आजकाल आरोग्याचं महत्त्व सर्वानाच पटलं असल्याने त्याला झुकतं माप दिलं जातं. अधिकाधिक लोक, विशेषत: स्त्रिया पोषणतत्त्वांच्या अभावामुळे भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारामध्ये पोषणाचं संतुलन साधण्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसतात. बहुतेक सर्वच स्त्रियांमध्ये एका पोषणतत्त्वाचा अभाव असतोच. तो म्हणजे लोह. शरीराच्या सर्व जैविक क्रियांमध्ये लोह अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाव असतं. त्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे तुम्ही अॅनिमिक बनू शकता. म्हणूनच या अवस्थेला डेफिशिअन्सी अॅनिमिया किंवा आयडीए असंही म्हटलं जातं.
लोह हा हिमोग्लोबिनमधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या हिमोग्लोबीनमुळे आपल्या रक्तातल्या लाल रक्तपेशी फुप्फुस, मेंदू तसंच इतर अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करतात. लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींची संख्या घटते आणि महत्त्वाच्या अवयवांना होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठय़ावरही परिणाम होतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
सतत थकवा वाटणं, कंटाळा येणं, अशक्तपणा, नराश्य, छातीत दुखल्याने होणारी चिडचिड, अनियमित मासिक पाळी, बधिरपणा, डोकेदुखी, ठिसूळ नखं, निस्तेज त्वचा, अनियमित छातीचे ठोके आदी तक्रारींचं मूळ यात असू शकतं. ही सर्व कमकुवत रोगप्रतिकारशक्तीची लक्षणं आहेत.
आता तुम्हाला विचार पडला असेल की लोह कमतरता असणाऱ्यांमध्ये आपला समावेश कसा असू शकेल? त्याची उत्तरं पुढे आहेत-
१) लोहाची कमतरता असलेला आहार- बऱ्याच अन्नघटकांमध्ये लोह असतं पण आपण ग्रहण केलेल्या १० ते २० मिलिग्रॅम लोहापकी आपलं शरीर केवळ १ मिलिग्रॅम लोहच शोषू शकतं. त्यामुळे आपल्या शरीराची लोहाची आवश्यकता खूप जास्त असते. त्यामुळे या खनिजाची कमतरता निर्माण न होण्यासाठी भरपूर लोह असणारे अन्नघटक खाल्ले पाहिजेत.
२) नेमक्या किती लोहाची आवश्यकता असते?- आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लोहाची गरज वेगवेगळी असते. एखाद्या प्रौढ व्यक्तीपेक्षा लहान मूल किंवा किशोरवयीनांना लोहाची जास्त आवश्यकता असते कारण त्यांची वाढ होत असते. त्याचप्रमाणे गर्भार स्त्रियांना आधीपेक्षा आत्ता दुप्पट लोहाची असते. कारण गर्भालाही लोहाची आवश्यकता असते. तसंच प्रसूतीदरम्यान भरपूर रक्त जात असल्याने ती कमतरताही भरून काढायची असते. पुढे स्तनपान देत असल्यानेही स्त्रीची लोहाची गरज वाढते.
३) िलग- स्त्री अॅनिमिक होण्याची शक्यता अधिक असते. दर महिन्याला मासिक पाळीदरम्यान भरपूर रक्तस्राव होत असल्याने त्यांच्या शरीरातलं लोह कमी होत राहतं. गर्भारपण, प्रसूती आणि दुग्धस्रवणामुळेही त्यांच्या शरीरातला लोहाचा साठा कमी होत जातो. पुरुषांमध्ये यापकी कोणतीही अवस्था येत नसल्याने त्यांच्या शरीरातला लोहाचा साठा अबाधित राहतो. मात्र ज्या पुरुषांवर गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या असतात ते मात्र याला अपवाद ठरतात.
