|| आदित्य केतकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणसाने मनाशी काहीएक करायचं ठरवलं की ते प्रत्यक्षात घडतं. त्यासाठी लागते ती अविरत मेहनतीची तयारी, घरच्यांचा पाठिंबा आणि नव्या गोष्टींना-आव्हानांना सामोरं जायची मानसिकता. माझं करिअरही याच गोष्टींमुळे आकार घेतं आहे. चौथीची शिष्यवृत्ती, बालवैज्ञानिक, भूगोल ऑलिम्पियाडमध्ये रौप्यपदक असे यशस्वी टप्पे पार करत माझं शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिरमध्ये झालं. अकरावी-बारावी वांद्रय़ाच्या नॅशनल महाविद्यालयात होतो. डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून संख्याशास्त्रात (स्टॅटिस्टिक्स) बी.एस्सी. केलं. त्याच काळात एन.सी.सी. युनिटमधून ‘बी अ‍ॅण्ड सी’ सर्टिफिकेटही मिळवलं. इंडियन आर्मी आणि इंडियन एअरफोर्समध्ये ऑफिसर म्हणून भरती व्हायचा सहा वेळा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने प्रत्येक वेळी ‘कॉन्फरन्स आऊट’ झालो. पुढे मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातून (सध्याचं मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पब्लिक पॉलिसी) एम. ए. इकॉनॉमिक्स केलं. एम.ए.च्या वर्षांतच जुहूच्या एल. एस. रहेजा महाविद्यालयात लेक्चरर म्हणून इंटर्नशिप केली. अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्र शिकवताना अध्यापनाची गोडी लागली. नंतर वांद्रय़ाच्या एम. एम. के. महाविद्यालय आणि नॅशनल महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर आणि लेक्चरर म्हणून ५ ते ७ महिने बी. कॉमच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र शिकवलं.

एम. ए. सुरू असतानाच मनाशी ठरवलं की, परदेशात जाऊन शिकायचं आणि शिकवायचंही! घरची परिस्थिती व्यवस्थित असूनही लाखो रुपये भरून किंवा शैक्षणिक कर्ज काढून शिकायला माझा ठाम विरोध होता. माझा करिअरग्राफ बघून ‘युनिव्हर्सिटी ऑफ नेवाडा रेनो’ने मला टीचिंग असिस्टंटशिप ऑफर केली. त्यामुळे शिक्षणासाठी काहीही शुल्क भरावं लागलं नाही. उलट दरमहा स्टायपेंड मिळाल्याने खर्च भागून बचत करणं सुरू झालं. अमेरिकेत जगभरातून लोक शिकायला आणि काम करायला येतात. इतर देशांतील लोकांना भेटायला, त्यांच्याकडून नव्या गोष्टी शिकायला, त्यांना भारताबद्दलच्या गोष्टी सांगायला अमेरिका हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. मीही अनेक देशांतल्या लोकांना भेटलो, त्यांच्याकडून नव्या गोष्टी शिकलो आणि स्वत:चे अनुभवही शेअर केले. नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश या आपल्या शेजारच्या देशांतील लोकांशी इथे राहून चांगली मैत्री झाली. इथल्या शिक्षणपद्धतीची जगभरातील विद्यार्थ्यांना भुरळ पडलेली दिसते. त्यात बंधनं आणि निर्बंध खूप कमी आहेत. उदाहरणार्थ- वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी इंग्रजी साहित्य किंवा भूगोलाचाही अभ्यास करू शकतो. क्रमांक पद्धत आणि कॉपी-पेस्ट वृत्ती अजिबात नाही. कॉपी करताना पकडले गेल्यास होणारी शिक्षा खूप कडक असते. एखादा विषय समजायला किती सोपा किंवा कठीण असतो ते तो शिकवणाऱ्या प्राध्यापकांवर अवलंबून असतं. आपल्याइतकं गुणांना महत्त्व दिलं जात नाही. मी शिकवतो, तेव्हा आपल्यासारखं ‘परीक्षेत काय येणार आहे’, असे प्रश्न विद्यार्थी कधीच विचारत नाहीत. विद्यार्थ्यांचा कल विषय शिकून आणि समजून घेण्याकडे अधिक असतो.

माझं एम. एस. इकॉनॉमिक्सचं शिक्षण पूर्ण झालं असून सध्या मिसिसिपीमध्ये एम.एस. स्टॅटिस्टिक्स शिकतो आहे. इकॉनॉमिक्स हा विषय ‘एसटीईएम’ म्हणजेच सायन्स-टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग-मॅथमॅटिक्स यापैकी कशातही येत नाही. पण स्टॅटिस्टिक्स हा विषय ‘एसटीईएम’मध्ये येतो आणि यूएसमध्ये ‘एसटीईएम’ विषयात शिक्षण घेतल्याचे फायदे आहेत. मी आणखी एक एम.एस. करण्याचा निर्णय घेतला. या अभ्यासक्रमात स्टॅटिस्टिक्समधले ‘एक्सपीरिमेन्टल डिझाईन’, ‘अ‍ॅडव्हान्स्ड प्रोबेबिलिटी’, ‘डेटा अ‍ॅनालिसिस’सारखे विषय शिकवले जातात. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून माझा दीड वर्षांचा अभ्यासक्रम संपला आहे. मिसिसिपीमध्ये शिक्षण सुरू असतानाच ‘जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’च्या ‘सेंटर फॉर टॅलेंटेड युथ’मध्ये शिकण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी’त दरवर्षी उन्हाळ्यात ‘सेंटर फॉर टॅलेंटेड युथ प्रोग्रॅम’ (सीटीवाय) वेगवेगळ्या शहरांत आयोजित केला जातो. त्याअंतर्गत शाळा (पाचवी ते दहावी), महाविद्यालयातील (अकरावी-बारावी) विद्यार्थ्यांना मास्टर्स लेव्हलच्या संकल्पना शिकवण्यात येतात. आपल्याला आवडणारा विषय त्या विद्यार्थ्यांनी निवडायचा असतो. कॉम्प्युटर सायन्सपासून ते बायॉलॉजीपर्यंत आणि मॅथमॅटिक्सपासून ते हिस्ट्रीपर्यंत असंख्य विषयांचा समावेश यात असतो. फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्ग हादेखील या सीटीवाय उपक्रमातील माजी विद्यार्थी आहे. या उपक्रमांतर्गत मी अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एम. एस. लेव्हलच्या अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्रातील संकल्पना शिकवतो. गेल्या वर्षी मी प्रिस्टन (न्यूजर्सी) आणि लॅन्कॅस्टर (पेनसिल्वेनिया) या शहरांमध्ये जाऊन शिकवलं होतं. अत्यंत प्रतिष्ठित अशा न्यूजर्सीच्या ‘प्रिस्टन युनिव्हर्सिटी’मध्ये ‘गेम थिअरी’ हा अर्थशास्त्रातील महत्त्वाचा विषय शिकवण्याची संधी मला मिळाली. याच युनिव्हर्सिटीमध्ये ‘गेम थिअरी’मधला ‘नॅश इक्विलिब्रियम’ हा एक महत्त्वाचा सिद्धांत गणितज्ज्ञ जॉन नॅश यांनी सर्वप्रथम मांडला होता.

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य कार्यालयात (युनायटेड नेशन्स हेडक्वॉर्टर्स) इंटर्नशिप मिळाली. ही संधी मिळणं, म्हटलं तर दुर्मीळ आणि म्हटलं तर आव्हान होतं. यु.एन. कोणत्याही प्रकारचा मोबदला देत नाही. न्यूयॉर्कमध्ये जायच्या-यायच्या प्रवासापासून ते राहणीमानापर्यंत सगळ्या गोष्टी स्वखर्चाने कराव्या लागतात. प्रथमदर्शनी अत्यंत खर्चीक वाटणाऱ्या या संधीसाठी स्पर्धा मात्र भरपूर आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी यू.एन.मध्ये इंटर्नशिप करता यावी, म्हणून चक्क कर्ज काढूनही येतात. या विद्यार्थ्यांमध्ये युरोपियन, अमेरिकन आणि कॅनेडियन विद्यार्थ्यांचं प्रमाण अधिक असतं. आपण भारतीय या बाबतीत जरा मागंच पडतो. इथे काम करण्याचा अनुभव जगावेगळा होता. माझं काम वेगवेगळ्या देशांतील एनजीओना यूएनच्या वतीने लाखो यूएस डॉलर्सची डोनेशन (मदत) मंजूर करण्याचं होतं. एखाद्या दिवशी अफगाणिस्तानची डोनेशन मंजूर केल्यावर संध्याकाळी घरी जाताना एखाद्या फुडकार्टवर खाताना एका अफगाणी माणसाशी बोलणं होत असे, तेव्हा त्याला त्या डोनेशनविषयी सांगताना एक विलक्षण आनंद होत असे. तसंच यूएनमध्ये एका निकाराग्वन मुलाशी ओळख झाली आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी एका निकाराग्वन देशाच्याच डोनेशनवर काम करत असताना त्या देशाशी निगडित प्रश्न मी थेट माझ्या नव्या मित्रालाच विचारले. त्यालाही मला माहिती देताना आनंद झाला, कारण आम्ही निकाग्वाला डोनेशन देत होतो. मुख्य म्हणजे पाश्चात्य देशांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात भारतीय ठसा उमटवण्याचा आनंद वेगळाच होता. तिथे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शिष्टाचार, कार्यालयीन पद्धती, आंतरराष्ट्रीय सनदी अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव आदी अनेक गोष्टी शिकता आल्या. मिसिसिपी स्टेट युनिव्हर्सिटीसारख्या जवळपास २० ते २२ हजार विद्यार्थीसंख्या असणाऱ्या विद्यापीठातून यू.एन.साठी निवडला गेलेला मी पहिला आणि एकमेव विद्यार्थी होतो.

माझ्या आई-बाबा आणि आजोबांची उणीव मला प्रकर्षांने जाणवते. सुग्रास आणि पौष्टिक जेवण आग्रहाने खाऊ  घालणारी आई नसते. जेवण-घरकामासह अनेक गोष्टींमध्ये स्वावलंबनाचे धडे गिरवावे लागतात. आर्थिक पाठबळ पुरवायला बाबा नसतात. विविध बिलं आणि विद्यापीठाचं शुल्क भरणं, शिक्षण संपल्यावर लगेच नोकरीसाठी धडपड करणं हे सगळं स्वत:च करावं लागतं. आईबाबांचं इतक्या वर्षांचं प्रेम, त्यांचे कष्ट या सगळ्या गोष्टी इथे आल्यावर खऱ्या अर्थाने आणि प्रकर्षांने जाणवल्या. न्यूयॉर्कमध्ये काम करताना न्यूयॉर्क ते न्यूजर्सी प्रवास करताना आजोबांनी माहीममध्ये घेतलेल्या घराचं मोल आणि महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं. पण इथल्या माझ्या प्रत्येक निर्णय आणि कृतीमध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ती माझी बायको- सायली. स्टॅटिस्टिक्स शिकण्याची गोडी तिच्याचमुळे लागली.

जवळपास प्रत्येक मोठय़ा अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये ‘इंडियन स्टुण्डण्ट असोसिएशन्स’ असतात. मिसिसिपीमधल्या ‘इंडियन स्टुण्डण्ट असोसिएशन’चा मी अध्यक्ष आणि सायली उपाध्यक्ष आहे. विद्यापीठात भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख करून देणं, त्यांची तात्पुरती राहायची सोय करणं, भारतीय सण-उत्सव साजरे करणं, भारतीय प्राध्यापकांसह त्यांच्या कुटुंबीयांना या सगळ्या उपक्रमांत सहभागी करून घेणं आणि विद्यापीठात भारतीय संस्कृतीचा अन्य देशांतील लोकांना परिचय करून देणं ही आमच्या असोसिएशनची प्रमुख उद्दिष्टं आहेत. सुरुवातीच्या काळात इथे कल्चरल शॉक बसतो. आपल्यापेक्षा मोठय़ा माणसांनाही एकेरी नावाने हाक मारायची पद्धत आहे. नेहमीच्या बोलण्यात ‘थँक्यू-सॉरी’ हे शब्द सतत वापरले जातात. अमेरिकन बोलीभाषेत बऱ्याच शब्दांचा अर्थानुभव ब्रिटिश इंग्लिशपेक्षा वेगळा आहे. उदा- गाडीच्या डिकीला ‘ट्रंक’, मॉलमधल्या सामानाच्या ट्रॉलीला ‘कार्ट’ म्हणतात. इथे येताना मला सर्वाधिक भीती हीच वाटली होती की, मी बोललेलं इथल्या लोकांना कळेल की नाही? सुरुवातीच्या काळातलं माझं इंडियन अ‍ॅक्सेंटमधलं बोलणं कुणाला कळत नसे. मग हळूहळू इतरांचं बोलणं ऐकून, त्यांच्यासारखं काही शब्दांचं तंतोतंत उच्चारण करून माझ्या बोलण्यात बदल केल्यावर ते लोकांना कळू लागलं. आता माझ्या प्रत्येक पहिल्या लेक्चरमध्ये मी विद्यार्थ्यांंना हेच किस्से सांगतो. त्यांना ते ऐकून खूप मजा येते.

इथे सर्वप्रथम जाणवते ती स्वच्छ हवा, रस्ते आणि त्यावरच्या चिक्कार गाडय़ा. न्यूयॉर्कसारख्या काही शहरांचा अपवाद वगळता इथे फूटपाथवर चालताना माणसं दिसत नाहीत. सार्वजनिक वाहतूक सर्वच शहरांत उपलब्ध असतेच असं नाही. त्यामुळे कुटुंबासोबत राहायचं असेल तर गाडी घेण्याखेरीज पर्याय नाही. मी मिसिसिपीमध्ये राहायला आल्यावर रोजचं वाणसामान आणण्यासाठीही बसवर अवलंबून राहणं अशक्य होतं. त्यामुळे आम्हाला गाडी घ्यावीच लागली. नेवाडात स्टायपेंड वाचवून जमा झालेल्या पुंजीतून मला सेकंड हॅण्ड गाडी घेता आली. गाडी घेतली तेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स हातात असले तरी मला किंवा सायलीला अमेरिकेत गाडी चालवायचा काहीच अनुभव नव्हता. आमच्याच विद्यापीठातल्या एका अमेरिकन प्राध्यापकांची गाडी आम्ही विकत घेतली. आमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर गाडी घरी कशी न्यायची हा प्रश्न दत्त म्हणून उभा ठाकला. हे बहुतेक त्या प्राध्यापकांनाही कळलं असावं. त्यांनी आम्हाला धीर देत काहीही लागलं तर फोन करा असं सांगितलं. घरी पोहचल्यावर काही वेळाने त्यांचा ‘नीट पोहचलात ना?’, असा मेसेज आला. त्यानंतरही गाडीविषयी त्यांचा सल्ला आम्ही विचारत असू. आता आम्हाला चांगली गाडी चालवता येत असल्याने बऱ्याच लांबचा पल्ला गाडीने गाठता येतो. गेल्या वर्षी माझे आईबाबा इथे आल्यावर त्यांना कॅलिफोर्निया, नेवाडा, मिसिसिपी, टेनेसी, वॉशिंग्टन डी.सी.ला आमच्या गाडीनेच घेऊ न गेलो होतो. गाडीतल्या गणपती बाप्पाबद्दल आमच्या अमेरिकन मित्रमंडळींना कुतूहल वाटतं. आम्ही आमच्या परीने त्यांना गणपतीच्या गोष्टी सांगतो. एम .एस. झाल्यानंतर भारतात येऊ न पुढे काय करायचं, हे अद्याप ठरवलेलं नाही. बघू या काय होतं ते..!

कानमंत्र

  • अमेरिकेत वागण्या-राहण्याचे नियम हळूहळू शिकून आत्मसात करा. आपल्या काही ठरावीक भारतीय सवयी शक्यतो सोडलेल्याच बऱ्या.
  • इथं शिक्षणाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्या साधण्यासाठी स्वत:च्या कर्तृत्वावर विद्यापीठात असिस्टंटशिप मिळवण्याचा प्रयत्न करून शिक्षण घ्या.

संकलन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mississippi state university