कडक शिस्तीमुळे संपूर्ण पोलीस खात्यात दरारा निर्माण करणाऱ्या, दबावाला न जुमानता समाजकंटकांविरोधात कारवाई करणाऱ्या एका कार्यक्षम आणि प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांशी मुक्त संवाद साधायची संधी या वेळच्या व्हिवा लाऊंजमधून मिळणार आहे. या धडाडीच्या व्यक्तिमत्त्वाचे नाव- मीरा बोरवणकर. सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, तुरुंग प्रशासन या पदावर असणाऱ्या मीरा बोरवणकर यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पहिल्या महिला सहआयुक्त होण्याचा मान मिळाला होता. त्या खऱ्या प्रकाशझोतात आल्या त्या मुंबईच्या माटुंगा विभागाच्या उपायुक्त बनल्या तेव्हा. तिथल्या गुंडांचा त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यानंतर अनेक मोठय़ा पदांवर त्यांनी काम केले. पुण्याच्या आयुक्तपदीही त्या होत्या. किरण बेदी यांचा आदर्श  ठेवून मोठय़ा झालेल्या मीरा चड्ढा-बोरवणकर यांचा पंजाबच्या फाझिलका या छोटेखानी शहरातून एका कर्तबगार अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडेल. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश मिळेल.
कधी : बुधवार, २० नोव्हेंबर.
कुठे :  एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे
वेळ :  दुपारी ३.३० वाजता.