयूटमधल्या फायबर ऑप्टिक इन्स्टिटयूटमधील प्रयोगशाळेत विद्यार्थी सहाय्यक म्हणून काम करते आहे. इतक्या व्यवधानांमुळे वेळेचं योग्य व्यवस्थापन करायला शिकले.
शाकाहारी असल्याने मला फारशा पदार्थाचे पर्याय उपलब्ध नाहीत. शिवाय विद्यार्थी असल्यानं पसे वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे नकळतपणे माझी स्वयंपाकात प्रगती झाली. भारतात असताना गिटार शिकले होते, ते इथे कंटिन्यू करता आलं. पोहण्याची आवड उन्हाळ्यात पुरी करता येते. मला चालायला आणि सायकिलग करायला खूप आवडतं. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोज तीन तास सायकल चालवणं फ्री आहे. फावला वेळ मिळाल्यावर मीही सायकल चालवते. वीकएण्डला काही वेळा आम्ही डॉम्रेटरीत बोर्डगेम्स खेळतो. आसपास बरेच तलाव असल्यामुळं तिथे चालणं होतं. जवळच्या जंगलात वॉकिंग ट्रेल्स होतात. एक मजेशीर किस्सा सांगायला आवडेल मला. मध्यंतरी आम्ही गार्डन्स ऑफ द वर्ल्ड या सुंदर बागेत गेलो होतो. तिथे केबलकारनं जायचं तिकीट आणि त्या बगिच्याचं तिकीट या दोन गोष्टी वेगवेगळ्या होत्या. मात्र आम्हाला त्याची कल्पना नव्हती. आम्ही केवळ केबलकारचं तिकीट काढून बागेत जायला निघालो. अर्थातच बागेच्या प्रवेशद्वाराशी आम्हाला तिकीट विचारलं गेलं. तेव्हा ‘आणखीन वेगळे पसे का द्यायचे?’ असा विचार मनात आला आणि आम्ही तिथून निघालो. फिरत फिरत पुढे गेलो. बागेत झाडांमधून एक वाट जात होती. तिथून आत शिरलो. ते कुणाच्या लक्षातही आलं नाही आणि आम्ही तो सुंदर बगिचा पाहू शकलो..
गेल्या वर्षी मी एक विषय घेतला होता- आइनस्टाइनच्या जनरल रिलेटीव्हीटीवरचा. त्या ४५ मिनिटांच्या प्रेझेंटेशनमध्ये बोलणं आणि प्रश्न-उत्तरांचा समावेश होता. प्राध्यापकांनी दिलेल्या विषयांमधला विषय आम्हाला निवडायचा होता. माझं प्रेझेंटेशन प्राध्यापकांना आवडलं. त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘हे मॉडेल प्रेझेंटेशन आहे,’ असं सगळ्यांच्या देखत सांगितलं. माझे सुपरवायझर डॉ. मार्टनि स्पर्ो आहेत. त्यांनी प्रबंध लिहायला सुरू व्हायच्या आधी सराव करून घेतला होता. बऱ्याचशा संकल्पना आणि अभ्यासाच्या विचारांच्या विविध पद्धती- स्मार्ट वे ऑफ िथकिंग त्यांनी विशद केलं होतं. याची प्रबंध लिहिताना खूपच मदत झाली. प्रबंधाचं काम चालू झाल्यावर आता आठवडय़ातून किमान एकदा दोन तास आम्ही भेटतो. माझ्या शंकांचं ते निरसन करतात. थेट उत्तर न देता विचार करण्यासाठी काही मुद्दे सुचवून, काही पुस्तकांचे संदर्भ देऊन अधिक विचार करून अभ्यास करायला लावतात. आता अभ्यासक्रमाची दोन वर्ष संपत आली आहेत. त्यामुळे पीएचडीसाठी युरोपातल्या विद्यापीठांमध्ये अर्ज करायला सुरुवात करते आहे. अर्ज मंजूर होऊन करिअरचा पुढचा टप्पा सुरू करण्यासाठी गरज आहे तुमच्या शुभेच्छांची!
शब्दांकन : राधिका कुंटे