‘ओह, सो यू आर द मॅन ऑफ द हाउस?’ या मित्राच्या नवऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर ‘इव्हन बेटर, आय अम द वुमन ऑफ द हाउस’, असं शांत पण सडेतोड उत्तर देणारी ‘ती’ आपल्या सगळ्यांना अगदी लगेच आठवली असेल. एका ज्वेलर्सची ही जाहिरात म्हणजे ‘वर्किंग वाइफ’ला डोळ्यापुढे ठेवून केलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी जरी असली तरी खूप बोलकी व वेगळा विचार मांडणारी आहे आहे. जवळपास सगळ्या जाहिरातींच्या केंद्रस्थानी स्त्रीपात्र असतं. परंतु सध्याच्या ‘ती’ची भूमिका ‘सेक्स किंवा अपििलग ऑब्जेक्ट’ च्या पलीकडे जाऊन नवीन व पॉझिटिव्ह विचार रुजवू पाहताना दिसतीये. या सगळ्या बदलांकडे यंगिस्तान कसं पाहतंय हे या लेखाच्या निमित्ताने जाणून घेतलंय.
नेमका काय बदल जाहिरातींमधून जाणवतोय यावर तृप्ती तांबे म्हणते, ‘सेक्स ऑब्जेक्ट च्या पलीकडे जाऊन स्त्रीच्या कामाचा बदललेला आवाका व त्यानुसार नातेसंबंधांमध्ये झालेले हळुवार बदल सध्या जाहिरातींमध्ये दिसतात. ते खूपच आशादायक आहे. अगदी शंभर टक्के जरी आपण या बदलाशी रिलेट होऊ शकत नसलो, तरी रिलेट व्हायला आवडेल हे नक्की!’ शाल्मली रेडकरच्या मते, ‘पूर्वी नवऱ्याचे मळके कपडे धुणे आणि घरची भांडी घासणे, मुलांचं संगोपन या भूमिकांमध्ये दिसणाऱ्या स्त्रिया आता अडचणीत सापडलेल्या गाडीला मदत करताना दिसतात. त्या टिपिकल चौकटीतून आपल्या हेमा-रेखा-जया-सुषमा बाहेर येताहेत ही खूप चांगली गोष्ट आहे.’
मुंबईचा श्रेयस मेहेंदळे एक वेगळा मुद्दा मांडतो. ‘विषयाचा मुद्दा सांगण्यासाठी गरज नसताना अंगप्रदर्शन दाखवणं हा पॅटर्न बदलतोय.
बऱ्याचशा ड्रेसमधून स्त्रियांचं बदललेलं व मानाचं स्थान अधोरेखित होतंय ही खूप चांगली गोष्ट आहे. या अशा जाहिरातींचं प्रतििबब चांगल्या पद्धतीने समाजात पडावं,’ असं श्रेयस मेहेंदळेला वाटतं. हा बदल चांगला आहे अशा आशयाचं मत मांडतानाच पुण्याचा ऋत्विज आपटे आणखी मुद्दा पुढे करतो.. रिअॅलिस्टिक जाहिरातींचा. त्याच्या मते, ‘स्त्रियांचं प्राबल्य आणि सकारात्मक बदल या गोष्टी मान्य आहेतच. पण या सर्व जाहिराती अजूनही रिअॅलिस्टिक वाटत नाहीत. जाहिरातींमधली आई-आजी आपल्याला जवळची आणि खरी वाटत नाही. त्यामुळे ओव्हर एग्झ्ॉजरेशन कमी केल्यास या जाहिरातींचा अजून चांगला प्रभाव पडू शकतो.’
मोनालीच्या मते, ‘नुकतीच आलेली एअरटेल फोर जीची अॅडही आपण राहत असलेल्या समाजाचं पूर्ण प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळे अनरिअॅलिस्टिक वाटू शकते. पण अशा प्रकारे जर समाजमनावर चांगला परिणाम होणार असेल तर माझ्या मते चित्र बदलायला सुरू होईल, ही आशा आपण कायम ठेवू शकतो.’ परंतु याच एअरटेलच्या जाहिरातीत ती कितीही मोठी बॉस दाखवली असली तरी घरी
येऊन ती किचनमध्ये काम करते हा स्टिरिओटाइप आपल्या जाहिराती काही सोडायला तयार नाहीत,’ असं कल्याणी होनरावला वाटतं. पण निदान अमुकतमुक डीओ लावला की मुली मागे पळत सुटतात, हा वेडेपणा बंद झालाय हे चांगलं लक्षण आहे. जाहिरातींमध्ये ‘ती’ नक्कीच बदलतीये पण आता खऱ्या आयुष्यातसुद्धा तिने हे बदल स्वीकारायला हवेत असं कल्याणीला वाटतं. अजूनही जाहिरातींमधून स्त्रियांना घराच्या किंवा घरकामाच्या चौकटीतून पूर्णपणे बाहेर काढलेलं नाहीये. अजूनही ‘ती’ शॉपोहोलिक किंवा मग चोंबडेपणा करणारी किंवा एनर्जेटिक राहण्यासाठी चहा किंवा बिस्किटाची मदत घेणारी दाखवली जाते. पण तरीही जाहिरातींमधून तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या कक्षा रुंदावताना दिसताहेत आणि हा बदल नक्कीच आश्वासक आहे.
आम्हाला भावणाऱ्या हेमा, रेखा, जया आणि सुषमा
‘ओह, सो यू आर द मॅन ऑफ द हाउस?’ या मित्राच्या नवऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर ‘इव्हन बेटर, आय अम द वुमन ऑफ द हाउस’, असं शांत पण सडेतोड उत्तर देणारी ‘ती’ आपल्या सगळ्यांना अगदी लगेच आठवली असेल.

First published on: 07-03-2015 at 01:29 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men thinking changes toward women