विनय जोशी
२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन. अमृतालाही पैजेत जिंकणाऱ्या मराठी भाषेचा सन्मान करण्याचा दिवस. यानिमित्ताने मराठी जनांच्या पिलापिलात जन्मणाऱ्या, कुलाकुलात नांदणाऱ्या, मनामनात दंगणाऱ्या मायमराठीचा जयघोष होतो. आपण मराठी बोलतो या भाग्याच्या स्मरणाने ऊर भरून येतो. आणि त्याचबरोबर दरवर्षी प्रश्नही उपस्थित होतो. या परंपरेचे पुढचे पाईक असणारी तरुणाई खरंच मराठी बोलते? मराठी ऐकते? वाचते? लिहिते?…
आजकालची तरुणाई वाचत नाही ही तर जुनीच व्यथा. पु.ल. वाचून येणारं निखळ हसू, गोनीदांच्या सोबत दिसणारा सह्याद्री, जीएंच्या लेखनातलं काजळकभिन्न गूढ, कुसुमाग्रजांनी दाखवलेली नवी उमेद या नॉस्टेल्जियात रमलेल्या आधीच्या पिढीला हे सारं पुढच्या पिढीला कळेल का, या चिंतेने ग्रासलं आहे. या पिढीला धारप घाबरवू शकतील का? कणेकर हसवू शकतील का? रणजित देसाई रमवू शकतील का? वाचणं तर दूरची गोष्ट. कॉलेज, ऑफिस आणि इतर ठिकाणी वावरताना मराठी ऐकलं तरी जातं आहे का? सोशल मीडियावर व्यक्त होताना, साधं मित्राला व्हॉट्सअॅप मेसेज करताना तरी मराठीत लिहिलं जातं आहे का? आणि यापेक्षाही गहन प्रश्न. शुद्ध मराठीत बोललं तरी जातं आहे का?
हेही वाचा >>> जुनंच प्रेम, नवं सेलीब्रेशन
या सगळ्या चिंता अगदीच वावग्या आहेत असं म्हणता येणार नाही. कॉलेज, रोड, बस, किचन, लाइट, ट्रॅफिक, बाइक, बिल्डिंग असे किती तरी इंग्रजी शब्द मराठीत केव्हाच सामावून गेले आहेत. टेक्नॉलॉजीच्या युगात मेसेज, पोस्ट, लिंक, इमेज असे शब्द आणि डिलीट, सेंड, फॉरवर्ड अशी क्रियापदंदेखील या पंगतीला अलगद येऊन बसली आहेत. अर्थात, भाषेचं प्रवाहीपण जपण्यासाठी हे आवश्यक आणि अपरिहार्यदेखील आहे. बातम्यांतदेखील स्पेस शटल लाँच होऊन लॅन्डरचं लँडिंग होतं असतं. अवतरक, बग्गी, क्षेपणयान असे बरेचसे पारिभाषिक शब्द लोप पावत आहेत. म्हणी, वाक्प्रचार हळूहळू कालबाह्य होत आहेत, पण या सगळ्यापेक्षा चिंतेचा विषय आहे तरुणाईच्या ओठी असणारी इंग्रजी आणि मराठीची भेसळ होऊन बनलेली मिंग्लिश ही नवी भाषा. ‘तू माझ्या टी मध्ये शुगर पुट करायला फरगेट झालास’ हे असं धेडगुजरी बोलणं अगदी ‘कुल’ मानलं जाऊ लागलंय. आणि मग खरंच प्रश्न पडतो आजच्या तरुणांच्या मनामनात दंगते का मराठी? त्यांच्या रगारगात रंगते का मराठी?
मराठी भाषेच्या संदर्भातील तरुणाईची ही समस्या गंभीर आहे खरी. पण परिस्थिती दिसते तितकी ही निराशाजनक नक्कीच नाही. अगदी हातात पुस्तक घेऊन वाचणं कमी झालं असेलही, पण किंडल आणि इतर माध्यमातून तरुणाईची वाचनाची आवड जपली जाते आहे. कदाचित अगदीच मर्ढेकर, खांडेकर वाचले जात नसतीलही, पण तरुणांना भावणारी अनेक पुस्तकं आजही ‘ट्रेण्डिंग’ आहेत. आजच्या आयुष्यावर बोलणाऱ्या संदीप खरेंच्या कविता अजूनही तरुणांच्या ओठी आहेत.
सोशल मीडिया हा आजच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तरुण पिढीला अभिव्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया जवळचा वाटतो. उलट आधीच्या पिढीला व्यक्त होण्यासाठी बऱ्याच मर्यादा होत्या. वृत्तपत्र, दिवाळी अंक, मासिकं यांना आपले लेख, कविता पाठवून त्यांनी ते छापायची वाट पाहावी लागायची. आता आपल्याच वॉलवर एका क्षणात कुठल्याही प्रकारचं साहित्य पोस्ट करता येतं. राजकीय घडामोडी असोत की काही सामाजिक प्रश्न असोत… सोशल मीडियावर तरुण मराठीत व्यक्त होताना दिसतात. इतिहासापासून विज्ञानापर्यंत अनेक विषयांवर अनेक मराठी ब्लॉग्स लिहिले जात आहेत. फेसबुक पेजवर नियमित उत्तम लिहिणारी अनेक नवी लेखक मंडळी उदयाला येत आहेत. ‘मिसळपाव’, ‘मायबोली’ अशा मराठी पोर्टल्सवर विविध विषय चर्चिले जात आहेत. ‘प्रतिलिपी’सारख्या विविध अॅप्सनी नवोदित कथा लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. इथे प्रेमकथा, भयकथा, रहस्यकथा, लघुकथा असे किती तरी प्रकार तरुणाई सहजतेने हाताळताना दिसते. आणि अशाच अनुभवातून पुस्तक लिहीत नवे लेखकदेखील घडत आहेत.
हेही वाचा >>> सफरनामा: घळीचा थरार!
रोजच्या धावपळीत वाचायला वेळ मिळत नसेलही, पण दर्जेदार मराठी साहित्य आवर्जून ऐकलं जातं आहे. स्नोवेलसारख्या अॅपवर ऑडिओबुक, पॉडकास्ट, टॉक शो यांची रेलचेल आहे. स्टोरी टेलवर लोकप्रिय पुस्तकांचा खजिना उपलब्ध आहे. अनेक विषयांवरचे मराठी पॉडकास्ट युवकांची श्रवणभूक भागवायला सज्ज आहेत.
अनेक भटक्या तरुणांचे ट्रॅव्हल व्लॉग असोत, खवय्यांचे खाबुगिरी व्लॉग असो किंवा गप्पा-मुलाखतींचे व्लॉग असो. मराठी व्लॉग पाहणं हे तरुणाईत ‘ट्रेण्डिंग’मध्ये आहे. ‘भाडिप’ने पुन्हा सुरू केलेल्या मराठी स्टँडअप कॉमिकच्या वाटेवर जात बरेच कलाकार निखळ हास्याची मेजवानी लोकांना देत आहेत. मराठीजनांचे नाट्यप्रेम नव्या पिढीत उतरल्याचंही स्पष्ट दिसतं आहे. ‘देवबाभळी’सारख्या नाटकांना दिसणारी तरुणांची मोठी संख्या हे याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. विविध एकांकिका स्पर्धांमध्ये फक्त कलाच नाही तर अभियांत्रिकी, वैद्याकीय शाखांच्या तरुणांचा सहभागही नजरेत भरण्यासारखा असतो. कविता वाचन, अभिवाचन, निवेदन असे कार्यक्रम सादर करणाऱ्या तरुणांची संख्यादेखील सध्या लक्षणीय आहे. मराठी भाषेत मुद्देसूद बोलणाऱ्या अनेक व्यासंगी तरुण व्याख्यात्यांची संख्या वाढली आहे.
महानगरात नक्कीच इंग्रजीचं लक्षणीय अतिक्रमण होतं आहे. पण उर्वरित महाराष्ट्रातले तरुण मराठीतच बोलत आहेत. उलट बोलीभाषा आणि खास स्थानिक शब्द जपण्याकडेही तरुणांचा कल वाढतो आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात नव्या माध्यमातून तरुण मराठी वाचत आहेत. लिहीत आहेत. ऐकत आहेत. तरुणाईला हे प्रयत्न वाढवण्याची गरज आहे खरी… पण तरीही सुरेश भटांच्या शब्दात जणू तरुणाई सांगते आहे,
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!!! बोलत राहू मराठी!!!
viva@expressindia.com