वैद्यकशास्त्रामध्ये वरचेवर नवनवीन गोष्टींचे शोध लागत असल्याने प्रत्येक आजार, स्थितीला व्याख्या आणि संज्ञा प्राप्त झाल्या आहेत. पीएमएस अर्थात प्री मेन्स्ट्रअल सिण्ड्रोम हा प्रजोत्पादनाची क्षमता शाबूत असणाऱ्या स्त्रियांमध्ये तात्पुरत्या काळासाठी आढळणारा सिण्ड्रोम असतो. मासिक पाळी सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी तो त्यांच्यात दिसतो. पीएमएसमागचं निश्चित कारण अद्याप माहीत नसलं तरी विशेषत्वाने मेंदूमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे तो होत असावा, असं सर्वमान्य मत आहे. हा एक सर्वसाधारण न्यूरोट्रान्समीटर असून मनोस्थितीत होणाऱ्या चढउतारांदरम्यान मन शांत आणि मोकळं राहण्यासाठी हा न्यूरोट्रान्समीटर काम करतो. त्याची पातळी कमी झाल्यास स्त्रियांना आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक वर्तणुकीमध्ये बदल झाल्याचं जाणवतं.
२० ते ४० या वयोगटातल्या प्रत्येकी ४ पकी तीन जणींना या सिण्ड्रोमने ग्रासल्याचं दिसतं. त्याची लक्षणं व्यक्तीगणिक वेगवेगळी असली तरी मासिक पाळी यायच्या काही दिवस अगोदर ती दिसू लागतात आणि पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी नाहीशी होतात.
यादरम्यान डोकेदुखी, त्रागा, गोंधळलेपण, स्वत:चाच राग येणं याचबरोबर चिंता, ताण, सतत मूड बदलत राहणं, बराच प्रयत्न करूनही चित्त एकाग्र न होणं ही लक्षणंही दिसतात. एवढंच नाही तर या दिवसांत स्त्रियांना तात्पुरता विसरभोळेपणाही जडतो. शरीरावर दिसणारे परिणाम म्हणजे पोटात गॅस होणं, फुगलेपण, बद्धकोष्ठता, हगवण, स्तन संवेदनशील बनणं, भरपूर घाम येणं ही लक्षणंही सर्वसामान्यत: दिसतात. आणखी एक महत्त्वाचं लक्षण कदाचित तुमच्या नजरेतून सुटू शकेल, ते म्हणजे विशिष्ट पदार्थाची भूक लागणं. त्यात चॉकलेटसारख्या गोड पदार्थापासून मिसळ-पावसारख्या झणझणीत पदार्थापर्यंत काहीही असू शकेल. असा एखादा पदार्थ खाण्याने तुम्हाला क्षणिक समाधान मिळेलही, पण कदाचित त्यामुळे इतर लक्षणांना चालना मिळेल.
पीएमएसच्या लक्षणांवर नियंत्रण आणण्यासाठी आहाराची काही मार्गदर्शक तत्त्वं पाळणं आवश्यक आहे. कारण ही लक्षणं वाढत जातात, असं पाहण्यात आलं आहे. त्यांच्यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही, तर ती दर महिन्याला डोकं वर काढतात.
० या काळात गोड पदार्थ विशेषत: चॉकलेटचं सेवन टाळावं. बऱ्याच चॉकलेट्समध्ये कॅफिन हा घटक आढळतो, ज्यामुळे अस्वस्थता वाढते आणि परिस्थिती आणखी चिघळू शकते.
० मिठाच्या अतिसेवनामुळे शरीरात द्रवपदार्थ साठण्याचं प्रमाण वाढतं. पुढे त्यामुळे शरीर फुगू लागतं आणि पोटात त्रास होऊ लागतो. त्यामुळे एकूणच आहारातलं मिठाचं प्रमाण नियंत्रणात आणणं आवश्यक आहे.
० एखादा पदार्थ खाण्याच्या तीव्र इच्छेमुळे मद्याचे चवदार आणि तळलेले पदार्थ खाण्याचा मोह होऊ शकतो. हे पदार्थ शरीरात झपाटय़ाने शोषले जातात आणि त्यामुळे ते पदार्थ जास्त काळ पोटात राहत नाहीत आणि लगेचच भूक लागते.
० आणखी एक टाळायची मुख्य गोष्ट म्हणजे जेवण टाळणं. त्यामुळे रक्तातल्या शर्करेची पातळी घटते, ज्यामुळे डोकेदुखी आणि थकवा हे त्रास उद्भवतात.
० ब्राऊन राइस, अख्खी धान्यं, चवळी वर्गातली कडधान्यं, काजू आणि डाळी हे भरपूर मॅग्नेशिअम असलेले पदार्थ खाल्ल्याने सेरोटॉनिनचं योग्य प्रमाण राखलं जाऊन मन शांत होतं आणि मन:स्थितीही चांगली राहते.
० भरपूर पुफा म्हणजेच पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आणि मुफा म्हणजेच मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स असलेले पदार्थ खाल्ल्याने पोटफुगीचा त्रास कमी होतो. शाकाहारी व्यक्तींनी थोडय़ाथोडय़ा प्रमाणात दोन जेवणांच्या मधल्या काळात अक्रोड, आळशीच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया खाव्यात, तर मांसाहारींनी टय़ुना आणि सॅलमन हे मासे खावेत.
० शहाळ्याचं पाणी, िलबूपाणी, किलगडाचा रस किंवा काकडी, टोमॅटो, दुधी यांचं सूप असे द्रवपदार्थ प्यावेत. त्यामुळे शरीरातले टाकाऊ तसेच विषारी घटक धुऊन जातात.
० त्रागा, वैतागलेपण आणि नराश्य यांना दोन हात लांब ठेवण्याच्या कामी जीवनसत्त्व कामी येतं. त्यामुळे संत्री, मोसंबीसारखी िलबू वर्गातली फळं खावीत.
० सफरचंद आणि संत्र्यासारखी मुबलक पोटॅशिअम असलेली फळं खाल्ल्याने सतत मूड बदलण्याच्या प्रवृत्तीला आळा बसतो. त्यामुळे ही फळं रोजच्या आहारात असावीत.
० कॅल्शिअम, अ जीवनसत्त्व, क जीवनसत्त्वाने युक्त असलेले खाद्यपदार्थ खावेत. कॅल्शिअमसाठी दूध, अ जीवनसत्त्वासाठी अंडी, गाजर आणि पिवळ्या-नािरगी रंगाची फळं, ई जीवनसत्त्वासाठी बदाम, मासे आणि अॅव्हॅकॅडोज खाल्ल्यानं सेरोटिनचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
शेवटची पण अत्यंत महत्त्वाची बाब, रक्तातल्या शर्करेचं प्रमाण शक्य तेवढं नियंत्रणात ठेवावं. त्यामुळे अनावश्यक भूक आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांना टाळता येतं. त्यामुळे दर दोन तासांनी खावं, नियमित व्यायाम करावा, पुरेशी विश्रांती आणि झोप घ्यावी तसंच योग, पॉवर योगा, कॅलिसथेनिक्स, चालणं अशा अॅक्टिव्हिटीज कराव्यात. संपूर्ण शरीराला आराम देणारा मसाज करावा.
या सर्वामुळे ताण कमी होईल आणि तुम्हाला ताजंतवानं वाटेल आणि काम करण्यास नवी ऊर्जा मिळेल.
मिकीज् फिटनेस फंडा : असा द्या पीएमएसशी लढा
वैद्यकशास्त्रामध्ये वरचेवर नवनवीन गोष्टींचे शोध लागत असल्याने प्रत्येक आजार, स्थितीला व्याख्या आणि संज्ञा प्राप्त झाल्या आहेत. पीएमएस अर्थात प्री मेन्स्ट्रअल सिण्ड्रोम हा प्रजोत्पादनाची क्षमता शाबूत असणाऱ्या स्त्रियांमध्ये तात्पुरत्या काळासाठी आढळणारा सिण्ड्रोम असतो.
First published on: 22-03-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mickeys fitness funda ways to fight premenstrual syndrome pms