मितेश जोशी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ नवी दिल्लीत करण्यात आला. या अभियानाच्या निमित्ताने तरुणाईच्या मनात फिटनेसच्या नेमक्या काय व्याख्या आहेत? रोजच्या धावपळीच्या जीवनात फिटनेसला ते किती महत्त्व देतात? हे अभियान भविष्यात फिटनेस क्षेत्रावर किती प्रभाव टाकेल? याचा व्हिवाने घेतलेला विशेष आढावा.

व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।

आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

व्यायामाद्वारेच आरोग्य, दीर्घायुष्य, सामर्थ्य आणि सुख प्राप्त होते. निरोगी असणे हे परमभाग्य आहे आणि आरोग्याद्वारेच अन्य सर्व कार्य सिद्धीला जातात, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. मात्र काळाच्या ओघात या सुभाषितांमधून मांडले गेलेले विचार मागे पडत चालले आहेत. पूर्वी आपल्याला शिकवले जायचे, आपल्याला ऐकायला मिळायचे की आरोग्याद्वारेच सर्व कार्य सिद्धीला जातात, आता ऐकायला मिळते की स्वार्थातूनच सर्व कार्य सिद्धीस जातात. आणि म्हणूनच या स्वार्थ भावनेत निदान स्वत:चे स्वास्थ्य नीट ठेवण्याचा विचार जपला जायला हवा, यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक ठरले आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ नवी दिल्लीत करण्यात आला. ‘हे सरकारी अभियान नाही. सरकार एक प्रसारक म्हणून हा विषय पुढे नेईल, मात्र एक प्रकारे व्यायाम हा प्रत्येक कुटुंबाचा हा कार्यक्रम बनायला हवा, प्रत्येक कुटुंबाच्या चर्चेचा विषय बनायला हवा’, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. या ‘फिट इंडिया’ अभियानाची वीट केवळ ‘फिटनेस’ किंवा ‘तंदुरुस्ती’ यावर रचलेली नसून त्यात ‘निरोगी’ आणि ‘समृद्ध जीवन’ यालाही अग्रक्रम देण्यात आला आहे. विशेषत: महाविद्यालयीन तरुणाईत त्याबद्दल अवेअरनेस येणे गरजेचे असल्याने या अभियानांतर्गत त्यावर भर देण्यात आला आहे. मात्र सध्याच्या धावपळीच्या जीवनात कॉलेज तरुणाई फिटनेस, जिम, डाएट या सगळ्याकडे कोणत्या नजरेने बघते याची उकल फिटनेस ट्रेनर, न्यूट्रिशियन विराज हजारेने करून दिली. विराज सांगतो, ‘फिटनेसबद्दल मुलामुलींमध्ये वरवरची उत्सुकता दिसते. त्यावर फारसा गंभीरपणे विचार केला जात नाही. जिममध्ये मी अनेक कॉलेज तरुणांना वर्कआऊ ट देतो. मी अनेक मुलं पाहिली आहेत जी १ जानेवारीला फिट दिसण्यासाठी जिमची फी, स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स गॅजेट यांसारख्या गोष्टींवर १५ हजार रुपये खर्च करतात. पण काही महिन्यांनंतर १५ मिनिटेसुद्धा या गोष्टींचा ते वापर करत नाहीत. अनेक मुलंमुली असेही असतात जे कोणत्या तरी सेलिब्रिटीला फॉलो करत असतात आणि त्यांची देहयष्टी कमवण्याची इच्छा आम्हा ट्रेनरजवळ व्यक्त करतात. मुळात ती देहयष्टी त्या सेलिब्रिटीसारखीच जर तुमची नसेल आणि ती त्या पद्धतीने सहज कमवता येऊ  शकत नसेल तर केवळ आपल्याला आवडते म्हणून त्या पद्धतीने शरीर कमवून काहीही उपयोग नाही. फिटनेस क्षेत्रातल्या क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टीच कॉलेज तरुणांना जास्त आवडतात, असं तो सांगतो. ‘फिटनेस टॉक्स विथ प्रणित’चे सर्वेसर्वा प्रणित शिळीमकर सध्याच्या तरुणाईच्या चुकीच्या लाइफस्टाइलविषयी व फिटनेसच्या चुकीच्या दृष्टिकोनाविषयी बोलताना म्हणाला, ‘आजची तरुणाई मागच्या पिढीची कोणतीच गोष्ट स्वीकारायला तयार नाही. आपल्या आईवडिलांची जी पिढी आहे, त्यांचा आहार, त्यांची लाइफस्टाइल, त्यांचा दिनक्रम आपल्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे. आजच्या तरुणाईची झोपायची-उठायची वेळ, नाश्ता-जेवणाची वेळ ठरलेली नसते. तेच आपल्या घरच्या मोठय़ा लोकांकडे बघितलं तर त्यांची सगळी कामं, आहार सगळं शिस्तीत आणि वेळेत चालू असतं. अगदी थोडं मागे जात आपल्या आई-वडिलांची जीवनशैली आणि त्यांची प्रकृती यांचा विचार केला तर दहा वर्षांपूर्वी किंवा वीस वर्षांपूर्वी त्यांची जी शरीरयष्टी होती तीच त्यांची आताही आहे. त्यात फारसा काही फरक पडलेला नाही, हे तुम्हाला जाणवेल’, असं प्रणित म्हणतो. मात्र तेच आपण स्वत:कडे पाहिलं तर चुकीचे अनहेल्दी पदार्थ सतत खात राहिल्याने दहा दिवसांपूर्वीचे आपण आणि आताचे आपण यात लगेच तफावत जाणवते. असं का होतं? तर याला आपणच जबाबदार आहोत. झोपेचा बेड, बिल्डिंगची लिफ्ट, गाडी, ऑफिसची लिफ्ट आणि स्वत:चा ऑफिसचा डेस्क या चक्रात आजची तरुणाई अडकून पडली आहे. त्यांचे फिटनेस गोल्स हे इव्हेंट स्पेसिफिक होत चालले आहेत. माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मला बारीक व्हायचंय, माझा हा शो आहे म्हणून मला जाड व्हायचंय. असं का? त्याच्यानंतर काय? याची उत्तरं त्यांच्याजवळ नाहीत, असं प्रणित सांगतो. ‘फिट इंडिया’ अभियानांतर्गत महाविद्यालयीन स्तरावरच तरुणाईत फिटनेसचे महत्त्व  बाणवण्याचा प्रयत्न झाला तर ते त्यांच्या दृष्टीने फायद्याचेच आहे. त्यांनी पारंपरिकपणे व्यायामाचा पुरस्कार न करता तंदुरुस्तीचा व निरोगी समृद्ध जीवनाचा पुरस्कार केला पाहिजे आणि ही जाणीव त्यांना या अभियानातून होणे गरजेचे असल्याचेही प्रणितने सांगितले.

तरुणाई फिटनेसच्या बाबतीत बव्हंशी कलाकारांना फॉलो करते. आपल्या क्षेत्रातील गरज म्हणून किंवा आवड म्हणून जाणीवपूर्वक फिट राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कलाकारांनी या उपक्रमाचं स्वागतच केलं आहे. अभिनेता अभिजित खांडकेकर याविषयी म्हणतो, फिटनेस क्षेत्र हे आजघडीला खूप मोठं व्यावसायिक क्षेत्र बनलं आहे. व्यायाम आणि डाएट या दोन्ही गोष्टी खरंतर हातात हात घालून जातात. अनेक जिम ट्रेनर हे मी काय काय खाऊन, कशी मेहनत घेऊन बॉडी बनवली हे सांगण्यात धन्यता मानतात. त्याचाच परिणाम त्यांना फॉलो करणाऱ्या तरुणाईवरही होत असतो. पण समोरच्या व्यक्तीला हे डाएट झेपेल का? त्याला बॉडी बनवण्यासाठी नाही तर फिट राहण्याची गरज आहे हा साधा विचारही केला जात नाही. आज फिटनेस अ‍ॅप मार्केटमध्ये आहेत. ज्याचा फायदा आज अनेकजण घेताना दिसत आहेत. पण आपण जो व्यायाम करतोय तो चूक आहे की बरोबर हे ते अ‍ॅप आपल्याला सांगू शकत नाही. त्यासाठी विश्वासार्ह आणि परिपूर्ण अशा फिटनेस अ‍ॅप्सची गरज आहे. शिवाय, सध्या अनेक प्रोटिन पावडर, इंजेक्शनची भुरळ आजच्या तरुणाईला पडली आहे. काही इंजेक्शन तर चक्क घोडय़ाला दिली जाणारी इंजेक्शन्स जिममध्ये ट्रेनर घ्यायला लावतात. सिक्स पॅक व झिरो फिगरचा अट्टहास यामुळे लैंगिक त्रास, चिडचिडेपणा तरुणाईच्या आयुष्यात वाढतो आहे. त्यामुळे फिट इंडियासारख्या उपक्रमातून तरुणाईला व्यायाम-फिटनेस याबाबतची शास्त्रशुद्ध माहिती समजावून द्यायला हवी. आणि चुकीच्या गोष्टींवर सरकारने कठोर पावले उचलायला हवीत. एकाअर्थी अशा अभियानाने प्रत्यक्षात फिटनेसची रुजवात झाली तर त्याचे सकारात्मक पडसाद समाजमनावर उमटतील एवढं मात्र निश्चित, असं तो म्हणतो. तर अभिनेता हार्दिक जोशीच्या मते, ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियानामुळे कचरा इतस्तत: फेकू नये, याबाबतीत जनजागृती झाली. शिवाय एक सुसूत्रता व शिस्त जनतेला लागली अशीच शिस्त व सुसूत्रता फिटनेस क्षेत्रात या अभियानामुळे यायला हवी. दहा वर्षांपूर्वीची लहान मुलं आणि आजची लहान मुलं यांच्या स्वभावात दिसणारे बदल, त्यांची जीवनशैली याला जबाबदार आहेत ते आजचे मार्के टमधले गेम्स. शारीरिक सुदृढता देणारे,  नवी ऊ र्जा देणारे मैदानी खेळच या मुलांना माहिती नाहीत. त्याचबरोबर आज चौकाचौकात जिम सुरू होत आहेत. अनेकजण तिथे गर्दी करतात. कोणी फिट दिसण्यासाठी तिथे जातं, कोणी शरीराला एका साच्यात बांधून घेण्यासाठी वगैरे वगैरे. पण यातून फार कमी जण आपल्याला दिसतील जे ‘मी बलवान होण्यासाठी जिम करतोय’, असं सांगतील. व्यायामाने जरी शारीरिक सुदृढता, सकारात्मक ऊर्जा मिळत असली तरीही आपल्याला बळ मिळतं याचा विसर आजच्या तरुणाईला पडला आहे. जीवनशैलीतील या बेशिस्तीमुळे त्याच्याशी संबंधित आजार आजच्या तरुणाईला होत आहेत. पूर्वीच्या काळी ३० वर्षांच्या तरुणाला मधुमेह झाला किंवा ४० वर्षांचा तरुण हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गेला, असं ऐकायला मिळत नव्हतं. पण आजकाल अशा बातम्या सहज ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी बदलण्यासाठीच फिट इंडियासारख्या उपक्रमांची महाविद्यालयीन स्तरापासूनच गरज आहे, असं हार्दिक म्हणतो. आजच्या कॉलेज तरुण-तरुणींनी लहान वयातच आपल्या दिनचर्येत छोटे-छोटे बदल करून, आपल्या जीवनशैलीत बदल करून तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे त्याने सांगितले.

सध्या विविध देशांत शारीरिक सुदृढतेसाठी ठोस पावले उचलली जात आहेत.  चीन २०३० पर्यंत फिटनेससाठी मिशनमोडमध्ये काम करत आहे. २०३० पर्यंत चीनचा प्रत्येक नागरिक तंदुरुस्त असावा यासाठी त्यांनी संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे. अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियातही आपल्या नागरिकांची शारीरिक सक्रियता वाढवण्यासाठी आणि निष्क्रियता कमी करण्यासाठी नागरिकांना फिट राहण्याचा दृष्टीने ध्येय निश्चित करून देण्यात आली आहेत. ब्रिटनमध्येही यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. २०२० पर्यंत पाच लाख लोक दररोज व्यायाम करतील, असे ध्येय त्यांनी निश्चित केले आहे. जर्मनीतदेखील फिट इन्स्टेड ऑफ फॅट हे मोठे अभियान सुरू आहे. याच धर्तीवर आपणही मागे न राहता फिटनेससाठी स्वत:हून प्रयत्न करायला हवे आहेत.

viva@expressindia.com

Story img Loader