४) गर्भारपण आणि दुग्धस्रवण- अनेक गर्भार स्त्रियांना मॅटर्नल आयर्न-डेफिशिअन्सी अॅनिमियाला तोंड द्यावं लागतं. या स्त्रियांना भरपूर लोहाची गरज असते कारण- १) सतत वाढत असलेल्या गर्भाला ऑक्सिजनपुरवठा २) स्वत:च्या शरीरासाठी लागणारं लोह ३) पुढे प्रसूतीदरम्यान बरंच रक्त जाणार असल्याने शरीराला आधीपासूनच जादा लोहाची तजवीज करावी लागते. एकटय़ा आहारातून गर्भवती स्त्रीला तिच्या शरीरासाठी तसंच गर्भासाठी पुरेसं लोह मिळणं कठीण असतं. त्यामुळे डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे सप्लिमेण्ट्स घ्याव्या लागतात. गर्भारपणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत शरीरातलं रक्ताचं प्रमाण तब्बल ४० टक्क्यांनी वाढतं. रक्ताच्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे प्लाझ्मा प्रोटिन्स, हिमोग्लोबीन आणि इतर रक्तघटकांचं केंद्रीकरण कमी होतं. एकूण रक्ताच्या प्रमाणात वाढ होऊनही रक्त-विरलन (हेमो-डायल्युशन) होतं. त्यामुळे हिमोग्लोबीनच्या संश्लेषणासाठी शरीराला पुरेशा लोहाची गरज भासते.
५) इतर पोषक घटक- इतर पोषक घटक जसं, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी-६ हिमोग्लोबीनमध्ये लोहनिर्मितीसाठी साहाय्यभूत ठरतात. त्यामुळे या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबीनची पातळी खालावते आणि त्यामुळे जे व्हायचं तेच होतं.
त्यामुळे भरपूर प्रमाणात लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी-६ असलेला आहार आपण नियमितपणे घेतला पाहिजे. ज्यामुळे शरीराला आवश्यक तेवढं लोह मिळेल आणि आपण अॅनिमिया होण्यापासून वाचू.
१) मटणामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. त्याचबरोबर मासे, कोंबडीचं मांस आणि प्राण्यांच्या इतर अवयवांमध्येही मुबलक लोह असतं.
२) शाकाहारींना अहळीवाच्या बिया, कॉलिफ्लॉवरचा हिरवा भाग, शेपू, चवळी वर्गातली धान्यं, डाळी, मटार, गडद हिरव्या पालेभाज्या, पोहे यांतून पुरेसं लोह मिळेल.
३) अख्खी धान्यं, मल्टिग्रेन ब्रेड, हिरव्या पालेभाज्या आणि अंडी हे फॉलिक अॅसिडचे स्रोत आहेत, जे हिमोग्लोबीन निर्मितीला चालना देतं.
४, संत्रं, मोसंबी, किवी ही फळं भरपूर खावीत. त्याचबरोबर ब्रोकोली, सिमला मिरची आणि टोमॅटो या फळभाज्याही भरपूर खाव्यात.
जगाची २५ टक्के लोकसंख्या पुरेशा लोहाअभावी जगते ज्यात स्त्रियांचा वाटा सर्वाधिक म्हणजे १८ टक्के आहे. त्यामुळे आपल्या आहारात असा बदल घडवून आणला पाहिजे जेणेकरून ते लोह शोषून घेण्यास आपल्या शरीराला मदत करेल. त्यामुळे अॅनिमियापासून वाचण्यासाठी शरीरातली हिमोग्लोबीनची सुयोग्य पातळी राखली जाईल.
मिकीज् फिटनेस फंडा : आयर्न की बात हैं..!
आजकाल आरोग्याचं महत्त्व सर्वानाच पटलं असल्याने त्याला झुकतं माप दिलं जातं. अधिकाधिक लोक, विशेषत: स्त्रिया पोषणतत्त्वांच्या अभावामुळे भविष्यात होऊ शकणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारामध्ये पोषणाचं संतुलन साधण्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसतात. बहुतेक सर्वच स्त्रियांमध्ये एका पोषणतत्त्वाचा अभाव असतोच. तो म्हणजे लोह.
First published on: 15-03-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mikis fitness funda the importance of iron in the body