काही दिवसांपूर्वी टीव्हीवरची एक जाहिरात बरीच गाजली होती. मॅरेज रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये बसलेला तरुण, ‘मी लग्नानंतर बायकोचं नाव लावणार’, असं सांगतो आणि मॅरेज रजिस्ट्रारसकट प्रेक्षकही अचंबित होतात. एका पंख्याची जाहिरात आणि टॅगलाइन.. हवा बदलेगी. आता अगदी तंतोतंत नाही तरी अशा हवाबदलाची काही उदाहरणं नक्कीच दिसताहेत. हवेची दिशा नक्कीच बदलतेय. या बदलत्या हवेचेच काही झोत टिपायचा हा प्रयत्न.

लग्नानंतर नवऱ्याच्या गावी शिफ्ट व्हायचं किंवा लग्नानंतर नवऱ्याची बदली झाली, तर तिथे जायचं हे मुलींसाठी गृहित धरलेलं सत्य. पण तेही आता बदलतंय. होणाऱ्या बायकोच्या करिअरसाठी तिच्या नोकरीच्या ठिकाणी जाणारे आणि लग्नानंतरही बायकोच्या करिअरला प्रायॉरिटी देत स्वत शिफ्ट होणारे तरुण आता दिसायला लागलेत.
‘काय रे तू जॉब का सोडतो आहेस?’
‘अरे मी बंगलोरला शिफ्ट होतोय. तिथे नवीन कंपनी जॉईन करतोय.’
‘काय! का पण? ते पण बंगलोरला? घरापासून इतक्या लांब?’
‘अरे बायकोला चांगली ऑफर मिळाली आहे तिथे. तिच्या करियरसाठी खूप महत्त्वाचा आहे हा जॉब. म्हणून मी माझा जॉब बदलतो आहे.’
हा संवाद अजिबात अतिशयोक्तीपूर्ण नाही. अगदी लहानपणापासूनच आपण ‘बाबांची’ बदली पाहिलेली, अनुभवलेली असते. पण आईची बदली आणि त्यासाठी शिफ्टिंग हे तसं न अनुभवलेलं. पण पुढच्या पिढीला हा अनुभव नक्की मिळणार. आत्ता पंचवीस-तिशीत असलेल्या मुली खूप करिअरिस्ट आहेत आणि त्यांचे पार्टनरही त्यांच्या करिअरला साथ देताहेत. त्यामुळे बायकोच्या किंवा गर्लफ्रेंडच्या नोकरीच्या ठिकाणी बदली करून घेणारे अथवा नवी नोकरी शोधणारे तरुण आता दिसायला लागले आहेत. मुलगा-मुलगी असा भेद न करता करिअरची समान संधी देणारं वातावरण हळूहळू निर्माण होतंय. त्यामुळे बायकोचं करिअर हादेखील प्राधान्यक्रम असणारे तरुण दिसताहेत.
vv08पुण्याच्या विनायक थत्तेने बायको सायलीच्या शिक्षणासाठी अमेरिकेची नोकरी नुकतीच सोडली. सायली आणि विनायकमध्ये खरं तर १० वर्षांचं अंतर. सायलीचं डान्समधलं पदव्युत्तर शिक्षण राहिलं असल्याने तिच्या स्वप्नांसाठी अमेरिकेच्या नोकरीवर पाणी सोडताना विनायक म्हणतो, ‘ती जर तिच्या आई बाबांना, घराला सोडून माझ्यासाठी येत असेल, तर तिच्या करियरसाठी मी अमेरिकेसारखी एक जागा का सोडू शकत नाही? आम्ही पुण्यात सेटल व्हायचा निर्णय घेतलाय. पुण्यातपण आयटी इंडस्ट्री वाढली आहे. दोघांचं करिअर एका ठिकाणी झालेलं कधीही उत्तम आणि लग्न झाल्यानंतर दोघांनी वेगवेगळ्या शहरांत राहण्यात काय अर्थ आहे? एकत्र राहायचं असेल तर सायलीनेच का अ‍ॅडजस्ट करावं?’
vv10आपल्या समाजात लग्न ठरवण्याचा क्रायटेरियाच मुळात असमान असतो. म्हणजे मुलीपेक्षा मुलगा जास्त शिकलेला हवा, जास्त कमावणारा हवा. अर्थात केवळ मुलांना आपल्यापेक्षा कमी शिकलेली बायको हवी असते असं नाही, तर बऱ्याच मुलींची आपल्यापेक्षा काकणभर वरचढ जोडीदार मिळावा अशीच अपेक्षा असते. बायकोने घर बघावं आणि आर्थिक जबाबदारी नवऱ्याची. हा तर अगदी आत्तापर्यंत खोलवर रुजलेला समज. पण जग बदलतंय तसे समजही बदलताहेत. आज नवऱ्याच्या शिक्षणाइतकंच बायकोच्या शिक्षण आणि करियरला महत्त्व आहे. हे सिद्ध केलं आहे डॉ. हर्षद जोशीने. डॉ. हर्षदची बायको डॉ. वनश्री नरगुंद-जोशी हिने अमेरिकेच्या इंडियाना युनिव्हर्सिटी, ब्लूमिंग्टनमधून ‘सायन्स एज्युकेशन’ या विषयात पीएच.डी. केलं आणि पुढे न्यू जर्सी सिटी युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉइन झाली. हर्षदने वनश्रीच्या करिअरची संधी ओळखून आणि तिच्या स्वप्नांसाठी ब्लुमिंग्टनहून न्यू जर्सीला स्वत:ची नोकरी शिफ्ट केली. हर्षद म्हणतो, ‘वनश्रीने तिचं पीएच.डी. पूर्ण केलं तेव्हा तिला पुढे चांगल्या संधी मिळणं साहजिक होतं. मी स्वत: या क्षेत्रात असल्यामुळे मला माहिती आहे की, योग्य वेळेला योग्य डिसिजन घेतलं तरच यश मिळतं. तिच्या समोर तिचं ब्राईट करियर आहे आणि मी तिच्या प्रगतीसाठी पूर्ण सपोर्ट करेन.’ वनश्री म्हणते, ‘आजच्या युगात दोघांनीही एकमेकांच्या साथ देणं आवश्यक झालंय. एकमेकांच्या चॉइसेसचा आदर करणंही त्यात आलं. खरं तर हे खूप साधं लॉजिक आहे आणि ते असंच सोपं असायला हवं. पण मला जाणीव आहे की, ते तसं नाहीय. आजदेखील बऱ्याच मुलींना हा सपोर्ट मिळत नाही. करिअर डिसिजनचा चॉइस मिळत नाही. हर्षद आणि आमच्या कुटुंबानं माझ्या करिअर चॉइसला पाठिंबा दिल्याबद्दल खरंच मी ग्रेटफूल आहे. माझ्यासाठी योग्य काय हे मला ठरवू दिलं आणि माझ्यासाठी स्वत:चा जॉब शिफ्ट करून अ‍ॅडजस्ट केलं.’
vv09विक्रांत मेहताची पण कहाणी काही वेगळी नाही. बायको दिव्याच्या करिअरसाठी त्याने स्वत:ची चेन्नईला नोकरी बदली करून घेतली. विक्रांत म्हणतो, ‘दिव्याच्या लाँग टर्म ग्रोथसाठी हा चेन्नईचा जॉब महत्त्वाचा होता आणि माझ्यासाठी तिचं करियर. आजच्या मेट्रो लाइफमध्ये करियर सर्वात महत्त्वाचं. मग ते मुलीचं असो वा मुलाचं. जे काही दोघांच्या भल्याचं असेल ते करावं.’
सेटल्ड जॉब, सवयीचं शहर, कुटुंबीय यांना सोडून जाणं सोपं नाही. घर, खाणं-पिणं, भाषा, हवामान सगळंच बदलतं. पण पूर्वीपासून मुली केवळ नवऱ्याच्या नोकरीसाठी हे सगळं अ‍ॅडजस्ट करून घेत होत्या. त्यांनी तसं केलंच पाहिजे हाच समज होता. पण हल्ली अ‍ॅडजस्टमेंट दोन्ही बाजूंनी व्हायला लागली आहे.

नागपूरच्या सिद्धार्थने बायको प्रज्ञासाठी नागपूरहून पुण्याला बदली घेतली. सिद्धार्थ सांगतो, ‘आजच्या २१ व्या शतकात जगताना, लग्नानंतर केवळ मुलीनंच सगळ्या अ‍ॅडजस्टमेंट्स कराव्यात हे म्हणणं इररिलेव्हंट आहे. प्रत्येकासाठी त्याचं करियर महत्त्वाचं असतंच. फक्त नवरा-बायकोमध्ये अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. आम्ही लग्न करायचं ठरवलं तेव्हा प्रज्ञा पुण्याला एका आयटी फर्ममध्ये काम करत होती आणि मी नागपूरला. माझ्यासाठी तिने तिची नोकरी सोडावी असं मला कधीच वाटलं नाही. मधला मार्ग काढायला आम्हाला जवळ जवळ एक वर्ष वेगवेगळ्या शहरांमध्ये राहावं लागलं. मग मी पुण्याला शिप्ट व्हायचं ठरवलं. मला तिथे नोकरी मिळाली आणि आज आम्ही दोघंही आनंदात आपापले जॉब्स सांभाळत एकत्र राहात आहोत.’ सुरुवातीला बायकोसाठी बदली करून घेणं स्वीकारणं जड जाईल अनेकांना, पण खरोखर युवर जॉब इज माय प्रायॉरिटी असं म्हणत तिचं करिअर सांभाळून घेणारा तोच खरा जंटलमन.
निहारिका पोळ

खुलासा
गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या (व्हिवा दि. २२ मे)‘‘भारताच्या मुलीं’ना बदल कधी दिसणार?’ या लेखातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपट दिग्दर्शिकेचे नाव विभा बक्षी असे आहे. विभा दीक्षित असे चुकीने दिले गेले होते. त्याबद्दल दिलगीर आहोत.