पावसाच्या अविरत धारा कोसळत असताना आवडत्या व्यक्तीसोबत बिनधास्त भिजण्यातच या ऋतूचा खरा आनंद आहे. अशा वेळी हिरव्या निसर्गात जायचं, मोकळा श्वास घ्यायचा. हिरव्या निसर्गात नातंही नव्यानं फुलू द्यायचं, उमलू द्यायचं. फेसाळणाऱ्या लाटांसोबत खेळत पावसात भिजण्याची मज्जा काही औरच. आणि सोबत ‘ती’असेल तर आणखी चार चाँद लागतात. मग एक कणीस वाफाळलेलं.. िलबू-तिखट भुरभुरलेलं नि वर कटिंग दोघांत मिळून एक.. चिंब पावसाळ्यातलं रोमँटिक डेटिंग आणि पावसाळ्यातले हे झिम्माड अनुभव..
पहिला पाऊस, एकत्र भिजण्याचा चिंब आनंद आणि त्या ओलाव्यात बहरणारं प्रेम.. सेलिब्रिटीही या रोमँटिक सिझनची वाट बघत असतात. सौरभ गोखले, स्मिता शेवाळे आणि क्षिती जोग सांगताहेत लग्नानंतरचा त्यांचा हा पहिला चिंब अनुभव..
सौरभ गोखले
अनुजा साठेसोबत १९ जानेवारी रोजी विवाहबद्ध झाल्यानंतरचा हा पहिला पाऊस दोघांनी महाबळेश्वरला जाऊन मस्त एन्जॉय केला. दोन दिवस दोघेही चिंब भिजलो. तिकडे जंगलाजवळच्या आनंदवन भुवनमध्ये मी वयाच्या पाचव्या वर्षांपासून जातो आहे, तेथेच आम्ही गेलो, सगळे पॉइंटही फिरलो आणि पावसाळ्यात आइस्क्रीम खाण्याचा वेगळा आनंद घेतला. अजूनही आम्ही दोघे पावसाचा भरपूर आनंद घेणार आहोत. गोव्याला जाणार, पावसाळ्यात गोव्याच्या समुद्राचे वेगळे रूप पाह्य़ला मिळते. तसेच रायगड-राजगड येथे ट्रेकिंगलाही जाणार. अनुजाला ट्रेकिंग फार आवडते, त्यामुळे ती पुण्यातील माझ्या मित्रांसोबत येईल. सिंहगडच्या पायथ्याशी मिसळ व चहा याचाही आनंद घेऊच. पुण्यात पिंपरीतील माझ्या बंगल्याच्या मागे-पुढे छान अंगण असल्याने पाऊस एन्जॉय करता येतो. पावसाळ्यात प्रदूषणमुक्त हवा असते. सर्वत्र हिरवाईदेखील दिसते. हे सगळे कसे छान रोमॅन्टिक आहे ना? मुंबईतील चित्रीकरणातून वेळ मिळताच मी पुण्याला पळतो व बायकोसोबत पावसाळ्यातील नवे बेत आखतो..
क्षिती जोग
सध्या मी मुंबईत, तर माझा नवरा हेमंत ढोमे पुण्यात असा प्रकार असल्याने ठरवूनदेखील आम्हाला ‘लग्नानंतरच्या पहिल्या पावसात एकत्र भिजायला मिळाले नाही.’ जूनमध्ये तसे करावे, एकत्रपणे पाऊस छान एन्जॉय करीत भजी-कॉफीवर ताव मारायचा असा बेत होता, पण दोघांच्याही अभिनय क्षेत्रातील व्यस्त वेळापत्रकामुळे ते शक्य झाले नसले तरी त्याच्याकडून मी जुलै महिना मागून घेतला आहे. मरिन ड्राइव्ह व गोवा अशा दोन ठिकाणी मला त्याच्यासोबत पाऊस एन्जॉय करायचा आहे. मागच्या वर्षी आमच्या साखरपुडय़ानंतर एक पाऊस येऊन गेला. पण सात डिसेंबरला लग्न झाल्यानंतरचा हा पहिला पाऊस सध्या सुरू आहे. तूर्त तो एकमेकांच्या आठवणीत काढला. माझ्या गोरेगावच्या घरातून पाऊस छानच दिसतो, दूरवरच्या डोंगरावरचा त्याचा ‘वर्षां’व पाहून मन आनंदते, विशेषत: या दिवसात संध्याकाळी वातावरण छान प्रसन्न असते.
स्मिता शेवाळे
३ फेब्रुवारी रोजी राहुल ओटक याच्याशी मी विवाहबद्ध झाले आणि लग्नानंतर चारच महिन्यांत आलेल्या ‘पहिल्या पावसा’त आम्ही दोघांनी ‘चिंब’ होण्याचा मनसोक्त आनंद घेतला. आमची गेल्या सप्टेंबरमध्ये ‘पहिली ओळख’ झाली म्हणजे, आम्ही एकमेकांच्या सहवासात आल्यानंतरचादेखील हा पहिला पाऊस. माझे सात-आठ पावसाळे चित्रीकरणासाठी येण्या-जाण्यात सरले, त्यातून वेळ मिळाल्यावर खिडकीत बसून पाऊस पाहण्याचा आनंद मिळवी, सरकणारे ढग, पाऊस गेल्यावर येणारा लख्खपणा हे सगळेच मला आवडे. पण लग्न झाल्यानंतरचा पहिला पाऊस मला विशेष ‘ओलावा’ देणारा ठरलाय. दोघांनाही आपापल्या कामातून वेळ मिळताच आम्ही दोघे दोन-तीन दिवसांसाठी भर पावसात माथेरानला गेलो. पूर्वी मला भिजायला आवडत नसे, मी बऱ्याच बाबतीत निरुत्साही असे. पण राहुलसोबत चिंब भिजायला आवडले व मी उत्साहीदेखील झाले, त्याच्यामुळे रोमॅन्टिक झाले, त्याच्या स्वभावामुळे माझ्यात केवढा तरी बदल होत चाललाय व त्यात हा छानसा मस्त पाऊस आला, त्यामुळे त्याच पावसात राहुलसोबत भिजले, हिंडले, फिरले. हा पाऊस आम्हा दोघांना असाच भिजवत राहावा असे वाटले.. राहुल ओटक चित्रपटसृष्टीतीलच असल्याने येथील कामाच्या स्वरूपाची दोघांनाही पूर्ण जाणीव आहे.