हिंदी सिनेमा‘हिट’ ठरला की त्यातली फॅशन लगेच बाजारात येते. हिंदी तारकांच्या स्टाइलला लगोलग ‘फॉलोअर्स’ मिळतात. मराठी सिनेमातल्या ‘स्टाइल’मुळे प्रभावित होऊन फुललेली बाजारपेठ तुम्ही कधी पाहिली आहे का? मराठी सिनेमा हिट झाला तरी त्यातली स्टाइल आणि फॅशन हे मुद्दे हिटलिस्टवरच असतात. आत्ता कुठे थोडेफार बदलाचे वारे वाहताहेत.
दीपिका पदुकोणचा ‘ये जवानी है दिवानी’ असो किंवा आलिया भटचा ‘टू स्टेट्स’ हे चित्रपट त्यांची कथा, अभिनय यांच्यापेक्षा जर कुठल्या गोष्टीमुळे लक्षात राहिले असतील, तर त्यातील अॅक्टर्सच्या फॅशनमुळे. ‘ये जवानी..’मधील दीपिकाच्या साडय़ा, रणबीरचे शर्ट्स असोत किंवा ‘टू स्टेट्स’मधल्या आलियाच्या कलरफुल कुर्तीज असोत, तरुणाईमध्ये या स्टाइल्सची चर्चा सर्वाधिक झाली. हिंदी चित्रपटांतल्या फॅशनच्या चर्चा फक्त कट्टय़ावर आणि ऑफिसमध्ये रंगतात असं नाही, तर त्या स्टाइल्सनी बाजारपेठासुद्धा फुलून जातात. अशी कुठल्या मराठी सिनेमाच्या ‘लूक’मुळे प्रभावित होऊन फुललेली बाजारपेठ तुम्ही कधी पाहिली आहे का?
गेल्या दशकात मराठी सिनेमानं कात टाकली, नवनवीन प्रयोग होऊ लागले, याबाबत कुणाचंही दुमत नाही. अगदी कथेपासून ते तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक पातळीवर मराठी सिनेमा आघाडीवर आहे. आपले चित्रपट हे केवळ ‘टाइमपास’ नसून बॉलीवूडच्या तोडीचे आहेत, इतकंच नाही त्यांच्यापेक्षा ‘लय भारी’ आहेत, हे आपण सिद्ध केलं आहे. हे सगळं होत असतानाही मराठी चित्रपटांमध्ये गेली काही र्वष दुर्लक्षित राहिलेला एक भाग होता, तो चित्रपटातील कलाकारांचा ‘लूक’. ज्याची फॅशन किंवा स्टाइल फॉलो करावी असा एकही ‘स्टार’ मराठीत नाही, हेदेखील खरं आहे आणि याचं कारण म्हणजे- मराठी सिनेमातल्या नायक-नायिका काय घालतात, कसे राहतात, यावर गेल्या कित्येक वर्षांमध्ये बारकाईने लक्ष देण्याची तसदी कुणीही घेतलेली दिसत नाही. त्यामुळे मराठी सिनेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तरुणाईदेखील त्यांच्या कथा, अभिनय यांच्याबाबतच अधिक चर्चा करते, पण तरुणाईचा एरवी लाडका विषय असलेल्या ‘फॅशन’बद्दल मराठी सिनेमा क्षेत्रामध्ये उदासीनताच आहे.
‘टाइमपास’, ‘दुनियादारी’, ‘लय भारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, आगामी ‘हॅपी जर्नी’ असे काही अपवादात्मक सिनेमे सोडल्यास फॅशन किंवा पात्रांचा लुक यावर बारकाईने विचार झाल्याची उदाहरणं कमी दिसतात. ‘दुनियादारी’ चित्रपटाच्या वेळी ७०च्या दशकातील फॅशनची चर्चा कट्टय़ांवर बरीच गाजली; पण त्यातली स्टाइलसुद्धा पुण्यात त्या काळच्या प्रचलित स्टाइलपेक्षा बॉलीवूडच्या ७०च्या दशकातल्या स्टाइलची नक्कल करणारी वाटली, अशी टीकाही झाली. ही फॅशनविषय चर्चा झाली हेसुद्धा मराठी चित्रपटासाठी नवलच, कारण कित्येकदा मराठी कलाकारांनी सिनेमात घालण्यासाठीदेखील स्वत:चे कपडे घरातून आणल्याच्या किंवा अगदी गावातील लोकांकडून कपडे जमवल्याच्या कथाही आपल्याला ऐकायला मिळतात. यातला अतिशयोक्तीचा भाग वगळला तरी एकूणच चित्रपटाच्या ‘लुक’बद्दल सिनेकलाकारांमध्ये असलेली उदासीनता खरी आहे.
आत्ता आत्ता कुठे सिनेमातली ‘स्टाइल’, ‘लूक’ यावर विचार होऊ लागल्याचं दिसतं. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱ्या ‘हॅपी जर्नी’ चित्रपटाचा स्टायलिस्ट अमित दिवेकरच्या मते, ‘‘सिनेमामध्ये पात्रांना दिला जाणारा लुक हा फक्त ग्लॅमरचा भाग भरून काढण्यासाठी दिला जात नाही, तर त्यामागे एक विशिष्ट विचारप्रक्रिया सामावलेली असते.’’ अमितने डिझाईन केलेले ड्रेस आणि स्टाइल हॉलीवूडपर्यंत पोचलेली आहे. असा अनुभवी स्टायलिस्ट मराठीत आल्यानं थोडा वेगळा विचार होऊ लागला आहे, असं दिसतं. ‘‘सिनेमातील पात्रांच्या ‘लूक’वर जर थोडं अधिक लक्ष दिलं, तर त्यामुळे एकूणच सिनेमाचा चेहरा बदलतो. सिनेमाच्या ‘लूक’कडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. ‘हॅपी जर्नी’चा लूक ठरवताना मी प्रत्येक कलाकाराच्या व्यक्तिरेखेप्रमाणे वेगवेगळी कलर पॅलेट तयार केली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या व्यक्तिरेखेनुसार लूक दिला होता. यासाठी स्टायलिस्ट, कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात सुसंवाद असणं गरजेचं आहे. मराठी सिनेमांच्या स्टाइलमध्ये धिम्या गतीने का होईना, पण बदल होत आहेत, हे नाकारता येणार नाही.’’ अमित म्हणतो.
हिंदी चित्रपटांमध्ये स्टायलिंगवर लक्ष देण्याची सुरुवात नव्वदीच्या शतकात सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत मनीष मल्होत्रा, नीता लुल्ला, रॉकी एस ही नावं चित्रपटांमधील त्यांच्या स्टायलिंगमुळे गाजली होती आणि आज तर ही नावं सामान्यांमध्ये परवलीचा शब्द झाली आहेत. यांना डिझायनर म्हणून ओळख मिळण्यापूर्वी एक स्टायलिस्ट म्हणून ओळख मिळालेली होती. यांच्या स्टाइल्सचा तरुणाईवर इतका प्रभाव आहे की, कित्येक तरुणी आजही लग्नासाठी मनीष मल्होत्राच्या डिझाइनर लेहेंगाची स्वप्नं पाहतात. मराठीमध्ये मात्र एकूणच ‘फॅशन’, ‘स्टाइल’ याबद्दल गंभीरतेने बोलायला अगदी अलीकडे सुरुवात होऊ लागली आहे. आजही मराठी सिनेमातला स्टायलिश कलाकार कोण? असा प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर देता येत नाही.
मराठी सिनेमांमध्ये बजेट हासुद्धा सिनेमाचा लुक ठरवण्याबाबतचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं फॅशन विश्लेषक, स्टायलिस्ट आणि ई-कॉमर्स उद्योजक प्रीता सुखटणकर सांगते. ‘‘हिंदी सिनेमांच्या तुलनेमध्ये मराठी सिनेमाचं एकूणच बजेट यात जमीन-अस्मानाचा फरक दिसून येईल. त्यामुळे मराठी निर्मात्याला नायक-नायिकांच्या लुकवर पैसे खर्च करणं परवडणारं नाही.’’ पण कमी खर्चातही ‘हटके’ स्टाइल करता येते हे ‘टू स्टेट्स’, ‘जब वी मेट’, ‘क्वीन’मधील नायिकांचे लुक पाहता जाणवेल. कमीत कमी खर्चामध्येसुद्धा उत्तम स्टायलिंग करता येतं हे खरं आणि दुसरा मुद्दा म्हणजे आज मराठी सिनेमांमधील बजेटसुद्धा वाढू लागलं आहे. सिनेमाच्या निर्मितीसाठी काही कोटी खर्च करण्याससुद्धा निर्माता मागेपुढे पाहत नाही. तंत्रज्ञानाच्या बाबतीत परदेशी तंत्रज्ञांनादेखील पाचारण करण्याची तयारी कित्येक जण दाखवतात. अशा वेळी फॅशनवरच काटकसर का?
हिंदीतल्या अनेक नायिकांचा फेव्हरेट फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे याचं उत्तर देताना म्हणतो, ‘‘फॅशन, स्टाइल या गोष्टी आपल्यासाठी नाहीत आणि ते केवळ श्रीमंतांचे चोचले आहेत, असा समज कित्येक मध्यमवर्गीय मनांमध्ये घर करून बसलेला आहे. त्यामुळे हा भाग इतर अनेक बाबींपेक्षा काहीसा दुर्लक्षितच गेला आहे. फॅशन आणि स्टाइल ही आपण समजतो तितकी वाईट गोष्ट नाही. आपलं कौशल्य दाखवण्यासाठी ‘प्रेझेंटेबल’ राहण्याची गरज प्रत्येकालाच असते, त्यामुळे सिनेमांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांच्या लुककडे लक्ष देण्याची गरज जास्त आहे. मराठी सिनेमा फॅशनच्या बाबतीत आज हिंदीच्या तुलनेमध्ये फार मागे आहे. हिंदीमधील फॅशन आज इतक्या स्तरापर्यंत उंचावली आहे, की त्यामध्ये फारसं काही करण्यासारखं उरलेलं नाही. आजच्या पिढीतील नायक-नायिकांमध्ये स्टाइलचा इतका सेन्स आहे की, रोजच्या आयुष्यातसुद्धा ते अगदी वेलड्रेस्ड असतात; पण मराठीमध्ये मात्र सुधारणेसाठी अजूनही बराच वाव आहे,’’ असं स्वप्निलचं म्हणणं आहे.
मेकअप आणि हेअरस्टाइलच्या बाबतीतसुद्धा मराठी चित्रपटांमध्ये उदासीनता दिसून येते. गेल्या कित्येक वर्षांमध्ये नट-नटय़ांच्या मेकअपमध्ये उल्लेखनीय म्हणावा असा बदल झालाच नाहीय. उलट कित्येकदा चांगल्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या तारे-तारकांचे फोटो पाहताना पॅचवर्क असणारा किंवा भडक, बटबटीत मेकअप फोटोजमधून दिसून येतो. हेअरकटच्या बाबतीतसुद्धा काही अपवाद वगळता कित्येक जण अजूनही आपल्या चेहऱ्याला साजेसा हेअरकटसाठी चाचपडताना दिसतात.
आजच्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सिनेमाचा लुक ही गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते, याची जाणीव होणं आता गरजेचं आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातल्या काही निवडक मंडळींनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. फक्त या प्रक्रियेने अजून वेग घेणं गरजेचं आहे.