मनुष्यप्राण्यामध्ये पुरुषांच्या जोडीला स्त्रीही महत्त्वाची आहे. त्यामुळे शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक उत्कर्षांसाठी ‘आरोग्य’ हा घटक तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संपूर्ण आरोग्यासाठी जीवनशैलीत काही बदल घडवून आणणं आवश्यक आहे. त्यात पौष्टिक आहाराची निवड, नियमित आणि सुयोग्य शारीरिक व्यायाम, योग, ध्यानधारणा आणि विश्रांती यांचा समावेश होतो.
ताणतणाव, अयोग्य आहार यामुळे उद्भवणाऱ्या रोगांना जागा नसणाऱ्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी पुढील व्यायाम आणि आहारसूचनांचं अवश्य पालन करा-
१) शारीरिक व्यायाम- आपल्या शरीराच्या तसंच मनाच्या आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळे कार्यक्षमता वाढते, शरीर लवचिक आणि सुदृढ बनतं आणि शरीराचं वजन नियंत्रित राहतं. अशा व्यायाम प्रकाराची निवड करा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. अ‍ॅरोबिक्स, कॅलिस्थेनिक्स, पायलेट्स, बूट कॅम्प, नृत्य, जिम वर्कआऊट असा कोणताही व्यायाम प्रकार अंगीकारा. व्यायामाचा असा फिटनेस कोर्स स्वीकारा, जो व्यवहार्य असेल आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतील.
२) नेहमीच्या व्यायामाला चालण्याची जोड द्या. हा असा व्यायाम प्रकार आहे, ज्याला कोणत्याही उपकरणाची गरज नसते, ज्यातून फिटनेस मिळवता येतो, शारीरिक बळ वाढतं आणि सहनशक्तीही वाढते.
३) व्यायाम कार्यक्रमामध्ये योगाचे किमान तीन दिवस असावेत. योगसाधनेमुळे भीती, दडपण, नकारात्मक विचार, अढी या गोष्टींचा निचरा होतो आणि मनाला समाधान आणि शांतता प्राप्त होते. दररोज प्राणायाम केलाच पाहिजे. त्यामुळे मन आणि शरीर ताजंतवानं होतं. वैचारिक गोंधळ दूर होतात आणि विचार अधिक सुस्पष्ट होतात.
४) झोप, विश्रांती आणि आराम याचा आपल्या शरीरावर चांगलाच परिणाम होतो आणि त्यामुळे ताणतणावही दूर राहतात. मानसिक आणि शारीरिक सुदृढतेसाठी या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
५) अख्खी धान्यं, बाजरी, फळं, भाज्या, मोड आलेली धान्यं, चवळी वर्गातली धान्यं आदी भरपूर फायबर असलेले अन्नघटक आहारात असावेत.
६) नियमितपणे थोडं थोडं खावं. कोणत्या वेळी, कोणता पदार्थ किती खाता याचा आपलं आरोग्य, वजन आणि चयापचय प्रक्रियेवर परिणाम होत असतो.
७) बरेच जण सतत चटपटीत पदार्थ खातात आणि भरपेट जेवतात. ते टाळल्यास कंटाळा किंवा ताणतणाव दूर होऊ शकतात. जेवणांच्या मधल्या वेळात पोटभरीसाठी फळं, सुकामेवा, ग्रीन टी किंवा हर्बल टीसारखी पेयं प्यावीत.
८) भरपूर पाणी पिऊन आपल्या शरीरातली आद्र्रता टिकवून ठेवावी. उत्तम रक्ताभिसरणासाठी आवश्यक आणि योग्य प्रमाणात पाणी प्यावं. त्यामुळे तुमची त्वचाही चमकदार बनेल.
९) दोन ते तीन वेळा भरपूर जेवण्यापेक्षा दिवसातून पाच ते सहा वेळा थोडं थोडं खावं. अशाने चयापचय प्रक्रियेला वेग मिळतो.
१०) जंक फूड, मदा, तेल, साखर आणि मिठाचं अतिसेवन टाळावं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा