मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारीला साजरा झाला. आजची मराठी युवापिढी धेडगुजरी ‘मिंग्लिश’ बोलते. मराठी भाषा अशाने कशी जगणार, असा ओरडा एकीकडे सुरू असतानाच मराठी भाषेची महती देशाबाहेरही पोहोचतेय हे नक्की. मराठीचं कौतुक ही भाषा बोलू शकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या शब्दात..
आजची पिढी मराठीपासून दूर जातेय. आजच्या युवकांना मराठी येत नाही. ते हिंदीमिश्रित मराठी किंवा इंग्रजीमिश्रित ‘मिंग्लिश’ बोलतात. असा ओरडा नेहमी केला जातो. पण या नाण्याला दुसरीही बाजू आहे. आपल्याला मराठी भाषेबद्दल अभिमान आणि आदर दोन्ही असतोच. हीच मराठी बोली आता केवळ आपल्याच नाही तर परकीयांच्याही मुखी पोहोचतेय. भाषेबरोबरच मराठी मातीमध्ये जन्माला आलेल्या अनेक थोर व्यक्ती आणि येथील ऐतिहासिक वास्तूंची महती परदेशातही जाऊन पोहोचली आहे.
हल्ली पुण्यात परदेशी विद्यार्थी फार मोठय़ा प्रमाणात दिसतात. परदेशातील विद्यापीठांमध्ये महाराष्ट्राविषयी दिल्या जाणाऱ्या माहितीमुळे तेथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात रस निर्माण झाला आहे. काही शिक्षणासाठी येतात तर काही संशोधनासाठी. या मुलांना जर विचारलं तर त्यांना कमीत कमी एखादं वाक्य तरी मराठी येतंच. पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डेक्कन कॉलेज यांसारख्या ठिकाणी भारतातल्या भाषा, पत्रकारिता, मास कम्युनिकेशन, इतिहास या आणि इतर अनेक विषयांचं शिक्षण घेण्यासाठी आलेले परदेशी विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एकनाथ, ज्ञानेश्वर आदी संत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज यांच्यावर आणि मराठी भाषेतील साहित्यामध्ये पीएचडी करणारेही काहीजण आहेत. यांच्यातील सगळेच नाही पण अनेक जण मराठी शिकतात. ‘संशोधनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मूळ साहित्य वाचल्याशिवाय अभ्यास करणं शक्य नसतं. मूळ साहित्य असतं मराठीमध्ये, त्यामुळे मराठी शिकण्याकडे कल असतो’, असं डेक्कन कॉलेजच्या सुजाता महाजन यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सेवाभावनेने आलेल्या परदेशी नागरिकांनाही मराठी शिकण्याशिवाय पर्याय नसतो. समाजसेवा करण्यासाठी समाजात मिसळावं लागतं आणि हा समाज मराठी बोलतो, त्यामुळे मराठी शिकणं अपरिहार्य ठरतं.
रेचल बॉल, ही अमेरिकन युवती पीएचडी करण्यासाठी पुण्यात आली. तिच्या नावाचा उच्चार नेमका कसा, असं विचारल्यावर तिनं रेचल असं चक्क देवनागरीत लिहून दाखवलं. ‘मराठी सिनेमा’ हा तिच्या थिसिसचा विषय. त्यासाठीच ती पुण्यात आली. मराठी सिनेमावरच संशोधन असल्यामुळे रेचलला साहजिकच मराठी छान कळतं. बोलता येतं, वाचता येतं आणि लिहिताही येतं. तिचे ‘पीएचडी’साठी लागणारे सोस्रेसही मराठीमधूनच आहेत. मराठी शिकायला सुरुवात केली तेव्हा खूप भन्नाट अनुभव आले. त्यातला एक ती हसत हसत सांगते. सुरुवातीला पती आणि पत्नी या शब्दांमध्ये तिचा फार गोंधळ उडायचा. ती सांगते, ‘एकदा मला एका रिक्षावाल्याने विचारलं – तुमचं लग्न झालंय का? मी उत्तर दिलं, ‘हो मला एक पत्नी आहे’ रिक्षावाल्याने विचारलं ‘पत्नी?’ रिचेल ‘हो’ म्हणाल्यावर त्यानं पुन्हा पत्नी कशी असेल असं विचारलं. हा वाद दहा मिनिटे चालू होता, नंतर लक्षात आलं.. पत्नी म्हणजे ‘बायको.. वाईफ’. त्यानंतर मात्र पती, पत्नीच्या भानगडीत न पडता तिने फक्त नवरा आणि बायको हेच शब्द वापरले.
डेव्हीड यान्सी
अमेरिकेतून भारत बघायला आलाय. पुण्यातल्या स्वयंसेवी संस्थेत काम करताना मराठी शिकतोय.
रेचल बॉल
अमेरिकन युवती पीएचडी करायला आली आहे. तिच्या थिसिसचा विषय आहे – ‘मराठी सिनेमा’.
क्वांग सुकासेम
मूळची थायलंडची. पुण्यातल्या मित्रमंडळींनी मराठी शिकवलंय आता पु.ल. वाचण्यात इंटरेस्ट आहे.
कर्स्टिन हार्टविग
मूळची जर्मनीची. इंडॉलॉजीची अभ्यासक. इंटर्नशिपसाठी पुण्यात आलीय आणि मराठी शिकतेय.
डेव्हीड यान्सी, अमेरिकेहून केवळ भारत बघण्यासाठी म्हणून आला आहे.
‘अमेरिकेला फार जुना इतिहास नाही. मात्र तुमच्या भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारत बघण्यासाठी मी शाळेत असल्यापासून पसे जमवतो आहे’, डेव्हीड सांगतो. तो इतिहास समजून घेण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीविषयी माहिती करुन घेण्यासाठीच तो इथे आला आहे. त्याला पुण्यात येऊन केवळ दोन आठवडेच झाले आहेत. आल्यापासून तो ‘मानव्य’ या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून जातोय. तिथल्या लहान मुलांशी इंग्रजीत बोलता येत नाही त्यामुळे त्याने आता मराठी शिकायला सुरूवात केली आहे. तो आपल्यासोबत एक नोटपॅड ठेवतो. शंका आली की प्रश्न विचारायचे, आपल्या छोट्या वहीत नोंद करुन घ्यायची आणि नवीन शिकलेलं लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीने त्याचं मराठी शिकणं चालू आहे. दोन आठवड्यांमध्ये तुम्ही कसे आहात, मला भूक लागली आहे, मला तहान लागली आहे, हे एवढं मराठी तो नक्कीच शिकला आहे. ‘मे महिन्यापर्यंत मी चांगलं मराठी बोलायला लागेन, याची मला चांगली खात्री वाटते’, डेव्हीड ठामपणे सांगतो.
लालेह हामझेपूर, इराणमधून पुणे विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशन शिकायला आली आहे. गेली तीन वर्ष ती पुण्यात आहे. मास कम्युनिकेशन इंग्रजीमध्ये असल्यामुळे मराठी शिकण्याची गरज नव्हती. पण पुण्यात राहात असल्यामुळे आणि मित्र परिवार मराठी बोलणारा असल्यामुळे तीन वर्षांनंतर आता थोडंफार मराठी येतं तिला. नसरिन तालेब्धसुद्धा पुणे विद्यापीठामध्ये शिकते आहे. नसरिनही इराणीच आहे. पुण्यात आल्यानंतर इतरांबरोबर बोलताना भाषेची खूपच अडचण यायला लागली. अजूनही येते, पण आता थोडंफार मराठी येत असल्यामुळं तिला मॅनेज करता येतं. मराठी शिकण्यासाठी वेगळी शिकवणी वगरे नाही लावली. आसपासच्या लोकांच्या संभाषणामधून शिकत गेले, असं ती सांगते.
थायलंडची क्वांग सुकासेम शिकण्यासाठीच पुण्यात आली आहे. तिला तिच्या शिक्षकांनी आणि मित्र मंडळींनी मराठी शिकवलं. इथल्या लोकांशी बोलता यावं यासाठी ती मराठी शिकली. तिला आपली संस्कृती, भाषा, लोक आणि इतिहास आवडतो. आपल्या सर्वाचे लाडके शिवाजी महाराज हे तिचेही आवडते योद्धे आहेत. तिच्या मित्रांनी तिला पु. लं.च्या काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि गंमत म्हणजे तिल्या त्या आवडल्याही आहेत, आता तिला पु.ल. देशपांडे वाचण्यात इंटरेस्ट निर्माण झालाय.
कíस्टन हार्टविग, मूळची जर्मनची. तिने जर्मनीमध्ये असताना इंडॉलॉजीमध्ये एम.ए. केलं आहे. इंडॉलॉजी म्हणजे इंडियन लँग्वेज अॅण्ड लिटरेचर स्टडीज्. सध्या ती इथे इंटर्नशिप करण्यासाठी आली आहे. तिला िहदी उत्तम येतं. पण मराठीच्या बाबतीत मात्र आत्ताशी सुरुवात आहे. तिला मराठीमधले थोडेफार शब्द येतात. तिला मराठी वाचताही येतं. ती मार्चमध्ये घरी परत जाणार आहे, पण तोपर्यंत जेवढं मराठी शिकता येईल तेवढं ती शिकणार आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून समाजशास्त्र शिकणारा इराणचा आरया लरोझी २००७- ०८ पासून पुण्यात राहतो आहे. त्यालाही मराठी बोलता येतं, दुसऱ्याने बोललेलं समजतं, पण वाचायला काही जमत नाही. यालाही त्याच्या मित्रांनीच मराठी बोलायला शिकवलं.
या सगळ्या परदेशी मित्रांना आपल्या मराठीविषयी आपुलकी आहे. त्यांना या भाषेनं लळा लावलाय आणि आपलंसं केलंय.