नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
पावसाची एक गंमत अशी की, एकच पाऊस एखाद्याला प्रचंड आनंदी, तर दुसऱ्या एखाद्याला हळवा करू शकतो. कोणाला बेभान, बेफिकीर जगायला सांगतो, तर कोणाला खोल, विचारी बनवतो. मराठी गाण्यांमधला पाऊस हा अशा सगळ्या भावनांना स्पर्श करतो, तो हिंदीसारखा केवळ प्रेम आणि विरह या मुद्दय़ांपुरता मर्यादित राहत नाही. आता सुधीर मोघ्यांचे हेच गाणे बघा ना –
‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा! पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा’ असे वाचण्यात आलेय की या गाण्यात भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलीचे प्रतीक दिले गेले आहे. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की, भाताचे बीज जमिनीत जवळजवळ पेरतात आणि मग जोरात पाऊस चालू झाला की, तयार झालेली रोपे काढून ती दुसऱ्या ठिकाणी पेरतात. त्या रोपांचे नवीन ठिकाणी एक नवीन आयुष्य चालू होते आणि ती रोपे मग समृद्धी आणतात. त्याचप्रमाणे स्त्रीचे एक नवीन आयुष्यच सासरी गेल्यावर चालू होते. असे गाणे निघू शकेल का हिंदी सिनेमामधे?
बाळासाहेबांचेच अजून एक गाणे- ‘ये रे घना ये रे घना..’ आरती प्रभूंनी लिहिलेले.. त्यातला ‘नको नको म्हणताना’ या फ्रेजचा सुंदर वापर, बेभानपणाकडे नेणारा, मर्यादा झुगारायला लावणारा पाऊस.. न्हाउ घाल माझ्या मना.. क्या बात! प्रतीकांचा विषय निघालाच आहे, तर ‘भरून भरून आभाळ आलंय भरून भरून’ या श्रीधर फडके- शांता शेळके-अनुराधा पौडवाल यांच्या गाण्याचा उल्लेख करावाच लागेल. गरोदर स्त्रीला भरलेल्या आभाळाचे, सुवार्ता आणणाऱ्या त्या वातावरणाचे प्रतीक यात सुंदर पद्धतीने वापरले आहे.
रात्री पाऊस पडत असला की ‘कुणी जाल का सांगाल का?’ हे यशवंत देव- कवी अनिल -वसंतराव देशपांडे यांचे गाणे आठवल्यावाचून राहत नाही. ‘आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली, परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली..’ कवी अनिल हे कधी तरी कुमार गंधर्व यांच्या घरी गेले असताना एक रात्री बाहेर जोराचा पाउस पडत होता आणि आत मुकुल शिवपुत्र गात बसले होते.. अशा उत्कट क्षणी कवी अनिल यांना ही कविता सुचली असे ऐकिवात आहे.
‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादात होता..’ या कवितेचा प्रत्येकाला वेगळा अर्थ लागतो. मला तो अजून लागला नाहीय, पण तरीही मंत्रमुग्ध होऊन हे गाणे ऐकतच राहावे असे वाटते. मग ते ‘भावसरगम’ किवा तत्सम मैफलीमधले बाळासाहेबांचे ‘’्र५ी’ रेकॉर्डिग असेल, तर विचारायलाच नको. पाऊस आणि निसर्ग त्या ओघाने आणि प्रेम यांमधला संबंध दाखवणारी सुंदर रोमँटिक गाणीही काही मराठीत कमी नाहीत. श्रावणात घननिळा बरसला, ऋतू हिरवा, ही गाणी मन प्रसन्न करून टाकतात.
..तुम्ही म्हणाल, की पाऊसगाण्यांची प्लेलिस्ट लिहायला एवढी घाई काय होती? जरा जोर धरू देत की पावसाला..! पण कसंय, पावसाचा एक प्रॉब्लेमसुद्धा आहे. पहिल्या-पहिल्यांदा मजा येते, पण मग काही वेळातच ‘पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे सुटी उगाच!’वाली भावना जागृत होते! म्हणून म्हटले ती भावना यायच्या आधीच प्लेलिस्ट सादर करून टाकू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा