‘माझ्या मराठी भाषेचा, लावा कपाळास टिळा..’ असं आपण सारे मराठीजन नेहमीच म्हणतो. पण या ‘माय मराठी’बद्दल आपल्याला कितीशी नि केवढी माहिती असते हो? मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठवाडी, मालवणी, झाडीबोली, नागपुरी, अहिराणी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, देहवाली, कोल्हापुरी, बेळगावी या मराठीतील बोली भाषा आहेत. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता मराठी भाषा अभ्यास परिषद, राज्य मराठी विकास संस्था, मराठी विश्वकोश निर्मिती, भाषा संचालनालय, मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद आदी अनेक संस्था कार्यरत असून त्यांचं योगदान मोठं आहे.
सध्या संगणकाच्या व्यवहारात ‘युनिकोड’सारख्या सॉफ्टवेअरचा वापर वाढलाय. अनेक देशी-विदेशी बनावटींच्या भ्रमणध्वनींमध्ये मराठी शब्दफलकाची सोय झालेली आहे. विविध सोशल साइट्सच्या माध्यमातून व्यक्त व्हायची भाषा मराठीच आहे. चंदेरी दुनियेतल्या चमचमत्या अमराठी तारे-तारकांच्या मराठी शिकण्याच्या बातम्यांमध्ये आता नावीन्य उरलेलं नाहीये. मराठीविषयीचा सार्थ अभिमान व्यक्त करणाऱ्या कौशल इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘मराठी अभिमान गीता’ला आजही तेवढीच जोरकसपणं पसंती मिळत्येय. विविध ब्लॉग्ज आणि वेबसाइट्सच्या माध्यमांतून अनेक मंडळी मराठीतून व्यक्त होणं पसंत करताहेत. त्याखेरीज तरुणाईची ‘िमग्लिश भाषा’ही रुळायला लागल्येय. हे सगळं आहे नि होतंय, ते केवळ मराठी माणसांच्याचबाबतीत, असं मात्र मुळीच नाही. आपण ते सहज करतोय कारण मराठी आपली मातृभाषा आहे. ज्यांची मातृभाषा मराठी नाही, त्यांचं काय? त्यांना मराठी भाषेविषयी काय वाटतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही केला. ही अमराठी भाषिक तरुणाई आपल्याइतक्याच जिव्हाळ्यानं मराठीविषयी भरभरून बोलली. त्यातल्या काहींनी मराठीला आपला ‘लिहिता हात’ केलंय तर काहींनी मराठी साहित्याचाही आस्वाद घेतलाय. ‘मराठी भाषा दिना’निमित्त आपल्या आवडत्या मराठी भाषेविषयी काहीजणांनी आपलं मत ‘व्हिवा’च्या या सदराच्या माध्यमातून मांडलंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा