वस्त्रान्वेषी : विनय नारकर
संस्कृत साहित्यामध्ये आलेले पीतांबराचे उल्लेख आपण मागच्या लेखात पाहिले. एक दिव्य आणि पवित्र वस्त्र म्हणून पीतांबराकडे कसे पाहिले जाते, हे त्यातून अधोरेखित झाले आहे. मराठी लोकसाहित्यातही पीतांबराचे विपुल उल्लेख सापडतात. जवळपास सर्व संतांच्या अभंगांमध्ये पीतांबराचा उल्लेख आहे. आपल्या लाडक्या विठ्ठलाचे वस्त्र म्हणून फक्त पीतांबराचाच उल्लेख अभंगांमध्ये येतो.
विठ्ठलाचं वर्णन करताना जनाबाई म्हणतात,
पीतांबर नेसूनियां पिंवळा । गळां पैं तुळसीच्या माळा ।
कीं रूप सुंदर सांवळा । तेज झळके झळाळा ॥
तसेच,
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥
पीतांबर माल गांठीं । भाविकांसी घाली मिठी ॥
याशिवाय जनाबाईंनी विठ्ठल कीर्तनात किती तल्लीन झाला होता हे सांगताना पीतांबराची प्रतिमा मजेशीरपणे वापरली आहे.
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरिला ।
प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचु लागला ॥३॥
नाचतां नाचतां देवाचा गळाला पीतांबर ।
सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥४॥
संत तुकारामांनीही विठ्ठलाचे रूपवर्णन करताना विविध अभंगांमध्ये पीतांबराचा आधार घेतला आहे.
कटीं पीतांबर कास मिरवली ।
दाखवी वहिली ऐसी मूर्ती ।,
तुळशीहार गळां । कांसे पीतांबर,
तसेच,
गुणा आला विटेवरी । पीतांबर धारी सुंदर जो
संत नामदेवांनी विठ्ठलाचे प्रतीक म्हणून पीतांबराचा उल्लेख केला आहे.
॥ पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥
विठ्ठलाच्या मनोहर लावण्याचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वरांनी ही पीतांबराचेच वर्णन केले आहे,
तो सावळा सुंदरू, कासें पीतांबरू
लावण्ये मनोहरू, देखियेला
या अभंगात तर पीतांबराचे वर्णन ज्ञानेश्वरांनी कसे केले आहे पाहा,
स्वर्गे सूर्यतेज वेढिलें ।
जैसे पंधरेने मेरूतें मढिलें ।
तैसे नितंबावरी गाढिलें ।
पीतांबरू झळके ॥ ज्ञानेश्वरी, अध्याय १
ज्ञानदेव म्हणतात, जसे स्वर्गाला सूर्य तेजाने वेढले आहे, जसे मेरूला सोन्याने मढवलेले आहे, तशीच शोभा पीतांबरामुळे येते.
संत निळोबांनी पीतांबराची तुलना विजेशी केली आहे.
कसीयलें पीतवसन । झळके विद्युल्लते समान ॥
संत एकनाथांनी पंधरा एक अभंगांमधून पीतांबरधारी विठ्ठलाचे वर्णन केले आहे. एका अभंगात त्यांनी पीतांबराला ‘सोज्वळ’ असे विशेषण वापरले आहे.
शंख चक्र गदा कमळ । कासे पीतांबर सोज्वळ ॥
संतांच्या वाणीतून जसे पीतांबरधारी विठ्ठलाचे वर्णन येते, तसेच ते लोकसाहित्यातूनही येते.
काय सांगू माझ्या इठ्ठलाचं ध्यान
इटेवरी उभा सुकुमार चरण
त्याशिवाय काही प्रसंगांवर आधारित लोकसाहित्यातही पीतांबराचा उल्लेख येतो.
पीतांबर मोलाचा जनीला नेऊन दिधला ।
रात्री जाऊनी जरीपटकाही विसरला ॥
मराठी लोकसाहित्यात केवळ विठ्ठलच नव्हे तर बऱ्याच देवतांसाठी पीतांबराचीच योजना दिसते. संस्कृतप्रमाणे मराठीतही पीतांबराचे दिव्यत्व सर्वमान्य दिसते. खंडेराय, रेणुकादेवी, तुळजा भवानी, अंबाबाई, महालक्ष्मी, दत्तात्रय, राधा, रुक्मिणी इत्यादी सर्व देवतांचे परिधान पीतांबर आहे, अशा उल्लेखाचे लोकसाहित्य सापडते. आणखी विशेष बाब म्हणजे सर्व सणांच्या गीतांमध्ये, महाराष्ट्राच्या विविध भागांच्या गीतांमध्ये पीतांबराचे उल्लेख सापडतात. खानदेशातील श्रावण भाद्रपदातील गौराईची गाणी असोत वा कानबाईची गाणी असोत, या देवतांना पीतांबर मात्र हवाच.
तठे मनी गौराई न्हायनीन् पिवया
पितांबर नेसनी व माय, केसर दंदनी
पिवया पीतांबर नेसनी न् कंपाळी
कुंकवाची चिरी व माय, केसर दंदनी
कोकण भागातील कोळीगीते ही बरीच प्रसिद्ध आहेत. मासेमारीसाठी होडी समुद्रात ढकलताना कोळी पुरूष पुष्कळ वेळा भवानीदेवीने आपल्याला सुखरूप परत आणावे म्हणून काही विशिष्ट प्रकारची गाणी म्हणतात. त्यांना ‘आंबवणी’ म्हणतात. यातही पीतांबराचा उल्लेख सापडतो.
कंबर पीतांबर नेसनी व माय, माय
भांगे गुलाल भरना व माय, माय
लग्नसमारंभानिमित्त किंवा अन्य काही प्रसंगी खास ‘जागरण गोंधळ’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात गोंधळी काही ‘गोंधळी गीते’ सादर करतात. त्यातही पीतांबर असतोच..
तृतीयेचे दिवशी बाईने शृंगार मांडिला
कंठीचे पदक कासे पीतांबर पिवळा
रुणझुणती नूपुरे लावण्य सुंदर निळा
अंबाबाई माउलीचा उधो म्हणा उधो म्हणा
तसेच,
पिवळा पीतांबर देवी नेसण्याला
कवडय़ाचा शिणगार
अंबानं केला वो देवानं केला
गौळणीमध्येही पीतांबरा संबंधाने उल्लेख येतो.
दुसरी गौळण भाळी भोळी
रंग हळदीहून पिवळी
पिवळा पीतांबर नेसून आली
पण याचा अर्थ पीतांबर हे फक्त देवतांनीच नेसावयाचे वस्त्र आहे असे नाही. ओव्यांमधून सर्वसामान्यांच्या नेसण्यात आलेले पीतांबराचे उल्लेखही सापडतात.
घातली मधुपका चोळी
नेसली पिवळा पीतांबर
तसेच,
नेशी पिवळा पीतांबर ग
हाती सोन्याचं बिलवर
मी ग निघाले न्हवयीना ग
लेक बाबांची तालीवार
इतक्या सगळ्या प्रकारच्या लोकसाहित्यात पीतांबराचे उल्लेख येत असताना लावणी मागे कशी राहील?
प्रभाकरच्या लावणीमध्ये अशा प्रकारे पीतांबर दिसतो,
विसां आंत उम्मर, नरम कंबर, पीतांबर पैठणचे नेसल्यें
तर परशरामाच्या लावणीमध्ये,
सडक पातळ विजना कंबर पीतांबर नेसली, असा उल्लेख येतो. अशा ओव्यांमधून आणि अन्य लोकसाहित्यामधून पीतांबराची लोकप्रियता दिसून येते. आज पीतांबर साडय़ा जरी नामशेष झाल्या असल्या तरी लोकसाहित्याने पीतांबराच्या आठवणी मात्र अजरामर करून ठेवल्या आहेत.
काही रूढ आख्यायिका, पौराणिक गोष्टी लोकगीतांमधून, ओव्यांमधून सांगितल्या जातात. अशीच एक पौराणिक कथा किंवा दंतकथा पीतांबराच्या उल्लेखाने सजली आहे. श्रीकृष्ण आणि नारद यांच्यात सुभद्रा व द्रौपदी यांच्या बंधुप्रेमाबद्दल चर्चा चालू असते. त्यांची परीक्षा घेण्यासाठी श्रीकृष्ण नारदास सांगतो की त्या दोघींकडे जाऊन कृष्णाचे बोट कापले आहे असा बनाव कर आणि त्यांच्याकडे बोटाला बांधण्यासाठी चिंधीची मागणी कर. त्याप्रमाणे नारद सुभद्रेकडे जाऊन चिंधी मागतो. ती म्हणते, माझ्याकडे फक्त उंची शालू आणि पैठणी आहेत, त्या कशा चिंधीसाठी फाडू.. मग नारद द्रौपदीकडे जातात. ती लागलीच स्वत: नेसलेला दिव्य पीतांबर फाडून त्याची चिंधी नारदांकडे देते. ती म्हणते ज्याने वस्त्रे देऊन माझी लाज राखली तो चिंधीसाठी माझ्या दारी आला आहे. त्यामुळे एक क्षणही विचार न करता ती आपला मौल्यवान पीतांबर फाडून कृष्णाला देते.
या कथेवर आधारित काही लोकगीते आहेत. त्यात म्हटले आहे.
‘चिंधी मागता नारद द्रौपदी पीतांबर फाडून देई मोलाचा’ आणि ‘कापली करंगळी रक्ता लागीयली धार, द्रौपदीने फाडियेला सव्वा हात पीतांबर’, अशा ओळी त्या लोकगीतांत येतात. याच कथेवर आधारित आचार्य अत्रे यांनी एक अलौकिक गीत लिहिले आहे. कवी ग्रेस यांच्या शैलीत बोलायचे तर, लवून कुर्निसात करावा असे गीत आचार्य अत्रे यांनी रचले आहे. ‘भरजरी गं पीतांबर’ या गीतासाठी ग्रेस यांनी अत्रे यांना महाकवी संबोधले आहे.
या गीतामध्ये किंवा या आख्यायिकेमध्ये सुभद्रा शालू किंवा पैठणी नेसली आहे आणि द्रौपदीने परिधान केले आहे ‘पीतांबर’. पं. अशोक रानडे म्हणतात की मराठी भाषा खूप सूचक आहे. मराठी साहित्यामध्ये वस्त्रांचे उल्लेख उगाच येत नाहीत, तर विशिष्ट वस्त्रांच्या उल्लेखाने एक भावसमुद्र येत असतो. म्हणजेच विशिष्ट वस्त्रे विशिष्ट भाव निर्माण करतात. इथे म्हणजे या गीतात द्रौपदीने पीतांबर नेसणे यातही अशीच सूचकता आहे. पीतांबर हे विष्णू, श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित असे वस्त्र आहे. द्रौपदी वस्त्रहरणावेळी वस्त्रे देऊन तिची लाज राखणाऱ्या, साक्षात नारायणालाच जर चिंधी द्यायची असेल तर ती कोणत्या वस्त्राची असावी? तर अत्रे म्हणतात ते, ‘त्रलोक्य मोलाचे वसन’ असले पाहिजे. असे वस्त्र म्हणजे ‘पीतांबर’. इथे पीतांबरामध्ये जी भावनिकता आहे ती शालू आणि पैठणीमध्ये येत नाही. ही वस्त्रे सुभद्रेला देण्यात अशी सूचकता आहे.
म्हणूनच अत्रे म्हणतात,
भरजरी गं पीतांबर, दिला फाडून
द्रौपदीचे बंधू शोभे नारायण
अशा प्रकारे कविसंरक्षित आठवणींमध्ये अमर झालेले पीतांबर होते कसे, कुठे विणले जायचे आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही ते कसे वापरायचे याबद्दल पुढील भागात जाणून घेऊ या.
viva@expressindia.com